कुणाच्या ग्रुपवर कुणाचे मेसेज?
एके सकाळी उठून व्हॉट्स अॅप चेक केल्यावर लक्षात आलं, 'हॅपी बर्थडे वैशाली!' असं म्हटल्याबद्दल मावशीने मला चांगलंच झाडलंय. 'नावाने हाक मारतोस?' वगैरेपासून 'नात्याची काही आजकालच्या मुलांना किंमतच नाही'पर्यंत तिने शाब्दिक धुलाई केली होती. हे सगळं झालं होतं, ते 'वैशाली' हे नाव दोघींचं असल्यामुळे. एका मित्राची मावशी आणि त्याची मैत्रीण दोघींची नावंही वैशाली आहेत आणि त्यांचे वाढदिवसही एकाच दिवशी असतात. फक्त त्या दोन वेगवेगळ्या ग्रुप्सवर आहेत. मात्र, अलीकडे व्हॉट्स अॅपवरील ग्रुप्सच्या वाढलेल्या प्रमाणामुळे सगळ्यांच्याच बाबतीत विविध किस्से घडू लागले आहेत.
व्हॉट्स अॅपवर सध्या एकामागोमाग एक भारंभार ग्रुप्स तयार होत गेले आहेत. बालपणीचा मित्रांचा ग्रुप, कॉलेजचा ग्रुप, ऑफिसचा, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचा, एकत्र बॅडमिंटन खेळणाऱ्यांचा, फक्त भावंडांचा, क्लासचा आणि विविध उपक्रम एकत्र करणाऱ्यांचा... असे अनेक ग्रुप दणादण 'फॉर्म' होत गेले. यामुळे खरंतर दैनंदिन आयुष्यात नव्या ओझ्याची भर पडलेय. यातून काही गंभीर, तर काही गमतीदार किस्से घडू लागले आहेत.
एखाद्या फक्त मुलांच्या ग्रुपवरचा फोटो चुकून मित्रमैत्रीणींच्या एखाद्या ग्रुपवर पोस्ट केला जाऊ लागलाय, तर विशिष्ट कारणामुळे मित्राशी घालायचा वाद हा त्याच नावाच्या दुसऱ्या मित्राशी घातला जाऊ लागलाय. शुभम पांचाळ याविषयी म्हणाला, 'एकदा कॉलेजमध्ये सांगितलेल्या एका कामाची चर्चा नेमकी माझ्याकडून आमच्या क्लासच्या ग्रुपवर 'पोस्ट' झाली. तेव्हापासून मला 'शिक्षकांच्या मागे मागे फिरणारा' असं ग्रुपवर चिडवलं जाऊ लागलंय.' एकमेकांना चुकीचे निरोप जाणं, जिवंत व्यक्तीच्या बाबतीत 'आरआयपी' मेसेज फॉरवर्ड होणं यांसारख्या घटनाही ग्रुप्स अति झाल्यामुळे घडू लागल्या आहेत. यावर उपाय इतकाच, की कुणालाही मेसेज पाठवताना नेमक्या व्यक्तीला आणि योग्य तोच निरोप जाईल, याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. अन्यथा गैरसमज पसरायला वेळ लागणार नाही.
No comments:
Post a Comment