Thursday, January 8, 2015

कुमारी माता वर्षभरात दुप्पट

kumarimata
यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांची संख्या वर्षभरात दुप्पट झाल्याचे धक्कादायक आणि तेवढेच चिंताजनक वास्तव समोर आले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याच्या आदिवासीबहुल झरी जामणी तालुक्यात ५२ कुमारी माता होत्या. ही संख्या यावर्षी दुपटीहून अधिक म्हणजेच ११९ वर पोहोचली आहे. प्रत्यक्षात संख्या कितीतरी अधिक आहे. यावरून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे कठोर कायदे, विविध सरकारी योजनांना सपशेल फेल ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील तेलंगण सीमेलगतच्या झरी जामणी तालुक्यातील गरीब, आदिवासी मुली वर्षानुवर्षांपासून अत्याचार सहन करीत आहेत. कुमारी माता होत आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला प्रभावळकर यांनी झरी तालुक्यातील निमणी या गावाला भेट देऊन कुमारी मातांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या कुमारी मातांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगत पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी भेट दिल्याने आता कुमारी मातांची समस्या सोडविण्यात मदत होईल, असा विश्वास त्यावेळी व्यक्त झाला होता. पण, यंदा कुमारी मातांचा आकडा दुप्पट झाला आहे. मुळात गर्भवती असताना अंगणवाडीसेविकांच्या संपर्कात येणाऱ्या कुमारी मातांचीच नोंद सरकार दरबारी होते. मात्र बदनामीच्या भीतीपोटी अनेक आईवडील मुलींची ही माहिती दडवून ठेवतात. त्यांची प्रसूतीही घरीच केली जाते. त्यामुळे हा आकडा प्रत्यक्षात अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment