Friday, July 4, 2014

डूज अँड डोंट्स हनिमूनचे

डूज अँड डोंट्स हनिमूनचे


hm

'हनिमूनच्या वेळेस जोडीदारानं शरीरसंबंधांस नकार दिल्यास ती क्रूरता ठरत नाही,' असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टानं दिला आहे. हा निकाल देत कोर्टानं यापूर्वी शरीरसंबंधास नकार देणं क्रूरता ठरवून विवाहबंधन तोडण्याचा फॅमिली कोर्टानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवला आहे. हनिमूनच्या दरम्यान शरीरसंबंध घडायलाच हवा, अशी बहुतांश वेळा तरुणांच्या विशेषतः मुलांच्या डोक्यातील कल्पना असते. टीव्ही मालिका, सिनेमा यांतील चित्रविचित्र दृश्यांमुळे किंवा मित्रांनी करून दिलेल्या चुकीच्या कल्पनांमुळे अनेकदा मुलांचे हे विचार तयार होत जातात. साधारणपणे आत्तापर्यंत फुलांनी शृंगारलेला पलंग, चारी बाजूंनी पलंगाभोवती लावलेल्या माळा, हातात दुधाचा ग्लास घेऊन पुढे येणारी नायिका... अशा पद्धतीची दृश्यं सिनेमांमधून दाखवली जातात. 'सुहागरात'च्या या कल्पना प्रत्यक्षातही खऱ्या ठराव्यात, हा समज यातूनच घडत गेला, तर ते अगदीच चुकीचंही नाही. मात्र, प्रत्यक्षात हनिमूनच्या दरम्यानचा वेळ हा फक्त शरीरसंबंधांसाठीच असतो, हा समजच चुकीचा आहे.

तज्ज्ञ म्हणतात...

कौन्सेलर अश्विनी लाटकर यासंदर्भात म्हणाल्या, 'दरवेळी फक्त मुलंच दोषी असतात असं नाही, तर मुलींच्याही आधीच्या काही प्रकरणांमुळे त्या नवऱ्याची तुलना प्रत्येक वेळी पूर्वीच्या बॉयफ्रेंडशी करतात. अर्थात, लग्नापूर्वी एखादं तरी 'अफेअर' असणं हे अलीकडे तरुणांच्या बाबतीत फारच 'नॉर्मल' गोष्ट झाली आहे. मात्र, लग्नानंतर हनिमूनच्या दरम्यानचा वेळ हा खऱ्या अर्थाने एकमेकांच्या सहवासात घालवण्यासाठी मिळणारा वेळ असतो. त्यामुळे शाळा, कॉलेजच्या आठवणी, मित्रमैत्रीणी, नातेवाईक, त्यांचे स्वभाव, अगदी घरगुती संबंध असलेल्या व्यक्ती, त्यांच्याशी असलेली नाती आणि अर्थातच एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वभाववैशिष्ट्यं याविषयी जाणून घेण्यासाठी मिळणाऱ्या या वेळाचं सार्थक करायला हवं. हनिमूनहून पुन्हा घरी आल्यानंतर आपण रोजच्या कामांमध्ये अडकणारच असतो. त्यावेळी एकमेकांविषयी जाणून घ्यायला नीटसा वेळ आणि स्वस्थता मिळत नाही. त्यातून रोज खटके उडतात, चिडचिड होते. हे टाळण्यासाठी हनिमून दरम्यानचा वेळ सत्कारणी लावणं आ‍वश्यक आहे.'

थोडा वेळ द्यायला हवा

'लव्ह मॅरेज'मध्ये फार वेळा हे प्रश्न येत नाहीत. मात्र, ठरवून झालेल्या लग्नात हनिमून दरम्यानच्या वेळाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. त्याच वेळी एकमेकांना योग्य पद्धतीनं सांभाळून घेतलं नाही, तर जोडीदाराच्या स्वभावाविषयीची, वागण्या-बोलण्याविषयीची कायमची अढी मनात बसू शकते.

मुळात एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला काही कारणानं आकर्षण वाटायला हवं, तरच शारीरिक संबंध मनापासून ठेवावेसे वाटू शकतात. जोडीदाराविषयी मनापासून प्रेम वाटल्याशिवाय होणाऱ्या शारीरिक संबंधांना काहीच अर्थ नाही; कारण मनं जोडली जाण्याचा तोही एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुलगी पाहाताच क्षणी मुलाला आवडली असेलही; पण मुलगीही मुलाच्या प्रेमात तत्क्षणी पडेल, असं नाही. त्यामुळे 'अॅरेंज मॅरेज'च्या दरम्यान तरी किमान एकमेकांना समजून घेण्यासाठी काही काळ जाऊ द्यायला हवा.

बऱ्याचदा 'स्कोअर किती?', 'बॅटिंग सुरू आहे का रे?' यांसारखे मेसेजेस मुलांना सर्रास पाठवले जातात. त्यातून मुलांना प्रोत्साहन मिळत नाही, तर त्यांच्या भावना भडकवल्या जातात. मात्र, शरीरसंबंध ही अतिशय नाजूक भावना असते. तिचा इतक्या उथळ पातळीवर जाऊन केला गेलेला विचार आणि त्यातून घडलेली कृती ही जोडीदाराचं मन कायमचं दुखवण्यासही कारणीभूत ठरू शकते.

काळजी व्यक्त करणं आवश्यक

रस्ता क्रॉस करताना तिचा हात धरणं, तिच्या खांद्यावरची एखादी जड बॅग स्वतःहून पुढे होऊन उचलून घेणं यांसारख्या छोट्या कृतींतूनही तिचं मन राखलं जातं. त्यातून जोडीदाराची काळजी व्यक्त होते आणि नवरा म्हणून बायकोचा विश्वास जिंकणं आवश्यकच आहे. त्यासाठी हनिमून दरम्यानचा वेळ सत्कारणी लावता येऊ शकतो. यावेळी 'फॅमिली प्लॅनिंग', नोकरी, करिअर, भविष्यातील योजना यांच्याविषयीही संवाद साधता येऊ शकतो. विविध विषयांवरील एकमेकांची मतं विचारात घेणं, काही न पटणाऱ्या मात्र, फारच त्रासदायक नसलेल्या जोडीदाराच्या सवयी हसून सोडून देणं यांसारख्या गोष्टींतूनही एकमेकांना जाणून घेणं सोपं होतं. शारीरिक संबंधांविषयी काही अडचण वाटत असेल, तर लग्नाआधी किंवा त्यानंतर मात्र, वेळीच डॉक्टरांकडे जाणंही आवश्यक आहे.


शारीरिक संबंधांविषयी घरात बोलणं टाळू नये. मुलांच्या जडणघडणीतला तो एक महत्त्वाचा भाग आहे. पालक म्हणून तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने आणि व्यवस्थित संवाद साधता, यावर मुलांचे जोडीदार, शारीरिक संबंध आणि हनिमूनविषयीचे विचार पक्के होत जाणार असतात. त्यामुळे ही जबाबदारी पालकांचीही आहे.

No comments:

Post a Comment