Thursday, January 8, 2015

आता 'लव्ह जिहाद'वाल्यांची वापसी


Karina

पहिल्याच अधिवेशनात नरेंद्र मोदी सरकारला चाचपडायला लावणारे 'घर वापसी'चे वादळ सहजासहजी शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. मोदींच्या नाराजीनंतर रस्त्यावरील 'घर वापसी' थंडावल्याचे वाटत असतानाच नव्या मार्गानं तिनं डोकं वर काढलं आहे. आता 'दुर्गा वाहिनी' या संघटनेनं 'घर वापसी'ला 'लव्ह जिहाद'ची जोड देत मुस्लिमांशी विवाह केलेल्या हिंदू तरुणींना 'वापसी'चे आवाहन केले आहे. अभिनेता सैफ अली खानशी निकाह करणाऱ्या करिना कपूरला यासाठी 'पोस्टर गर्ल' बनविण्यात आलं आहे.

'दुर्गा वाहिनी' ही विश्व हिंदू परिषदेची महिला शाखा आहे. या संघटनेचे मुखपत्र असलेल्या 'हिमालय ध्वनी' मासिकाचा ताजा अंक 'लव्ह जिहाद'वर आहे. त्यावर अभिनेत्री करिना कपूर हिचा अर्धा चेहरा हिंदू व अर्धा चेहरा नकाबाने झाकलेला दाखविण्यात आला आहे. त्याखाली 'धर्मांतरण से राष्ट्रांतरण...' असा मथळा देण्यात आला आहे. दुर्गा वाहिनीच्या उत्तर भारत प्रांत समन्वयक रजनी ठुकराल यांच्या मार्गदर्शनाखाली हा अंक छापण्यात आला आहे.

'धर्मांतरामुळेच आपल्या देशाचे तुकडे झाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. धर्मांतरामध्ये 'लव्ह जिहाद'चा मोठा वाटा असतो. त्यामुळं याविषयी हिंदू समाजामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. एखादी तरुणी 'लव्ह जिहाद'च्या जाळ्यात अडकून मुस्लिम झाली असेल आणि आता तिला पुन्हा मूळ धर्मात यायचं असेल तर तो तिचा हक्क आहे,' असं ठुकराल यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

याविषयी ठुकराल यांना विचारलं असता, 'मुस्लिमांनी दगा देऊन लग्न केलेल्या १६ हिंदू मुलींनी 'घर वापसी'साठी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यातील दोघींना आम्ही पुन्हा मूळ धर्मात प्रवेशही दिल्याचा दावा त्यांनी केला.

पोस्टरवर करिनाच का?

'करिना कपूर ही एक सेलिब्रिटी आहे. तरुणवर्ग तिचं अनुकरण करतो. करिना करू शकते तर आपण का नाही असं त्यांना वाटतं. म्हणूनच तिचा फोटो आम्ही मासिकाच्या मुखपृष्ठावर वापरल्याचं रजनी ठुकराल यांनी सांगितलं.

सैफकडून निषेध

हिंदुत्ववाद्यांच्या या कृतीचा सैफ अली खान यानं निषेध केला आहे. 'हे कृत्य किळसवाणं आहे, पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. हा आडाणीपणा आणि धर्मांधता देशासाठी घातक आहे,' असं तो म्हणाला.

No comments:

Post a Comment