Wednesday, July 30, 2014

फेसबुकवर नवा व्हायरस आलाय New virus on facebook

सोशल नेटवर्किंगमधील सर्वांत मोठी वेबसाइट असलेल्या फेसबुकला नव्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत फेसबुकवरील सुमारे आठ लाख अकाउंट्समध्ये हा व्हायरस शिरल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या व्हायरसमुळे फेसबुक वॉलवर आपल्याला मित्राने पाठवलेल्या बनावट व्हिडिओची लिंक दिसते. या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर एक वेगळीच वेबसाइट ओपन होते व तेथे हा व्हिडिओ पाहण्यासाठी 'प्लग इन' डाउनलोड करण्याची सूचना येते. प्लग इन डाउनलोड करण्याचा पर्याय स्वीकारताच या व्हायरसचे काम सुरू होते. या प्लग इनच्या आधारे व्हायरस युजरच्या फेसबुक, ट्विटर आणि ई-मेल अकाउंटमध्ये प्रवेश मिळवतो. त्यानंतर, त्या युजरची सर्व खासगी माहिती काढून घेतली जाते आणि त्याच्या फ्रेंडलिस्टमधल्या अन्य एका युजरच्या वॉलवर त्याच्या नावे अशाच बनावट व्हिडिओची लिंक दिसू लागते. असा या व्हायरसचा फैलाव सुरू आहे. या व्हायरसचा फैलाव वेगाने सुरू असून दर तासाला सुमारे ४०,००० अकाउंट्समध्ये या व्हायरसचा शिरकाव होत असल्याची माहिती सोशल नेटवर्किंग तज्ज्ञ कार्लो डि मिचेली यांनी दिली. गुगलने या व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी गुगल क्रोम ब्राउजरची 'एक्स्टेंशन्स' बंद केली आहेत. तथापि, सायबर हल्लेखोरांनी व्हायरस पसरवण्यासाठी गुगल क्रोमपासून सुरुवात केली असली, तरी आता व्हायरसला रोखणाऱ्या पर्यायांमधून मार्ग काढण्यासाठी हल्लेखोरांचे प्रयत्न सुरू आहेत. हल्लेखोरांनी मोझिला फायरफॉक्स ब्राउझरसाठी यापूर्वीच असे मार्ग शोधले असल्याचे मिचेली यांनी सांगितले. 

या नव्या हल्ल्यामध्ये अत्यंत सावध मार्गाने फेसबुकचा वापर युजर्सची खासगी माहिती काढून घेण्यासाठी तसेच व्हायरसचा प्रसार करण्यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळेच, हा हल्ला अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फेसबुकवर फोटो आणि व्हिडिओ यांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असल्याने युजरना या व्हायरसबाबत संशय येत नाही. त्याचप्रमाणे, अनेकदा फेसबुकवरील व्हिडिओ पाहण्यासाठी नवे प्लग-इन सहज डाउनलोड केले जातात. शिवाय, हा व्हायरस घेऊन येणारा व्हिडिओ हा एखाद्या जाहिरातीसारखा नसून खरोखर मित्राने आपल्यासाठी शेअर केल्यासारखा दिसत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात नाही.
सायबर हल्लेखोरांनी आता युजर्सची खासगी माहिती काढून घेण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढले आहेत. त्यामुळे व्हायरस हा कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगणे कठीण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता सोशल नेटवर्किंगवर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे सावधपणे पाहायची सवय युजर्सनी लावून घ्यायला हवी. वॉलवर एखादा व्हिडिओ शेअर करायचा झाल्यास त्यासोबत काही कमेंट लिहिण्याची सवयही युजर्सनी ठेवावी. म्हणजे शेअर झालेला व्हिडिओ हा बनावट नसून मित्रांनीच पाठवला असल्याचे ओळखणे फ्रेंडलिस्टमधील अन्य युजर्सना शक्य होईल. नवनव्या व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय शोधण्यासाठी फेसबुक, क्रोम आणि फायरफॉक्स यांचे प्रयत्न सुरूच आहेत. तथापि, त्यासाठी त्यांना युजर्सकडून सहकार्य मिळण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment