Tuesday, January 13, 2015

संघ दक्ष... नवे लक्ष्य! संघाचे काम ५ लाख लोकांपर्यंत नेणार


RSS - Rashtriy Swayamsevak Sangh

५१ हजार स्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम ५ लाख लोकांपर्यंत पोहचवा, असे आदेश रविवारी (११ जानेवारी) झालेल्या देवगिरी महासंगममध्ये देण्यात आले.

मराठवाडा व खान्देशातील तब्बल १५ जिल्हे, १२३ तालुके मिळून संघाच्या देवगिरी प्रांताची आखणी करण्यात आली आहे. या १५ जिल्ह्यांतून रविवारी तब्बल ५१ हजार स्वयंसेवक आले होते. त्या सर्वांना मकरसंक्रांत आणि २६ जानेवारीला 'भारत माता पूजन' असे ध्येय देण्यात आले आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा संदेश असलेले 'मकर संक्रमण संदेशा'चे पत्रक ५१ हजार स्वयंसेवकांना दिले आहे. हे स्वयंसेवक ज्या तालुक्यातून, गावातून आलेले होते, तेथे संघ मा‌हित नसलेल्या नव्या दहा जणांना भेटतील. आणि हे संदेश पत्रक देऊन संघाचे कार्य समजावून सां‌गतील.

महासंगममध्ये सहभागी झाालेल्या स्वयंसेवकांना त्यांच्या गावात, गल्लीत, कॉलनीत २६ जानेवारीला 'भारत माता पूजन' करण्यास सांगण्यात आले आहे. भारतमाता पूजन कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने बोलवायचे. त्यांना देशहित, राष्ट्रहित याकडे पहिले पाऊल टाकण्याचे आवाहन करायचे. त्यामुळे यातून 'संघाच्या शाखेकडे चला,' असा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा हेतू सफल होईल, अशी आशा संघातील धुरिणांना आहे.

५ हजार सरकारी कर्मचारी संघाच्या वेषात

संघाच्या देवगिरी महासंगाममध्ये शासकीय कार्यालयातील तब्बल ५ हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला. एकूण ५१ हजार स्वयंसेवकांमध्ये ५ हजार विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी बिनदिक्कतपणे सामील झाले होते. पूर्वी संघाचे काम करणे, अप्रत्यक्षरित्या संघाच्या जबाबदारी स्वीकारण्यासाठी शासकीय कर्मचारी धजावत नव्हते. नोकरी जाण्याची शक्यता असायची. निलंबित होण्याचे भय या शासकीय कर्मचाऱ्यांना असे, आता ही परिस्थिती राहिली नाही, हे यावरून स्पष्ट दिसत होते.

२०० जणांनी केली स्वच्छता

देव‌गिरी महासंगम यशस्वी झाल्यानंतर सोमवारी संघाच्या २०० हून अधिक स्वयंसेवकांनी या स्थळाच्या १०० एकर जमिनीवर साफसफाई केली. शोषखड्ड्यांमध्ये कचरा व्यवस्थापन करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

७५ टक्के युवक

देवगिरी महासंगममध्ये सहभागी झालेल्या ५१ हजार स्वयंसेवकांमध्ये ७५ टक्के युवक होते. १८ ते ३५ वयोगटातील युवकांची संख्या अधिक होती. यापूर्वी १९८३ मध्ये झालेल्या संघाच्या शिबिरास केवळ २५ हजार जण आले होते.

''संघाच्या बाहेरगावाहून आलेल्या ५१ हजार स्वयंसेवकांना संदेश पत्रक घेऊन त्यांच्या गावी पाठवले आहे. मकरसंक्रांत व २६ जानेवारीला हे स्वयंसेवक तब्बल ५ लाख १० हजार लोकांशी संवाद साधतील.''

- दिवाकर कुलकर्णी, सहकार्यवाह, शहर संघ.

No comments:

Post a Comment