Sunday, January 18, 2015

द्रौपदी आहे तरी कोण?

महाभारतातल्या द्रौपदीकडे क्षत्रिय कन्या म्हणून पाहिलं जातं. परंतु तिच्या वागण्या-व्यवहारातला स्वतंत्र बाणा पाहिला की, ती विमुक्त वनकन्याच अधिक शोभते. प्रसिद्ध हिंदी लेखिका सुमित्रा अग्रवाल यांनी आपल्या दहा वर्षांच्या संशोधनातून हेच सिद्ध केलं आहे...
................

द्रौपदी महाभारतातील एक बहुचर्चित नायिका. तिच्या तेजाने दिपणारी मंडळी आहेत, तसंच भीषण भारतीय युद्धाची खलनायिका म्हणून तिच्यावर संतप्त होणारी मंडळीही आहेत. डॉ. राममनोहर लोहियानी स्त्रीत्वाचं आदर्श प्रारूप म्हणून तिची शिफारस केली आणि स्त्रीचळवळीच्या विचारमंथनातही दौपदीला स्थान मिळालं.

डॉ. सुमित्रा अग्रवाल या द्रौपदीच्या तेजस्वितेमुळे तिच्याकडे आकर्षित झाल्या. या तेजस्वितेचं रहस्य शोधून काढण्यासाठी त्यांनी गेलं दशकभर अभ्यास केला. द्रौपदी एक नागरकन्या म्हणून न घडता एक वनकन्या म्हणून आदिजमातीच्या परिवेशात वाढली आणि तिच्या लोकविलक्षण स्त्रीत्वाचा उगम त्यात आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. त्यांच्या विवेचनाचा गोषवारा पुढीलप्रमाणे :

द्रौपदी यज्ञकुंडातील अग्निशिखांतून निर्माण झाली असं महाभारत नोंदवतं. 'द्रुपदाचा द्रोणाकडून अपमान झाला होता. या अपमानाचा वचपा काढण्यासाठी आपल्याला एक अजेय पुत्र असावा असं त्याला वाटत होतं. त्यासाठी त्याने नगराबाहेर वनस्थलीत एक यज्ञ केला आणि त्यातून एका क्षणी त्याला अग्निशिखांतून प्रकट होणारा एक मुलगा व मुलगी प्राप्त झाली असं महाभारत नोंदविते.'

आदिपर्वातील वर्णन असं - 'यज्ञाच्या अग्नीतून अग्निदेवतेसारखा तेजस्वी असा एक पुत्र बाहेर आला. त्याच्या अंगावर उत्तम कवच होतं, डोक्यावर मुकुट होता, हातात खड्ग व धनुष्यबाण होतं. ...बाहेर पडताच तो एका उत्तम रथावर चढला आणि युद्धाच्या घोषणा देऊ लागला.' दुपदपुत्र पूर्ण पुरुष या स्वरूपातच प्रकट झाला असं यातून दिसतं.

द्रौपदीच्या बाबतीत आदिपर्व नोंदवतं - 'यज्ञाच्या वेदीवरून एक कन्या प्रकट झाली. तिला पुढे पांचाली म्हटले गेले. सुंदर कटीप्रदेश असणाऱ्या या कन्येच्या प्रकट होण्याबरोबर आकाशवाणी झाली... या कन्येचे नाव कृष्णा आहे. ही सर्वाधिक सुंदर तरुणी योग्य वेळ येताच देवांचे काम करून देईल.'

याचा अर्थ द्रौपदी द्रुपद राजाला मिळाली ती पूर्ण स्त्रीच्या रूपात आणि त्यावेळी तिच्या जगण्याचे प्रयोजनही रेखून दिलेले होते.

मग द्रौपदी जन्मली कुठे, वाढली कुठे? महाकवी तिला अयोनीसंभवा संबोधतात. महाकाव्याच्या नायिकेला अशी अलौकिकता देणे, क्रमप्राप्त असू शकते. पण महाभारत हे फक्त काव्य नसून इतिहासही आहे असे आपण मानतो. त्यामुळे द्रौपदीचे जन्मरहस्य आपल्याला उलगडले पाहिजे. तिचा जन्म मानवीगर्भापासून मानवी मातापित्यांपासूनच होणार हे आपण मानले पाहिजे. त्या दृष्टीनं विचार करता यज्ञवेदी नगराच्या बाहेर वनस्थलीत होती हे आपण लक्षात घेऊ. ही जुळी मुलं याजकाना यज्ञवेदीच्या आसपास खेळताना मिळाली अशा लोककथा आहेत. त्यांना राजघराण्यात सामील करून घेताना अग्निशुद्धाचा विधी केला गेला असावा. मूळात दौपदी वनकन्या असावी.

