Saturday, July 19, 2014

आत्मपरीक्षण - Self Analysis Spiritually

सर्वप्रथम आम्ही अडचणीत आलो आहोत, ताणतणावात आलो आहोत याची जाणीव आम्हाला होणे गरजेचे आहे. त्यानंतर त्या अडचणी, ते ताणतणाव यांचे कारण काय याचा खरा शोध आपण घेतला पाहिजे. याचा शोध प्रत्येकाला आपल्या अंतरंगात घ्यायचा असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या अंतरंगातूनच आपल्याला मिळू शकतात. आपल्या प्रश्नाचे स्वरूप, त्याची कारणे, त्या प्रश्नाचे वाढणे व त्या प्रश्नाचे विसर्जन कसे होते हे आपल्याला आतून कळत नाही, तोपर्यंत हे प्रश्न कधीच संपत नाहीत. अन्यथा जन्मोजन्मी ते प्रश्न आपल्या सोबत राहतातच आणि जास्त गहन होऊन आम्हाला ते अधिकाधित गर्तेत नेऊन सोडतात. सर्वांनी हे आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा आमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत. 

आमच्या प्रश्नांचे उत्तर बाहेर नाही. जी माणसे बहीर्मुख असतात ती प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधतात. त्यांना असे वाटते की बाहेरची परिस्थिती बदलली तर सर्व प्रश्न सुटतील. पण ते खरे नाही. बाहेरच्या परिस्थितीशी त्या खऱ्या शांतीचा काहीही संबंध नाही. परिस्थिती बदलल्याने आपले प्रश्न सुटत नसतात. अन्यथा जे संपूर्ण संपन्न झाले आहेत, ज्यांनी प्रचंड भौतिक व आर्थिक प्रगती केली आहे ते सुखी झाले असते. आपणही काही कमी आर्थिक व भौतिक प्रगती केलेली नाही; पण आपण त्या सुख-शांतीला अप्राप्त आहोत हा आपला अनुभव नाही का? खरे तर त्या सुख-शांतीचा संबंध गरिबी अथवा श्रीमंतीशी अजिबात नाही. त्या सुख-शांतीचा संबंध आत्मज्ञानाशी आहे व आत्मज्ञानाचा संबंध मनाच्या व अंतर्मनाच्या संपूर्ण शांत होण्याशी आहे. जर तुम्ही अज्ञानी असाल, तर तुम्ही गरीब असा वा श्रीमंत असा; काहीच फरक पडत नाही. श्रीमंत माणूस फक्त श्रीमंतीत राहणारा मोठा भिकारी असतो. ज्याला अजून हवे आहे, ज्याची भूक शमलेली नाही, जो सारखा पद, पैसा, प्रतिष्ठेच्या मागे धावतो आहे तो खरे तर अंतरंगातून भिकारीच असतो. अशा व्यक्तीची चर्चा करताना ज्ञानेश्वर माऊली १४व्या अध्यायात त्या व्यक्तीचे वर्णन राजवाड्यात राहणारा भिकारी असे करतात. किती यथार्थ वर्णन आहे बघा. 

आमची परिस्थिती काय वेगळी आहे? आम्ही भिकारीच आहोत. अन्यथा पद, पैसा, प्र‌तिष्ठेच्या मागे का लागलो असतो? आमच्या अंतरंगात एक पोकळी आहे, एक रिक्तता आहे, एक अपूर्णता आहे. ती पोकळी, ती रिक्तता, ही अपूर्णता आम्हाला सतत जाणवते, अस्वस्थ करते. या रिक्ततेची, पोकळीची, अपूर्णतेची जाणीव आम्हाला सुख, शांती, समाधानाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते. ही जाणीव प्रत्येक मनुष्यमात्रात आहे. ती पशुमध्ये, वनस्पतीत, पक्ष्यांत नसते. ही जाणीव फक्त मनुष्य प्राण्यातच आहे आणि अस्तित्वाच्या उत्क्रांतीचा हा अखेरचा टप्पा आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे आत्मज्ञानच आहे. म्हणून मनुष्य जन्माला सर्वच धर्मांत अनन्य महत्त्व दिले गेले आहे. पण ही जी अपूर्णता, रिक्तता किंवा पोकळी आहे जी आम्हाला सतत जाणवते तिचा अर्थ मात्र आमच्या सुन्न डोक्याला कधीच कळत नाही.

- विजय पांढरे Vijay Pandhare


आत्मसंवादाच्या वाटेवर...

एकाच कार्यालयातील दोन म‌ित्रांचा कार्यालयाबाहेर न‌ित्यभेटीचा उपक्रम अनेक वर्षे सुरू होता. या भेटीत त्यांच्यात अनेक व‌िषयांवर चर्चा व्हायची. या दोघांपैकी एकाच्या मनात व‌िचार डोकावला, उद्यापासून आपण भेटायचे. चर्चाही करायची. मात्र, हजर नसणाऱ्या माणसाचं नावही उच्चारायचं नाही. त्याचे दोष तर सोडाच, पण गुणांबद्दलही बोलायचं नाही. आपण आपले सुख-दु:खाचे भावव‌िश्व एकमेकांपुढे मांडू. 

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या द‌िवशी दोन्ही म‌ित्र रोजच्या भेटीच्या जागेवर पोहचले. एकमेकांव‌िषयी चौकशीची औपचारिकता पार पडली. पुढे काय बोलणार? बराच वेळाने एकमेकांकडे बघत दोघेही चालते झाले. दुसऱ्या द‌िवसापासूनच्या भेटी त्यांना अंतर्मुखतेच्या आणि आत्मपरीक्षणाच्या वाटेवर घेऊन गेल्या. व‌िषयांतराच्या माध्यमातून नकळत त्यांच्यात वृत्त्यांतर घडले होते. 

