' एमईएस'कडून 'मॅरिटल कौन्सिलिंग' अभ्यासक्रम सुरू
१३ फेब्रुवारीपासून बॅचला सुरुवात
' लग्नापूर्वी स्वभावातील दोष कळाले असते तर आज वाद झाले नसते, रोज भांडत बसण्यापेक्षा वेगळेच झालेले बरे,' असे सांगत थेट घटस्फोटाचा निर्णय घेणा-या तरुण जोडप्यांची संख्या वेगाने वाढते आहे. या तरुणांना लग्नापूर्वी अथवा लग्नानंतरही योग्य समुपदेशन मिळाले तर लग्न व्यवस्था मोडणार नाही. आपल्या संस्कृतीची ओळख असलेली ही लग्न व्यवस्था वाचविण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कम्युनिटी कॉलेजने 'मॅरिटल कौन्सिलिंग' हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
समाजात समुपदेशकांची संख्या वाढल्यास लग्न व्यवस्था वाचविण्यास नक्कीच मदत होईल, हा या अभ्यासक्रमामागील हेतू आहे. काही वर्षांपूर्वी घटस्फोट हा शब्द उच्चारताना देखील लोक बिचकत होते, पण अलीकडे लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोटाचा विचार केला जातो. या बाबत केंदाचे वरिष्ठ समुपदेशक डॉ. भारत देसाई म्हणाले, 'अलीकडे कुटुंबजीवन बदलत चालले असून, दाम्पत्य टिकले तरच कुटुंबे टिकणार आहेत. पती अथवा पत्नीला एकमेकांमध्ये होत असलेले मतभेद आणि मानसिक प्रवाह समजून घेणारी विश्वासार्ह व्यक्ती मिळाली तर, ते नक्कीच आपले मन मोकळे करतील. या संवदेनशील कामासाठी समुपदेशकांची गरज आहे. लग्नाच्या आधी अथवा लग्नानंतर योग्य सल्ला मिळाल्यास जोडप्यांमधील मतभेद नक्कीच टाळता येतील. त्यामुळे या अभ्यासक्रमातून आम्ही समुपदेशक घडविणार आहोत,' असे देसाई यांनी सांगितले.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या पहिल्या बॅचने कोर्स नुकताच पूर्ण केला असून, त्यात वकील, समुपदेशक, आणि या विषयामध्ये आवड आणि लग्न व्यवस्थेविषयी आस्था असलेले नागरिक यात सहभागी झाले. अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळणार असून, येत्या १३ फेब्रुवारीला दुसरी बॅच सुरू होते आहे, अशी माहिती समन्वयक अमृता दाबके यांनी दिली.
कसा असेल अभ्यासक्रम
- ' मॅरिटल कौन्सिलिंग' हा अभ्यासक्रम हा चार महिन्यांचा असेल.
- त्यात लग्न व्यवस्थेचा काळानुसार बदलत गेलेला प्रवास, त्याबाबतचे कायदे, सामाजिक मानसिकता, वधूवर सूचक मंडळांची भूमिका, जोडप्यांच्या समस्या, एकेरी पालकत्व, घटस्फोट प्रक्रिया, समुपदेशाच्या शास्त्रीय पद्धती या विषयांचा समावेश आहे.
- या क्षेत्रात काम करणा-या तज्ज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Marital counseling to avoid divorce
No comments:
Post a Comment