स्टेटस अपडेटसाठी मिळणार पैसे
फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर दर काही तासांनी स्टेटस अपडेट्स करण्याची सवय लागलेल्या युजर्ससाठी खुशखबर आहे. आता प्रत्येक वेळी स्टेटस अपडेट करताना सोशल मीडिया युजर्सना पैसे कमावण्याची संधीही मिळणार आहे. 'बब्ल्यूज' www.bubblews.com ही सोशल नटवर्किंग वेबसाइट नुकतीच नव्या स्वरूपात सादर करण्यात आली. 'बब्ल्यूज डॉट कॉम'चे संस्थापक अरविंद दीक्षित आणि जॅसन झुकॅरी यांनी युजरना आकर्षित करण्यासाठी ही नवी शक्कल लढवली आहे.
या प्लॅटफॉर्मवर युजरकडून अपडेट होणाऱ्या कंटेंटला अनुसरून जाहिराती अपलोड केल्या जातील. हा कंटेंट पोस्ट करणाऱ्या, तसेच शेअर करणाऱ्या युजर्सना या जाहिरातींमधून जमा होणाऱ्या पैशांचा ठराविक वाटा दिला जाईल. युजरना प्रत्येक पोस्टद्वारे होणाऱ्या देवाणघेवाणीतून अंदाजे ५० डॉलर्सपर्यंत कमाई करता येऊ शकेल. आम्ही एक व्यवसाय चालवत आहोत. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा विचार करणे आम्हाला भाग आहे. तथापि, आमच्या वेबसाइटवरून होणाऱ्या देवाणघेवाणीचा फायदा युजरनाही व्हावा, या विचारातून आम्ही ही नवी कल्पना मांडत आहोत, असे दीक्षित यांनी सांगितले. अन्य सोशल नेटवर्किंग साइट्स युजरना विनाशुल्क व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याची जाहिरात करत असले, तरी ते प्रत्यक्षात युजरच्या खासगी आयुष्यात डोकावून पैसा कमावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही मात्र युजरना पैसे कसे मिळतील, याचा विचार करत आहोत, असे सांगून दीक्षित यांनी फेसबुकवरही नेम धरला.
बब्ल्यूजवर स्टेटस अपडेट करण्यासाठी किमान ४०० अक्षरांची अट ठेवण्यात आली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना एखाद्या पोस्टमधून युजर्सचे व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी किमान ४०० अक्षरांची पोस्ट असणे आवश्यक आहे, असे दीक्षित म्हणाले. आपल्या वेबसाइटचे 'बब्ल्यूज' हे नाव बबल आणि न्यूज या शब्दांच्या एकत्रिकरणातून तयार झाल्याचेही त्यांनी सांगितले. युजर्सच्या कल्पनाशक्तीचे प्रतीक म्हणून बबल्स हा शब्द वापरण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
बब्ल्यूज प्रथम २०१२ मध्ये बिटा व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली होती. सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच बब्ल्यूजवर दहा हजारांहून अधिक जणांनी पोस्ट अपडेट केल्या, तर जगभरातील २ कोटींहून अधिक जणांनी या वेबसाइटला भेट दिली. त्यामुळे दीक्षित व झुकॅरी यांनी ३० लाख डॉलर्सच्या गुंतवणुकीसह ही वेबसाइट नव्या स्वरूपात सादर केली. बब्ल्यूज साइटवर करण्यात येणाऱ्या सर्व पोस्ट या सार्वजनिक असतील, आणि साइटला भेट देणाऱ्या कोणालाही त्या पोस्ट फॉलो करता येतील. या पद्धतीमुळे साइटवर अधिकाधिक पारदर्शकता जपली जाईल, असे संस्थापकांचे म्हणणे आहे. या साइटला अमेरिकेसह कॅनडा, ब्रिटन, भारत व फिलिपिन्समधून सर्वाधिक प्रतिसाद मिळतो आहे. सध्या या साइटवर केवळ इंग्रजीतून पोस्ट करता येत असल्या, तरी अन्य भाषांमध्ये पोस्ट करण्याची सुविधाही देण्यासाठी वेबसाइटचे प्रयत्न सुरू आहेत.
स्मार्टफोनच्या भुलभुलैय्यात सोशल साइट
खिशात स्मार्टफोन आहे. इंटरनेट तर सुरू असेलच. अन् हो तुम्हाला नेहमीप्रमाणे फेसबूक, ट्विटर, गूगल प्लस सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर फिरायची हौस ही असेलच. तर चला मग. तुम्ही कशाला मागे रहाताय. लाइक करा, शेअर करा, कॉमेण्ट करा अन् चक्क घरबसल्या पैसे मिळवा. या काही खोट्या भूलथापा नाहीत. त्यासाठी फक्त थोडी वाट पहावी लागेल.
स्पर्धा किती जीवघेणी आणि तीव्र असते, याचे नेमके उदाहरण म्हणजे सोशल नेटवर्किंगचे जग. फेसबूक, गूगल प्लस, ट्विटर. या सगळ्यांना यूजर्स हवे आहेत. या जगात एक नवीन पाऊल ठेवलय ते बबल्यूज (Bubblews) ने. या नव्या सोशल नेटवर्किंग साइटलाही आता कोट्यवधी यूजर्स हवे आहेत. त्यासाठी त्यांनी नवा फंडा वापरला आहे. कंपनी आपल्याला होणारा फायदा यूजर्समध्ये वाटणार आहे. बबल्यूज यूजर्सच्या प्रत्येक लाइक, कॉमेण्ट आणि शेअरिंगसाठी एक सेंट (साठ पैसे) देणार आहे. हा अकडा पन्नास डॉलरवर गेल्यानंतर ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.
२०१२ मध्ये बबल्यूजची पहिली बीटा एडिशन आली. आता दुसऱ्यांदा ही साइट लॉँच होत आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, भारत आदी देशात या साइटचे यूजर्स आहेत. दरम्यान, २०१३ मध्ये एक लेख छापून आला होता. त्यात या साइटपासून दूर रहा असे सांगितले होते. तसेच कंपनीने पोस्ट शेअर करण्यासाठी पैसे दिले नाहीत, असा आरोप केला होता.
आम्ही व्यापार करत आहोत. त्यातून आम्हाला पैसे कमवायचे आहेत. पण सोबतच आपण जर सोशल संवादात सहभागी होत असाल, तर आपल्यालाही पैसे मिळतील.
- अरविंद दीक्षित, संस्थापक सदस्य, बबल्यूज
No comments:
Post a Comment