या म‌ित्रांच्या जागी आपण अनेकदा असतो. इतरांचे गुण-दोष व त्यांच्या नकारात्मक गोष्टींचा पाढाच आपल्याला पाठ असतो. मात्र, इतरांना आपल्याकडून लावले जाणारे न‌िकष हे आपण स्वत:साठी वापरत नाही. परिणामी आत्मसंवादापासून आपण वंच‌ित राहत जातो. आत्मसंवाद आणि आत्मपरीक्षणाअभावी आपल्यातील दोषांची जाणीवच आपल्याला झाली नाही तर आपल्या प्रगतीला सुरुवात होणार तरी कशी? या स‌िद्धांताचे उदाहरण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या व‌िचारवैभवात सापडते. ते म्हणतात, 'प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गोंदवल्यात यावे. माझ्या रामासमोर उभे रहावे. माझा राम हा पारा असलेल्या आरशाप्रमाणे आहे. त्याच्यासमोर उभे राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचे दोष समजून येतील.' पुढे ते म्हणतात, 'आपल्यातील दोष आपल्याला समजणे ही सुधारणेची पह‌िली पायरी आहे.' यावरून जाणवते की इतरांच्या गुण-दोषांभोवती आयुष्यभर फ‌िरणाऱ्या आपल्या बुद्धीला आपण आत्मसंवादाची, आत्मच‌िंतनाची द‌िशा देण्याचा प्रयत्न आपण केला तर आत्मपरीक्षणाची वाट आपल्याला सापडेल. ही वाट आपल्याला आत डोकव‌िण्यास मदतशील ठरते. 

संतचरित्रातला एक व‌िचार असेही सांगतो की, 'आपण ज्या देवतेची उपासना करतो त‌िचे गुण आपल्या अंगी येतात.' या व‌िचारामागे एक मानस‌िक प्रक्र‌िया दडलेली असते. आपण रात्रंद‌िवस ज्यांच्या गुण क‌िंवा दोषांच्या च‌िंतनात आपली सर्व ऊर्जा केंद्रित करतो ते गुण क‌िंवा दोष नकळत आपल्या मनाचा ताबा घेतात. ही अत्यंत सूक्ष्म स्तरावर घडणारी मनोप्रक्रिया असल्याने त‌िची जाणीव आपल्याला होत नाही आणि आत्मसंवादाच्या पहिल्या पायरीवर पाऊलं टाकणं उभ्या आयुष्यात अनेक द‌िग्गजांनाही जमत नाही. अध्यात्माच्या वाटेवर मनाला पुढे नेण्यासाठी परन‌िंदा टाळण्याचा न‌िश्चय माणसाचे अंत:करण शुद्ध करतो. शुद्ध अंत:करणाची प्राप्ती ही अध्यात्माच्या वाटेवर टाकले जाणारे आणखी एक बळकट पाऊल आहे, याची जाणीव परन‌िंदा टाळण्याच्या पह‌िल्या पायरीवरील कृतीतून होते. 

- व‌िजय पांढरे Vijay Pandhare


गीता आणि ज्ञान...

गीता तसा आपला सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, पण गीता नीट संपूर्णपणे खोलात जाऊन क्वचितच कोणी अभ्यासत असेल. त्यामुळे गीतेचे आकलन वा माहिती आपल्याला पूर्णपणे नसतेच. 

गीतेत अध्याय किती, गीतेत श्लोक किती, प्रत्येक अध्यायाचे नाव काय प्रत्येक अध्यायात नेमके काय सांगितले आहे, गीतेतील अध्यायांत नेमके काय सांगितले आहे, गीतेतील अध्यायांचा एकमेकांशी कसा समन्वय आहे, या सर्व बाबींबाबत अज्ञान आहे. मग त्यात जे सांगितले आहे ते तत्त्व अनुभवावर प्रत्यक्ष जाणणे ही फार लांबची गोष्ट ठरते. 

ज्याने आत्मतत्त्वाची अनुभूती आपल्या स्वतःच्या अंतरात प्रत्यक्ष घेतली तो गीतेचा अर्थ आपल्या पूर्वसंस्कारानुसार लावतो. म्हणून कोणी कर्माला महत्त्व देतो, कोणी भक्तीला महत्त्व देतो, कोणी ध्यानाला महत्त्व देतो, तर कोणी ज्ञानाला महत्त्व देतो. पण कर्म, भक्ती ध्यान आणि ज्ञान या चारही गोष्टी एकच आहेत हे जो स्पष्टपणे जाणतो, त्यालाच गीता समजलेली असते. 

खरे तर आपल्याला गीता या शब्दाचा अर्थही माहीत नसतो. गीता शब्दाचा अर्थ माझ्याही वाचनात आलेला नाही. कुणीही त्याचा अर्थ सांगितलेला आढळत नाही. गीता या शब्दाचा अर्थ अत्यंत सोपा आहे. ग+ईतः= गीता, ग+ईतः म्हणजे कहाणी अहमभावाची, कहाणी अहंकाराची, The Story of ego, process of ego. ज्याला आपण 'मी' 'मी' म्हणतो ती नेमकी काय गोष्ट आहे, त्या मीची निर्मिती कशी होते, वाढ कशी होते, त्या मीचा अंत कसा होतो तो मी जन्म कसा घेत फिरतो, त्या 'मी'ची संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आहे हे सर्व स्वतःच्या अनुभूतीवर अंतरंगात प्रत्यक्ष जाणणे म्हणजे गीता जाणणे होय. 

