Saturday, July 19, 2014

..आणि नदी जिवंत झाली! And river get life!

पाणीटंचाई, दुष्काळ यांनी त्रस्त असलेल्या मराठवाड्यात आठ गावांतील लोकांच्या सहभागातून लातूर, औसा तालुक्यातून वाहणारी तावरजा नदी पुनरुज्जीवित करण्यात आली. या कामात कोणीही पुढारी कर्ता नव्हता, तर गावातील सामान्य माणसं, शेतकरी, राबणारे, हातावर पोट असणारे, कर्ते आहेत.
river
पाणी हे जीवन आहे, पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल, जल है तो कल है असे घोषणावजा सुविचार वाचून पाणीप्रश्नाचं गांभीर्य सामान्यांना थोडंफार जाणवतं. परंतु आपल्या गावात, शेतात पाण्याचं नियोजन कायमस्वरूपी कसं करता येईल या दृष्टीनं कोणी फारसा विचार करत नाही. सामूहिक प्रयत्न तर दूरच.

या सगळ्याला छेद देत प्रसिद्धीचा हव्यास न धरता गेल्या दोन वर्षांपासून श्री श्री रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेच्या पुढाकारानं आणि लोकसहभागानं लातूर जिल्ह्यात जलजागृती अभियान यशस्वीपणे राबविलं आहे. २०१३च्या उन्हाळ्यात या संस्थेने घरणी नदीची खोली वाढवून तिचा प्रवाह सरळ रेषेत वाहील अशी बांधणी करून ती नदी जिवंत केली होती. यंदाच्या वर्षी संस्थेने लातूर, औसा तालुक्यातून वाहणारी तावरजा नदी पुनरुज्जीवित केली आहे. रामकिशन पंढरीनाथ सावंत या निवृत्त शिक्षकाने सांगितलं की, 'मी माझ्या लहानपणी या नदीत पोहायला जात असे. परंतु गेल्या वीस वर्षांत इथं नदी होती असे सांगण्याची वेळ आली. आता यंदा मात्र पु‌न्हा या नदीत पोहण्याचा आनंद घेऊ शकणार आहे.'

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रकल्प समन्वयक मकरंद जाधव यांनी या सांगितलं की, 'आम्ही लोकसहभागातून असं काम होऊ शकतं हे लोकांना पटवून देण्यासाठी प्रथम शिबीर घेतो. गावात बैठक घेतली जाते. गावकऱ्यांचं एकमत झालं की, ते स्वतःहूनच पैसे गोळा करतात आणि आम्ही काम सुरू करतो. वाहनाचा, मशिनरीचा खर्च आमचा असतो आणि त्या मशिनरीसाठी लागणाऱ्या डिझेलचा खर्च गावकरी करतात. प्रकल्पाच्या पै न पैचा हिशोब गावकरीच ठेवतात.' तावरजा नदीकाठच्या आठ गावांत कैलास जगताप, बालाजी साळुंके या दोघांनी पुढाकार घेतला होता.

तावरजा मध्यम प्रकल्पापासून मांजरा नदीच्या पात्रातील संगमापर्यंत २५ किलोमीटरचं अंतर आहे. त्याला जोडून ठिकठिकाणी ओढे-नाले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात तावरजा नदीचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम शिरुर, आलमला, गंगापूर, उंबडगा, पेठ बुधडा, बाभळगाव भुसणी, या गावांतून पूर्ण झालं आहे. चार महिन्यांपूर्वी या कामाला प्रारंभ झाला होता आणि आता १३ किलोमीटर अंतराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या कामावर फक्त १ कोटी ८५ लाख रुपये खर्च झाला आहे. हेच काम शासकीय दराने केलं असतं, तर किमान ७ कोटी रुपये लागले असते! विशेष म्हणजे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी यासाठी निधी दिलाच, परंतु ज्यांना शेती नाही अशांनीही पैसा दिला आहे. याचं उदाहरण सांगताना महादेव गोमारे म्हणाले की, आलमला या गावच्या चहाच्या हॉटेलच्या मालकांनी त्याला या अभियानाची माहिती मिळाल्यानंतर एकरकमी २५ हजार रुपये दिले. गावातल्या लाँड्रीवाल्याने मदत दिली. ५० रुपयांपासून ते ५० लाख रुपयांपर्यंत देणग्या मिळाल्या आहेत. ज्यांना शेती नाही, जे भूमिहीन आहेत, मजूर आहेत त्यांनी का देणगी दिली? तर नदीला पाणी आलं की, आपल्या गावात पाणी येईल आणि आपलीही रोजगाराची चिंता मिटेल ही मजुराला आशा वाटते. या कामात मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक आमदार दिलीपराव देशमुख यांनी सक्रिय मदत केली. आज गौरवानं या कृतीला सहकारातील लातूर पॅटर्न म्हटलं जातं.

आठ गावांतून वाहणाऱ्या या नदीचा लांबी ही ७५० मीटरपासून ते ६ हजार मीटरपर्यंत वाढवलेली आहे. प्रत्येक ठिकाणी खोली मात्र समान ६० मीटर ठेवण्यात आली असून रुंदीसुद्धा २ मीटर कायम ठेवली आहे. या कामावेळी तब्बल १५ लाख ३० हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. यातील काही गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या मुरमाड जमिनीवर टाकून शेती सुपीक बनविली आहे. बाकी गाळ हा दोन्ही बाजूला रचण्यात आला आहे. या १३ किलोमीटरच्या नदीत आता २३० कोटी लिटर पाणी साठणार आहे. आणि जमिनीखालील पाणीसाठ्यात ९१८ कोटी लिटरने वाढ होणार आहे.

तावरजा नदीशिवाय जिल्ह्यातील नागरसोगा, भादा, गंगापूर, समासापूर, येथील नाला सरळीकरणाचे, रुंदीकरणाचे खोलीकरणाचे ४० लाख रुपये खर्चाचे काम झालं आहे. या परिसरातील पाण्याची पातळी वाढणार आहे. पहिल्याच पावसाने नागरसोग्याचा नाला दुथडी भरून वाहू लागला आहे. पेठलाही पाणी आलं आहे. शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जिल्हा परिषदही या कामात सहभागी झाली आहे. कामासाठीच तांत्रिक सहकार्य देण्यासोबतच या नदीच्या पात्रात ४ गॅबीयन बंधारे, ३ कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी त्यांनीही ५० लाख रुपये खर्च केले आहेत.

गेल्या वर्षीच्या धरणी, कातपूर, सावरगावच्या जलसंधारणाच्या कामामुळे जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत १.०७ मीटरने वाढ झाल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात त्यामुळे लातूर जिल्ह्यात फक्त ७ टँकर सुरू होते. बाकी सर्व हातपंप, खासगी विहिरी सरकारने अधिग्रहीत करून पाणीपुरवठा केला आहे. आता तावरजा जिवंत झाल्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. तावरजाचा काठ भक्कम व्हावा, त्या परिसरातील माती वाहून जाऊ नये यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला ३६ हजार झाडं लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये १० हजार बांबू, १३ हजार लक्ष्मीतरू, ७ हजार लिंब, आणि ५ हजार औषधी वनस्पतींच्या झाडांचा समावेश असेल.

'गाव करीत ते राव काय करील' असं म्हणतात, ते इथं प्रत्यक्षात उतरलेलं दिसतं. या कामात कोणीही पुढारी कर्ता नव्हता, तर गावातील सामान्य माणसं, शेती करणारे, राबणारे, हातावर पोट असणारे, कर्ते झाले आहेत हे निश्चितच उल्लेखनीय आहे.

No comments:

Post a Comment