Tuesday, July 29, 2014

सावधान! नवा मलेरिया येतोय


संपूर्ण जगभरातील आजारांचे अभ्यासकेंद्र असलेल्या जिनिव्हातील 'सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल' या केंद्राने मलेशिया, फिलिपाइन्स, इंडोनेशिया व भारताला प्लाझ्मोडीयन नोलेसी या मलेरियाच्या पाचव्या प्रकाराबद्दल धोक्याची सूचना दिली आहे. पूर्वी मलेशियात आढळणारा अत्यंत जीवघेणा नोलेसी मलेरिया भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला आहे. २४ तासांच्या आत माणसाचा बळी घेणाऱ्या नोलेसी मलेरियासदृश पेशंट भारताच्या पूर्वेकडील राज्ये, महाराष्ट्र आणि आसपासच्या नक्षलग्रस्त भागांमधील घनदाट जंगलांमध्ये सापडल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
new-maleria
मलेरियाचे वायवॅक्स, फॅल्सीपॅरम, ओव्हेल व मलेरिया मलेरी हे चार प्रकार आहेत. त्यातील फॅल्सीपॅरम मलेरिया हा जीवघेणा आहे. पण त्यापेक्षाही कमी वेळात जीव घेणाऱ्या नोडेसी या मलेरियाच्या पाचव्या प्रकाराचा शोध १९३१मध्ये कोलकातामध्ये लागला. रॉबर्ट नोलेसी या शास्त्रज्ञाने तो शोधून काढल्यामुळे त्याचे नामकरण नोलेसी असे झाले. या शोधात कोलकाता येथील भारतीय संशोधक मोहनदास गुप्ता यांचाही सहभाग होता. सुरुवातीला माकडांमध्ये आढळणारा हा मलेरिया २००९पासून मलेशियात माणसांमध्ये आढळू लागला. सध्या हा मलेरिया माकडांपासून डासांच्या माध्यमातून माणसाला होतो. घनदाट जंगलाच्या भागात नोलेसीचा सर्वाधिक धोका आहे. महाराष्ट्र व आसपासच्या नक्षलग्रस्त भागात नोलेसी मलेरियासदृश पेशंट आढळून आल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्याचा मोठा फटका नक्षलग्रस्त भागातील जंगलात तैनात सीआरपीएफच्या जवानांना बसण्याची भीती आहे. या मलेरियाची लागण झाल्यावर २४ तासांत माणूस उपचारांअभावी मृत्युमुखी पडतो. मलेरियाच्या इतर प्रकारात थंडी-ताप, डोकेदुखी व इतर अवयव दुखतात. त्यामध्ये उपचारांसाठी वेळ मिळतो. पण नोलेसी मलेरियाची लागण होऊन वेळेत उपचार न मिळाल्यास पेशंटला जीव गमवावा लागतो. या मलेरियाची दखल सेंटर फार डिसीज कंट्रोल(सीडीसी)ने घेतली असून सीडीसीने भारतासह आशियाई देशांना नोलेसी मलेरियाचा धोका असल्याचे नमूद केले आहे.

सध्या जागतिक पातळीवर नोलेसीची चर्चा सुरू आहे. दक्षिण आशियाई देशांना धोका असल्याचे सीडीसीने नमूद केल्याने भारतात यावर संशोधन होण्याची गरज आहे. - डॉ. अमोल अन्नदाते बालरोगतज्ज्ञ व वैद्यकविषयक अभ्यासक

No comments:

Post a Comment