ज्ञान हे वाचून लाभत नसते. वाचून लाभते ती केवळ माहिती असते, त्यापेक्षा जास्त नाही. आणि माहिती गोळा करणारा कधीच ज्ञानी नसतो; कारण त्यांच्या कामक्रोधादि मूढपणात काहीही फरक पडलेला नसतो. माहिती मनुष्याचे अंतरंग बदलू शकत नाही. केवळ प्रत्यक्ष ज्ञानच मनुष्याचे अंतरंग बदलत असते. बाकी सर्व बदल वरवरचे असतात, दिखाऊ असतात. आणि वरवरचे बदल तुमचे दुःख, तुमच्या चिंता, तुमच्या कामना यांचे कधीच हरण करत नाहीत. उलट वरवरचे बदल दुःख, चिंता, भय, कामना वाढवतात. म्हणूनच मनुष्य जितका अधिक पुस्तकी माहितीवाला तितके त्याला मनोकायिक रोगांनी जास्त पछाडलेले असते, हे वैश्विक सत्य आहे. 

दुसरा आपल्या वापरातला महत्त्वाचा शब्द म्हणजे धर्म. धर्म म्हणजे काय हे अनेकांना नेमके कळलेले मसते. आपापल्या जडबुद्धीने, तर्कबुद्धीने आपण धर्म जाणत असतो. 

धर्म या शब्दाचा अतिशय खोल अर्थ आहे. मी नेमका काय, त्याचे स्वरूप काय, तो कशाशी संबंधित आहे की तो वैश्विक आहे हे प्रत्यक्ष जाणणे, ही संपूर्ण प्रक्रिया जाणणे म्हणजे धर्म होय. सर्व जगाताचा धर्म एकच आहे हे जो प्रत्यक्ष अनुभवतो, तो 'मी' होय हेच अद्वैत तत्त्वज्ञान होय. पण ती अनुभुती प्रत्यक्ष अंतरंगात प्रकटणे महत्त्वाचे आहे. 

- विजय पांढरे Vijay Pandhare


निष्काम भक्ती

संपूर्ण अस्तित्व काय आहे?, निसर्ग काय आहे?, हे जग कशापासून निर्माण झाले?, मी कोण आहे?, ही पंचमहाभुते कशी निर्माण होतात, हे आकार, हे विविध गुण कसे निर्माण होतात?, हे जग कसे अस्तित्वात येते?, हे कालचक्र, भवचक्र नेमके कसे चालते, हे सर्व जाणणे म्हणजे अध्यात्म वा धर्म जाणणे होय.

यासाठीच वेद, शास्त्र, पुराणे निर्माण झाली आहेत. पण आज जगामध्ये ज्ञान लोपले असून बेगडी ज्ञान जगात विविध अर्थ घेऊन वावरताना स्पष्टपणाने दिसत आहे. या गोंधळामुळेच गीतेचे विविध अर्थ लावले गेले आहेत. पण गीतेचे मूळ निष्काम होण्यात आहे हे आपण नीटपणाने जाणले पाहिजे. तुम्ही भक्ती करा की ध्यान करा की कर्म करा की ज्ञानमार्गी व्हा; सर्वांचे मूळ निष्कामतेतच आहे. भक्ती, ज्ञान, कर्म व ज्ञान या सर्वांत जर निष्कामता हा मूळ गुण नसेल तर मग त्या सर्व गोष्टी, सर्व मार्ग व्यर्थ होत, हे आपण प्रथम जाणून घेतले पाहिजे. खरेतर निष्काम व्हायला एखादा ठराविक मार्ग, पद्धत लागत नाही. निष्कामता केवळ जीवनात विविध प्रसंगी येणाऱ्या सुख-दु:खाच्या, भयाच्या, चिंतेच्या अनुभवास आपण समजून घेतले तरच अंतररंगात येत असते. निष्काम होणे हेच सर्व साधनांचे सार आहे. पण आज चित्र अगदी उलटे आहे.

जो मनुष्य स्वत:ला जाणत नाही व जगाला सुखी करायला निघाला आहे, त्याच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी आहे. अशा भ्रमित लोकांच्या हाती या भौतिक जगाची सत्ता असल्यानेच आज जग दु:खी झालेले आहे आणि अधिकाधिक दु:खाच्या गर्तेत जात आहे. असे असूनदेखील आपण पूर्णपणे भौतिकतेच्या मागे जायचे की आध्यात्मिकतेकडे जायचे, हा खरोखरच ज्याचा प्रश्न आहे आणि कोणत्या दिशेला जायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.

बहुतेक सगळे गुरू इच्छा पूर्ण करण्यासाठी साधना सांगताना सर्वत्र आढळतात. खरे तर या सकाम गुरूंनीच आजचा सकाम भक्तीचा, सकाम साधनेचा, विकृत असा सकाम समाज साऱ्या जगभर निर्माण केला आहे. आजच्या ढासळलेल्या परिस्थितीला ही सकाम साधनाच जबाबदार आहे. अर्थात याला अनेक अपवाददेखील आहेतच; मात्र ते अगदीच क्वचितच आढळतात. आजचे शिक्षणदेखील अती सकाम असल्यामुळे शेवटी निराशा दु:ख, निष्फलता प्राप्त झालेली आपल्याला सर्वत्र दिसते आहे.

आपण म्हणाल निष्काम होऊन काय मिळणार? पहिल्यांदा निष्काम होऊन तर पहा; मग समजेल काय मिळते ते. पण आपण खरोखर निष्काम होतच नाही म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. पण जर आपण अद्वैत तत्त्वज्ञान सांगणाऱ्या गुरूच्या उपदेशाचा अभ्यास करत राहिलो, तर ज्ञान प्रकट झाल्याशिवाय राहात नाही. अर्थात ज्याच्या अंतरंगात सत्याची तळमळ आहे, त्यालाच ज्ञान प्राप्त होते. सकाम माणसाला कधीही ज्ञानप्राप्ती होत नाही.

- विजय पांढरे Vijay Pandhare


सत्य, मनाच्या गाभाऱ्यातले

आज आपण सत्याच्या शोधाबाबत चिंतन करणार आहोत. आपण सर्वांच्या मनात सत्याबाबत कुतूहलही आहे आणि ‌चिंताही आहे. बरेच लोक तर सत्य म्हणून काही असते हे मान्यही करत नाहीत. काहींच्या मते सत्य ही एक भ्रामक कल्पना आहे. काहींना असे वाटते की, नामजपाच्या साधनेनंतर सत्य प्राप्त होते. काही योगाने सत्यप्राप्ती होते असे मानतात, तर काही सत्याचे प्रकटन कर्मयोगाने होते असे मानतात. काहींचा फक्त भक्तीमार्गावर विश्वास आहे, तर काही सत्य केवळ ज्ञानमार्गानेच प्राप्त होते असे मानतात. खरे तर सत्यप्राप्तीचा मार्ग हा वैश्विक आहे. सत्यप्राप्तीचा मार्ग सर्वांसाठी एकच आहे. जे मन निष्काम होते, ज्या मनात कोणत्याही महत्त्वाकांक्षा नसतात, पण जे मन सजग असते, समजपूर्वक स्वत:विषयी सजग असते, त्या मनात सत्याचे प्रकटन आपोआप होत असते. एक विशिष्ट मनाची अवस्था आहे, जी प्राप्त झाली असता त्या मनाला सत्य प्रकटन घडत असते. मग सहाजिकच प्रश्न निर्माण होतो की अशी अवस्था कशी प्राप्त होते. 

सत्याचे दर्शन व्हावे म्हणून जर तशी मनाची अवस्था निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करेल तर ते एक मृगजळ आहे. कारण मला सत्याचे दर्शन व्हावे ही सुध्दा कामनाच आहे आणि कामना असलेले मन सत्य प्रकटनाला लायक नसते. असा हा कठीण खेळ आहे. येथे महत्त्वाकांक्षी मनुष्य नापास सिध्द होतो. येथे स्वार्थात कर्तृत्त्ववान मन नापास असते. स्वार्थी, बुद्धिवान, तर्कवान माणसे सत्याला प्राप्त होऊ शकत नाहीत. एकदा जे. कृष्णमूर्तींना एका धनाढ्य व्यक्तीने प्रश्न केला की, मला सत्य कधी प्राप्त होईल? तेव्हा कृष्णमूर्तींनी त्याला प्रतिप्रश्न केला की, आपला व्यवसाय काय? त्या व्यक्तीने उत्तर दिले की, मी शेअर मार्केटच्या व्यवसायात आहे. तेव्हा कृष्णमूर्तींनी उत्तर दिले की, तुम्ही जर धनप्राप्तीच्या पाठीमागे असाल, तर तुम्हाला सत्याची प्राप्ती कधीही होणार नाही. म्हणजेच जे मन कशाच्या तरी मागे धावत असते ते सत्याला मुकत असते. अगदी सत्यप्राप्तीच्या मागे धावणेसुध्दा सत्याप्राप्तीच्या मार्गातला अडथळाच आहे. 

खरे तर सत्यप्राप्तीचा संबंध मनाशी असल्यामुळे आपण आपलं मन प्रथम समजावून घेतलं पाहिजे. मन जे केवळ वर वर जाणवतं तेवढंच नाही तर खोल खोल अंतर्मनाचे दर्शन करण्याची क्षमता मनाला प्राप्त होणेही गरजेचे आहे. जोपर्यंत आपल्या मानाच्या गाभाऱ्यात खोल बुडी मारण्याची क्षमता आपल्या मनाला प्राप्त होणार नाही, तोपर्यंत आपल्याला सत्याचा खुलासा कधीच होणे शक्य नाही. मग पुढचा प्रश्न आपोआप निर्माण होतो की, खोल अंतर्मनात बुडी कशी घ्यायची, जेणेकरुन अंतर्मनाचे दर्शन आपल्याला होईल! कारण सत्य जाणणे म्हणजे मनाला संपूर्ण तळापर्यंत, शेवटपर्यंत जाणणे होय. मनाला खोल खोल स्तरापर्यंत जाणले असता सत्य जाणले जाते, याशिवाय कोणताही मार्ग सत्यापर्यंत पोहोचतच नाही. सर्व मार्ग सत्यापर्यंत पोहोचतात हे जे काही संत सांगतात, तेव्हा त्या संतांना त्या सर्व मार्गांनी मनाचे खोल खोल स्तर शेवटपर्यंत जाणणेच अभिप्रेत असते, दुसरे काहीही नाही. 

- विजय पांढरे - Vijay Pandhare


आत्मज्ञानाची गुरूकिल्ली


आपण नेहमी निराशेतून बाहेर येण्यासाठी जे प्रयत्न करत असतो, ते सर्व प्रयत्न आपल्याला अधिकाधिक दुःखाकडेच नेत असतात. याची आपल्याला जाणीवसुद्धा नसते. इतके आपण भ्रमात व अज्ञानात जगत असतो. मात्र जेव्हा मनाला उमजते की आपले मनच अडथळा आहे तेव्हा मनाकडून मनाचा त्याग होतो व मन स्वत:चे स्वत:त विसर्जित होते आणि मनाच्या त्या विसर्जनातच सत्याचे प्रकटन होते.

सत्य तर मन व मायेच्या पलीकडे आहे. म्हणून सध्याच्या मनाचे विसर्जन हीच आत्मज्ञानाची गुरूकिल्ली आहे. तुमचे मन काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हिंसा, स्पर्धा, अहंपणाने भरलेले असेल, तर आपण जे काही करू ते सर्व स्वार्थकेंद्री असल्याने त्यातून फक्त दु:खच निर्माण होते; सुख, समाधान, तृप्ती कधीच नाही.

या सर्व दु:खाचे मूळ मीपणाच्या भावनेत आहे. खरे तर आपण कोण आहोत, काय आहोत, आपल्या जीवनप्रक्रियेचे रहस्य काय, आपल्या अस्तित्वाचे मूळ तत्त्व कोणते आहे व त्या मूळ तत्त्वातून आजचे स्वरूप कसे निर्माण झाले आहे, हा संपूर्ण बोध जोपर्यंत मनाला होत नाही, तोपर्यंत ही कमतरतेची जाणीव अखंड अशीच तेवत राहात असते. आपल्याला असे वाटते की 'मी' म्हणजे जगापासून एक अलग, वेगळं व्यक्तिमत्त्व आहे आणि वर वर भासणाऱ्या गुण-आकाराच्या विभिन्नतेमुळे हे खरे वाटायला लागते. जेव्हा आपण सगळेजण स्वत:च्या सुखासाठी, स्वत:च्या सुरक्षेसाठी, स्वत:च्या समृद्धीसाठी कार्यरत 
होतो, तेव्हा या सर्व कृती आत्यंतिक स्वार्थकेंद्रितपणाकडेच नेतात. दु:ख व भ्रम निर्माण करणाऱ्या या मनप्रक्रियेच्या आकलनातून मनाचे महत्त्वाकांक्षा, इच्छा, भय, वासना, लोभ, द्वेष यांच्याशी आपोआप तादात्म्य तुटलेले असते.

सत्याचा शोध प्रयत्नाने किंवा मनाने लागतच नसतो. याचे कारण सर्व प्रयत्न हे जे यापूर्वी माहिती आहे त्या क्षेत्रातच असतात आणि सत्य तर अज्ञात आहे. म्हणूनच मन जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत सत्य उमजतच नाही. तसे पाहता अध्यात्म ही अज‌िबातच कठीण गोष्ट नाही. पण त्याचबरोबर हेसुद्धा खरे आहे की अहंकाराचे, मनाचे, संस्कारांचे विसर्जन ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खऱ्या विभूतींचे, संतांचेच मार्गदर्शन गरजेचे आहे. सुख जेथे नाहीच त्याठिकाणी आपण सुखाचा शोध अव्याहतपणे घेत असतो. ईश्वर किंवा ती मूळ शक्ती, ते जे काही आहे ते मन जाणत नाही. मनाला ते माहीतच नाही. मग जे मनाला माहीतच नाही त्याचा शोध मी मनाने कसा घेऊ शकतो?

सत्यावर असलेला असत्य मनाचा लेप दूर झाला, की सत्याला खरे आकलन होते. अन्यथा जोपर्यंत मन कार्यरत आहे तोपर्यंत मनानेच मनाला भास जाणवतात आणि ही माया आहे. खरे तर सत्य स्वत:हून तेथे आधीच प्रकट होते. ते प्रकट केले जाऊ शकत नाही. याचे कारण मनच असत्य आहे व असत्याचे विसर्जन झाले की सत्य तर असतेच; ते आणावे लागत नाही.

- विजय पांढरे - Vijay Pandhare


शून्य आणि समत्व

विश्वव्यापक अनंत अमर्याद अगणित रितेपणाची शून्याची आपल्याला जाणीवच नसते. या वस्तुस्थितीचे दर्शन कधीच घडत नसते. म्हणून अहंकार हाच सत्यदर्शनातला खरा अडथळा आहे हे संतवचन नेहमी तुम्ही ऐकलेच असेल. ही जी मूळ वस्तुस्थिती आहे मूळ अवस्था आहे तेच सत्य आहे. 

