करिअरिस्ट मीं : चंदनाचा देह
ज्या काळात करिअरिस्ट स्त्री हा शब्दही वापरात नव्हता आणि कुणी स्त्री त्यात नव्हती, अशा वेळी जयंती ऊर्फ मावशींनी 'पब्लिसिटी' व्यवसायात पाऊल टाकलं. त्यांच्या भाच्याच्या शब्दांत चंदनासारखं झिजून मावशींनी 'बीवायपी' ब्रँड निर्माण केला. आज वयाच्या ८१ व्या वर्षीही 'बीवायपी' च्या मॅनेजिंग डायरेक्टर असणाऱ्या मावशींविषयी..
जाहिरातीच्या क्षेत्रात आज 'बीवायपी' हा एक ब्रँड झालेला आहे आणि हा ब्रँड ज्यांनी निर्माण केला, ते संस्थेचे दोन प्रमुख आधारस्तंभ कै. दादा पाध्ये आणि त्यांची मेव्हणी जयंती जोशी ऊर्फ मावशी. दादा त्या वेळी 'लोकमान्य' दैनिक बंद पडल्यानंतर चिमणलाल शहांच्या 'प्रजामित्र' या मराठी वर्तमानपत्रासाठी स्पेस मार्केटिंगचं काम करत होते. दादांचं मन काही नोकरीत रमत नव्हतं. व्यवसाय सुरू करायचा त्यांचा विचार होता. अर्थात त्यासाठी आर्थिक पाठबळ हवं आणि माणसं हवीत. या दोन्ही गोष्टी सुरुवातीला गाठीशी नव्हत्या. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मेव्हणीला विचारलं. काही कारणाने जयंती जोशी यांचा घटस्फोट झाला. त्यामुळे त्या बहिणीकडेच राहात होत्या आणि 'झारापकर्स'मध्ये नोकरीही करत होत्या. मावशींनीही नोकरी सोडून त्यांना साथ द्यायची ठरवली. ९ एप्रिल १९५९, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बी.वाय. पाध्ये पब्लिसिटीची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून प्रचंड मेहनत करत मावशींनी आणि दादा पाध्येंनी 'बीवायपी'चा डोलारा उभा केला. आज मावशी ८१ वर्षांच्या आहेत. तरीही तेवढय़ाच सक्रिय आहेत.
दादा जाहिराती मिळवायचे आणि कार्यालयातल्या व्यवस्थापनापासून ते वर्तमानपत्रात जाहिराती पोहोचवण्यापर्यंत सगळी कामं मावशीच करायच्या. खरं तर, त्या काळात या क्षेत्रात कुणी स्त्रिया नव्हत्या. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या कार्यालयात जेव्हा मावशी जाहिराती घेऊन जात असत, तेव्हा सगळ्यांनाच त्यांचं अप्रूप वाटे. त्याचं काम अत्यंत नेटकं, शिस्तशीर आणि चोख असायचं. बहिणीच्या मुलांची मावशी असल्यामुळे अगदी तरुण वयातच त्या सगळ्यांच्याच मावशी झाल्या.
भल्या पहाटे ५ वाजता मावशींचा दिवस सुरू व्हायचा. उठल्यावर आधी दादर स्टेशनवर जायचं आणि एजन्सीज्साठी ज्या वर्तमानपत्रांच्या प्रती येतात त्या घेऊन यायच्या, हे रोजचं काम. मग ऑफिसमध्ये आलेल्या सगळ्या जाहिरातींच्या प्रती हाताने तयार करायच्या. तेव्हा झेरॉक्स नसल्याने ४०/४० प्रती हाताने तयार कराव्या लागत. त्या वेळी जाहिरातींचे ब्लॉक गिरगावातल्या मुगभाट लेनमध्ये करून मिळत. ते करून घ्यायचे आणि सगळ्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयात ते नेऊन द्यायचे. बरं, त्यातला एखादा ब्लॉक तुटलेला निघाला तर परत तो गिरगावात नेऊन बदलून आणायचा. तेव्हा 'लोकसत्ता'चं कार्यालय ससून डॉकला होतं. तिथून त्या सगळ्या वर्तमानपत्रांची कामं करत करत 'नवशक्ती'त जाऊन मग घरी येत असत. म्हणजे अनेकदा सकाळी १० वाजता मावशी दादरहून निघत ते संध्याकाळी ५ वाजता घरी येत असत. पण एवढे कष्ट करत असूनही दुपारच्या उन्हात फिरताना एक आण्याचं सरबत प्यायचं असेल तरी त्या १० वेळा विचार करत.