आदिजमातीशी द्रौपदीचा घनिष्ठ संबंध असावा असे मानण्यास आणखीही काही कारणं डॉ. अग्रवाल यांनी नोंदवली आहेत. द्रौपदीचे शारीरिक व मानसिक व्यक्तिमत्त्व आर्यवंशीयांचे समजले जाते, त्याप्रकारचे नाही. तिचा सावळा वर्ण, निळे कुरळे केस, एखाद्या शिल्पाप्रमाणे असणारी देहयष्टी आणि तिच्या सौंदर्याचा मादक प्रभाव, दौपदीला आदिवासी वंशाशी जोडतो.

तिची मनोरचना, स्त्रीत्व वा लैंगिकताही आदिवासी वंशाशी मिळती जुळती आहे. मुख्य भिन्नता स्वातंत्र्याच्या अनुभावात आहे. नागरकन्या एका विशिष्ट चौकटीच्या आत स्वतंत्र असते. पण ती चौकट आखण्याचे स्वातंत्र्य तिला नसते. एका वनकन्या एका सहससुंदर वातावरणात वाढते, आपली मानमर्यादा स्वत:च आखून घेते. दौपदीची स्वातंत्र्येच्छा वनकन्येच्या जातकुळीची आहे. सुरुवातीपासून आपल्या देहमनावर आपला अधिकार तिने अबाधित राखला आहे.

द्रौपदीची पुरुषांशी असलेली नाती तपासताना कृष्णाशी 'सखा' म्हणून असणारे नाते विशेष अभ्यसनीय आहे. 'खय या आदिवासी जमातीतील मुलगी' दिंगनामध्ये (युवागृहात) कोणत्याही मुलाशी अंतरंग मैत्री करते. तिला 'जोस्ती' असे म्हणतात. यामध्ये यौनसंबंध असूही शकतात, नसूही शकतात. प्रत्येक मुलीला जोस्तीचा अधिकार आहे, असं खय समाज मानतो. जोस्ताचे नाव डाव्या दंडावर गोंदविण्याचाही प्रघात आहे. जोस्त पुढे नवरा बनू शकतो, पण बनतोच असं नाही.

कृष्ण द्रौपदीचा 'जोस्त' होता असे म्हटले तर! कृष्ण दौपदीच्या संबंधावर पांडव व कृष्ण यामधील संबंधाची छाया कधी पडत नाही.

आदिवासी समाजाची नैसगिर्क न्यायप्रवृत्ती प्रबळ असते आणि म्हणून माणसावरील अत्याचाराविरुद्ध ते सहज पेटून उठतात. दौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा याच न्यायभावनेतून सामना केला. त्यातून मनाला लागलेली आग कधीच विझू दिली नाही. ज्या सूडभावनेसाठी द्रौपदीची निंदा केली जाते तिचे समर्थन धर्म व न्याय यांचा आधार घेत तिने सभामंडपातच केले आहे. महाभारतीय युद्ध हे दौपदीसाठी धर्मयुद्धच होते.

द्रौपदीचे पंचपतित्व नागरसमाजात अमान्य व निंदनीय होते. दुपद राजालाही ते अमान्य होते. पण द्रौपदीने ते विवश न होता आनंदाने स्वीकारले, इतकेच नव्हे तर ते सफल करून दाखविले. बहुपतित्वाची प्रथा असणाऱ्या आरिय जमातीत आताही असे मानले जाते की 'जितका मोठा पतींचा समूह तितकी त्या स्त्रीची प्रतिष्ठा अधिक.' हा व्यवहार सफल करण्यासाठी काटेकोर नियम त्यात घालून दिलेले असतात. यापैकी काही जमातीत दौपदीची पूजा केली जाते, काही ठिकाणी तिची मंदिरे आजही आढळतात, हाही दौपदीचा या वंशाशी असणाऱ्या संबंधाचा पुरावाच नव्हे का?

डॉ. सुमित्रा अग्रवाल म्हणतात, 'द्रौपदीचा देहविरोध, अदम्य स्वातंत्र्यचेतना निभिर्ड पारदर्शी स्वभाव, आत्मविश्वास, नैसर्गिक न्यायाबद्दलची दृढ आस्था, विशिष्ट मूल्यबोध, अन्यायाचा विरोध करण्याचे प्रचंड सामर्थ्य, स्त्रीच्या सन्मानासाठी सावधानता आणि या सर्वांना लपेटून असणारे एक ऊर्जासंपन्न गतिशील व्यक्तित्त्व असंच दर्शविते की द्रौपदी नागरकन्या नसून वनकन्या आहे.'

No comments:

Post a Comment