सर्वांच्याबाबतीत ही अवस्था एकच आहे मग तो पशू असो प्राणी असो मानव असो किंवा कोणताही पदार्थ. सर्व अस्तित्वाची उत्पत्ती याच सत्यापासून झाली आहे. ही अनुभूती प्रत्यक्ष येईपर्यंत आपल्याला ज्ञान झालेलेच नसते. तोपर्यंत आपण अज्ञानातच जगत असतो. ही अनुभूती पुस्तक वाचून किंवा निव्वळ वरवर प्रवचन ऐकून येत नसते तर जेव्हा आपल्या अंतरंगात प्रचंड तहान निर्माण होते सर्व जगाचे अस्तित्व आपले स्वत:चे अस्तित्व आपले मन आपली पंचज्ञानेंद्रिये पद पैसा. प्रसिध्दी भोगविलास आपले प्रयत्न आपले कर्म सर्व तथाकथित अध्यात्म सर्व ध्यानपध्दती सर्व कर्मकांड सर्व पुस्तकी ज्ञान आपला सतत काहीतरी मिळविण्याचा काहीतरी होण्याचा प्रयत्न हे सर्व अर्थहीन असल्याचे आपल्या लक्षात येते मग मनाच्या भ्रामक कल्पनेत कसे बध्द आहोत ,आपण केवळ भूतकाळातील संस्कारात कसे जखडले गेलो आहोत असे प्रत्यक्ष आतून कळायला लागते. तेव्हा मनाशी तादात्म्य तुटून आपण निर्विकार निरीक्षणाला प्राप्त होतो व अहंकाराचे आपल्या सर्व पूर्वसंस्कारांचे विसर्जन समजेतून होऊन आपण मूळ अवस्थेला प्राप्त होतो. जी शून्यावस्था आहे. 

अहंकाराला अंतर्मनात खूप खोलवर असलेल्या रितेपणाची शून्याची जाणीवच नसते व तशी करुन घेण्याची इच्छाही नसते. कारण संपूर्ण रितेपणाची जाणीव अहंकाराचे समूळ उच्चाटन घडवून आणते. अनुभवाचे बळकटीकरण करुन या रितेपणाच्या वस्तुस्थितीपासून उलट दिशेला जाण्याचा मनाचा सतत प्रयत्न असतो. म्हणून विचारांच्या मनाच्या इच्छेच्या वासनांच्या पलीकडे जाण्याची गरज संत लोक हजारो वर्षांपासून प्रतिपादन करित आले आहेत. पण त्याचा साधा अर्थही आपल्या बथ्थड मनाला कधी कळत नसतो. या काही नसणेपणापासून रितेपणापासून आपण कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी तो अस्तित्वात तर असतोच. मात्र या वस्तुस्थितीपासून दूर जाण्यासाठी अहंकार नाना पळवाटा शोधत असतो. म्हणून जर आपण पळवाट शोधणे बंद केले व आवड निवड विरहित असे अवधान आपण ठेवू शकलो तर या रितेपणाशी व काही नसण्याची व आपली प्रत्यक्ष गाठ पडू शकते. हा निसर्गाचा नियम आहे. या गाठ पडण्यालाच साक्षात्कार असे म्हणतात. कारण तेव्हाच आपल्याला वस्तुस्थितीचे व स्वरुपाचे दर्शन होते. पार्था समत्व बुध्दिचे ते सार जाण योगाचे ', असे ज्ञानेश्वरीत स्पष्ट सांगितले आहे. असे हे जे आवड निवड विरहित अवधान आहे या अवलोकनालाच ध्यान असे म्हणतात. प्रज्ञा प्राप्तीचा तोच एकमेव मार्ग आहे. यालाच स्थितप्रज्ञता विपश्यना मेडिटेशन सामायिक समतास्थायीभाव निर्विकल्प निरीक्षण अशी खूपशी नावे आहेत. 

- विजय पांढरे - Vijay Pandhare


अनुभवाची भूमिका

आपल्याला अनुभवाची, इच्छेची एवढी ओढ का बरे आहे? कशासाठी या अनुभवाची, इच्छेची सातत्याने आपण मागणी करत असतो? सर्वांनी ही बाब तपासून पाहणे गरजेचे आहे. बरे, हे अनुभवाचे, इच्छेचे गाठोडे फक्त जागृत मनातच असते असे नाही, तर अंतर्मनातही हे गाठोडे आपले घर करून वसत असते व दोन्ही स्तरांवर या अनुभवाचे, इच्छेचे संवर्धन करण्याचे काम अहोरात्र सुरू असते. अनुभवाचे इच्छेचे, वासनेचे जतन व संवर्धन करणारे हे जे केंद्र आहे, ते केंद्रच अहंकार असतो. हा अनुभव, ही इच्छा हेच घातक आहेत. 

खरे म्हणजे मनच आपला खरा शत्रू असून या मनाचे स्वरूप, त्याचे कार्य करण्याची पद्ध्त, त्या कार्यपद्धतीमुळे निर्माण होणारा अहंकार, अहंकाराचे बळकटीकरण, त्यातून निर्माण होणारे दु:ख; तसेच त्या मनाचे व अहंकाराचे विघटन होण्याची रीत, त्यातून अनुभवाला येणारी शांती हे आपल्या लक्षात आले तर आपला योग्य दिशेला प्रवास होतो, पण ही गोष्ट आपल्या कधीच लक्षात येत नाही. म्हणूनच आपण लाखो वर्षांपासून भ्रमाच्या खेळात व या मायेच्या चक्रात अव्याहतपणे प्रवास सुरूच ठेवला आहे. अनुभव जतन करणारे जे हे केंद्रच निकामी झाले, म्हणजेच अनुभव जतन करणे व वाढवणे बंद झाले तर त्यातूनच सत्याचा जन्म होत असतो. ही गोष्ट आपल्या ध्यानीमनीही नसते. कारण आपण तसे प्रयोग कधीही केलेले नसतात. आपण अनुभव वाढवणारे व जतन करणारे जे हे केंद्रच मनप्रक्रियेच्या समाजातून वितळून जाऊ दिले, तर मी किंवा माझे काही अस्तित्वातच नाही याची अनुभूती आपल्याला येऊ शकते. 

