Monday, January 12, 2015

पौराणिक खेळ खेळण्याची संधी

कधी पौराणिक कथा-मालिकांमध्ये वाचले-पाहिलेले तर कधी वस्तुसंग्रहालयात काचेपलीकडून न्याहाळलेले सारीपाट-Saripat, गंजिफा-Ganjifa, विविध प्रकारचे बुद्धिबळ-Chess यांसारखे खेळ प्रत्यक्ष खेळण्याची संधीच सीएसटीच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये चालून आली आहे. प्राचीन भारतीय संस्कृती विभागाने दरवर्षीपणे यंदाही 'विविधा' या महोत्सवाचे आयोजन केले असून, यामध्ये विविध प्राचीन खेळ केवळ पाहण्याचीच नव्हे, तर खेळण्याचाही आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.



 गेली १८ वर्षे होत असलेल्या या महोत्सवात यापूर्वी इराण, ब्राझिल, कोकण आदी संकल्पनांवर आधारित कार्यक्रम केले होते. यंदा या महोत्सवाची संकल्पना आहे, चतुरंग! म्हणजेच बैठ्या खेळांचे रंगतदार, मनोरंजक प्रकार. त्यात नक्षत्रांवर आधारित पत्ते म्हणजेच गंजिफा-ganjifa, नाट-Nat, अष्टचम्मा-Ashtachamma, सात प्रकारचे बुद्धिबळ-Chess, गायचोळा-Gaychola, पालगुंडी-Palgundi, मंकल-Mankal, कौआ-Cawaa, नवकाकडी-Navkakadi अशा सहसा ऐकायला, पहायला किंवा खेळण्यास न मिळालेल्या खेळांचा समावेश आहे. १२ व १३ जानेवारी रोजी फेस्टिवल रंगणार आहे.

कलेला वाव

सेंट झेवियर्समध्ये भरणाऱ्या प्राचीन खेळांची माहिती देणाऱ्या 'विविधा' या फेस्टिवलमधून नव्या पिढीला जुन्या खेळांचा आनंद देण्याचा तर उद्देश आहेच, शिवाय हे खेळ घडवणाऱ्या पारंपरिक कारागिरांच्या कलेला वाव देण्याचाही उद्देश आहे.

या फेस्टिवलमध्ये प्राचीन खेळांचे महत्त्व समजावून ते कशा पद्धतीने खेळायचे हे सेंट झेवियर्सचे विद्यार्थी सांगतील. क्रिकेट, फुटबॉल आणि मोबाइल गेमच्या जमान्यात जुन्या खेळांचा विसर पडलाय. नवीन पिढीला या खेळांची ओळखही नाही. त्यामुळे या उपक्रमांतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे खेळ पोहोचवण्याचा विभागाचा मानस आहे. पारंपरिक कारागिरांना यातून उत्पन्न मिळून त्यांच्या कलेला वाव मिळावा हाही, या फेस्टिवलचा उद्देश असल्याचे विभागप्रमुख डॉ. अनिता राणे-कोठारे यांनी सांगितले.

हा आमच्या विद्यार्थ्यांनी उभा केलेला महोत्सव आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचे काम आम्ही करत असलो तरी प्रत्यक्ष जबाबदारी विद्यार्थ्यांवर असल्याने त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग, वस्तूंचे योग्य प्रदर्शन आदींचा अनुभव मिळतो.

धडेही मिळणार

विशेष म्हणजे हे खेळ मोठ्या आकारात असून ते खेळण्याचे धडेही दिले जाणार आहेत. यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण दिले गेले आहे. खेळ, त्यांचे तक्ते, प्रदर्शन वस्तू, खेळांच्या प्रतिकृती यांचाही सर्वांनाच आनंद घेता येईल. १२ व १३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत कॉलेजच्या प्रांगणात हे प्रदर्शन भरेल. ते सगळ्यांसाठी विनामूल्य खुले आहे.

No comments:

Post a Comment