आपल्या आठवणी सांगताना मावशी म्हणाल्या, ''त्या सुरुवातीच्या दिवसात खरंच आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते आणि त्यामुळे या कामासाठी आम्ही माणूसही ठेवू शकत नव्हतो. मलाही या क्षेत्रातलं काहीच ठाऊक नव्हतं. पण असेल ते काम करायची तयारी होती आणि धडाडीही होती. लहानपणापासून आईची शिकवणही तशीच होती. एकतर मी बहिणीकडे राहात होते. त्यामुळे जेव्हा दादांनी या व्यवसायाचा विषय काढला, तेव्हा मलाही वाटलं की मी त्यांच्यासाठी काही करू शकले तर उत्तम. शिवाय मलाही त्यांच्यावर भार होऊन राहायचं नव्हतं. खरं तर त्यावेळी बँकेत सेव्हिंग खातं कसं उघडायचं हेही मला ठाऊक नव्हतं. इंग्रजी पाचवीपर्यंत माझं शिक्षण झालेलं. त्यामुळे हळूहळू कामाची माहिती करून घेत घेत मी ते काम करायला लागले. दादांना फंडाचे काही पैसे मिळाले होते. ते बँकेत ठेवून आम्ही या व्यवसायाला सुरुवात केली. कसं काय जमेल आपल्याला, असा प्रश्नच होता. पण दादांना नोकरीत असताना पगार होता २५० रुपये आणि पहिल्याच महिन्यात आम्हाला ३०० रुपये कमिशन मिळालं. तेव्हाच लक्षात आलं की, हे जमू शकेल आपल्याला.''
मावशींमधला हा आत्मविश्वास त्यांच्या व्यवसायाला खूपच उपकारक ठरला. शिवाय, त्याही सतत शिकत राहिल्या. केवळ व्यवसायातलं ज्ञान नाही तर मागे पडलेला शाळेचा अभ्यासही त्यांनी पूर्ण केला. त्यांनी दहावी बाहेरून पूर्ण केली. १७ वर्षांचा खंड पडला होता, पण तरीही कामातून जसा वेळ मिळेल तसा काढून, अगदी शेवटच्या १५ दिवसांत केवळ अडीच तास अभ्यास करून जिद्दीने मावशी १९६४ साली पिंगेज क्लासेसच्या खासगी शाखेमधून ५५ टक्के मार्क मिळवून पहिल्या आल्या.
आज या वयातही त्या 'बीवायपी'च्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. सकाळी ९ ते दुपारी साडेबारापर्यंत त्या ऑफिसमध्ये येऊन तिथल्या व्यवस्थापनात लक्ष घालतात. एवढंच नाही तर घरच्या आघाडीवरही त्यांचं सगळ्यांकडे लक्ष असतं. घरातल्या वस्तूंपासून ते घरच्यांच्या खरेदीपर्यंत सगळ्यांची व्यवस्था त्यांच्याचकडे असते. किंबहुना विजय, दिलीप, श्रीराम ही भाचे मंडळी म्हणतात की, आमचा संसारही आमची मावशीच उत्तमरीत्या चालवते. त्यामुळे आम्हाला काहीच बघावं लागत नाही. दादा गेल्यानंतर आता 'बीवायपी'चा बराचसा कारभार मावशींबरोबर विजय पाध्येच पाहतात.