पण अनुभवाची अथवा मनाची यंत्रणा कशी काम करते ते समजावून घेण्याची आपली इच्छाच नसते. त्यामुळे अनुभवाच्या अथवा मनाच्या इच्छेत दडलेला धोका आपल्याला कधीच कळत नाही व म्हणूनच आपण अनुभवाचे बळकटीकरण करण्याचे चुकीचे काम सदैव सतत सुरूच ठेवतो. कारण अनुभवाच्या इच्छेत, बळकटीकरणात काही चूक आहे असे आपल्याला वाटतच नाही.. जे चूक आहे ते बरोबर आहे असे या अवस्थेत वाटत असते. जसे नागाचा दंश होऊन विषबाधा झालेल्या व्यक्तीला तिखट मिरची गोड लागते. कडूनिंबाचा कडू पाला गोड लागतो. तशीच अवस्था भ्रमित माणसाची असते. म्हणूनच हवे असते सुख, पण तो धावत असतो दु:खाच्या दिशेने व आपण दु:खाच्या दिशेने धावत आहोत याची साधी समजही त्या माणसाला नसते, हीच मानवी मनाची खरी शोकांतिका आहे. 

आपण असे अनुभवाचे जतन व संवर्धन का करत असतो ? कारण आपल्याला असे वाटते की, आपण अनुभवांचे जतन व संवर्धन केले नाही तर आपले अस्तित्त्वच शिल्लक उरणार नाही. खरे तर काहीही नसणे हेच आपले खरे स्वरूप आहे. जे अनंत, अमर्याद, अगणित स्वरूपाचे आहे. या वस्तुस्थितीचे भान आपल्याला नसते व या विस्मरणातूनच अहंकाराचा जन्म होतो. हा अहंकारच मग भवचक्राला जन्म देत अनंत कालापर्यंत दु:खाचे डोंगर उभे करत असतो. 

- विजय पांढरे


मन, इच्छा व आत्मसाक्षात्कार

पदाची, संपत्तीची, प्रसिद्धीची, विविध इंद्रियभोगांची, वासनेची इच्छा सर्वांमध्ये सदासर्वदा तीव्रतेने असते. ही जी अनुभव घेण्याची इच्छा आहे, तीच अहंकाराला जन्म देते, अहंकाराला बळकटी देते. खरेतर इच्छाच अहंकार आहे, तृष्णा आहे. अनुभवाची इच्छा म्हणजेच अहंकाराचे सातत्य ठेवणारी यंत्रणा. ही यंत्रणा अनादी आहे व या यंत्रणेलाच माया, विचार, अस्तित्व अथवा मन असेही म्हटले जाते. आपण अनुभव मिळविण्याचा, जमविण्याचा जितका प्रयत्न करू तितके आपण या यंत्रणेच्या गुंत्यात अडकतो, आपल्याला जास्त भ्रम होत असतो. 

ही जी यंत्रणा आहे ती एक स्वसंमोहन असून, संपूर्ण अस्तित्व हे एक स्वसंमोहनच आहे. आपण जितक्या स्वीकार अथवा नकाराच्या प्रतिक्रिया करू तितके-तितके संस्कार दृढ होत जातात व ती यंत्रणा बळकट होत जाते. लाखो वर्षांपासून आपण आपले मन, म्हणजेच ही यंत्रणा अशी बळकट करत आलो आहोत; कारण या यंत्रणेचे नियम, काम करण्याची पद्धत आपल्याला समजलेली नसते. भ्रमातून, गैरसमजातून आपण अंधाराकडे प्रवास करत असतो. त्यामुळे आपल्याला वारंवार, दुःखाचा, तणावाचा व निराशेचा अनुभव येतो. सुख जेथे नाहीच त्याठिकाणी आपण सुखाचा शोध अव्याहतपणे घेतो आणि आपण एवढे जड बुद्धीचे झालो आहोत की, या प्रयत्नांमुळेच आपण अधिकाधिक दुःखात, ताणतणावात जात आहोत याचे आकलनही आपल्याला होत नाही. मुक्त पुरुषांच्या, संतांच्या संगतीत राहिल्याने, त्यांचे उपदेश ऐकल्याने, ते वाचल्याने या शोकांतिकेचे आकलन होते. म्हणूनच सत्संगाचे अनन्य म्हत्त्व आहे. 

मन हेच खरे अज्ञान असून हे मनच आपल्याला चुकीच्या दिशेने जायला भाग पाडत असते. हे मनच आपला खरा शत्रू आहे. आपण इतके मूर्ख आहोत की या निराशेला, दुःखाला, भ्रमाला, ताणतणावांना जे मनच मूलतः कारणीभूत असते त्या मनाच्या सल्ल्यानुसारच आपण आपले निर्णय घेत असतो. स्वतः स्वतःची घोर फसवणूक करत असतो. जे आपल्याला कधीच समजत नाही इतक्या गहन अज्ञान व अंधकारात आपण लाखो जन्मात वावरत आलो आहोत. या गोष्टीची आपल्याला पुसटशी कल्पनाही नाही इतके आपण अभागी आहोत. हे मनाविषयीचे आकलन साक्षात्कारी, आत्मज्ञानी, मुक्त संताच्या संगतीत होऊ शकते. पण मन स्वतःला बुद्धिनिष्ठ, हुशार, तर्कनिष्ठ, विचारशील समजते व आपल्याच कोषात स्वतःला जखडून ठेवते. 

