Friday, July 4, 2014

शूजवर अडकवा पानं-फुलं


मॅचिंग आणि स्टाइलिश ड्रेसवर चपलाही तशाच मॅचिंग हव्यात. पण सगळ्याच ड्रेसवर मॅचिंग चपला शोधत राहिलो, तर घरून ओरडा पक्का. पण यावरही एक फॅशनेबल पर्याय आहे, शू क्लिप्सचा... 

shoe


प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग शूज मिळवणं हा एक कठीण उद्योग असतो. कारण फक्त वाईट शूजमुळे संपूर्ण गेट अपचा पचका व्हायची शक्यता असते. म्हणूनच फॅशन मार्केटमध्ये एक नवीन पर्याय उपलब्ध झालाय तो म्हणजे शू क्लिप्स. शक्यतो नक्षी नसलेले प्लेन शूज घेऊन त्यावर या मॅचिंग क्लिप्स लावायच्या की तुमचा गेटअप रेडी झालाच म्हणून समजा. 

आत्तापर्यंत फक्त सिनेमा किंवा रॅम्पवर बघायला मिळालेली ही फॅशन आता मार्केटमध्येही बघायला मिळतेय. मुलींमध्ये ती सॉल्लिड हीट होत आहे. अगदी छोट्याशा आकारापासून ते जम्बो साइजपर्यंत अनेक पर्याय या क्लिप्समध्ये मिळतात. तुम्हाला पार्टीसाठी किंवा ब्रायडल लुक तयार करायचा असेल तर काळे-पांढरे शूज घेऊन त्यावर ड्रेसला मॅचिंग अशा शू क्लिप्स अडकवायच्या. तुमचा झक्कास लूक तयार. या क्लिप्समध्ये सर्वात जास्त मागणी कुणाला असेल तर ती म्हणजे, फुलांच्या आकाराच्या क्लिप्सना. रंगीबेरंगी आणि जाळीदार फुलं काळ्या शूजवर अडकवल्यावर एक मस्त क्लासिक लुक मिळतो असं शूजप्रेमी मुलींचं म्हणणं आहे. त्याशिवाय पिसं, खडे, फळांचे आकार, साखळी या प्रकारच्या ‌क्लिप्सही अगदी खुलून दिसतात. तुम्हाला अगदी परीराणी टाइप्स स्वप्नाळू लुक हवा असेल तर हाय हिल्स सँडल्सवर अशा नाजूक, गर्ली क्लिप्स अडकवून टाका. किंवा सिंड्रेला शूजवर पुढे, मागे किंवा दोन्ही बाजूला या शू क्लिप्स लावल्यात तर सगळ्यांपेक्षा वेगळं दिसाल हे नक्की. 

कशा लावायच्या ? 

या क्लिप्स वापरायला अगदी सोप्या असतात. अगदी केसांच्या पिनेप्रमाणेच. या शू क्लिप्सना मागे अडकवायला एक हुक असतो. तुम्ही फक्त तुमच्या शूजना तो हुक घट्ट लावून या क्लिप्स फिट करायच्या. या पिना एकदा वापरल्यानंतर परत नीट काढून ठेऊन पुन्हा वापरायची सोयही असतेच. 

घरच्या घरी 

या शू‌ क्लिप्स घरच्या घरीही करता येतील. तुटलेल्या माळा, तुटलेले ब्रोच, कानातले, जाळी अशा टाकाऊ गोष्टी जरा वेगळ्या पद्धतीने अरेंज करून त्या केसांच्या पिनांवर लावूनही तुम्ही शू क्लिप्स बनवू शकता. नेटवरही याच्या अनेक पद्धती तुम्हाला सापडू शकतील. 

कुठे मिळतील ? 

तुमच्या नेहमीच्या फॅशन मार्केटमध्ये तर या क्लिप्स मिळतीलच पण ऑनलाइन मार्केटमध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. अगदी १५०रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत या क्लिप्स मिळून जातील. 

No comments:

Post a Comment