विजय सांगतात, ''आज मी जो काही आहे तो केवळ मावशीमुळेच. व्यवहारज्ञान आणि उद्योगाचं बाळकडू मला घरातच मिळालं. आमची मावशी व्यवहाराला अत्यंत चोख. तिचं म्हणणं १ रुपया असो किंवा १ कोटी रुपये असोत, त्याचा हिशोब देता आला पाहिजे. आमचा घरचा हिशोबही आम्ही अत्यंत काटेकोरपणे लिहितो. म्हणजे अगदी दोन रुपयांची कोथिंबीर आणली तरी ती हिशोबात लिहिली जाते. ती म्हणते, भले तुम्ही हॉटेलमध्ये जा, मजा करा. पण त्या पैशाचा हिशोब द्या. तिच्यामुळे आम्हाला घरातल्या सगळ्यांना हीच सवय लागली आहे. तसं बघायला गेलं तर आमच्या मावशीकडे आर्थिक क्षेत्रातली कोणतीच पदवी नसताना आमच्या ऑफिसच्या हिशोबाची स्वत:ची एक पद्धत तिने तयार केली. व्यवसाय वाढल्यावर पुढे सी.ए.ला जेव्हा आम्ही विचारलं, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि तीच पद्धत सीएनेही ग्राह्य़ आणि योग्य मानली हे विशेष. तिच्यामुळे आमच्या व्यवसायात जी पारदर्शकता आहे, ती आम्ही आजही ठेवली आहे. समोरच्या माणसाला कधीही फसवायचं नाही आणि आपण कुणाचे पैसे देणं ठेवायचं नाही, हा तिने घालून दिलेला दंडक आहे. १००/१५० बिलं एकत्र तपासताना त्यातली छोटीशी चूकही तिच्या नजरेतून सुटत नाही किंवा जर चुकून त्यांच्याकडून कमी दर लावलेला असला तरी ती बिलं वर्तमानपत्रांना परत पाठवत असे. प्रसंगी, 'द्या हो मावशी पाठवून, उलट तुम्हाला थोडे कमी पैसे द्यावे लागणार आहेत. तुमचं नुकसान नाहीए ना?' असा निरोप वर्तमानपत्रांच्या कार्यालयामधून यायचा. त्यावर मावशी म्हणायची, 'पाच वर्षांनी जर ही गोष्ट तुमच्या सीएच्या लक्षात आली आणि त्याने चौकशी केली तर उगाच आम्ही तुम्हाला फसवलं असा त्याचा अर्थ होईल. तेव्हा हिशोब आपण चोख ठेवूया.' मावशीच्या या हिशोबामुळेच आमचा व्यवहार आजही चोख आहे. दादांनी आमचं एजन्सीचं मंदिर उभं केलं. त्यात चंदनासारखी झिजली मावशी आणि ते मंदिर मजबूत करण्यासाठी त्या चंदनाचा सिमेंटसारखा उपयोग झाला. अर्थात यात आमच्या आईचंही श्रेय तेवढंच आहे. पण त्या सुरुवातीच्या काळात मावशी बाहेरचं सगळं करायची आणि आई घर सांभाळायची. पण 'तू बाहेर फिरतेस' अशी तक्रार आईनेही कधी केली नाही. कारण ती आपल्या कुटुंबासाठीच करते आहे याची जाणीव तिलाही होती. आमचे दादा गमतीने म्हणायचे की, व्यवसाय सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत जर मावशीने एकेक रुपया जरी बाजूला काढला असता तरी आज ती लक्षाधीश झाली असती. पण एक पैशाचा जरी हिशोब लागला नाही तरी तिला रात्री झोप येत नाही, ती एक रुपया कुठचा बाजूला करणार?''
इतका दुसऱ्याचा विचार करून वागणारी माणसं सापडणं आज विरळच. विजय, दिलीप, श्रीराम हे तीनही भाऊ एकत्र राहतात. दादा,आई यांच्याबरोबरच किंबहुना थोडं जास्तच मावशीच्या शिकवणीमुळे आज त्यांच्यातलाही स्नेहाचा धागा पक्का झालेला आहे आणि हे संपूर्ण घर गुण्यागोविंदाने एकत्र नांदतंय.