मनाची ही कार्य करण्याची धोकादायक पद्धत संतच स्पष्ट करून सांगतात. आपल्या जगात तथाकथित ज्ञानी, लोभी, भ्रमित, पद, पैसा, प्रसिद्धीचा हव्यास असणारे मूढ जीव असतात. दुर्दैवाने संपूर्ण समाजाची सूत्रं अशाच लोकांच्या हाती गेल्याचे दिसते आहे. म्हणून आजचा समाज हा दुःखात, निराशेत, ताणतणावात व भ्रमात गेला आहे. आजचे शिक्षण महत्त्वाकांक्षा, स्पर्धा, सत्तालोलुपता, भ्रष्टाचार, लोभ, अहंकार व भ्रम वाढविणारे आहे. खरे शिक्षण माणसाला निरअहंकारी, पवित्र, त्यागी तथा प्रज्ञावान बनवते. आज तर परिस्थिती अशी आहे की, जे भ्रष्ट, लोभी, अहंकारी, भ्रमित, महत्त्वाकांक्षी, पद, पैसा, प्रसिद्धीचा हव्यास असलेले आहेत, त्यांना आज बुद्धिमान, ज्ञानी व कर्तृत्त्ववान समजले जाते. 

- विजय पांढरे


दु:खबोध 


कुणाला वाटते मी गरीब आहे म्हणून दुःखी आहे, तर कुणी पद नाही म्हणून स्वतःला दुःखी समजते. कुणाला वाटते मी प्रसिद्ध व्यक्ती नाही म्हणून दुःखी आहे. तर कुणाला वाटते मी शारीरिक व्याधींमु‍ळे दुःखी आहे. असे हजारो अर्थ आपण त्या रिक्ततेचे, अपूर्णतेचे लावत असतो व ती पोकळी, ती अपूर्णता पूर्ण करण्यासाठी जन्मभर झटत असतो. बऱ्याचदा आपल्या अपेक्षित गोष्टी आपल्याला प्राप्तही होतात; पण तरीही आपली अपूर्णता, आपली रिक्तता, आपली पोकळी कमी झालेली नाही, हेही आपल्या लक्षात येते. उलटपक्षी ती वाढलेलीच अनुभवाला येते. आपण जे जे करतो त्यातून सुख, समाधान, शांती तर अनुभवाला येतच नाही पण उलट दुःख, ताणतणाव, निराशा, असामाधान, अशांती वाढल्याचाच अनुभव येतो. 

हीच मूढावस्था आहे. आपल्याला पाहिजे असते, सुख पण मिळते दुःख. आपल्याला पाहिजे असतात गोड आंबे, पण मिळतात बाभळीचे काटे. म्हणजे नक्कीच पेरताना आम्ही बाभळीच्या बिया पेरल्या असल्या पाहिजेत. बेहोशीत त्या बाभळीच्या बियाच आंब्याची कोय समजून पेरल्या असल्यामुळेच ही परिस्थिती झाली आहे. सर्वांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करून हे समजावून घेतल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणारच नाहीत. 

आमच्या प्रश्नांची खरी कारणे, खरे मूळ संतांनाच समजले आहे. तथाकथित पुढारी, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, तथाकथित धर्मगुरू हेही भ्रमाच्या साम्राज्यात असतात व इतरांनाही तिथेच घेऊन जातात. त्यांना असे वाटते की समृद्धी, श्रीमंती आणि भरभराट आली की दुःख मिटेल. त्यांना वाटते की शिक्षणाचा प्रसार झाला की दुःख संपेल. आपण उच्चशिक्षित झालो आहोत आपले दुःख मिटले का? नुसत्या बाह्य विकासाने आपले प्रश्न सुटत नसतात. अन्यथा समृद्ध, संपन्न व्यक्ती सुखाला प्राप्त झाल्या असत्या. पण, मनोकायिक रोगांचे प्रमाण तर संपन्न लोकांतच अत्याधिक आढळते. यावरून काय बोध घ्यायचा तो आपला आपण घ्यावा हेच उत्तम. 

हे जे बहिर्मुख सुधारणावादी आहेत त्यांना वाटते की चांगली राज्यपद्धती असली तर सर्व सुखी होतील. पण, असे काही होत नाही, हाच आपला अनुभव आहे. फ्राईड तर टोकाला जाऊन सांगतो की 'मनुष्यजात कधीच सुखी होणार नाही; कारण मनुष्याची वासना कधीच पूर्ण होत नाही.' पण, त्या बिचाऱ्याला वासनेचा अर्थच कधी समजला नाही. म्हणून म्हातारपणी वेडा होऊन त्याने आत्महत्या केली. या अपूर्णतेचा अर्थ फक्त संतानाच समजला आहे. म्हणूनच आपले संत सांगून गेले की, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा शोध घेत नाहीत, जोपर्यंत मी कोण आहे याचा बोध तुम्हाला होत नाही, तोपर्यंत तुम्ही कधीही सुखी होणार नाहीत. म्हणून ते सांगतात बाबा रे, अंतर्मूखी हो. तुझ्या अंतरंगात, तुझ्या आंतरमनात शोध घे. ध्यान कर. अंतरंगात बुडी मार. समाधीला प्राप्त हो; मग तुला तुझे स्वतःचे ज्ञान होईल व स्वतःचे ज्ञान झाले की संपूर्ण अस्तित्वाचे ज्ञान होईल. अस्तित्वाचा हा खुलासा होतो तेव्हाच ती रिक्तता, ती पोकळी, ती अपूर्णता, ते अज्ञान संपते. अन्यथा ते कधीच संपत नाही. 

- विजय पांढरे

1 comment: