Monday, November 24, 2014

Cost for google search



गुगल सर्चसाठी पैसे मोजा



सध्या गुगल सर्च ही सुविधा मोफत उपलब्ध आहे. मात्र, जगात काहीच फुकट मिळत नाही, या न्यायानुसार गुगल या सर्चच्या बदल्यात युजरला जाहिराती दाखवते. या जाहिरातींसाठी युजरची व्यक्तीगत माहिती वापरली जाते असा आरोप सातत्याने केला जातो आणि त्यात तथ्यदेखील आहे. मात्र, आता ज्यांना जाहिराती नको त्यांच्यासाठी 'गुगल कंट्रीब्युटर' नावाने पेड सर्च सुविधा गुगलने सुरू केली आहे.

दरमहा १ ते ३ डॉलर दरम्यान शुल्क भरून या सुविधेचा लाभ घेता येतो. त्याबदल्यात ज्या वेबसाइटवर गुगलच्या जाहिराती दिसतात, त्या साइट तुम्हाला जाहिरातीशिवाय दिसतील व जाहिरातीच्या जागी एक चौकट असेल. तसेच या साइटवर तुमच्यासाठी धन्यवाद संदेशही दिसेल. जितके जास्त पैसे युजर देईल, तितक्या जास्त अॅड फ्री साइट्स त्याला पाहता येतील. या उपक्रमामध्ये सहभागी व्यक्ती देतील तो पैसा यात सहभागी झालेल्या वेबसाइटला देण्यात येणार असल्याचा गुगलचा दावा आहे. यामध्ये सहभागी झालेले युजर केवळ ते नियमित भेट देत असलेल्या साइटलाच निधी देऊ शकतील.

सध्या Mashable, Imgur, WikiHow, Science Daily, the ONION, urban dictionary या साइट यात सहभागी झाल्या आहेत. सध्या केवळ अमेरिकास्थित वेबसाइट यात सहभागी झाल्या असल्यातरी भविष्यात त्यात आणखी साइटची भर पडण्याची शक्यता आहे. गुगलने आमंत्रण पाठविलेल्या युजरलाच यात सहभागी होता येणार आहे. आमंत्रण न मिळालेले युजर https://www.google.com/contributor/welcome/ या लिंकवर जाऊन आमंत्रणासाठी असलेल्या वेटींग लिस्टमध्ये नाव नोंदवू शकतात. आमंत्रण मिळाल्यानंतर युजर यामधील साइट पाहून त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकतो. सहभागी झाल्यावर या साइटला भेट द्यायची असेल तर ब्राउझिंग पूर्वी गुगल अकाऊंटला लॉगिन करावे लागेल.

यापूर्वी Readability नावाच्या एका सुविधेचे गुगल कंट्रीब्युटर प्रमाणे मासिक शुल्क गोळा करून युजर नेहमी वापरत असलेल्या साइटला देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, २०१२ मध्ये ही सेवा बंद झाली. सध्या Next Web यासारख्या वेबसाइट युजरकडून वर्षाला सुमारे ३६ डॉलर शुल्क आकारून त्यांच्या साइटला अॅड फ्री अॅक्सेस पुरवतात. सध्या गुगलचा हा उपक्रम अगदीच प्राथमिक पातळीवर असला तरी येत्या काळात त्याचे यश-अपयश समोर येईलच. मात्र, खासगी माहिती गुप्त ठेवण्याविषयी युजरमध्ये निर्माण झालेली जागृतीआणि गुगलकडून आकारली जाणारी किरकोळ रक्कम पाहता, ही सेवा यशस्वी होण्यात फारशा अडचणी येणार नाहीत, असे दिसते.

No comments:

Post a Comment