Saturday, February 11, 2012

संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांचे भाषण

संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांचे भाषण

आजच्या साहित्यिकांची जबाबदारी
शनिवार, ४ फेब्रुवा्ररी २०१२
altउद्घाटक न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, पूर्वाध्यक्ष आणि आमचे मित्र श्रीयुत उत्तम कांबळे, डॉ. महिपसिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराजजी चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार संजयजी देवतळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, गेंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आईंचवार, स्वागताध्यक्ष श्रीयुत शांतारामजी पोटदुखे, महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती उषा तांबे, महामंडळाचे पदाधिकारी, कार्याध्यक्ष प्राचार्य मदनरावजी धनकर, मुख्य कार्यवाह डॉ. कीíतवर्धन दीक्षित आणि मान्यवर साहित्यिक, कलावंत आणि रसिक श्रोतेहो, अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे त्रेपन्नावे अधिवेशन 5 जानेवारी 1979 रोजी चंद्रपूर येथे झाले होते. त्यावेळी सम्मेलनाचे अध्यक्ष प्रख्यात कथाकार प्रा. वामन कृष्ण चोरघडे हे होते. आणि स्वागताध्यक्ष श्रीयुत शांतारामजी पोटदुखे हे होते. त्यावेळच्या सम्मेलनात मी माझ्या एकदोन कविता वाचल्या होत्या. तेहतीस वर्षांनंतर आज दिनांक 3 फेब्रुवारी 2012 रोजी मी माझे अध्यक्षीय भाषण करायला उभा राहिलो आहे. खरे तर मी माझ्या घरी, माझ्या कुटुंबात परत आलो आहे अशीच माझी भावना आहे. मी भाषेच्या घरात राहतो, भाषेच्या प्रदेशात माझा रहिवास आहे. हे घर खूप मोठे आहे, हा प्र्रदेश खूप विस्तीर्ण आहे. मी या घराच्या विविध दालनांमधून वावरतो, गवाक्षांतून बाहेर पाहातो, याच्या तळघरांतून आणि भुयारांतून हिंडत असतो. याची कित्येक दालने अजून मी पाहिलेलीदेखील नाहीत. परंतु माझे संचित मोठे आहे. याच घरात वावरलेल्या कित्येक महानुभावांचे ते अक्षरसंचित आहे. तो माझा ठेवा आहे. मी काही थोडी टिपणे तेवढी काढलेली आहेत. थोडा विसावा घ्यावा म्हणून मधून मधून मी माझ्या महाकाय पूर्वजांच्या तळहाताएवढय़ा कोपर्यात येतो. या जागेजवळ एक अवाढव्य खिडकी आहे. तीमधून मी बाहेर डोकावतो. मी आत आणि बाहेर पाहण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. फार थोडे मला जमले आहे. माझ्या आतही एक जग आहे आणि त्यात सतत कोलाहल सुरू असतो. या कोलाहलातही एक शांत स्वर शोधण्याचा माझा प्रयत्न असतो. मी आता या क्षणी मी माझ्या आतल्या आणि बाहेरच्या कोलाहलासह आपणासमोर उभा आहे.
तेहतीस वर्षांनंतरचे चंद्रपूर पुष्कळच वाढले, विस्तारले आहे. सगळीच निमशहरे, शहरे, महानगरे आपले रूप बदलत आहेत. इतिहासातच झोपून गेल्यासारखे वाटणारे हे शहरही आता पापण्या उघडून इकडेतिकडे पाहू लागले आहे. श्रीमहाकाली, अचलेश्वर यांच्या नंतर सुपर थर्मल पॉवर प्लांट हे आधुनिक काळातले नवे देवालय इथे आलेले आहे. या रोपटय़ातून निघालेले विजेचे हात दूरपर्यन्त पोचलेले आहेत. शहरांत झगमगाट आहे, परंतु खेडय़ांमध्ये, रानांमध्ये प्रकाशाचे थेंब पाझरत आहेत की नाहीत याबद्दल मी साशंक आहे. मधून मधून मला मात्र डोळ्यांमधले अंगार फुललेले दिसतात. उन्हाचा, पावसाचा स्पर्श झाला नाही तर झाडेही वेडीवाकडी वाढत जातात, तेथे माणसांचे काय.
लोकपूर, इंदुपूर, चांदा, चंद्रपूर अशी या शहराची नावे बदलत गेलेली असली तरी याचे मूळचे लोकपूर हे नाव अद्यापही यथार्थ आहे. मराठी भाषक आहेतच, तेलुगूभाषक आले, सिंधीभाषक आले, बंगालीभाषक आले आणि सगळेच या भाषापुंजात सामावून गेले. गोंडी, कोलामी इत्यादी आदिभाषक आहेतच. 1961 च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात बंजारी, गोंडी, गुजराती, हिंदी, कन्नड, कोलामी, मराठी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलणारे लोक होते. सुमारे 76 टक्के मराठी, 12 टक्के गोंडी आणि 8 टक्के तेलुगू भाषक असे त्यावेळचे प्रमाण होते. नागपुरी, वर्हाडी, झाडी या बोली बोलणारेही या भाषापुंजात आहेतच. इतक्या सगळ्या भाषा बोलणारे लोक इथे आहेत म्हणून हे लोकपूर. हे सगळे लोक मनात वागवत मी इथून बाहेर गेलो आणि पुन्हा परत आलो. उधळ्या मुलाची गोष्ट प्रसिद्धच आहे. तो घरी परत येतो तेव्हा त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहिलेले नसते. माझे तसे झाले नाही. आपण अगदी नम्रच होऊन जावे असे काही मिळत गेले आणि सगळा अहंकारच नाहीसा होऊन जावा असे कितीएक क्षण आले. परंतु आपण दुभंगलेल्या सांस्कृतिक अवस्थेत वाढलो असल्यामुळे आमच्या मनाच्या गत्रेत अजून अंधार खळाळत आहे.
याच शहराच्या रस्त्यांवरून माझे बालपण चालत गेले आणि याच शहरात मला केव्हातरी कवितेच्या कीटकाचा दंश झाला. महाकाली, त्या देवीच्या पलीकडच्या अजस्र पाषाणमूर्ती माझ्या कवितांमध्ये प्रतिमा म्हणून येऊ लागल्या. तेव्हाच्या योगभ्रष्ट या प्रदीर्घ कवितेत मी लिहिले होते  चांदा हे शहर अमुकसाठी प्रसिद्ध असून तमुकसाठी अप्रसिद्ध असले तरी येथे दर चत्र पौर्णिमेला महाकालीची मोठी यात्रा भरते.
त्यावेळी महाकालीचे जे रूप मला जाणवले होते तेही लिहिले

महाकाली.
जळते डोळे.
जळते हास्य.
जळते, उघडे नागडे नृत्य.

हे नृत्य विध्वंसाचे नाही, सर्जनाचे आहे. विध्वंसापेक्षा सर्जनावर माझा जास्त विश्वास आहे. समाजाची जुनाट खिळखिळी झालेली संरचना नष्ट केली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी नवी आणि अधिक उत्तम अशी संरचना उभारली पाहिजे हे मी त्यावेळच्या 'माझ्या लोकांचा आकांत' या कवितेत लिहिले होते. अर्थात माझ्या लोकांचा आकांत अद्याप मावळला नाही. अजूनही दूरवर पसरलेल्या अरण्यांमधून दुखितांचे विव्हल स्वर वार्यावरून माझ्यापर्यन्त पोचतात.
पुढे काही बोलण्यापूर्वी मला छळत असलेले एक दुस्वप्न आपणास सांगावे असे वाटते. एका अंधुक खोलीत मी प्रवेश केला तेव्हा हळूहळू आतले चेहरे दिसू लागले. त्यांवर यातना आणि हताशा होती. मुले होती, स्त्रिया होत्या, म्हातारी माणसे होती. सगळीच विझलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली. मी विचारले, काय काम आहे, तुम्ही कोण आहात. त्यांचे ओठ हलले नाहीत पण घोष ऐकू आला. आम्ही तुझ्याचकडे आलो आहोत. स्वतवर मृत्यूची विकराल छाया ओढवून घेणार्या शेतकर्याच्या नात्यातली ती माणसे होती. आम्ही तुझ्याचकडे आलो आहोत, हा घोष पुन्हा पुन्हा कानांवर पडू लागला.
क्षणभर मी डोळे मिटले आणि पुन्हा उघडले तेव्हा तिथे काहीही नव्हते. परंतु तो भ्रमच असावा. मी एका दुस्वप्नातच वावरतो आहे असे मला सारखे वाटत राहते.
चंद्रपूर हे शहर माझ्या घडणीशी निगडित आहे. सुरवंटातून फुलपाखरू व्हावे हा वाक्प्रचार एरवी वापरला असता, पण तो माझ्या प्रकृतीला मानवत नाही. बालवय, कुमारवय, पौगंडावस्था, पुढे युवावस्था ही माझी स्थित्यंतरे झाली. एखादा मजकूर आपण जुळवायला देतो. मग जुळारी भरपूर चुका असलेले पहिले मुद्रित देतो, मग, दुसरे, तिसरे. अंतिम म्हणून दिलेल्या मुद्रितातही भरपूर मुद्रणदोष असतात. पण आपण जाऊ दे म्हणतो. तर असा अजूनही भरपूर मुद्रणदोष असलेला मजकूर मी आहे. त्यामुळे मला वाचायचे कसे हा प्रश्न लोकांना पडत असावा. तरी या माझ्या मुद्रणदोषांसह मला माझ्या आप्तस्वकीयांनी, मित्रांनी, हितचिंतकांनी स्वीकारले याबद्दल मी कृतज्ञ आहे. एका शब्दापुढे दुसरा शब्द ठेवला तर अर्थाचे अनेक स्तर उलगडत जातात हे याच शहरात मला समजले. आतले आणि बाहेरचे सगळे आकांत ओढून काढण्याचे काम मी याच शहरात सुरू केले. मी भुकेच्या, उन्हाच्या, उद्ध्वस्त रात्रीच्या देवाला म्हटले होते  आपल्या अजस्र दगडी पावलांखाली मला सुखानं झोपू द्या. ती झोप मला अद्याप मिळालेली नाही. आमच्या समकालीनांनाही अशी झोप मिळालेली नाही याची मला कल्पना आहे. डोस्टोवस्की, मार्क्‍स, लेनिन, चे गेवारा, सात्र्, काम्यू, काफ्का, गांधी, नेहरू, लोर्का, बेकेट, व्हिन्सेंट वॉन गो, हेन्री मूर, राममनोहर लोहिया, मर्ढेकर, मुक्तिबोध, मलय रायचौधुरी, अरुण कोलटकर, जगदीश स्वामीनाथन, वासुदेव गायतोंडे, सुधीर पटवर्धन.. हे सर्व माझ्या किती तरी आधीच्या काळातले, नंतरच्या काळातले, माझ्या काळातले लोक पापणी जागी ठेवून आहेत.
चंद्रपूरचे कावडकरगुरुजी, फडकेगुरुजी, राजुरकरगुरुजी, राघमवारगुरुजी मला आठवतात. कृष्णमूर्तीसर आणि गुर्जरसर आज आठवतात. प्रा. मनोहर सप्रे, आणि वि. वा. जोशी आठवतात. कित्येक संध्याकाळी आम्ही दफनभूमीत बसून लिहिणे आणि जगणे या विषयांवर बोललो आहे. सप्रे आणि जोशी यांनी मला काय दिले आहे याची त्यांनाच कल्पना नव्हती. प्रसन्नतेचे शिडकावे टाकणारे मनोहर टोंगे आठवतात. बालवयातले विश्वास लहामगे आणि सुरेश द्वादशीवार आठवतात. एॅनिमेशन फिल्ममध्ये एखाद्या लहानशा फुलामध्ये सगळे जग असावे तसे त्यावेळचे आमचे जग होते. परंतु बाहेर हत्ती आहे आणि तो प्रचंड आहे हे आम्हाला कळले होते, आणि तोही आमच्या या फुलातल्या जगावर प्रेम करणारा आहे अशीच आमची भावना होती. प्रत्यक्षात तसे नव्हते आणि नाही हे आपणा सगळ्यांनाच आता कळलेले आहे. आमच्या सगळ्या ऊसाचा, केळ्यांचा फडशा पाडणारा कलोनियल हत्ती गेल्याचा आनंद आम्ही साजरा करून हात वाळवत नाही तोच पोस्ट कलोनियल हत्ती आमच्या शिवारात शिरतो आहे असे दिसून आले.
तसे हे माझे मूळ गाव नव्हे. मी जिथे जन्मलो ते मूळ गाव आता नाहीसे झालेले आहे. आता ते गाव नाही, ती शेते नाहीत. कोळशाच्या खाणी आहेत. वडलांनी आमच्या शिक्षणासाठी हे गाव निवडले. गोंड राजांनी बांधलेला परकोट हा इतिहासाचा एक अवशेष होता. गावाबाहेरच्या टाकून दिल्यासारख्या पडलेल्या अवाढव्य मूर्ती हा दुसरा अवशेष होता. कधीकधी डोक्याला पिसे खोवलेली, अंगावर वाघाचे चामडे पांघरलेली, हातात तीरकमठा असलेली माणसे गावात येत. तीही या अवशेषाचाच भाग होती. आता चंद्रपूर नव्या इतिहासाचा भाग बनत चालले आहे.

2.
मी म्हटले होते, आज आपण सगळेच पूर्वी न अनुभवलेल्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहोत. सांस्कृतिक, राजकीय, आíथक, सामाजिक क्षेत्रांमध्ये उत्पन्न झालेल्या संभ्रमाच्या मुद्रा पाहतो आहोत. गावे, शहरे बदलत आहेत. पुष्कळदा असे वाटते की आपण अवाढव्य अशा बाजारपेठेतून हिंडतो आहोत. आजच्या या स्थितीत संस्कृती, भाषा, साहित्य यांचे भवितव्य काय या प्रश्नाने आपण अस्वस्थ आहोत. याशिवायही अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत. स्पेस मिळाली की आपण प्रश्न मांडायला लागतो. काही वेळा आपल्याला अशी स्पेस तयार करावी लागते. झाडीपट्टी रंगभूमी ही अशा स्पेसचे उत्तम उदाहरण आहे. उर्वरित महाराष्ट्राला कितपत कल्पना आहे कोण जाणे. झाडीपट्टीची दंडार ही परंपरेने चालत आलेली लोककला आहे. दंडार म्हणजे हातात डहाळी घेऊन केलेला नाच असा एक अर्थ दिलेला आहे. म्हणजे हे सृजनाचे नृत्य आहे. जंगलात, निसर्गात राहणार्या लोकांचा निर्मितीचा उत्सव. आता सर्वत्र पसरलेल्या जंगलात कार्पोरेट हत्ती शिरून उच्छाद मांडायला सिद्ध झालेले आहेत.
साम्राज्यवाद नष्ट झाला आहे. परंतु साम्राज्ये आपल्या डोळ्यांसमोर आकार घेत चालली आहेत. जागतिकीकरण हे या साम्राज्याचे नाव आहे. या साम्राज्यात आधुनिकता आणि समृद्धी यांची आमिषे दाखवली जातात. परंतु प्रत्यक्षात सामाजिक दुभंगलेपण आणि सांस्कृतिक मागासलेपण यांचे पोषण केले जाते.
व्यक्तीचे बाहेरच्या जगाशी असलेले संबंध, बाजारपेठेचा प्रभाव आणि त्याच्याशी निगडित उपभोक्तावादी संस्कृती आणि धार्मिकता व धर्मजातिवाद यांचा उदय या तीन गोष्टींचा अनेक विचारवंतांनी परामर्ष घेतला आहे. व्यक्तीच्या दृष्टीने सामाजिक प्रश्न महत्त्वाचे राहिलेले नाहीत. सार्वजनिकतेच्या ठिकाणी वैयक्तिकता आलेली आहे. व्यक्ती स्वतच्या प्रश्नांमध्ये जास्त गुंतत गेली आहे. बाजारपेठेचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी अप्राप्य अशा वस्तू व्यक्तीच्या हाताशी आलेल्या आहेत असा आभास तयार केला जातो. परंतु व्यक्तीची वास्तविक स्थिती आणि तिच्या निवडीला केले जाणारे आवाहन यांत विसंगती तयार होते. वस्तूंमध्येच सर्वस्व आहे, खरा आनंद आहे असे वाटणे, वस्तूंनी झपाटले जाणे अशी एक मानसिक अवस्था तयार होते. आíथक क्षमता नसल्याने बहुसंख्यांना त्या मिळवता येत नाहीत.
सर्वसामान्य माणसांच्या सुखदुखांची हायस्ट्रीट फिनिक्सच्या मोराला काही पर्वा नसते. तो चमचम दिव्यांचा पिसारा फुलवून दिमाखात उभा असतो. जयंत पवार यांची 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' ही कथा जागतिकीकरणावरचे, मुक्त बाजारपेठेवरचे, नवमध्यमवर्ग आणि कनिष्ठ वर्ग यांच्यात पडलेल्या दरीवरचे एक प्रखर भाष्य आहे.
जागतिकीकरण ही भिन्न भिन्न आíथक, राजकीय आणि सांस्कृतिक विचारप्रवाहांना सामावून घेणारी संज्ञा आहे. जागतिकीकरण ही एक अवस्था आहे आणि सिद्धान्तही आहे. वर्तमानकाळात जागतिकीकरण या शब्दात विविध अर्थच्छटा दडलेल्या आहेत. उदाहरणार्थ  मुक्त बाजारपेठ, आíथक उदारीकरण, राजकीय-आíथक-सांस्कृतिक जीवनावर पाश्चात्त्य धारणांचा प्रभाव, पश्चिमीकरण किंवा अमेरिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार, इंटरनेट क्रांती, जागतिक एकात्मता, इत्यादी. जागतिकीकरणाची ही अवस्था एक अपूर्ण अवस्था आहे. भांडवलशाहीचा हा पुढचा टप्पा आहे. वाफेवर चालणारी जहाजे, टेलिग्राम, टेलिफोन, रेल्वे ही भांडवलशाहीची संचार साधने होती. प्रगत भांडवलशाहीला संगणक, उपग्रहांवर आधारित दृश्राव्य माध्यमे, भ्रमणध्वनी, द्रुत आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक ही संचार-संज्ञापन साधने मिळालेली आहेत. समाजवैज्ञानिकांच्या मते जागतिकीकरण या संज्ञेत सामाजिक अस्तित्वाशी निगडित स्थल आणि काल या संकल्पनांतील मूलभूत बदलांचा निर्देश आहे.
मार्शल मॅकलुहान यांनी 1967 मध्ये म्हटले होते  काळ संपला आहे, अवकाश नाहीसा झाला आहे. आपण आता वैश्विक खेडय़ात (ग्लोबल व्हिलेजमध्ये) राहतो आहोत. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काल आणि अवकाश या संकल्पना बदलल्या आहेत. वाहतुकीची गतिमान साधने (रेल्वे, विमाने) आणि संज्ञापनाची साधने (सॅटेलाइट फोन, संगणक) ही भौगोलिक अंतर आणि अवकाशाची जाणीव बदलण्याची काही कारणे आहेत. मानवी अनुभवाच्या संदर्भात जवळ/दूर या संकल्पना बदलल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विविधवस्तुभांडारे (मॉल्स) ही आजच्या जगाची प्रतीके आहेत. विविध बाजारपेठा एकमेकींच्या जवळ आलेल्या आहेत किंवा सार्या जगाची एक बाजारपेठ झालेली आहे. जागतिकीकरणाचा अप्रादेशिकीकरणाशी, उत्तरराष्ट्रीयतेशी संबंध आहे. त्यात भौगोलिक आणि राजकीय सरहद्दींपलीकडचा परस्परांशी अनुबंध अभिप्रेत आहे. देशादेशांमध्ये तटबंदी नसाव्यात हे यामागचे तत्त्व आहे. टेलिकम्युनिकेशन, डिजिटल कंप्युटर्स, ऑडिओव्हिज्युअल मीडिया या गोष्टी सगळ्या सरहद्दी ओलांडतात. कोणत्याही देशातून दुसर्या कोणत्याही देशातील व्यक्तीला इ-मेल करता येते. मुक्त बाजारपेठेमुळे वस्तूही सरहद्दी ओलांडतात. परंतु माणसांच्या मुक्त संचाराला परवानगी नाही. व्हिसा असल्याशिवाय एका देशातून दुसर्या देशात जाता येत नाही. के. एन. पणिक्कर यांच्या मते काही शब्द आपला मूळ अर्थ लपवून ठेवतात. जागतिकीकरण हा सौम्य शब्द वर्चस्व या शब्दाऐवजी वापरला जातो. त्याला जे वास्तविक पाहता अभिप्रेत असते त्याहून तो वेगळेच काही सुचवत असतो. समान वाटा आणि स्वेच्छया सहभाग असे म्हटले जाते. परंतु असमान विकासाच्या समकालीन जागतिक व्यवस्थेत असमानतेशिवाय दुसरे काही हाती लागत नाही. पणिक्कर यांच्या मते भारतासारख्या देशांसाठी जागतिकीकरण म्हणजे गुलामी.
जागतिकीकरण हे शेतीत वापरल्या जाणार्या दंताळ्यासारखे आहे. त्याला अनेक दाते आहेत. मानवीजीवनाच्या आíथक, राजकीय, सांस्कृतिक विभागांना त्याने व्यापलेले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये त्याच्या भिन्न भिन्न पलूंचा विचार केला जातो. अर्थशास्त्रात जागतिकीकरण म्हणजे व्यापार, पसा, व्यापारी प्रतिष्ठाने, सावकारी पेढय़ा, भांडवल. राज्यशास्त्राच्या दृष्टीने सत्ता, युद्ध, शांतता, राजवटी, अशासकीय सेवा संघटना. समाजशास्त्रात जागतिकीकरणाच्या दृष्टीने मानवगटांचा, त्यांच्यातील संघर्षांचा, वर्गाचा, राष्ट्रीयतेचा, सामाजिक करारांचा विचार होतो. मानसशास्त्राच्या दृष्टीने जागतिक कृतींचे विषय आणि लक्ष्य म्हणून व्यक्तींकडे पाहिले जाते. मानवशास्त्राच्या कक्षेत जागतिकीकरणाच्या संदर्भात संस्कृतींची सरमिसळ, स्वीकार-संघर्ष-विलीनीकरण हे विषय येतात. संज्ञापनविद्य्ोच्या कक्षेत जागतिकीकरणाच्या संदर्भात माहिती तंत्रज्ञान, आंतरजाल (इंटरनेट) हे विषय येतात. भूगोल विषयाच्या अंतर्गत अवकाश या संकल्पनेत सामावणार्या सर्व गोष्टी समाविष्ट होतात.
सध्याचे जागतिकीकरण हे पूर्णपणे आíथक स्वरूपाचे आहे. या आíथक जागतिकीकरणाला जगभर कार्यरत असलेल्या संज्ञापनव्यवस्थेचे साहाय्य झालेले आहे. त्यामुळे भाषा, साहित्य, कला, संस्कृती या गोष्टी प्रभावित झालेल्या आहेत. आíथक जागतिकीकरणाचे इतरही जीवनक्षेत्रांवर परिणाम झालेले दिसतात. उत्पादनांसाठी जग हीच बाजारपेठ झाल्यामुळे आपल्या देशाबाहेरची उत्पादने उपभोक्त्यांना मिळू लागली. अर्थात विकसनशील देशांच्या संदर्भात बरीचशी उत्पादने वरच्या वर्गासाठीच आहेत हे दिसते. वित्तीय बाजारपेठांमुळे भांडवलाचा पुरवठा होऊ लागला. परकीय गुंतवणुकीसाठी विविध देश उत्सुक झाले. त्यातून बहुराष्ट्रीय कंपन्या, कार्पोरेशन्स यांची आíथक सत्ता तयार झाली. जागतिक सरकार अजून अस्तित्वात आलेले नाही. मात्र जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची सत्ता जगभर चालत असलेली दिसते. प्रगत भांडवलशाहीचे प्रगत वसाहतवादात रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागतिकीकरण हे पुनर्वसाहतीकरण असून जागतिक निगमांच्या (ग्लोबल कार्पोरेशन्सच्या) अमलाखाली भिन्न भिन्न देशांच्या आíथक व्यवस्था एकत्रित करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे असे मत मांडले जाते. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन, उपग्रह, इंटरनेट यांच्या साहाय्याने दूरदूरपर्यन्त माहितीचा महापूर पोचतो यात शंका नाही. मात्र ही साधने ज्या मानवसमूहांना उपलब्ध नसतात, ते या माहितीपासून वंचित राहतात. एक नवी विषमता अस्तित्वात येते. या विषमतेला डिजिटल डिव्हाईड असे म्हटले जाते. आयटी हॅव्ज आणि आयटी हॅव नॉट्स असे दोन वर्ग तयार होतात. सारे जगच बाजारपेठ झाल्याने स्पध्रेत टिकण्यासाठी मालाची गुणवत्ता वाढवणे आवश्यक झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञान असलेले पुढे जाणार यात शंका नाही. विकसित देशांनी विकसनशील देशांमध्ये सुरू केलेली औद्योगिक प्रतिष्ठाने पर्यावरणाचे नियम पाळतातच असे नाही. विकसनशील देशातील नसíगक साधनसंपत्तीच्या शोषणाला कोणताही अटकाव असत नाही अशी दृश्ये दिसतात. विविध राष्ट्रांमधले लोक शिक्षण, पर्यटन, उद्योग या निमित्ताने भिन्न भिन्न देशांमध्ये जाऊ लागले, तेथे वास्तव्य करू लागले. त्यामुळे बहुसांस्कृतिकतेची जाणीव होऊ लागली. त्याचबरोबर संस्कृतींचे कृत्रिम एकरूपीकरणही अस्तित्वात येत चालले आहे असे दिसते. आजच्या जगात बहुसंख्य, विशेषत शहरी, निमशहरी लोक एकाच प्रकारचे संगीत ऐकतात, तेच खेळ पाहतात, त्याच दूरचित्रवाणी-मालिका पाहतात. हॉलिवूडचे इंग्रजीतले अन्य देशी भाषांमध्ये डब केलेले चित्रपट, पॉप म्युझिक, फास्ट फूड, कोक, पेप्सी, नायकी बूट सर्वत्र आढळतात. देशातल्या भिन्न भिन्न भागातल्या हस्तकलांच्या, संगीताच्या, लोकनाटय़ाच्या परंपरा क्षीण होत जातात. कलाकृतीकडे कलाकृती म्हणून न पाहता खरेदी-विक्रीची वस्तू, गृहसजावटीची वस्तू म्हणून पाहिले जाते. एतद्देशीय गोष्टींपेक्षा परदेशी वस्तू, परदेशी कल्पनाप्रणाली आत्मसात करण्याकडे कल वाढताना दिसतो. यातूनच उपभोक्तावादाची वा चंगळवादाची निर्मिती होत असते. मूलभूत महत्त्वाच्या गोष्टींसंबंधीचे नवे तंत्रज्ञान स्वीकारावे असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु ते मिळतेच असे नाही. त्यामुळे विकसनशील देशातील लोकांच्या बुद्धीचा, कष्टाचा उपयोग करून घेणे एवढेच उरते. जागतिकीकरणात इंग्रजी भाषेला आत्यंतिक महत्त्व आलेले आहे. त्यामुळे इतर भाषांचे, विशेषत भारतासारख्या देशातल्या प्रादेशिक भाषांचे, बोलींचे भवितव्य काय हा प्रश्न निर्माण होतो. एक भाषा जाते तेव्हा त्या भाषेतले सगळे संचित नाहीसे होते.
भारतासारख्या कृषिप्रधान देशावर आíथक जागतिकीकरणाचा किती गंभीर विपरीत परिणाम होतो याविषयी वंदना शिवा यांनी लिहिले आहे  आíथक जागतिकीकरणामुळे बीज-बियाणे उद्योगाचे केंद्रीकरण, जागतिक व्यापारी प्रतिष्ठानांचा (ग्लोबल कार्पोरेशन्स) कृषिव्यवसायात प्रवेश, कीटकनाशकांचा वाढता वापर, वाढत चाललेली कर्जे, निराशा, त्यामुळे लहान शेतकर्याच्या होणार्या आत्महत्या या गोष्टी घडत आहेत. भांडवल गुंतवणारी कार्पोरेट-नियंत्रित कृषिव्यवस्था अस्तित्वात येते आहे. अशा स्थितीत गरीब शेतकरी टिकून राहणे अशक्य झाले आहे. जागतिकीकरणात निर्यातीला प्राधान्य आहे. त्यामुळे शेतकरी अन्नधान्य पिकवण्याऐवजी निर्यात करता येईल अशी पिके घेऊ लागले आहेत. उत्पादनखर्चात वाढ झाल्यामुळे कर्ज काढण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. पाहिजे तसे उत्पन्न झाले नाही किंवा भाव मिळाले नाहीत तर शेतकरी बुडतो, तो वैफल्याने ग्रासला जातो.
विकसित देशांनी पुरस्कृत केलेला जागतिकीकरणाचा सिद्धान्त विकसनशील देशाला अमलात आणता येऊ शकतो का, हा एक प्रश्न उपस्थित होतो. जागतिकीकरणामुळे खरोखरच नवे तंत्रज्ञान येते का हाही एक प्रश्न आहे. परदेशी कंपन्या इथली जमीन, पाणी आणि मनुष्यबळ यांचा वापर करतात. शीतपेये, साबणे, सौंदर्यप्रसाधने यांचे कारखाने निघतात. मात्र संगणकासाठी आवश्यक असलेल्या भागांची निर्मिती करणारे कारखाने निघत नसतात. खुल्या बाजारपेठेमुळे उपभोग्य वस्तूंची आयात होते, त्या प्रमाणात निर्यात होते का हा प्रश्नही उपस्थित होतो. एकंदरीत आíथक-औद्योगिक क्षेत्रांवर बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रभाव आहे ही वस्तुस्थिती आहे. परदेशी भांडवलाच्या सहयोगाने उद्योग उभारणारे सुपीक जमिनीची, घनदाट जंगलाची, पाण्याची, वस्त्यांची पर्वा करीत नसतात हेही दिसून येते.

3.
जागतिकीकरण या विषयावर मराठीत बरेच लेखन झालेले आहे. बहुतांश लेखनात जागतिकीकरणाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, वसंत पळशीकर यांच्या लेखाचे शीर्षकच 'जागतिकीकरण आणि भारतीय समाजासमोरील यक्ष प्रश्न' असे आहे. आपण सारेच ही नवी जागतिक अर्थव्यवस्था प्रत्यक्षात मान्य करीत आहोत, गत्यंतरच नाही म्हणून तिच्याशी जुळवून घेत आहोत ही वस्तुस्थिती मान्य करावयास हवी, आपण या व्यवस्थेचा सामना करावयास हवा असे ते म्हणतात. जागतिकीकरणाचा परिणाम सामाजिक न्यायाशी संपूर्णत विसंगत झालेला आहे, त्याचप्रमाणे जागतिकीकरणात लोकशाहीचे खच्चीकरण झालेले दिसते असे आनंद तेलतुंबडे सांगतात. जागतिकीकरणाला थोपवून धरणारे देशी परंपरांसारखे दुसरे कोणतेही अमोघ शस्त्र नाही असे भालचंद्र नेमाडे यांचे मत आहे. जागतिकीकरणाचा शेतीक्षेत्रावर अनिष्ट परिणाम झालेला आहे असा गोिवद पानसरे यांचा निष्कर्ष आहे. नव्वदीच्या दशकात खाजगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरणाचा जणूकाही आगडोंबच उसळला या भाषेत विश्राम गुप्ते यांनी या अवस्थेचे वर्णन केले आहे. के. एन. पणिक्कर विचारतात, नव्वदच्या दशकातच का, पन्नासच्या किंवा साठच्या दशकात का नाही ? त्यांच्या मते द्विध्रुवीय जगाच्या राखेतून जागतिकीकरण उदयास आले आहे. समाजवादी गटाच्या पडझडीमुळे भांडवलवादी शक्तींना विजयाच्या नव्या युगाचा आरंभ करण्यासाठी मार्ग मिळाला. त्यांना विरोध करणारे कोणी उरले नव्हते. भारतासारख्या देशाने विरोध करावयास हवा होता, तसे घडले नाही. उलट एका बहुराष्ट्रीय प्रतिष्ठानाच्या उपाध्यक्षाने उदारीकरण म्हणजे दुसरे स्वातंत्र्य असे घोषित केले. हे दुसरे स्वातंत्र्य बूज्र्वाजीपुरते मर्यादित आहे आणि बहुसंख्य भारतीयांना त्याचा काही लाभ नाही.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत समाजात बदल होतील, आíथक स्थितीत बदल होतील, समाजातील उच्च, मध्यम व कनिष्ठ वर्ग यांच्या स्थितीत बदल होतील. मात्र हे बदल चांगलेच आहेत, किंवा असतील असे म्हणता येत नाही. आनंद तेलतुंबडे यांनी म्हटले आहे  जागतिकीकरणामुळे देशादेशांतील, प्रदेशाप्रदेशांतील, व्यक्तीव्यक्तींतील विषमता न भूतो न भविष्यती अशा प्रमाणावर वाढलेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत कनिष्ठ वर्गापुढे, कनिष्ठ मध्यमवर्गापुढे उच्च वर्गाचे, उच्च मध्यमवर्गाच्या जीवनरीतीचे आदर्श असतील यात शंका नाही. विश्राम गुप्ते यांनी नवमध्यमवर्ग ही संज्ञा वापरली आहे. जागतिकीकरणातला हा महत्त्वाचा घटक आहे. तो उपभोक्ता आहे. जागतिकीकरणाने त्याच्या आíथक मिळकतीत बरीच वाढ झालेली आहे. या नव-मध्यमवर्गात व्यवस्थापन-विद्याविभूषित, दृकश्राव्यमाध्यम-पारंगत, संगणकतज्ञ, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांतील उच्चपदस्थ, अभियांत्रिकी, व्यवस्थापनविद्या, वैद्यकीय शिक्षणसंस्थांचे संचालक इत्यादींचा समावेश होतो.
नवमध्यमवर्गाच्या पलीकडे मोठा कनिष्ठ वर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग आहे. त्यांचे भवितव्य काय या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. तेलतुंबडे यांनी म्हटले आहे  साधारणत जागतिकीकरण सबलांना अधिक सबल व दुर्बलांना अधिक दुर्बल करते; मग तो देश असो, समाज असो वा व्यक्ती. जगण्यात निर्माण होणारी स्पर्धा हादेखील या प्रक्रियेतील एक अपरिहार्य भाग आहे. त्यातून विशिष्ट अशी मानसिक अवस्था तयार होते. क्षोभ, चिंता, त्रास. दैनंदिन जीवनातील छोटय़ा गोष्टींनी क्षोभ उत्पन्न होतो. काहीतरी भयानक घडेल असे वाटत राहते. प्रकृती, पसे, कुटुंब यांच्याविषयीच्या काळजीने मन व्यापून जाते. ही चिंता अवास्तव असते आणि प्रमाणाबाहेरही असते. परंतु त्यामुळे दैनंदिन जीवन चिंता आणि भीतीने ग्रासले जाते.
प्रवीण दशरथ बांदेकर यांनी खेळखंडोबाच्या नावानं या दीर्घ कवितेत लिहिले आहे
भेदरलेल्या माणसांना कळत नाहीये
आजच्यापुरतंच जगावं की आतापुरतंच
आपल्यापुरतंच जगावं की स्वतपुरतंच
किंवा जगण्यासाठीच असावं की आहोत म्हणून जगावं

'जागतिकीकरणामुळे वस्ती नव्हे, तर शॉिपग मॉल जन्माला येतो, आणि नागरिक नव्हे, तर ग्राहकनिर्मिती होते' असे संजीव खांडेकर यांनी म्हटले आहे ते यथार्थच आहे. जे. जी. बॅलर्ड यांच्या 'किंगडम कम' या कादंबरीतील मध्यवर्ती स्थळ शॉिपग मॉल हेच आहे. त्या कादंबरीत उपभोक्तावादाचे फॅसिझममध्ये कसे रूपांतर होते हे दाखवले आहे. पणिक्कर यांनी उपभोक्तावादाचा धर्माधता-जातीयता यांच्याशी संबंध जोडलेला आहे. धर्माधता-जातीयता यांचाही फॅसिझमशी संबंध आहे.
नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाचा उदय झाला. त्याच दशकात कविता लिहू लागलेल्या पिढीच्या कवितेत जागतिकीकरणाचे पडसाद उमटणे स्वाभाविकच आहे.

खुल्क है खुदाका आणि मुल्क जनताका
हुकूम कंपनीका, नाचो िझग लपालपा

या शब्दांत अरुण काळे यांनी मुक्त बाजारपेठेचे वर्णन केले आहे.
मेगामॉल शॉिपगमध्ये आपले वस्तूंमध्ये कसे रूपांतर होत जाते हे हेमंत दिवटे यांच्या कवितेत दिसते. आपण व्हिस्पर नॅपकिन आहोत, हग्गीजचा पॅक आहोत, उंची कॅमे साबू आहोत, किंवा यार्डले, लक्स इंटर नॅशनल आहोत असे निवेदकाला वाटू लागते.

की मी काटा-चमचा आहे ?
ज्याने चाळिशीचा एक मराठी माणूस
मॅगी नूडल्स खातोय
की मी टीव्ही आहे ?
ज्याच्यासमोर अख्खं कुटुंब बसलंय
मला पाहत, जेवत, माझ्यावरची चॅनल्स बदलत..

या व्यवस्थेत जगत असताना व्यक्ती परात्म होते, ती स्वतपासून दुरावते, ती यंत्राचा भाग बनते आणि उपभोक्तादेखील वस्तुरूप पावतो. त्याला निवड आहे, निवडीची संधी आहे हा आभास असतो. खरेतर त्याला निवडीची संधी नसते. गोष्टी त्याच्यावर लादलेल्या असतात. तोही एक वस्तूच असतो हे या कवितेत अधोरेखित झाले आहे. वस्तूंची ओढ वाटणे आणि स्वतच वस्तू होऊन जाणे हे परात्मतेचे लक्षण आहे. जागतिकीकरणाचे हे सांस्कृतिक आक्रमण होय आणि ते भयावह आहे. मानवी मनाचा आणि बा'ा जगताचा संवादी संबंध आवश्यक असतो. बा'ा जगतात निसर्ग आणि मानव हे महत्त्वाचे घटक असतात. निसर्गाचा आणि माणसाच्या जगण्याचा संबंधही संवादी असणे आवश्यक असते. कृषिजनसंस्कृतीत असा संवाद अंतर्भूत होता. जागतिकीकरणाचा कृषिजनसंस्कृतीमधील संवादावरच आघात झालेला आहे. बाहेरच्या वाढत चाललेल्या कोलाहलात वावरत असताना व्यक्तींच्या मनातला कोलाहलही वाढत चाललेला आहे.
4.
मानवाच्या सामाजिक जीवनात भाषा ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. भाषा हे संज्ञापनाचे, संवादाचे साधन आहेच, त्याचबरोबर ते माहिती आणि ज्ञान साठवण्याचे साधन आहे. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती त्या त्या भाषक समूहाच्या संस्कृतीची वाहकही आहे. पिढीमागून येणारी पिढी भाषेने जोडलेली असते. भाषेत व्यावहारिक गोष्टी असतात, तशाच आत्मिक गोष्टीही असतात. मागच्या पिढय़ांच्या ज्ञानाचे आणि अनुभवांचे संचित भाषेत साठवलेले असते. भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे. जगातील सर्व लोकशाहीवादी देशांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. याचा एक अर्थ असा की प्रत्येकाला बोलण्याचा, आपल्या भाषेत वा कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे; प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्याचा, बोलण्याचा, त्या भाषांतून आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे आपल्या भाषा टिकवण्याचा, त्या समृद्ध करण्याचाही अधिकार आहे. जगात पुष्कळ भाषा आहेत. आणि माणसे साधारणपणे द्विभाषक असतात, (महाराष्ट्रातल्या शिक्षणात मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषा आहेत), त्यामुळे एका भाषेतले ज्ञान दुसर्या भाषेत जावे अशी अपेक्षा असते. ते परिणामकारक रीतीने घडत नाही. उलट जागतिक स्तरावर वा राष्ट्रीय स्तरावर प्रभावी असलेली भाषा अवगत नसलेल्यांना, जणू काही, बोलण्याचा- व्यक्त करण्याचा अधिकारही राहत नाही. वर्चस्व गाजवणार्या भाषेच्या भाषकासमोर ती भाषा येत नसलेले, पण ज्ञानसंपन्न आणि प्रभावी अभिव्यक्ती करू शकणारे, लोक मूकस्तंभ बनून राहतात.
जागतिकीकरणाच्या अवस्थेत इंग्रजीसारख्या एकाच भाषेत संज्ञापन आणि ज्ञानव्यवहार होत असेल तर इतर भाषा बोलणार्याचे आणि त्यांच्या भाषांचे भवितव्य काय हा प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्य आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची, राजकारणाची, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या व्यवस्थापनाची, ज्ञानाची, अनुवादाची, संगणकाची, इंटरनेटची आणि मोबाईल फोनची, भाषा आहे. ती ग्लोबल लँग्वेज आहे. थोडक्यात ती जागतिकीकरणाची भाषा आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत इंग्रजी भाषेला अत्यंत महत्त्व आलेले आहे. पूर्वी ब्रिटिश वसाहती असलेल्या देशांतच नव्हे, तर जगाच्या सर्वच खंडांतील देशांमध्ये ती शिकली, बोलली, लिहिली जाते आहे. तथापि पूर्वी वसाहती असलेल्या देशांवर तिचा अधिक प्रभाव आहे. घानासारख्या आफ्रिकन प्रजासत्ताकात इंग्रजी भाषेला प्रथम क्रमांकाचे स्थान आहे. राज्यकारभाराची, व्यापाराची, शिक्षणाची तीच भाषा आहे. जागतिकीकरणाच्या अर्थकारणामुळे विकसनशील देशांच्या अर्थकारणावर जसे विपरीत परिणाम होत आहेत तसेच ते भाषांच्या बाबतीतही होतील का अशी चिंता अनेक देशांतील भाषातज्ञ व्यक्त करीत आहेत. इंग्रजीमुळे राष्ट्रीय भाषांचे, प्रादेशिक भाषांचे, बोलींचे अस्तित्व मिटून जाईल काय या प्रश्नाने जगभरातील विचारवंत अस्वस्थ झालेले आहेत. कारण तशी काही चिन्हे वास्तवात दिसत आहेत.
भारतामध्ये भाषांची विविधता आहे. आसामी, उडिया, उर्दू, कन्नड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाली, पंजाबी, बंगाली, बोडो, मणीपुरी, मराठी, मलयालम, मथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, हिंदी या प्रमुख भाषा आहेत. हिंदी ही उत्तरप्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, हिमाचल प्रदेश, आणि राजधानी दिल्ली व केंद्रशासित प्रदेश यांची अधिकृत भाषा आहे. इंग्रजी भाषेचा सहभाषा म्हणून स्वीकार केलेला आहे. राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी आणि हिंदी या भाषांना विशेष महत्त्व आहे. प्रादेशिक भाषांना राज्यभाषेचा दर्जा असला तरी सर्वच राज्यांमध्ये इंग्रजी ही भाषा सार्वजनिक व खासगी क्षेत्रांमध्ये उपयोगात आणली जाते. या मान्य प्रादेशिक भाषांखेरीज अन्य भाषाही आहेत. महाराष्ट्रात मराठीच्या बोलींखेरीज भिली, गोंडी, कोरकू, वारली या भाषा आहेत. या मराठीच्या बोली नसून स्वतंत्र भाषा आहेत आणि त्या भाषांमध्ये त्या भाषकसमूहांचे सांस्कृतिक संचित आहे.
1961 च्या जनगणनेनुसार भारतात 1652, तर 1991 च्या जनगणनेनुसार 1576 भाषा आहेत. यांपकी 22 भाषांचे भाषक दहा लाखांहून अधिक आहेत. 50 भाषांचे भाषक एक लाखाहून अधिक आहेत. 114 भाषांचे भाषक दहा हजारांहून अधिक आहेत. 2001 च्या जनगणनेनुसार 29 भाषांचे भाषक दहा लाखांहून अधिक आहेत. 60 भाषांचे भाषक एक लाखाहून अधिक आहेत. 122 भाषांचे भाषक दहा हजारांहून अधिक आहेत. भाषेवरील आक्रमणे पाहता यातल्या किती भाषा येत्या दहा वर्षांत टिकतील अशी चिंता भाषातज्ञांना वाटणे स्वाभाविकच आहे.
हिंदी ही (तिच्यातील बोलींसह) बहुसंख्य लोकांची भाषा आहे असे दिसते. 2001 च्या जनगणनेनुसार 25 कोटी 80 लाख लोकांनी हिंदी ही आपली भाषा म्हणून नोंद केली आहे. प्रदेशभाषा नसूनही हिंदी ही भाषा अवगत असणार्या लोकांची संख्याही मोठी आहे. बॉलिवूड चित्रपट, चित्रवाहिनीवरील विविध कार्यक्रम, जाहिराती, अहिंदी प्रदेशांतही हिंदीतील दैनिकांच्या आवृत्त्यांचे प्रकाशन, हिंदी भाषेतील व्यावसायिक व अव्यावसायिक नियतकालिके, हिंदी साहित्याचा प्रसार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषांमधील ग्रंथांचे अनुवाद- या सर्व गोष्टींमुळे हिंदी भाषेला भारतीय उपमहाद्वीपातील प्रथम क्रमांकाच्या भाषेचे स्थान मिळाले आहे. दक्षिण भारतात तमिळ, कन्नड, मलयालम, तेलुगू असा क्रम दिसतो.
मराठी ही मुख्यत महाराष्ट्राची भाषा आहे. ती भारतात चवथ्या क्रमांकाची भाषा असून जगात पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे. जवळजवळ दहा कोटी लोकांची ही भाषा आहे. महाराष्ट्राबाहेर गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू येथे बहुसंख्येने मराठी भाषक आहेत. अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस येथेही मराठी भाषक आहेत. इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून मराठीची चिन्हे दिसतात. याचा अर्थ ती याआधी काही काळ अस्तित्वात आली असावी. महाराष्ट्री प्राकृत हे तिचे मूळ आहे. याचा एक अर्थ असा की इसवी सनाच्या 200 वष्रे आधी तिचे अस्तित्व असल्याचे आढळते असे म्हणता येईल. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या पूर्वार्धात गाहासत्तसई (गाथासप्तशती) हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ग्रंथ रचला गेला. भाषातज्ञांच्या मते महाराष्ट्री प्राकृतपासून अपभ्रंशाच्या माध्यमाने मराठी भाषा परिणत झालेली असल्याने मराठीच्या उद्गम-विकासात या गाथेचे अपूर्व महत्त्व आहे. या गाथेत मराठी ठश्याचे व मुद्रेचे अनेक शब्द आहेत. मराठी शब्दसंपत्तीचा आरंभ या दृष्टीने या गाथेचे विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रीतील हे प्राचीनतम काव्य मध्ययुगीन महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र पठण येथे रचले गेले, पुढे याच ठिकाणी अनेक मराठी ग्रंथकार निपजले. स्थूल मानाने इसवी सनाच्या आरंभापासून मराठी भाषेचे अस्तित्व आहे असे म्हणता येईल. म्हणजेच दोन हजार वर्षांहून अधिक काळ मराठी भाषा अस्तित्वात आहे.
ही मराठी भाषा आगामी काळात केवळ बोली म्हणून राहील का, कालांतराने तिचे बोली म्हणून मिळालेले अस्तित्वही नाहीसे होईल का असे चिंता-प्रश्न मराठी विचारवंत मधून मधून विचारत असतात.
महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात त्रिभाषा सूत्र आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी. आंतरराष्ट्रीय भाषा, राज्यभाषा आणि देशभाषा. शिक्षणातील माध्यमालाही असेच पर्याय आहेत. मात्र विज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वृत्तपत्रविद्या, संज्ञापन यांच्या शिक्षणासाठी इंग्रजी हेच माध्यम आहे किंवा त्याला प्राधान्य आहे. महाराष्ट्र शासनाने 1960 पासून मराठीचा राजभाषा म्हणून स्वीकार केला. 1999 साली पहिलीपासून इंग्रजी हे नवे धोरण अमलात आणण्याचे ठरवले. शासननिर्णयात म्हटले होते  एकविसाव्या शतकात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्यांला मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे, त्याने राष्ट्रभाषा अवगत केली पाहिजे, आणि ज्ञानभाषा म्हणजेच इंग्रजी भाषाही शिकली पाहिजे. इंग्रजी भाषेला आज सर्वत्र असलेले महत्त्व व प्रामुख्याने या भाषेची उपयुक्तता लक्षात घेऊन इंग्रजी भाषा हा विषय इयत्ता पहिलीपासून सुरू केल्यास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्रजी अत्यंत उपयुक्त ठरेल.
थोडक्यात, उच्च शिक्षण बरोबर इंग्रजी असे हे समीकरण आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत चालल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा समाजातील आíथक दृष्टीने उच्च वर्गाला उपलब्ध होतात. बहुसंख्य आíथक दृष्टीने कनिष्ठ वर्गातील मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. इंग्रजी माध्यमातून शिकणारा उच्च वर्ग आणि मराठी माध्यमातून शिकणारा कनिष्ठ वर्ग यांच्यात द्वंद्व निर्माण होऊ नये, इंग्रजी माध्यमातून शिकण्याची संधी सर्वाना मिळावी हा यामागचा उद्देश असावा. गेल्या पंचवीस वर्षांत अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापनविद्याशाखीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याचबरोबर व्यवसायाभिमुख असे इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, डिझाईन, केटिरग, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, फिल्म, टेलिव्हिजन, एॅडव्हरटायजिंग, जर्नलिझम हे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. या अभ्यासक्रमांचे माध्यम प्राय इंग्रजी हेच आहे. मानव्य (आर्ट्स) आणि वाणिज्य (कॉमर्स) या विद्याशाखांमध्ये कोणतेही माध्यम घेतले तरी चालण्यासारखे आहे. या नव्या अभ्यासक्रमांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पालकदेखील इतके प्रभावित झालेले आहेत की आता मानव्य, वाणिज्य, आणि शुद्ध विज्ञान या विद्याशाखांची काही आवश्यकता आहे असे त्यांना वाटेनासे झालेले आहे.
वसाहतकाळात इंग्रजी भाषेचे जे स्थान होते तेच आज पुन्हा तिला प्राप्त झालेले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण जीवनपद्धतीचा जो साचा स्वीकारला त्यात इंग्रजी भाषा अटळ असल्याचे आपल्याला जाणवले आणि स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्रजी भाषेला जो आपला विरोध होता तो मावळला, हे सुधीर रसाळ यांचे म्हणणे यथार्थच आहे. इंग्रजी ही उच्च शिक्षणाची, उच्च ज्ञानाची, जागतिकीकरणाची भाषा असल्यामुळे तिचा स्वीकार अपरिहार्य आहे ही भावना बळावत चालली आहे. मात्र इंग्रजी भाषेचा स्वीकार म्हणजे देशी भाषांची, मराठीची काही गरज नाही ही समजूत अयोग्य आहे. मराठीखेरीज दुसरी भाषा येत नसलेले लोक आणि इंग्रजीखेरीज दुसरी भाषा नको असणारे लोक अशी विषम व्यवस्था एक समाज म्हणून घातक स्वरूपाची आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत ही स्थिती उपकारक ठरते. लोकांना इंग्रजी किंवा हिंदी अशा प्रभावी भाषांच्या अधीन करणे हे लोकांचे ग्राहकांत रूपांतर करण्याच्या दृष्टीने साहाय्यभूत ठरते. कालमानानुसार इंग्रजीचा आग्रह आहे. हरकत नाही. परंतु मराठीचा पाया भक्कम न करता मुलांचे इंग्रजीचे कसे तरी शिक्षण केले तर तिकडूनही भाषिक-सांस्कृतिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊनही नीट इंग्रजी आणि मराठी न येणारी मुले सर्वस्वी जनसामान्यांची, ग्रामीण भागातील असतील याचीही जाणीव ठेवली पाहिजे.
5.
जोवर मराठीच्या विविध बोली बोलल्या जात आहेत, प्रमाण मराठीत शिक्षित लोक आपले व्यवहार करीत आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा बहुसंख्येने आहेत तोपर्यन्त मराठी भाषा टिकून राहण्याचे उपाय करणे शक्य आहे. मराठीला पर्याय म्हणून इंग्रजीची (आणि माहिती तंत्रज्ञानाची, इलेक्ट्रॉनिक्सची) निवड करण्याचा विकल्प आपण ठेवतो तेव्हाच मराठीचे स्थान दुय्यम कसे आहे हे आपण दाखवत असतो. या विषयांचा स्वीकार करूनही मराठी हा विषय अनिवार्य असलाच पाहिजे असे धोरण आखले पाहिजे आणि त्याची कडक अमलबजावणी केली पाहिजे. गेली काही वष्रे मराठीची गरज कशी नाही याचा वृत्तपत्रांतून प्रचार करण्यात गेलेली आहेत. विशेषत विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधल्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर मराठी नको या मताचा प्रभाव टाकण्यात आलेला आहे. पुढे तर प्रश्नच नाही. भाषेचा किंवा साहित्याचा वाराही लागू नये अशीच व्यवस्था केलेली आहे. आपण पहिलीपासून दहावीपर्यन्त मराठीचा आग्रह धरलेला आहे. अकरावीपासून मराठी विषय सोडला तरी चालेल अशी व्यवस्था केलेली आहे. हे योग्य नाही. लोकांनी ते रोखायला हवे आहे. कुठलेही विषय घ्या, पण एक विषय मराठी हा असलाच पाहिजे असा लोकांनी आग्रह धरायला पाहिजे, आणि शासनानेही विचार करायला पाहिजे. जी मुले अकरावी-बारावीला मराठी विषय घेतात त्यातली काही बीएला जातात आणि मराठी साहित्य हा विषय घेतात. बीएससी, बीकॉमकडे जाणार्याना मराठी साहित्य हा विषय घेण्याची संधीच आपण नाकारलेली आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या यांच्याकडे बहुसंख्य विद्यार्थी जातात.  त्यांच्या अभ्यासात भाषा नाही आणि साहित्यही नाही. म्हणजे मराठी वाचवण्याची सगळी जबाबदारी बीएला जाणार्या मूठभर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आपण टाकलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. काही थोडे लोक मराठीचे अध्ययन करतात. बाकीच्यांना मराठीशी काही देणेघेणे नाही. ही वस्तुस्थिती भाषेच्या, साहित्याच्या, संस्कृतीच्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाच्याही दृष्टीने चांगली नाही. भाषेपासून, साहित्यापासून मुलांना तोडून टाकता आणि मराठी भाषेचे काय होईल, मराठी साहित्याचे काय होईल अशी चिंता करता. ही विसंगती आहे. मी असे सुचवतो आहे की आपण अन्य विद्याशाखांमध्येही साहित्य हा विषय ठेवावा. भाषा निवडण्याचा विकल्प मुलांना द्या  मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, इतर कोणतीही भारतीय भाषा. मूळ भाषेतले साहित्य, अनुवादित साहित्य त्यांना देता येईल. मुलांना साहित्यापासून अजिबात तोडू नये. साहित्य हे मानवी संवेदनांना जागवणारे असते, भावनेचा स्पर्श घडवते, विचारांना चालना देते. मुख्य म्हणजे जगातल्या जीवजंतूंविषयी आत्मीयता वाटणे, आपले आणि इतरांचे जगणे सुंदर करावेसे वाटणे हा साहित्याचा, कलांचा संस्कार असतो. साहित्यानुभवदेखील एक विलक्षण सुंदर अनुभव असतो. अशा अनुभवांपासून आपल्या मुलांना तोडून टाकणारी शिक्षणपद्धती आपण चालवली आहे. ती बदललीच पाहिजे. जनभावना समजून वागणारे चांगले राज्यकत्रे, कर्तव्यदक्ष व सहृदय अधिकारी, आपल्या पर्यावरणाची जाण असलेले अभियंते, समाजातील आíथक वर्गाचे भान असलेले डॉक्टर्स, न्यायासाठी झटणारे वकील, मुलांची सर्वागीण उन्नती झाली पाहिजे यासाठी तळमळणारे शिक्षक-प्राध्यापक, आपल्या समाजाचा संतुलित विकास झाला पाहिजे असे समजणारे उद्योगपती, सगळ्यांना योग्य तो वाटा मिळाला पाहिजे याकडे लक्ष देणारे व्यापारी.. हे सगळे लोक आपल्याला हवे आहेत की नकोत? हवे असतील तर भाषा, साहित्य, कला यांच्यापासून मुलांना तोडू नका. केवळ करिअर डोळ्यांमोर ठेवायला लावून आपण आपल्या मुलांचे उच्चभ्रू आणि परात्म कामगारांमध्ये रूपांतर करून टाकतो आहोत हे लक्षात घ्या.
भाषा ही केवळ व्यक्तींमध्ये संवाद साधणारी नसते, ती संस्कृतीची वाहक असते. अनेक पिढय़ांच्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा त्यात संचय असतो. प्रख्यात आफ्रिकन लेखक एनगुगी वा थ्योंगो यांच्या शब्दात सांगायचे तर संस्कृती आपल्या मौखिक आणि लिखित साहित्याच्या माध्यमातून मूल्यसमूहाची अभिव्यक्ती करते. त्या मूल्यांमुळे आपल्याशीच आपली ओळख होते, आणि एकंदर विश्वात आपले स्थान काय आहे ते समजते. आपल्या भाषेपासून दूर करून आपण आपल्या मुलांना स्वतचीच ओळख करून घेण्याची संधी नाकारत आहोत.
जेथे प्रमाण मराठी भाषेची दुर्दशा आहे, तेथे बोलींची स्थिती काय असेल याची कल्पना करता येते. मी स्वत प्रमाण मराठी उच्च आणि बोली कनिष्ठ असे समजत नाही. मी प्रमाण भाषेकडे माहितीची, ज्ञानाची, वैचारिक लेखनाची, वृत्तपत्राची, राजकीय व प्रशासनिक व्यवहाराची, न्यायदानाची भाषा म्हणून पाहातो. ती सर्वाना अवगत असली पाहिजे. संत नामदेव, संत तुकाराम यांच्यापासून आजपर्यन्त प्रमाण भाषा घडत आलेली आहे. बोली भाषा प्रमाण भाषेला समृद्ध करीत असतात. प्रमाण भाषेने बोलींकडून ऋण घेतलेले असते. आपल्या प्रमाण मराठीचा मूल स्रोत बोलींमध्ये आहे. बोलीमध्ये असलेले शब्दभांडार, शब्दांमधले शहाणपणाचे संचित खूप महत्त्वाचे आहे. बोली नष्ट होणे म्हणजे अनेक पिढय़ांनी कष्टाने मिळवलेले ज्ञान वाया घालवणे आहे. बोलींचे स्रोत आटले तर प्रमाण भाषा कोरडी आणि दरिद्री होते. प्रमाण मराठीचा जीवनाच्या सर्व क्षेत्रात कुशल वापर आणि मराठीच्या बोलींचे संवर्धन या दोन्ही बाबतीत शासनाच्या भाषाविभागाने भरीव काम केले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक बोली आहेत. वर्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, डांगी, मालवणी, कुडाळी, झाडी, डांगणी, माणदेशी, मराठवाडी, भिलोरी, पोवारी, गोंडी, इत्यादी. आजच्या मराठी साहित्यात या विविध बोलींमधले लेखन केले जात आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता या साहित्यप्रकारांतील लेखनात बोलींचा वापर मोठय़ा प्रमाणात होताना दिसतो. दलित, भटक्या, विमुक्त, आदिवासी जाती-जमातींमधून आलेल्या लेखकांच्या स्वकथनांतून त्या त्या प्रदेशाशी, व्यवसायाशी, समाजगटाशी निगडित बोली आलेली आहे. उदाहरणार्थ  लक्ष्मण माने यांच्या उपरामध्ये कैकाडी बोली, रुस्तुम अचलखांब यांच्या गावकीमध्ये जालना परिसरातील बोली, दादासाहेब मल्हारी मोरे यांच्या गबाळमध्ये मिरज-जत परिसरातील कुडमुडे जोशी जमातीची बोली, शरणकुमार िलबाळे यांच्या अक्करमाशीत अक्कलकोट परिसरातील बोली, लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्यामध्ये लातूर परिसरातील संतामुच्चर जमातीची बोली, रावजी राठोड यांच्या तांडेलमध्ये नांदेड परिसरातील बंजारा बोली, भगवान इंगळे यांच्या ढोरमध्ये जामखेड परिसरातील बोली, योगीराज बागूल यांच्या पाचटमध्ये वैजापूर परिसरातील ऊसतोडीच्या कामगारांची बोली.. अशा कितीतरी बोली मराठी साहित्यात आलेल्या आहेत. बोलीबरोबर ती बोली बोलणार्याची संस्कृतीही अशा कथनांतून व्यक्त होते. या बोलींचा आणि प्रमाण मराठीचा सांधा जोडण्याचे काम विद्यापीठातील मराठीचे, समाजशास्त्राचे आणि सांस्कृतिक मानवशास्त्राचे प्राध्यापक करू शकतात; नव्हे, ते त्यांनी करावे असे मी सुचवतो.
6.
दुसरा एक मुद्दा येथेच मांडतो. घरीदारी बोली बोलणारी मुले शाळेत येतात आणि प्रमाण भाषा गिरवायला लागतात. बोली अशुद्ध, प्रमाण भाषा शुद्ध असे मत िबबवले जाते. ते बरोबर नाही. प्रमाण भाषा आत्मसात करणे भाषिक व्यवहारासाठी आवश्यक आहे. परंतु बोली शाळेच्या वर्गाबाहेर ठेवणे अशक्यच असते. ती बोलण्यात, लिहिण्यात डोकावणार यात संशय नाही. मुलांना ती वापरू द्यावी असे माझे मत आहे. दोन्ही भाषांना जोडणारा एक पूल असला पाहिजे. एखादा निबंध बोली भाषेत लिहायची परवानगी असली पाहिजे. एखाद्या ठिकाणी बोलीतला समर्पक शब्द वापरला तर चूक मानता कामा नये. मराठीच्या इतर बोलींचा परिचय करून दिला पाहिजे. बोली भाषेत लिहिलेल्या कविता, कथा, एकांकिका अभ्यासक्रमात असल्या पाहिजेत. याचा अर्थ प्रमाण भाषेचा विसर पाडावा असा नाही. प्रमाण मराठीतलेही उत्तम साहित्य असेलच. सध्याच्या मराठी साहित्याला प्रमाण भाषेचे किंवा बोलीचे वावडे नाही. परंतु हे सगळे असून जर मराठीला महत्त्व नसेल, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असतील, दहावीनंतर मराठीची गरज नाही असे बिंबबवण्यात येत असेल, मानव्य आणि सामाजिक शास्त्र शिकणार्याखेरीज इतर कोणत्याही विद्यार्थ्यांला मराठीची वा मराठी साहित्याची गरज नाही असे आपण मानणार असू तर मराठी भाषेचे आणि साहित्याचे भवितव्य काय असेल अशी आतडे, आच नसलेली चिंता आपण करीत राहू.
माझ्या मनात एवढी निराशा दाटलेली नाही. बीए, एमए.च्या विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच भारतीय प्रशासकीय सेवेसाठी परीक्षा देणार्या बुद्धिमान विद्यार्थ्यांनाही शिकवण्याची संधी मला मिळाली आहे. मराठी भाषा आणि साहित्य या विषयांविषयीची त्यांची आस्था मला महत्त्वाची वाटते. भाप्रसेसारख्या उच्च परीक्षेसाठी मराठी विषय असताना अकरावीत मराठी विषय नसला तरी चालेल हे कोणत्या प्रकारचे धोरण आहे हे मला समजत नाही. हे धोरण शासनाने बदललेच पाहिजे. तसा आग्रह आपण सर्वानी दाखवलाच पाहिजे.
भाप्रसेसारख्या स्पर्धापरीक्षांप्रमाणेच मराठीसाठी काही व्यावसायिक क्षेत्रे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ  दूरचित्रवाणी, चित्रपट, पत्रकारिता, विज्ञापनव्यवसाय, संगणक उपयोजन, इत्यादी. अशा अनेक क्षेत्रांमध्ये मराठीचा वाढता वापर झाला पाहिजे. वसाहतकाळात मराठीचे संवर्धन करण्याचे जसे प्रयत्न झाले, तसेच ते आताच्या नववसाहतकाळातही झाले पाहिजेत. शासन आणि समाज या दोघांचीही ही जबाबदारी आहे.
आजपर्यंत साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून अनेकदा मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त करण्यात आली, तिच्या विकासाचे उपाय सांगण्यात आले. महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विभाग सुरू केला. भाषा सल्लागार समिती तयार केली. अर्थात या विभागाचे आणि समितीचे काम अद्याप सुरूच झाले नाही. ते लवकरच सुरू होईल अशी आशा आहे. मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या संवर्धनासाठी भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांसारख्या संस्था आहेत. अलीकडे शासनाने राज्य मराठी विकास संस्थेचे साहित्य संस्कृती मंडळात विलीनीकरण करण्याचे ठरवल्याचे समजते. हे योग्य नाही असे माझे मत आहे. राज्य मराठी विकास संस्था ही एक स्वायत्त संस्था आहे. शासनाच्या अनुदानातून या संस्थेचा कारभार चालतो हे खरे आहे. तथापि राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य संस्कृती मंडळ या दोन्ही संस्थांची कार्यक्षेत्रे अणि उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. मराठी भाषेचा सर्व अंगांनी व सर्व जीवनक्षेत्रांतील मराठी भाषेचा विचार करणे हे मराठी विकास संस्थेचे उद्दिष्ट आहे. साहित्य संस्कृती मंडळ हे प्राधान्याने साहित्यकेंद्री मंडळ आहे. शासनाच्या भाषा विभागाने राज्य मराठी विकास संस्था ही केंद्रीय संस्था आहे असे घोषित केले पाहिजे. तिच्याशी इतर भाषाविषयक आणि साहित्यविषयक संस्था संलग्न केल्या पाहिजेत. राज्य मराठी विकास संस्थेला भाषाविज्ञान आणि साहित्यमीमांसा या दोन क्षेत्रांतील अधिकारी व्यक्तींची जोड मिळाली तर मराठी भाषेच्या उपयोजनाच्या सर्व क्षेत्रांत मोलाचे काम होऊ शकेल. या दोन संस्थांचे विलीनीकरण करून आपण मूळ उद्दिष्टांना हरताळ फासतो आहोत हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे.
भाषेविषयी विचार करताना आपण आपल्या नजरेसमोर शालेय विद्यार्थी ठेवला पाहिजे. कारण हा खूप मोठा वर्ग आहे. मराठी माध्यमाच्या, इंग्रजी माध्यमाच्या, अन्य माध्यमांच्या शाळांमधून शिकणार्या लक्षावधी विद्यार्थ्यांना मराठी हा विषय असतो. या विद्यार्थ्यांना प्रमाण मराठीचे ज्ञान व्हावे आणि मराठीतील उत्तम साहित्याशी त्यांचा परिचय व्हावा ही उद्दिष्टे असतात. विद्यार्थ्यांची भाषिक आकलनक्षमता व ग्रहणक्षमता लक्षात घेऊन तीन प्रकारची पुस्तके तयार केली जातात. भाषेचे विविध क्षेत्रातले उपयोजन ध्यानात घेऊन उपयोजनलक्ष्यी अभ्यासक्रम असावा असे एक मत आहे. त्याचप्रमाणे लहानपणापासूनच मराठीतील चांगल्या गद्याची आणि काव्याची ओळख व्हावी असेही दुसरे मत आहे. तिसरे मत म्हणता येणार नाही, पण सुचवले जाते ते असे की, पाठय़पुस्तकाचा आकार लहान असावा आणि वैचारिक लेखन मुळीच नको. मुलांची आकलनक्षमता डोळ्यांसमोर ठेवूनच पाठय़पुस्तकात किती पृष्ठे असावीत हे ठरवले जाते. त्यात चित्रे, छायाचित्रे, रेखाटने असावीत ही अपेक्षा केली तर ती योग्यच आहे. मुलांसमोर जाणारी पुस्तके डोळ्यांना सुख देणारी असली पाहिजेत आणि सध्या छपाईचे तंत्रही पुष्कळ सुधारले आहे, त्यामुळे ते शक्य आहे. मात्र वैचारिक लेखन नको ही मागणी असमंजसपणाची आहे. मुलांना आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत त्याचबरोबर विचारही व्यक्त करता आले पाहिजेत. त्यासाठी विचार कसा करावा आणि तो मांडावा कसा याचे ज्ञान झाले पाहिजे. सध्या मराठीत वैचारिक लेखनाचे दुíभक्ष्य आहे असे आम्हाला आढळून आले. त्याचे काय कारण असावे याचा विचार करताना लक्षात आले की दहावीपर्यन्त फारसे वैचारिक लेखन नसते. नंतर मराठी हा विषयच नसतो. एकोणिसाव्या शतकात, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीत सकस वैचारिक लेखन झालेले आहे. पुढे मात्र ही परंपरा क्षीण होत गेलेली दिसते.
शाळेतल्या मुलांना पाठय़पुस्तकांखेरीज वाचायला इतर पुस्तके मिळाली पाहिजेत. शहरातल्या शाळांमध्ये ग्रंथालये असतात, शहरातही असतात. ग्रामीण परिसरात पुस्तके मिळण्याची खरी अडचण असते. हल्ली शासनाच्या सहकार्याने जिल्'ााच्या ठिकाणी ग्रंथोत्सव केले जात आहेत ही फार चांगली गोष्ट होते आहे. ग्रामीण परिसरातील शाळांमध्ये ग्रंथालये असली पाहिजेत याची काळजी शासनाने आणि समाजाने घेतली पाहिजे. गाव तेथे वाचनालय अशा चळवळीचे नाव मी ऐकले होते. आता गावात बर्याच गोष्टी प्रवेश करीत आहेत, वाचनालयांची काय स्थिती आहे याची कल्पना नाही. स्वयंसेवी संघटनांनीदेखील ग्रंथालय चळवळीला प्राधान्य दिले पाहिजे. दृकश्राव्य माध्यमांकडून मिळणार्या गोष्टी अल्पजीवी असतात, ग्रंथ चिरकालिक परिणाम करीत असतात.
खेडय़ापाडय़ापर्यन्त पुस्तके पोचली तर आज कोण लेखक-कवी आहेत, ते काय लिहिताहेत हे लोकांना समजेल. अन्यथा मोठय़ा शहरातल्या मर्यादित वर्तुळात साहित्याचे वाचन आणि त्यावरील चर्चा होत राहील. आज खेडय़ापाडय़ांतून, वाडय़ावस्त्यांमधून, घरात शिक्षणाची परंपरा नसलेल्या समाजगटांतून साहित्याची निर्मिती होत आहे. या सार्याचे लिखाण सर्वसामान्यांपर्यन्त पोचले पाहिजे. त्यासाठी वाचनालये, ग्रंथालये पाहिजेत. आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाहीत आपल्या मताचे मूल्य जाणणारा, आपल्या हक्कांविषयी आणि कर्तव्यांविषयी जागरूक असणारा नागरिक अपेक्षित आहे. असा नागरिक घडवण्याच्या दृष्टीने ग्रंथ साहाय्यभूत ठरणार आहेत. त्यामुळे ग्रंथालये उभारण्याकडे शासनाने, समाजाने लक्ष दिले पाहिजे. गाव तिथे पाणवठा असला पाहिजे ही जितकी नसíगक मागणी आहे, तशीच गाव तिथे ग्रंथालय हीदेखील आहे असेच समजले पाहिजे.
मराठीच्या शिक्षकांना, प्राध्यापकांना तर माझी विनंती आहेच, सामाजिक शास्त्रांच्या, विज्ञानाच्या प्राध्यापकांनाही माझी विनंती आहे की त्यांनी स्वतचा ग्रंथसंग्रह करावा आणि त्यात मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृतींचा समावेश करावा.
7.
1980 आणि 1990 ही दोन दशके अस्वस्थता, प्रक्षोभ, अशांतता, हिंसाचार यांची दशके होती. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची 1984 मध्ये हत्या झाली. 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. 1992 मध्ये अयोध्या येथील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. 1993 मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट झाले. 2000 चे दशकही अत्यंत अस्वस्थतेचे होते. जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद यांचा दुहेरी गोफ या काळात विणला गेलेला दिसतो. मंडल आयोग, नवीन आíथक धोरण (यात वस्तू आणि भांडवल यांच्या आयातीस मुक्त वाव, शासकीय उद्योगांचे खासगीकरण, मुक्त बाजारपेठ यांचा समावेश होता), लातूर जिल्'ाातील विनाशकारी भूकंप, वर्ल्ड वाईड वेबने जग जोडले जाणे, मोबाईल फोनचे आगमन, परमाणू परीक्षण, ओरिसात एक मिशनरी आणि त्याची दोन मुले यांची जिवंत जाळून केलेली हत्या, 2001 पासून दरवर्षी होणारे बॉम्बस्फोट, गोध्राजळीत आणि नंतरचे हत्यासत्र, सुनामी, खैरलांजी येथे झालेले दलित कुटुंबाचे हत्याकांड, शेअर घोटाळे, भ्रष्टाचार, पशांचा अपहार, सत्तेत येण्यासाठी होणारा घोडेबाजार..
अशा अत्यंत अस्वस्थ, अशांत काळात साहित्य लिहिले जात होते. साहित्यविषयक चर्चासत्रे, विचारवेध संमेलने, अखिल भारतीय साहित्य संमेलने, घटक संस्थांची संमेलने, जिल्हा संमेलने, दलित-आंबेडकरवादी, ख्रिस्ती, मुस्लिम, आदिवासी, ग्रामीण, समरसता, सत्यशोधक, विद्रोही साहित्यसंमेलनेही होत राहिली. स्त्रीवादी साहित्याची चळवळ ही या काळातली महत्त्वाची चळवळ होय. शरद पाटील यांनी अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा पर्याय मांडला. चौथी नवता किंवा नव्वदोत्तर कविता या संज्ञा आल्या. या सर्व चळवळी वर्णभेद, जातिभेद, िलगभेद, धर्मभेद, वर्गभेद यांच्या विरोधात शब्द उच्चारणार्या होत्या. या चळवळींशी निगडित अनियतकालिके निघाली. साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात देशीवाद, उत्तर-आधुनिकवाद, संरचनावाद, विरचना, चिन्हमीमांसा, उत्तरवसाहतवाद असे वाद आले, त्यांवर लेखन होऊ लागले.
नव्वदचे दशक हा एक महत्त्वाचा टप्पा होता. याच काळात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत महानगर, शहर, निमशहर, ग्रामीण परिसर आणि त्यांत वसती करणारे लोक यांच्यात लक्षणीय बदल होत गेले. ग्रामीण परिसर निमशहरात, निमशहर शहरात, शहर महानगरात रूपांतरित होऊ लागले. टीव्ही, केबलटीव्ही, मोबाईल फोन तर आलेच, अगदी छोटय़ा छोटय़ा मोटरस्टँडवर चकचकीत बंद पाकिटातील जिन्नस आले, पाण्याच्या बाटल्या आल्या. लोकांची जीवनशैली बदलत चालली. टीव्हीवरल्या मालिकांनी, जाहिरातींनी आभासी विश्व तयार केले. वस्तूंचे, भौतिक गरजांचे मायाजाल निर्माण केले. जीवनाच्या अनेक पातळ्यांवर अंतर्वरिोध निर्माण केले. एकाचवेळी आíथक सुबत्ता आणि आíथक विपन्नता दिसू लागली. विज्ञाननिष्ठ काळात पराकाष्ठेची धर्मश्रद्धा प्रकट होऊ लागली. जग जवळ आले म्हणताना भिन्न धर्मीयांच्या मधून विस्तव जाईनासा झाला.
कवींची, लेखकांची नवी पिढी या सगळ्या प्रक्रियेतून जात असल्याने त्यांचे लेखन वेगळे होऊ लागले. कवी-लेखक यांच्या भोवती जे राजकीय, सामाजिक, आíथक, सांस्कृतिक, भाषिक पर्यावरण असते त्याचा त्यांच्या दृष्टिकोणावर आणि लेखनावर परिणाम होत असतो. हे प्रभाव आत्मसात करताना ते वाङ्मयीन संस्कारही स्वीकारत असतात. नव्वदोत्तरी पिढीने साठोत्तरी पिढीचे संस्कार स्वीकारले आणि आपले वेगळ्या प्रकारचे लेखन केले. या पिढीच्या कवितेच्या आणि इतरही लेखनाच्या बाबतीत महानगरी, ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी अशी वर्गीकरणे असमर्पक वाटावीत असे भोवतालचे पर्यावरण बदलून गेले. ग्रामीण परिसरात शहरी, महानगरी गोष्टी शिरल्या; शहरात, महानगरात ग्रामीण परिसरातील लोक रोजगारासाठी येऊ लागले. दोन तासांच्या अंतरावरल्या शेतांत काम करण्यासाठी तालुक्याच्या गावातून स्त्रिया रेल्वेने जाऊ लागल्या. मुंबईतल्या लोकलने जाणार्या चाकरमान्यांतले आणि त्यांच्यातले अंतर कमी झाले. ग्रामीण परिसरातील अनेक कर्मचारी नित्य अपडाऊन करीत असतात. दलित साहित्याचा मुख्य परिसर ग्रामीणच आहे. दलित, ग्रामीण, आदिवासी, भटके-विमुक्त हे समाज गावगाडय़ाशी निगडित आहेत. तो गावगाडाही विस्कळीत होऊ लागला. तथापि ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्री हे साहित्यप्रवाह, स्वतचे वैशिष्टय़ कायम ठेवून आहेत.
या पिढीतील कवींनी कवितेची परंपरा जशी नाकारली नाही, तशी सांस्कृतिक परंपराही नाकारली नाही. तसे करणे अशक्यही असते. परंपरेतून सत्त्व घेऊन नवी कविता घडवता येते. परंपरांच्या संदर्भात प्रश्नही उपस्थित केले. मुख्यत या पिढीच्या कवितेत आपल्या भोवतालच्या वास्तवाचे चित्रण आणि विश्लेषण आहे. ते कधी डाव्या दृष्टिकोणातून (मार्क्सवाद संपल्याचा निर्देशही या कवींनी केला आहे), कधी देशीवादी दृष्टिकोणातून, कधी आधुनिकवादी, तर कधी आधुनिकोत्तरवादी दृष्टिकोणातून केलेले आढळते. या पिढीतल्या कवींना प्रश्न पडलेले आहेत, पण त्यांची उत्तरे सापडत नाहीत. धर्मग्रंथांत, कल्पनाप्रणालीत, चळवळीत, विज्ञानात, कलेत, साहित्यात उत्तरे सापडत नाहीत. प्रश्न अंगावर येत राहतात. परंतु उत्तरे हाती लागत नाहीत. या पिढीत बरेच आश्वासक कवी आहेत. सगळ्यांचीच नावे देता येणार नाहीत. पण काहींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. भुजंग मेश्राम, अरुण काळे, श्रीधर तिळवे, हेमंत दिवटे, मंगेश काळे, प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, अजय कांडर, गोिवद काजरेकर, वर्जेश सोलंकी, प्रफुल्ल शिलेदार, मनोज पाठक, दिनकर मनवर, सलील वाघ, संजीव खांडेकर, ज्ञानदा, श्रीकांत देशमुख, दासू वैद्य, केशव सखाराम देशमुख, मीनाक्षी पाटील, रवींद्र इंगळे चावरेकर.. असे आणखीही काही कवी आहेत. युगाचा सांधा बदलतो तेव्हा प्रथम कवितेत अभिव्यक्ती होते ही आपली परंपरा आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत माणसाचे होत चाललेले अमानुषीकरण हेमंत दिवटे यांच्या 'मी-आत्ताच स्लिट केलेलं चिकन' या कवितेत आढळते.

जेव्हा मी तडफडत असते
आकांत करीत असते
झपाटलेल्या आवेशानं या पत्र्याच्या डब्यात
प्रचंड जगण्याच्या तीव्र आसक्तीनं
तेव्हाच
तुमच्या मनात माझं मसालेदार नागडं
तुमच्या इच्छांना शमवणारं तंदुरी रूप
तरळत असतं

अनेक पातळ्यांवर ही कविता फिरते. आपण आणि आपण. बाकी जगाचे काहीही होवो. कुणाची हत्या, कुणाचा सर्वनाश. शेतकर्याना शेतीसाठी, गुरांसाठी, माणसांना पिण्यासाठी पाणी मिळो न मिळो, आमच्या वीजप्रकल्पाला पाणी मिळालेच पाहिजे. जंगलाचे काहीही होवो, सुपीक जमिनींचे काहीही होवो, लोकांच्या वस्त्यांचे काहीही होवो- आमच्या प्रकल्पांना जमीन, पाणी, इतर सुविधा मिळाल्या पाहिजेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत माणसे हळूहळू अमानुष होत जातात. या पिढीतल्या कवींना हे तीव्रतेने जाणवले. असाध्य व्याधी जडलेल्या वर्तमानाचे आणि त्या वर्तमानात कुठलीही निशाणी उमटवण्याची शक्यता नसलेल्या कवीचे चित्रण प्रवीण बांदेकर यांच्या 'खेळखंडोबाच्या नावानं' या दीर्घ कवितेत झालेले आहे. कवीने वर्तमानातील व्यक्तींचे शारीरिक, मानसिक, आत्मिक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या भोवताली कल्लोळत असलेल्या वर्तमानाचे भान वर्जेश सोलंकी यांच्या कवितेत आहे. मंगेश काळे यांनी तृतीय पुरुषाचे आगमन या कवितेत एकंदरीत मानवाचा इतिहासच डिसेक्शन टेबलवर ठेवलेला आहे. जागतिकीकरणाच्या सुपरसॉनिक घोडय़ावर बसून आलेला तृतीय पुरुष एकसुरी, एकरूपी, सपाट जग निर्माण करणार आहे. त्याला आपण रोखणार आहोत की सपाट होऊन जाणार आहोत. कवीने उत्पन्न केलेला हा प्रश्न आहे. आपल्याजवळ तयार उत्तर नाही.
आपल्याजवळ पुष्कळच प्रश्नांना उत्तरे नाहीत. उदाहरणार्थ अशोक पवारसारखे लेखक ज्या भीषण जीवनवास्तवाचे चित्रण करतात ते वास्तव अनुभवणारी माणसे जे जगत असतात त्या जगण्याविषयीच्या प्रश्नांचे कोणते उत्तर आपल्याजवळ आहे? नव्वदोत्तर काळातील स्त्रीवादी साहित्याकडेही मी आपले लक्ष वेधू इच्छितो. मध्यमवर्गीय, पुरुषी जीवनजाणिवेच्या कक्षेत अद्याप न आलेल्या अनुभवांनी व प्रश्नांनी स्त्रियांचे साहित्य खदखदते आहे. मेघना पेठे, नीरजा, प्रज्ञा पवार इत्यादींच्या कथा व अनेक कवयित्रींच्या कविता स्त्रियांचे मन आणि शरीर यांच्या बाबतीतले अस्पृष्ट वास्तव थेटपणे दाखवून वाचकाला स्वतला प्रश्न विचारायला भाग पाडीत आहे.
8.
कादंबरीत वर्तमान वास्तवाचे चित्रण अधिक तपशिलाने येते. या कालखंडात अनेक कादंबरीकार आहेत आणि कादंबर्याच्या संख्येतही भर पडलेली आहे. काही कादंबरीकारांनी आजच्या समग्र काळाचे चित्रण केलेले दिसते. श्याम मनोहर यांच्या 'कळ' (1996), 'खूप लोक आहेत' या कादंबर्यातून स्वातंत्र्योत्तर काळातील माणसाला पडलेले नतिक प्रश्न उपस्थित केले आहेत. रंगनाथ पठारे यांच्या 'नामुष्कीचे स्वगत' (1999) या कादंबरीत एकूण जागतिकीकरणातील मूल्यव्ववस्थेविषयीचे प्रश्न आलेले आहेत. अनिल दामले यांच्या  'गौतमची गोष्ट' (1998) या कादंबरीत वास्तव आणि आभासी वास्तव यातली अस'ा गुंतागुंत व्यक्त झाली आहे. कोणत्याही धर्माची रचना प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही हे या कादंबरीतले महत्त्वाचे सूत्र आहे. मकरंद साठे यांच्या 'अच्युत आठवले आणि आठवण' (2003) या कादंबरीत जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील द्विधा अवस्थेचे चित्रण केले आहे. मल्टिनॅशनल कंपन्या आणि सत्ताकांक्षी राजकारणी लोक एखाद्या प्रदेशाची धूळधाण कशी करून टाकतात याचे चित्रण प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या 'चाळेगत' (2009) या कादंबरीत आढळते. त्यातला एक परिच्छेद पाहा
हे सगळं 'ाांनी त्यांनी बिघडवलेलं आजचं वातावरण म्हणजे या विनाशकारी चाळ्यांचीच कृत्यं आहेत. या चाळेगतीला विडा वगरे देऊन बारापाचाच्या पूर्वापार अधिकार्यानी- म्हणजे आपल्यातल्या विचार करू शकणार्या जाणत्या लोकांनी वगरे वेळीच रोखायला हवं होतं. ते या बाबतीत उदासीन रा'ाले. आता ही चाळेगत थोपवणं कठीण आहे. ती बहुधा आपला पुरा कालखंड घेऊन, सगळा सत्यानाश करूनच शांत होणाराय.. ही चाळेगत म्हणजे तरी काय आहे नक्की ? चालगत.. चालगती? कालगती? कलागत? कली? काळ? शुक्लकाष्ठ? पीडा? साडेसाती? अवदसा? विनाशक शक्ती?
'वर्तमान' (सुरेश द्वादशीवार, 2002) या कादंबरीत, या देशात विचारांचा लोप झाला आहे काय असा प्रश्न विचारला आहे.
या कालखंडातील लक्षणीय कादंबर्यामध्ये 'एन्काउंटर' (एकनाथ साळवे), 'कळप' (राजन गवस, 1997),  'बारोमास' (सदानंद देशमुख, 2002), 'वारूळ' (बाबाराव मुसळे, 2004), 'नातिचरामि' (मेघना पेठे, 2005), 'ब्र' (कविता महाजन, 2005), 'निशाणी डावा अंगठा' (रमेश इंगळे उत्रादकर, 2005), 'साखरफेरा ' (मोहन पाटील, 2006), 'पडघम' (रवींद्र शोभणे, 2007), 'भिरूड' (गणेश आवटे, 2007), 'इळनमाळ' (अशोक पवार, 2008), ' रिबोट' (जी. के. ऐनापुरे, 2008), 'रौंदाळा' (कृष्णात खोत, 2008), 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' (आनंद िवगकर, 2011) आपला वर्तमान व्यक्त झाला आहे. थोर कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू' या कादंबरीचा विशेष उल्लेख करावा लागेल. इतिहास आणि संस्कृती असलेल्या मानवसमूहाचे चित्रण असलेला विस्तृत कालपट या कादंबरीत आलेला आहे.
नाटक या साहित्यप्रकारातही या कालखंडात गंभीर अशा नाटकांची भर पडलेली आहे. महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, गोिवद पुरुषोत्तम देशपांडे, प्रेमानंद गज्वी, दत्ता भगत, राजीव नाईक, श्याम मनोहर, मकरंद साठे, जयंत पवार, संजय पवार, चंद्रशेखर फणसळकर, शफाअत खान, अजित दळवी, प्रशांत दळवी, चंद्रकांत प्रभाकर देशपांडे, अभिराम भडकमकर, चेतन दातार, मनस्विनी लता रवींद्र इत्यादींचा उल्लेख करतो. हे सर्व आजचे साहित्य वाचण्यासाठी नव्या संवेदनशीलतेची गरज आहे.
मराठी साहित्याच्या प्रसार-प्रचारात वाङ्मयीन नियत-अनियतकालिकांचे महत्त्वाचे योगदान असते. अभिरुचि, सत्यकथा, छंद या नियतकालिकांनी वाङ्मयीन अभिरुची संपन्न केली. अनुष्टुभने तो वारसा चालवला. साहित्यसंस्थांच्या साहित्य, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, प्रतिष्ठान, युगवाणी या नियतकालिकांनी नवनव्या साहित्यप्रवाहांची आस्थेने दखल घेतली. बृहन्महाराष्ट्रातील अन्य भाषांतील साहित्याची ओळख करून देणारे पंचधारासारखे नियतकालिक आजही सुरू आहे. कवितारतीसारख्या केवळ कवितेला आणि काव्यविचाराला वाहिलेल्या, भाषाविचाराला समíपत भाषा आणि जीवन या नियतकालिकांना टिकून राहण्यासाठी बरीच धडपड करावी लागते आहे. अंतर्नाद, मुक्त शब्दसारखी नियतकालिके आज आहेत. साठसत्तरच्या दशकांप्रमाणे नव्वदच्या दशकात आणि त्यानंतर साक्षात, शब्दवेध, अभिधा, अभिधानंतर, खेळ, ऊर्मी, ऐवजी, नवाक्षर दर्शन, काव्याग्रह, अतिरिक्त, अक्षरगाथा इत्यादी लघुनियतकालिके आली, परंतु त्यांचा वाचकवर्ग मर्यादित आहे. पदरमोड करून निघणारी ही नियतकालिके वाचणार्याच्या घरोघरी गेली पाहिजेत.
गेल्या 50-60 वर्षांत जागतिक, भारतीय, मराठी साहित्यात विविध विचारप्रणाली आलेल्या आहेत. वास्तववादानंतर अतिवास्तववद, जादुई वास्तववाद, मार्क्सवाद, घटितार्थशास्त्र आणि अस्तित्ववाद, आधुनिकवाद, उत्तर-आधुनिकवाद, संरचनावाद, उत्तर-संरचनावाद, विरचनावाद, चिन्हमीमांसा, कथनमीमांसा, वाचक-प्रतिसाद सिद्धान्त, स्त्रीवाद, उत्तर-स्त्रीवाद, उत्तरवसाहतवाद, निम्नवर्गीय अध्ययन, संस्कृति-अभ्यास, सांस्कृतिक जडवाद, नवऐतिहासिकतावाद इत्यादी विचारप्रणालींनी साहित्याचे अध्ययनक्षेत्र व्यापलेले आहे. गंगाधर पाटील, म. सु. पाटील, रा. ग. जाधव, मििलद मालशे, अशोक जोशी, राजीव नाईक, हरिश्चंद्र थोरात यांनी या विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलेले आहे. मराठीत स्वतंत्रपणे काही सिद्धान्त मांडले गेले. मर्ढेकरांचा लयसिद्धान्त, मुक्तिबोधांचा मानुषतेचा सिद्धान्त, दि. के. बेडेकर, रा. ग. जाधव यांचा साहित्याचा सांस्कृतिक अभ्यास, नेमाडे यांचा देशीवाद, रा. ग. जाधव यांचे साहित्याचे परिस्थितिविज्ञान, म. सु. पाटील यांचे तृष्णेचे काव्यशास्त्र, हरिश्चंद्र थोरात यांचे श्रद्धेचे साहित्यशास्त्र व संशयाचे साहित्यशास्त्र, इत्यादी.
साहित्याच्या वाचनाविषयीच्या दोन ठळक भूमिका सांगता येतात. केवळ साहित्यकृतीवर लक्ष केंद्रित करणारी एक भूमिका असते; तर दुसरी साहित्यकृतीसोबतच तिच्या विविध संदर्भाचाही विचार करणारी असते. साहित्यकृतीचा राजकीय- आíथक- सामाजिक- सांस्कृतिक स्थितीशी, विचारप्रणालीशी, अन्य कलाप्रकारांशी, विविध प्रकारच्या संहितांशी संबंध असतो असे मानणारी ही दुसरी भूमिका आहे. साहित्यकृतीत व्यक्ती असतात, समाजगट असतात, त्या समाजाची संस्कृती असते, इतिहास असतो, त्या समाजगटाचे लढे असतात, जयपराजय असतात, जगण्याच्या पद्धती असतात, मूल्ये असतात, वारसा असतो, विशिष्ट बोली असते, बोलीत साठवलेले पूर्वजांचे शहाणपण असते. त्यामुळे साहित्यकृतीचा संदर्भाशिवाय विचार करणे अपुरे ठरते असे ही भूमिका मानते. साहित्यकृती ही एक सांस्कृतिक घटना असते; आणि संस्कृतीत मानवाच्या सर्वच जीवनांगांचा समावेश होतो.
साहित्याकडे जाण्याच्या, साहित्य समजून घेण्याच्या अनेक वाटा आहेत. वाटा वेगवेगळ्या आहेत. अर्थातच साहित्याच्या वाचकाने आणि लेखकाने कोणती वाट धरायची याचे त्याला स्वातंत्र्य आहे. एकाच वेळी अनेक वाटा असू शकतात आणि कोणत्याही वाटेने कोणालाही जाता येते.
सामाजिक-राजकीय, आíथक, धार्मिक जीवनातही वेगवेगळ्या वाटा असतात. आपण आपल्या एकटय़ालाच नव्हे, तर सगळ्या समाजाला, समाजात घडणार्या गोष्टींना आपण जबाबदार आहोत असे समजून वाट धरायची असते. वाट हा एक आदिबंध आहे. आदिकाळातल्या माणसांपासून आजतागायत माणसे वाटचाल करीत आहेत. गांधीजींची सत्याची वाट होती. मार्क्सची समग्र परिवर्तनाची वाट होती. तिसरी वाट एका पेंटिंगमध्ये दाखवलेली आहे. व्हिन्सेंट वॉन गॉग या चित्रकाराच्या 'गव्हाच्या शेतावर उडणारे कावळे' या चित्रात ती वाट आहे. गव्हाच्या सळसळत्या शेतावर निळेभोर आभाळ आहे. त्यात काळे कावळे आहेत. खाली त्या शेतातून एक वाट निघालेली आहे. ती क्षितिजापलीकडे कुठे तरी दूर गेलेली आहे. माणसात दडून असलेल्या असीम सौंदर्याची ती वाट आहे.
आमच्या आजच्या या जगात आम्ही कोणत्या वाटांनी चाललो आहोत? सत्याच्या? परिवर्तनाच्या? सौंदर्याच्या? की विनाशाच्या? आमच्या जगण्यात काय आहे आणि आमच्या साहित्यात काय आहे?
9.
महात्मा फुले यांनी व्यक्तीला असलेल्या स्वातंत्र्याविषयी म्हटले होते
आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्यांने एकंदर सर्व स्त्रियांस अगर पुरुषांस एकंदर सर्व मानवी हक्कांसंबंधी आपले पाहिजेत तसे विचार, आपली पाहिजेत तशी मते बोलून दाखविण्यास, लिहिण्यास अणि प्रसिद्ध करण्यास स्वतंत्रता दिली आहे..
अभिव्यक्तीच्या पाठोपाठ नियंत्रणाचा, सेन्सॉरशिपचा विचार मनात येतो. अलीकडे मुस्कटदाबीची बरीच उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. कोणत्या विशिष्ट राजकीय संघटनेचा वा सामाजिक संस्थेचा निर्देश करण्याची गरज नाही. सगळीकडे लोकच असतात. त्यांचे झुंडीत रूपांतर होते आणि तोडमोड सुरू होते. जे काळ्या अक्षरांत लिहिलेले वा छापलेले असते ते आदळआपट केल्याने नाहीसे होत नसते. माणसे जायबंदी होतात किंवा इमारती क्षतिग्रस्त होतात. पत्रकारांवर, लेखकांवर होणारे हल्ले म्हणजे तोंड बंद करण्याचा प्रकार आहे. आधी लोक बोलतच नाहीत, त्यांच्या वतीने कुणी बोलायचे ठरवले तर ते बोलू दिले जात नाही. साहित्य व इतर कलांच्या बाबतीत आक्षेप घेताना अश्लील आणि विध्वंसक हे दोन शब्द वापरले जातात. अश्लील म्हणजे नतिक दृष्टिकोणातून आक्षेपार्ह. धर्म आणि संस्कृती या संदर्भातही एखादे लिखाण खळबळजनक ठरत असते. विध्वंसक य शब्दात समाजविघातक, राजकीय-सामाजिक व्यवस्थेचा विध्वंस, विद्रोह, देशद्रोह या अर्थच्छटा आहेत. अश्लील आणि विध्वंसक या दोन शब्दांचे शिक्के मारून साहित्यकृती, कलाकृती दडपल्या जातात.
या संदर्भात साहित्य, कला क्षेत्रातील, राजकीय संघटनांतील आणि शासनातील प्रतिनिधींनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे; उत्स्फूर्त प्रक्षोभ यासारख्या गोष्टींना महत्त्व देऊ नये.
अभिव्यक्तीच्या पाठोपाठ आणखी एका गोष्टीचा निर्देश केला जातो. तो म्हणजे कृतीचा. लेखकाने नुसते लेखन करायचे नसते तर त्याने कृतीही करायची असते. लेखन हीच माझी कृती आहे असे लेखक म्हणू शकतो. परंतु त्यामुळे लोकांचे समाधान होत नाही. चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाटय़, स्थापत्य या कलाक्षेत्रांतील लोकांकडून ही अपेक्षा नसते; लेखक-पत्रकारांकडून ती असते. लेखकांनी हस्तक्षेप केला पाहिजे, भाग घेतला पाहिजे, बाजू घेतली पाहिजे असा आग्रह असतो. लेखकाला सूक्ष्म सामाजिक आणि राजकीय भान असले पाहिजे. काही गोष्टी घडवून आणणे लेखकाच्या आवाक्याच्या बाहेरचे असते. तो जनजागरण करू शकतो. एखादा मुद्दा घेऊन लोकशिक्षण करू शकतो. प्रसंगी त्याला राजकीय, सामाजिक, आíथक आणि धार्मिक सत्तेच्या विरोधात जावे लागते.
आपण ज्या कालखंडात लिहितो आहोत आणि वाचतो आहोत त्या कळात अभिव्यक्तीची जोखीम आणि जबाबदारी स्वीकारणे भागच आहे.
मुख्य म्हणजे जबाबदारी. ती लेखकाने स्वीकारणे जसे आवश्यक असते, तसेच समाजाच्या इतर घटकांनीदेखील. पूर्वी ज्यां पॉल सार्त् या फ्रेंच विचारवंताने जबाबदारीचे तत्त्व सांगितले होते  माणूस स्वतला जबाबदार आहे याचा अर्थ तो स्वतलाच जबाबदार आहे असा नाही, तो सगळ्या माणसांना जबाबदार असतो. मी कशालाही जबाबदार नाही, इतर लोकच सगळ्या गोष्टींना जबाबदार आहेत असे म्हणण्याचा हा काळ आहे. अर्थात कुणी काहीही म्हटले तरी आपली जबाबदारी आपल्याला टाळता येत नाही. जेव्हा एखाद्या पक्षाचे, संघटनेचे, संस्थेचे, समूहाचे ऐतिहासिक मूल्यमापन केले जाते तेव्हा त्यांनी आपली जबाबदारी पाळली की नाही हे उघड होते. तेच साहित्याच्या, कलांच्या क्षेत्रात काम करणार्याच्या बाबतीतही घडते. हेच वाचक आणि रसिक यांच्या विषयीदेखील म्हणता येईल. आपण मकबूल फिदा हुसेन यांना देशाबाहेर घालवले. आपले समाधान झाले. आता मी विचारतो  आपण प्रोग्रेसिव्ह ग्रूपच्या इतर चित्रकारांचे काम पाहिले? ते समजून घेतले? नंतरच्या कालखंडातल्या भारतीय चित्रकारांचे काम पाहिले? ते समजून घेतले? हे समजून घेतले नसेल तर आपण कुणाला देशाबाहेर घालवले?
आमच्या संस्कृतीत ही हिंस्रता कुठून आली ? जगणे, जगू देणे याविषयीचा विचार म्हणजे संस्कृती असा माझा संस्कृतीविषयीचा छोटासा विचार आहे. माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात केवळ भौतिक पदार्थ, शारीरिक क्रिया आणि घटना एवढय़ाच गोष्टी नसतात, तर व्यक्तींच्या अर्थपूर्ण कृती आणि अभिव्यक्तीही असतात. त्यांतून व्यक्तींनी, व्यक्तिसमूहांनी काही व्यक्त केलेले असते आणि समाजाने ते समजून घेतलेले असते. समाजात निरंतर अभिव्यक्तीची, उच्चाराची वेगवेगळी रूपे तयार होत असतात. त्यांचा अर्थ समाजातच लावायचा असतो.
साहित्य लिहिणार्यानी कोणकोणत्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवल्या पाहिजेत याविषयी मी म्हटले होते
हळूहळू स्वतला संपवणे किंवा हळूहळू इतरांना संपवणे ही नेमकी काय प्रक्रिया आहे, आतल्या आत व्यक्तीने छिन्न विच्छिन्न होऊन जावे अशी ही कोणती समाजव्यवस्था आहे, अनेक व्यक्ती आणि गोष्टी आपल्या अवतीभवती असूनही व्यक्ती इतक्या एकाकी का होत आहेत, समूहाचे बिनचेहर्याच्या घोळक्यात का रूपांतर होत असते, राजकीय आणि धार्मिक सत्तांनी व्यक्तीला स्वतची ओळख ठेवता येऊ नये अशी व्यवस्था का केली आहे, व्यक्तींचे चिपाड करून टाकणार्या रूढी आणि समजुती कशामुळे टिकवून ठेवल्या जात आहेत, कृषीवर आधारित समाजव्यवस्थेत ज्या धर्माचा आधार घेतला की शांत वाटत असे त्याच धर्माचे औद्योगिकीकरणाच्या व जागतिकीकरणाच्या अवस्थेत द्वेषाच्या हत्यारात का आणि कसे रूपांतर होते..?
लेखकांनी या प्रश्नांचा खोलवर वेध घेतला पाहिजे.
10.
मी कविता लिहायला सुरुवात केली, तेव्हा हा देश एखाद्या दूरस्थ शहरासारखा, एखाद्या भव्य कीटकगृहासारखा आहे आणि आपण त्यात कोंडले गेलो आहोत असे मला वाटायचे. इथे सामाजिक न्याय नाही; भांडवलशाही व्यवस्थेतल्या भोंगळ न्यायतत्त्वांच्या घासून गेलेल्या ध्वनिमुद्रिका केवळ वाजताहेत असे वाटायचे. इथली आमची पिढी सर्वसामान्य सामाजिक आणि आíथक हक्कांपासून वंचित आहे; युद्धे, उपासमार, बेकारी या गोष्टी अटळपणे आमच्या वाटय़ाला आलेल्या आहेत आणि हे वास्तव निमूटपणे स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही अशी भावना होऊ लागलेली होती. लोकशाही म्हटल्यानंतर काळ्या शाईत काढलेले चित्र असावे तसे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहत असे  असंख्य सांगाडय़ांचे उंच उभारलेले हडकुळे हात, साखळदंडांनी जखडलेले पाय, आणि कुणाच्या तरी जयजयकारासाठी वासलेले जबडे. हीच आहे आपली लोकशाही असे वाटायचे. बंद, मोच्रे, संप, आंदोलने, गोळीबार, दगडफेक, लुटालूट, हत्या अशा गोष्टी नियमितपणे व्हायला लागल्या, तेव्हा आपला देश भयंकर अपराधांच्या टाचांखाली तुडवला, चिरडला जातो आहे असे वाटायचे. भूतकालवाचक शब्दांत मी हे बोलत असलो तरी आजचा आपला वर्तमानही काही वेगळा आहे असे म्हणवत नाही.
एकीकडे राज्ययंत्र आहे, शासक आणि सत्ता आहे, सत्तेशी जुळवून घेणारे आहेत, सत्ता आपल्या हाती कधी येईल याचा विचार करणारे आणि व्यूह रचणारे आहेत; दुसरीकडे काहीही हातात नसलेले सामान्य लोक आहेत. मध्ये प्रचंड दरी असलेली ही विभागणी आहे. या सामान्य म्हटल्या जाणार्या लोकांमध्येही निरनिराळ्या सत्ता आहेत आणि सत्ताकांक्षीही आहेत. तथापि सगळ्या सत्ता एका बाजूला असतात आणि हताश सामान्य दुसर्या बाजूला असतात. त्यांच्या मनात आपल्या असहायतेबद्दल संताप असतो. त्यांच्या मनातल्या संतापाला चिथावणी देण्यासाठी भाषा, जात, धर्म यांपकी कोणतेही कारण पुरते. अभावातून आणि मनाच्या आवेगांच्या दडपणुकीतून त्यांच्या रागाच्या जाळाच्या जिभा लवलव करू लागतात. सत्तेच्या नीतीला अशा गोष्टी नेहमीच उपकारक ठरत आलेल्या आहेत. साठच्या दशकात लिहायला लागलेली आमची पिढी हे सगळे पाहातच आलेली आहे. वर्तमानकाळात नियती म्हणतात ती अज्ञातात कुठेतरी आहे, किंवा गूढ आहे असे नाही, तर राजकीय-आíथक सत्ता हीच ती नियती आहे हे आम्हाला उमगलेले होते. विरोधही केला. शिक्षणपद्धती, जातिभेद, धर्मभेद, िलगभेद, भ्रष्टाचार अशा विविध गोष्टींच्या विरोधात बंगाल, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र, महाराष्ट्र या प्रदेशांतल्या युवकांनी आंदोलने केली.
कालांतराने बदलाचा हा आत्ताचा काळ आला. पुष्कळ चांगल्या गोष्टी घडल्या. शिक्षणाचा प्रसार झाला. खेडोपाडी विद्यालये, महाविद्यालये आली. वंचित वर्ग शिकायला लागला. पुढे शिक्षणसम्राट आले. आणखीही अनेक सम्राट आले. जुनी साम्राज्ये गेली, नवी साम्राज्ये आली. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकविद्या, व्यवस्थापनशास्त्र, शिक्षणशास्त्र ही लुसलुशीत कुरणे झाली. कोणत्यातरी राजकीय पक्षाशी संबंध असणार्याची वा जवळ असणार्याची ही कुरणे आहेत. हरकत नाही; शिक्षण तर पोचले. चौपदरी, आठपदरी रस्ते झाले. रस्त्याकाठी ढाबे आले. शेतकर्याना आपल्या उत्पादनाचे रोखीत रूपांतर करण्याची संधी मिळाली. त्या रस्त्यांपासून काही दूरपर्यन्तच्या त्यांच्या गावात रस्ते आहेत-नाहीत, वीज आहे-नाही, पाणी आहे-नाही. बसेस आल्या. खाजगी आल्या, एस्टय़ा आल्या. वेगवेगळी पिके आली, खते, कीटकनाशके आली, धरणे झाली, सिंचनाच्या सुविधा झाल्या. भाज्यांच्या बागा, फळबागा झाल्या. फुलांच्याही मोठय़ा बागा झाल्या. रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने आले. ऊस होतो, साखर कारखाने आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही आहे, कॉम्प्युटर आहेत, इंटरनेट नेटवर्क आहे. काहींकडे आहे, पुष्कळांकडे नाही. बांधकामव्यवसाय वधारला, छोटय़ा गावांमध्ये शहरासारख्या कॉलन्या झाल्या..
1947 पासून 2011 पर्यन्त आपण जेवढे सुधारायला हवे होते,
तेवढे आपण सुधारलो का, हाच काय तो लहानसा प्रश्न आहे.
दर दिवशी होत असलेल्या शेतकर्याच्या आत्महत्यांनी मला निरुत्तर केलेले आहे. आत्महत्या ही केवळ एक व्यक्तिगत घटना नसते, ते एक सामाजिक घटितही असते. समाज या घटनेसाठी उत्तरदायी असतो.
निसर्गातल्या शक्ती खेचून घेऊन माणसांचे जगणे समृद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात तळागाळापासूनची माणसे समृद्ध झाली की काही मूठभर, हाही एक लहानसा प्रश्न आहे. व्यक्ती आणि काही व्यक्तींचे समूह समृद्ध झाले. लाच ही गोष्ट लांच्छन राहिली नाही, भ्रष्टाचार ही जगण्याची शैली ठरली. आपण लिहिण्यावाचण्याच्या क्षेत्रात काम करीत असतो त्यामुळे कदाचित या गोष्टी खुपत राहतात. खेडी उद्ध्वस्त होत आहेत, छोटय़ा शहरांचे मोठय़ा शहरांत आणि मोठय़ा शहरांचे महानगरांत रूपांतर होत आहे. व्यक्ती विरुद्ध व्यक्ती, समूह विरुद्ध समूह, त्यांच्यात अमानुष हिंसेची अभिव्यक्ती होत आहे. हिंसाचार ही आपल्या काळातली अतिशय व्यग्र करून टाकणारी गोष्ट आहे. माझ्या आत एक कलह चालला होता. माझ्याच एका नाटकात तो कलह दोन पात्रांच्या, दोन मित्रांच्या संवादातून व्यक्त झाला.
एक सांगतो  समाजद्रोही माणसांना ठार मारण्याचा अधिकार असला पाहिजे. हजारो सामान्य निरपराध माणसांना ज्यांच्यामुळे अगतिकपणे आयुष्य घालवावे लागते त्यांना ठार करण्याचा अधिकार. आपल्या या दरिद्री राष्ट्रांच्या, शोषित प्रदेशांच्या तिसर्या जगात पदरात पडते ते निमूटपणे स्वीकारणारे, वाकणारे, भिणारे, लाचार हसणारे, बंदूक किंवा चाबूक पाहून थरथर कापणारे लोक राहतात. आपलीच माणसे आपल्याच माणसांना पिळताहेत, शोषण करताहेत. त्यांना सर्व प्रकारच्या यंत्रणांकडून अभय असते. उलट अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार्याना नष्ट केले जाते. न्याय मागण्यासाठी लोक रस्त्यावर येतात तेव्हा त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव होतो. तो हिंसाचार असतो. धर्म आणि जातीच्या नावाने हिंसाचार होतो. भूमीहीन, दलित, आदिवासी यांना निपटून काढणारा हिंसाचार असतो. हे सगळे थांबवले पाहिजे.
त्यावर दुसरा विचारतो  हा हिंसाचार थांबवण्यासाठी हत्या करण्याचा अधिकार? कोणाला? हिंसाचार हा उपाय आहे का? हिंसेने हिंसा वाढते की कमी होते?
मला गांधीजींच्या विचारात या कलहातून बाहेर पडण्याची वाट सापडली. त्यांनी म्हटले होते  आपण हिंसेच्या वणव्याच्या मध्यभागी सापडलेले पामर प्राणी आहोत. अहिंसेचा पाया अद्वैतभावना हा आहे. इतरांना न दुखावणे हा अहिंसेचा एक पलू आहे, तर आपल्याला दुखावणार्यावरही प्रेम करणे हा दुसरा पलू आहे.
अर्थातच ही अद्वैतभावना सगळ्या समाजात, केवळ सामान्य माणसांमध्ये नव्हे, तर राजकीय-आíथक-धार्मिक सत्ता हातात असलेल्या समाजगटांमध्ये मुरलेली असली पाहिजे. अन्यायग्रस्तांनी कायम अन्याय सहनच करीत राहावे ही अहिंसा असणार नाही. म्हणून हिंसा-अहिंसा यांच्यातल्या संघर्षांचे चित्रण साहित्यात आले पाहिजे. समाजात दडलेली हिंसा कविता, कथा-कादंबरी, नाटक लहिणार्यानी उघड केली पाहिजे.
आजच्या एका कवीने लिहिले आहे