रोजच्या जगण्यात आवश्यक अशा अनेक गोष्टींचं ज्ञान मावशींना आहे आणि ते ज्ञान ऐकून वाचून मिळवलेलं आहे आणि वाढवलेलंही आहे. त्यांना पंचांग अचूक कळतं. घरात कुणी आजारी पडलं तर त्याची सुश्रूषा मावशीच करणार, असा एक अलिखित नियमच झालेला आहे. मुख्य म्हणजे त्यांना नाडी परीक्षा अचूक करता येते. आयुर्वेदातल्या बऱ्याच औषधांची माहिती आहे, त्यामुळे सुश्रूषा करताना त्या औषधांचं महत्त्व ओळखून आणि स्वभावाप्रमाणे मनापासून न कंटाळता त्या एखाद्याची काळजी घेत असतात. १९८७ साली जेव्हा दादांना हार्टअॅटॅक आला तेव्हापासून पुढे जवळजवळ २२/२३ वर्षे त्यांना दिवसाला १०/१२ गोळ्या घ्यायला लागायच्या. त्यामुळे ते कंटाळा करत आणि कोणती गोळी कोणत्या वेळी घ्यायची हे त्यांच्या लक्षातही राहात नसे. पण मावशी त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटं करून ठेवत आणि त्या त्या वेळी त्यांना देत. त्यामुळे वेळच्या वेळेवर औषधं दिल्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य अधिक सुकर झालं. तसंच विजय आणि दिलीप ते १० वर्षांचे असताना दोघांना एकदम कांजिण्या झाल्या होत्या. त्यांच्यात एक वर्षांचाच फरक आहे. त्यामुळे दोघंही लहान. पहिले दोन-तीन दिवस त्याचा असर जास्त असतो आणि या दिवसात शरीराला खूप खाज सुटते. मुलं लहान असल्याने त्यांना खाजवू न देता त्यांचं लक्ष तिथून दुसरीकडे जावं म्हणून मावशी कायम त्यांच्या उशाशी बसलेल्या असत. त्यांचं खांणं-पिणं, त्यांची औषधं आणि खाजवण्यावर त्यांचं लक्ष जाऊ नये म्हणून त्यांच्याशी गप्पा मारणं हा त्यांचा अखंड यज्ञ चालू होता. शिवाय सुरुवातीच्या या दिवसात घर आणि ऑफिस एकत्रच असल्याने तेवढय़ात कुणी काही कामासाठी आला तर त्याच्याशीही बोलायचं. या सगळ्या गोष्टी एका वेळी सुरू असत.
आणि या सेवासुश्रूषेच्या बाबतीत त्यांनी आपलं परकं असं कधी मानलं नाही. गेली ४५ वर्षे त्यांच्याकडे नोकरीत असणारे धामणस्कर हे आता त्यांच्या घरचेच झालेत. काही वर्षांपूर्वी त्यांचं एक मोठं ऑपरेशन झालं किंवा त्यांनाही जेव्हा अॅटॅक आला तेव्हा त्यांच्या घरी कुणी नसल्याने ते काही दिवस पाध्येंकडेच राहात होते. या दिवसात त्यांना डॉक्टरांकडे नेणं. त्यांची औषधं वेळच्या वेळेवर देणं. त्यांना योग्य ते जेवण-खाण देणं, यासगळ्याकडे मावशींचंच जातीने लक्ष होतं. आजही अगदी विजय, दिलीप, राम यांच्या मुलींना किंवा त्यांच्या नातवंडांनाही जेव्हा बरं नसतं तेव्हा पहिला फोन मावशींना जातो. कारण सगळे प्रश्न तिथे सुटतात, याची आतापर्यंत सगळ्यांना खात्री झालेली आहे.
