Wednesday, July 30, 2014

येळ्ळूरवरून शिवसेनेचा 'यळकोट'

'कर्नाटक पोलीस हाय-हाय', 'बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे', अशा घोषणांनी आज संसद दुमदुमून गेली. येळ्ळूरमध्ये कानडी पोलिसांनी मराठी माणसावर केलेल्या अमानूष लाठीमाराच्या निषेधार्थ शिवसेना खासदारांनी लोकसभा डोक्यावर घेतली आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापतींना सभागृहाचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं.
lok-sabha
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचं संपूर्ण मराठी भाषकांचं गाव असलेल्या येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांनी रविवारी अक्षरशः राक्षसी थैमान घातलं. 'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' हा कर्नाटक सरकारनं शुक्रवारी पाडलेला चौथरा मराठीप्रेमींनी शनिवारी पुन्हा बसवल्यानं त्यांचा महाराष्ट्रद्वेष उफाळून आला होता. त्या रागाच्या भरात त्यांनी रविवारी तो चौथरा पुन्हा पाडला. त्यावेळी प्रतिकार करायला गेलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीमार केला. एवढ्यानं त्यांचं समाधान न झाल्यानं, त्यांनी घराघरांत घुसून तरुणांना, महिलांना बेदम मारहाण केली. सायकली, दुचाकी तोडल्या, गाड्याही फोडल्या. त्याचे तीव्र पडसाद सीमाभागात आणि महाराष्ट्रात उमटले होते.

या मुद्द्यावरून आधीपासूनच आक्रमक असलेल्या शिवसेनेनं 'कानडी मुजोरी'वर सडकून हल्ला चढवला. सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी त्यांनी पुन्हा उचलून धरली आहे आणि 'संयुक्त महाराष्ट्रा'चा नाराही बुलंद झाला आहे. तोच आज लोकसभेत घुमला. येळ्ळूरमध्ये जे काही घडलं ते भयंकर आहे, कर्नाटकच्या पोलिसांनी मानवी हक्क पायदळी तुडवलेत, त्यामुळे प्रश्नोत्तरांचा तास रद्द करून या विषयावर चर्चा घ्यावी, अशी मागणी शिवसेना खासदारांनी एकमुखानं केली. हौद्यात उतरून त्यांनी कर्नाटक पोलिसांचा धिक्कार सुरू केला. त्यावर, सभापती सुमित्रा महाजन यांनी हा विषय शून्य प्रहरात उपस्थित करण्याची सूचना खासदारांना केली. परंतु, ते काहीच ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं, आवाज वाढतच गेल्यानं महाजन यांनी १२ वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब केलं.

संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभेत पोहोचला असून त्याबाबत मोदी सरकार काय भूमिका घेतं, कर्नाटक सरकारच्या मुजोरीला कसा चाप लावतं, की महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशाच पडते, याची उत्सुकता मराठीजनांना आहे.

No comments:

Post a Comment