खरं तर, कुणाचाही मावशींशी एकदा संपर्क आला की, त्यांचं कायमस्वरूपी नातंच बनून जातं. इतकी आपुलकी त्यांच्यात भरलेली आहे. घरातल्या सुनांनाही त्यांचं ते प्रेम मिळाल्यामुळे माहेरी जाणं हा केवळ एक उपचार असतो त्यांच्यासाठी. घरातला कोरम पूर्ण झाल्याशिवाय आणि गप्पिष्ट मावशींच्या गप्पा ऐकल्याशिवाय कुणाला चैनच पडत नाही. घरातल्या या माणसांव्यतिरिक्त कितीतरी माणसं मावशींनी जोडलेली आहेत. नाटय़सृष्टीतील अजित भुरे यांचंही मावशीशी असंच नातं आहे. ते म्हणतात, ''व्यवहाराला अत्यंत काटेकोर, वरवर रोखठोक, पण आतून अत्यंत प्रेमळ असलेल्या मावशीचं आमच्यावर खूप प्रेम. म्हणजे आमचं बिल थकलं असेल तर वसुली करणार. पण जेव्हा प्रेमाने एखादं बक्षीस द्यायचं असेल तेव्हा तेही देणार. खरं तर त्या व्यवहाराला चोख असल्यामुळेच आज बीवायपी टिकली! ''
खरोखरंच त्या काळात नाटकांच्या जाहिरातींचे पैसे वसूल करणं मुश्कील असायचं. ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग असेल, त्या दिवशी थिएटरवर जाऊन त्या जाहिरातीच्या पैशांची वसुली करावी लागे. पहिला अंक संपला की, त्यांचा हिशोब पूर्ण होई आणि मग यांचे जाहिरातीचे पैसे मिळत. मावशी स्वत: रोज थिएटरवर जाऊन वसुली करत असे किंवा त्या वेळी वेगवेगळ्या क्लासेसच्या जाहिराती असत. तर बहुतेक सगळ्या क्लासेसच्या मार्च ते जून जाहिराती असत. पण पैसे मात्र जूनमध्ये अॅडमिशन झाल्यावर मिळायचे. रोज रात्री क्लास बंद करताना हिशोब झाला की यांना जाहिरातीचे पैसे मिळायचे. मग रात्री मावशीचं ठरलेलं असे- कापडाची पिशवी घ्यायची आणि वसुलीसाठी क्लासवर निघायचं. पैसे पिशवीत टाकायचे आणि घरी यायचं. रात्री उशिरा अनेकदा रस्त्याला फारशी वर्दळही नसायची. एकदा एक गृहस्थ मावशींच्या मागे लागला. पिशवीत तेव्हा तीन हजार रुपये होते. मावशी कोहिनूर सिनेमाच्या बाजूने निघाल्या आणि व्ही. एस. मालंडकरांच्या दुकानात शिरल्या. त्यांना त्या भाई म्हणत. मावशींनी तो गृहस्थ मागे लागल्याचं सांगितलं. भाईही थोडय़ा वेळाने दुकान बंदच करणार होते. तोपर्यंत मावशी तिथे बसल्या, मग भाईंबरोबर घरी आल्या. सगळीकडे त्यांची माणसं जोडलेली होती. त्यामुळे असे प्रसंग आले तरी त्यातून त्या बाहेर पडल्या आणि अनेकांशी नातं जोडलेलं राहिलं.
मावशींचा आध्यात्मिक अधिकारही मोठा आहे. त्यामुळे कधीकधी विनय आपटे मावशींकडे दृष्ट काढून घेण्यासाठी येतात किंवा घरात कुणाला बरं नसलं की मावशींच्या हातून साईबाबांची उदी लावली तर बरं होणार ही एक घरातल्या सगळ्यांची श्रद्धा आहे. शिवाय वेगवेगळ्या देवस्थानांना किंवा हिंगणे संस्थानासारख्या सामाजिक संस्थांना मदत करण्याची सवय तिने सगळ्यांनाच लावलेली आहे. करिअरची वेगळी वाट धुंडाळताना माणुसकीचा आणि आपुलकीचा झरा जर आपल्यात असेल, तर मावशींसारखे आदर्श आजही निर्माण होऊ शकतात. आज जाहिरातीच्या क्षेत्रात अनेक मुली आहेत, पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मावशींनी त्यांच्या करिअरची धडाडीने सुरुवात करून एक वेगळी वाट यशस्वीपणे चोखाळली, एवढं निश्चित..
प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे म्हणतात, ''माय मरो नि मावशी जगो हे ज्या आत्मीयतेने म्हटलं जातं, त्यात या मावशीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. मावशी म्हणून ती अत्यंत प्रेमाने आमचे लाड पुरवते. विजय, दिलीप, श्रीराममुळे आमचीही ती मावशी झाली. आपल्या आनंदात आणि दु:खात काही माणसं ठामपणे आपल्या पाठीशी असतील याची आपल्याला खात्री असते. अशा माणसांपैकी मावशी आहे. मावशी जगन्मित्र आहे. प्रसंगी तिच्या जिभेला तिखट धार आहे. पण तेवढय़ाच प्रेमाने ती सगळ्यांचं करतेही. ५० वर्षांपूर्वी ज्या ताकदीने ही बाई व्यवसायात उभी राहिली, त्याला सलाम आहे.''
No comments:
Post a Comment