माण्सांची नस्ते वाहत नदी कधीच
फार्फार तर पाट वाहू शकतात माण्सांच्या रक्ताचे
म्हणजे परंपराय इथे साक्षात्
ज्यात कापली गेलीयत माणसं कण्सासारखी
(मंगेश नारायणराव काळे)
आज आपण ज्या हिंसेने वेढले गेलो आहोत ती नुसती शारीरिक स्वरूपाची नाही; मानसिक स्वरूपाचीदेखील आहे. तिचा साहित्यिक, कलावंत म्हणून आपण वेध घेतला पाहिजे. त्यामुळेच मी सर्व विद्याशाखांमधून साहित्य आणि ललित कला यांचा अभ्यास अनिवार्य केला पाहिजे असे म्हणत असतो. समाजात अद्वैतभावना, हक्काची आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली पाहिजे. ती साहित्यातून होत असते. शिवाय भाषा आणि संस्कृती यांची जपणूक म्हणजे समाजातल्या सर्व थरातल्या माणसांची जपणूक असते. साहित्याच्या जोडीला इतर कलाही असल्या म्हणजे जीवनाचे समग्र चित्र साकार होते. माणूस म्हणून आपण कुठे आहोत हे कळते.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमध्ये काम करणारी माणसे आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध आला पाहिजे. सगळ्या कलांनी एक कलाजगत अस्तित्वात येते. कलाकारांमध्ये परस्परांविषयी सौहार्द असले की ते समाजातही निर्माण होते. प्रत्येक कलाक्षेत्रातील व्यक्तीने, मग ती गायनक्षेत्रातील असो की अभिनयक्षेत्रातील की नाटय़क्षेत्रातील की क्रीडाक्षेत्रातील असो, कोणत्याही कलाक्षेत्रात काही प्रश्न उपस्थित झाले तर कलावंतांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. तसे चित्र सध्या दिसत नाही. कलावंत म्हणून आपण बाहेरचे जग आत ओढून घेत असतो. बाहेर जे काही भलेबुरे, घडणे-बिघडणे, जोडणे-मोडणे, उगवणे-खुडणे चाललेले असते, ते सगळे आपल्या आत येत असते. आपले आकलन-ग्रहण ढोबळ असेल तर आपली अभिव्यक्ती स्थूल असते. आपण किती खोल पाहतो, किती सूक्ष्मतेने समजून घेतो, त्यावर आपली अभिव्यक्ती आपले रूप धारण करते. वर्तमानकाल समजून घेण्यास सोपा नाही, तो जटिल आहे याची मला कल्पना आहे. परंतु हे तर लेखक-कलावंतांसमोरचे आव्हानच असते. याशिवाय प्रतिकूल शक्ती नेहमीच काम करीत असतात. संदेश भंडारेसारख्या छायाचित्रकार-कलावंताने म्हटले आहे
आज समाजाची आहे रे व नाही रे अशी विभागणी जो करतो त्याला कोणतीच माध्यमे थोडीदेखील जागा देईनाशी झाली आहेत. नाही रे वर्गातील घटकांची बाजू घेऊन सरकारशी भांडण करणार्याची प्रतिमा भांडखोर; उपद्रवी व विनाशकारी विकासाला हरकत घेणार्याची प्रतिमा आक्रस्ताळी; शिक्षण महागडे करण्याला आक्षेप घेणार्याची प्रतिमा जीर्णमतवादी; कामगार-कष्टकरी यांच्या शोषणाकडे बोट दाखवणार्याची प्रतिमा विकासविरोधी करून लोकांना सत्यापासून व मूळ प्रश्नापासून दूर ठेवले जात आहे. यामुळे अन्याय, शोषण, मनमानी, फसवणूक याविरुद्ध कोणी लढत नाही असा भ्रम सर्वसामान्यांमध्ये पसरतो. आपले कोणी कैवारी नाही म्हणून मग सामान्य लोक सोसत बसतात, निराश होतात.
मनोहर सोनवणे या आजच्या काळावर भाष्य करणार्या एका निबंधकाराने म्हटले आहे
माणसांचं नेमकं काय झालं आहे? शर्यतीत धावणारा घोडा की ताणतणावांचं ओझं लादलेलं खेचर? अस्थिरता, अनिश्चितता, असुरक्षितता आणि अशांततेनं माणसांना घेरलंय. नाती विस्कटताहेत, कुटुंबं डळमळीत होताहेत. माणसं सरभर होताना दिसताहेत.
आजच्या या काळात लेखकांचे-कलावंतांचे काय कार्य आहे हे या परिच्छेदातून स्पष्ट झाले आहे. कविता लिहिण्याची हीच वेळ आहे असे मी म्हणतो तेही यामुळेच. बटरेल्ट ब्रेश्टच्या ओळींचा उपयोग करून म्हणायचे झाले तर अंधाराच्या आजच्या युगात अंधाराचे गाणे गायिले पाहिजे. म्हणजे उजेडाचे महत्त्व समजेल. मनोहर सोनवणे यांनीच म्हटले आहे  आम्ही नव्या पानफुटीची प्रतीक्षा करत होतो. नव्या पानफुटीची प्रतीक्षा संपली का? माझ्या एका एकांकिकेत सर्व सामान्य लोक म्हणत असतात  आता आम्हाला आमचे स्वातंत्र्य आजच मिळेल. आता आमचे नष्टचर्य आजच मिटेल. आता हजार फुलं उमलतील. आता पूर्व दिशेला तांबडं फुटेल. आता आमची काळरात्र मावळेल. आता आमच्या स्वातंत्र्याची पहाट उगवेल. मग ते सर्व लोक घोषणा करतात  जनतेचा विजय असो. पीडितांचा विजय असो. तर वरून एक अवाढव्य बूट हळूहळू खाली येऊ लागतो.
हा निराशावाद नव्हे. ही वस्तुस्थिती आहे. लेखकांनी वास्तवाला सामोरे जायला हवे. विख्यात चित्रकार सुधीर पटवर्धन यांचे विटनेस नावाचे एक चित्र आहे. चित्राच्या मध्यभागी उजव्या हातात हृदय आणि डाव्या हातात कुंचला घेतलेला चित्रकार उभा आहे. त्याच्या बेंबीची जखम चिघळलेली आहे. त्याच्या पायांखाली झुडुपाने झाकलेले रेल्वेचे रूळ आहेत. तुटलेला मानवी हात जवळच पडलेला आहे. एक कुत्रा मांसाचा लचका तोडताना दिसतो आहे. चित्रकाराच्या उजव्या बाजूला अका मिरक आणि डाव्या बाजूला लिओनार्दे दा िवची यांच्या चित्रांतील प्रतिमा आहेत. उजव्या बाजूला भंगलेली िभत आहे, चित्राच्या वरच्या भागात खडकाळ प्रदेश आहे. नाळेची जखम उघडी पडून चिघळत असलेला हा कलावंत, माझ्या मते, भूतकाल आणि वर्तमानकाल यांच्या मधोमध उभा आहे. तो एका क्लेशपूर्ण आणि अनिश्चयी अवस्थेचा साक्षीदार आहे.
लेखक, पत्रकार, विचारवंत, चित्रकार आदी कलावंत हे आपल्या काळाचे साक्षीदार असतात. आपल्या काळाला काहीतरी झालेले आहे हे त्यांना दिसते, समजते. म्हणून मी मागे एका कवितेत प्रजासत्ताकवादी, मूलतत्त्ववादी, चंगळवादी, परिवर्तनवादी, स्तुतिपाठक, वक्तृत्त्वकलानिपुण पंडित या सगळ्यांनी विचार करावा म्हणून एक टिपण मांडले होते. त्यात म्हटले होते

आपल्या आसपासच्या आजच्या काळाला
काय झालेलं आहे,
चालता बल एकएकी खाली कोसळावा
आणि चार्ही पाय झाडू लागावा,
तसं याचं का म्हणून झालेलं आहे,
याचं दुखणं काय, याला कसली व्याधी जडलेली आहे
याचा विचार करावा
कलावंतांनी, लेखकांनी, विचारवंतांनी आपला काळ वाचावा आणि तो आपल्या कलाकृतींतून, साहित्यकृतींतून व्यक्त करावा अशी माझी कला-साहित्यविषयक धारणा आहे.
कुठलीही कला ही संस्कृतीची निर्मिती असते. संस्कृतीचा आणि कलांचा संबंध अविभाज्य असतो. साहित्यादी कला आपल्या जीवनाशी, संस्कृतीशी, आपल्या परमेश्वर कल्पनेशी, आपल्या ऐहिक आणि पारलौकिक जगाच्या धारणांशी, ऐहिक जगात जगत असताना करावयाच्या कर्तव्यांशी, आपल्या जीवनविषयक तत्त्वविचारांशी, मूल्यांशी, आचारांशी निगडित असते.
सारांश, साहित्य ही संस्कृतीची निर्मिती आहे आणि साहित्यातून संस्कृतीचा आविष्कार होतो. संस्कृतीमधून कल्पनाप्रणालीही व्यक्त होते. मात्र एकच एक कल्पनाप्रणाली नसते, अनेक कल्पनाप्रणाली असतात. कालमानानुसार भिन्न भिन्न कल्पनाप्रणालींची भरही पडत असते. सामाजिक जीवनात अर्थाची, चिन्हांची आणि मूल्यांची निर्मिती करणारी प्रक्रिया म्हणजे कल्पनाप्रणाली अशी व्याख्या केली जाते. प्रभावी राजकीय सत्ता नियमित, कायदेशीर ठरवण्यासाठी प्रचारित केली जाणारी भ्रामक विचारसरणी अशीही कल्पनाप्रणालीची एक व्याख्या आहे. कधी, विशिष्ट सामाजिक गटाचा किंवा वर्गाचा विचारव्यूह म्हणजे कल्पनाप्रणाली असते आणि तो विचारव्यूह सर्वाचा असल्याचे भासवले जाते. कधी, संस्कृती हा शब्द उच्चारला जात असला तरी तेथे विवक्षित कल्पनाप्रणाली अध्याहृत असते. एका भूभागात राहत असलेल्या सर्वाची एकच एक संस्कृती असते असे मानणे हादेखील विशिष्ट कल्पनाप्रणालीच्या वर्चस्वाखाली होत असलेला आग्रह असतो. भारतासारख्या विशाल भूभागात अनेक वर्षांपासून विविध वंशांचे, जातींचे, धर्माचे, विविध भूप्रदेशांतून आलेले लोक राहत आहेत. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत अनेक समूहांनी भिन्न समूहांशी जुळवून घेतलेले असले तरी आपल्या वंशाचे, जातीचे, भूभागाचे स्मरण आणि त्यानुसार आचरण कायमच ठेवलेले दिसते. त्यामुळे राष्ट्रवादाच्या प्रभावी कल्पनाप्रणालीच्या वर्चस्वाच्या काळातही आपापल्या वेगळेपणाच्या, आपल्या उपरेपणाच्या, आपल्या गुलामीच्या, समाजश्रेणीतील आपल्या खालच्या स्थानाच्या जाणिवांनी विद्रोहाच्या चळवळीही सुरू झाल्या होत्या. मराठी साहित्यातील मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांची आत्मचरित्रे, दलित-आदिवासी-भटक्या-विमुक्तांची स्वकथने पाहिली तरी सांस्कृतिक भिन्नता लक्षात येते. जागतिकीकरणाच्या कल्पनाप्रणालीत सपाटीकरण अभिप्रेत आहे. एक भाषा (व्यापाराची), एक संस्कृती (बाजारवादी), एक जीवनशैली (चंगळवादी), एक कला (सुशोभीकरणाची), एक साहित्य (करमणूकप्रधान), एक मूल्य (आíथक संपन्नता), एक सत्ता (आíथक उदारीकरणवादी) असे हे सपाटीकरण आहे. अशा सपाटीकरणाला नकार देण्याची क्षमताही साहित्यादी कलांमध्ये असते. भांडवलशाहीत भांडवलशाहीला पोषक आणि प्रगत भांडवलशाहीत प्रगत भांडवलशाहीला पोषक अशीच साहित्यकलानिर्मिती होईल असा सिद्धान्त मांडता येत नाही. दोहोंनाही विरोध करणार्या, त्यांच्यातील अंतर्वरिोध उघडून दाखवणार्या साहित्यकृती-कलाकृतीदेखील निर्माण होत राहतील.
11.
हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. येथे आपण मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा गौरव करीत आहोत. मराठी भाषा नष्ट होईल या चिंतेने आपण ग्रासलेले असतो. येथेच मराठीसंबंधीच्या एका वस्तुस्थितीचा उल्लेख केला तर ते गर ठरणार नाही. आज मराठी विषयात एम ए, एम फिल, पीएच डी, नेट-सेट झालेल्या युवकांची काय स्थिती आहे ? विद्यालये-महाविद्यालये यांचे जाळे सर्वत्र पसरले आहे. परंतु या युवकांना सेवेत सामावून घेतले जात नाही. महाविद्यालयातील व्याख्यात्याच्या जागेसाठी आज बोली काय आहे? हे उघडे गुपित आहे. पण आपण सारेच सज्जन असल्यामुळे याविषयी काही बोलत नाही. मराठी भाषा जगवणार्याची ही स्थिती आहे. भाषांच्या, सामाजिक विज्ञानांच्या पात्रताधारकांची आज अतिशय वाईट अवस्था आहे. समाजाच्या भौतिक समृद्धीची आपण काळजी करतो, ती रास्तच आहे. समाजाच्या सांस्कृतिक समृद्धीचीही काळजी केली पाहिजे. विद्यालयांत-महाविद्यालयांत पात्रता असलेले, अभ्यासू आणि संशोधक वृत्तीचे शिक्षक-प्राध्यापक असले पाहिजेत. त्यांच्याकडे आपण भावी पिढी सोपवत असतो. या पिढीमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समाज यांच्याविषयीची आच आणि आस्था निर्माण व्हायची असेल तर शिक्षणक्षेत्र निर्मळ असले पाहिजे. खेडय़ापाडय़ात शिक्षण पोचवणार्या शिक्षणसंस्थाचालकांविषयी मी आदरच व्यक्त करीन. तथापि त्यांच्या मनातही विद्यादान करणार्या गुरुजनांविषयी आदर आहे का याविषयी आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. प्राथमिक शिक्षणात तर आपल्या संस्कृतीच्या झाडाची मुळे असतात. चांगल्या शाळा, चांगले शिक्षक, चांगली पाठय़पुस्तके या मुलांच्या मूलभूत गरजा आहेत. आजच्या आपल्या जगात आहे-रेंच्या शाळा आणि नाही-रेंच्या शाळा असा भेद आहेच. शाळांचे निरीक्षण करणार्याना विपरीत दृश्ये दिसतात आणि ते अस्वस्थ होतात. रमेश इंगळे-उत्रादकर यांच्या 'सर्व प्रश्न अनिवार्य' या कादंबरीत आजच्या शैक्षणिक पर्यावरणातील अपप्रवृत्तींचे असे अस्वस्थ करणारे वास्तव आलेले आहे. या अपप्रवृत्तींच्या विरोधात लढू इच्छिणारे एक सर त्या कादंबरीत आहेत. ते म्हणतात
मी लढायचं ठरवलंय. हा काळ माझी परीक्षा घेतोय पण त्याला माहीत नाही की मला बापू आणि गुरुजींनी कॉप्या पुरवण्याचं आश्वासन दिलंय. दोघंही भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत म्हणाले.
बापू म्हणजे गांधीजी आणि गुरुजी म्हणजे सानेगुरुजी.
राजर्षी शाहू महाराज, सानेगुरुजी, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील - शिक्षणक्षेत्रातल्या या दिग्गजांचे स्मरण केल्यानंतर आपली क्षितिजे किती अरुंद आहेत, आपली दृष्टी किती अधू आहे हे ध्यानात येते. तरीदेखील आदिवासी भागात काम करणारे, 'माझी काटेमुंढरीची शाळा' लिहिणारे गो. ना. मुनघाटे यांच्यासारखे ज्ञातअज्ञात शिक्षक आहेत यामुळे दिलासाही मिळतो. मधून मधून आपण जगाच्या शाळेत शिकवणारे गांधीगुरुजी आणि मार्क्‍सगुरुजी यांचे स्मरण केले तर आपले शिक्षणक्षेत्रच नव्हे, तर समाजाची इतर क्षेत्रेही स्वच्छ राहतील. नुसते अंगणच नव्हे तर आपले मनही झाडून स्वच्छ करणार्या गाडगेबाबांचे आणि आपल्या आत विवेकाची वात पेटवणार्या विनोबांचे स्मरण केले पाहिजे. म्हणजे मग आपण कोणत्या वाटा उघडत आहोत, कोणत्या वाटांनी आपण जात आहोत आणि सोबत चालणार्याना आणि मागून येणार्याना कोणत्या वाटांनी घेऊन जात आहोत या अंगावर येणार्या प्रश्नांचा विचार आपण करू शकू. परंतु प्रश्न न विचारण्याच्या, उत्तरे न देण्याच्या या काळात मी भलतीच अपेक्षा करीत आहे की काय असा प्रश्न मलाच पडलेला आहे. माझा हा प्रश्न प्रश्नच नव्हे असेही म्हटले जाईल. परंतु प्रश्न विचारणे हे लेखकांचे, कलावंतांचे काम आहे. आपल्या भवतालाबद्दल जागरूक असणे आणि त्या भवतालात उत्पन्न होणार्या अपप्रवृत्तींबद्दल प्रश्न विचारणे हे सर्वच सर्जनशील कामे करणार्याचे कर्तव्य आहे.
आपण महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्र असे शब्द वापरतो. जेथे जेथे मराठी भाषक आहेत ते ते प्रदेश आपल्या मनातल्या महाराष्ट्रात आपण सामील केलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातली पाठय़पुस्तके तिथल्या शाळांतली मुले अभ्यासतात. आपल्या लेखकांची पुस्तके तिकडचे वाचक वाचतात. महाराष्ट्राबाहेरच्या या प्रदेशातल्या भा. रा. लोवलेकर, रा. अ. काळेले, दामोदर अच्युत कारे, लक्ष्मणराव सरदेसाई, प्रल्हाद वडेर, शंकर रामाणी, पुरुषोत्तम आत्माराम चित्रे, द. पं. जोशी यांसारख्या व्यक्तींनी कवितेच्या, कथेच्या, समीक्षेच्या, संपादनाच्या क्षेत्रांत मोठी कामे केली आहेत याची आपल्याला माहिती आहे. तरीदेखील महाराष्ट्रातील साहित्यवर्तुळातील व्यक्तींचा बृहन्महाराष्ट्रातील साहित्यक्षेत्रातील व्यक्तींशी म्हणावा तेवढा संबंध येत नाही. आपण मराठीत लिहीत असूनही महाराष्ट्रात आपली दखल घेतली जात नाही अशी तिथल्या व्यक्तींची खंत असते. हैदराबाद, गुलबर्गा, भोपाळ, इंदूर, बिलासपूर, पणजी, बडोदे येथे मराठी भाषा आणि साहित्य यांसाठी काम करणार्या संस्था आहेत. अन्य भाषकांच्या राज्यात मराठीसाठी काम करणार्या या संस्थांसाठी महाराष्ट्र शासनाने आणि मराठी समाजाने साहाय्य केले तर दूरत्वाची भावना नाहीशी होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेदेखील बृहन्महाराष्ट्रातील लेखकांना महाराष्ट्रात व्यासपीठे उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील साहित्यसंस्थांच्या मुखपत्रांनी त्यांच्या रचनांना जागा दिली पाहिजे.
आज आपल्या देशाबाहेरही मराठी भाषेची आणि साहित्याची जपणूक करणारे लोक आहेत. अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेने गेली काही वष्रे मराठी साहित्यात मौलिक भर घालणार्या लेखकांचा गौरव केला आहे. अमेरिका, इंग्लंड, इसरायल, मॉरिशस, कॅनडा, सिंगापूर, जर्मनी, इत्यादी देशांमध्ये मराठी साहित्य वाचणारे आणि मराठीत लिहिणारेही आहेत. या सगळ्यांनाच आपण जोडून घेतले पाहिजे. इथेच नव्हे, तर जगात कुठेही मराठीत झालेले लेखन हे मराठी साहित्याच्या इतिहासात नोंदवले गेले पाहिजे. आपली इतिहासदृष्टी व्यापक असली पाहिजे आणि इतिहासकथन प्रामाणिक असले पाहिजे. मराठी साहित्याचा इतिहास म्हणजे एकंदर मराठीत केल्या गेलेल्या लेखनाचा इतिहास असतो. महाराष्ट्रातीलही विविध प्रवाहांच्या साहित्याची दखल इतिहासाने घ्यायची असते याचाही विसर आता पडणार नाही, अशी मला खात्री आहे.
इथेच आणखी एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. मराठीत देशातल्या व जगातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या साहित्यकृतींची भाषांतरे होत आलेली आहेत. ते चांगलेच आहे. यापुढेही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या श्रेष्ठ कृतींची भाषांतरे होत राहोत. त्याचबरोबर मराठीतल्या उत्तमोत्तम कृतींची अन्य भारतीय व जागतिक भाषांमध्ये भाषांतरे झाली पाहिजेत. विदेशातही मराठीचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी मराठी साहित्याच्या संदर्भात महत्त्वाचे काम केले आहे. इयान रेसाइड, एॅन फेल्डहाऊस, गुंथर सोंथायमर, मॅक्सिन बर्नसन ही नावे सहज आठवतात. मराठीसाठी काम करणार्या कोणाचेही विस्मरण होऊ नये.
वाचनापासून आजची पिढी दूर चालली आहे अशी एक तक्रार केली जाते. या पिढीतली मुले पुस्तकांकडे जात नसतील तर पुस्तकांना त्यांच्यापुढे जायला लावावे. मराठीतल्याच नव्हे, तर जागतिक भाषांमधल्या उत्तमोत्तम कृती त्यांच्यापुढे ठेवल्या पाहिजेत. मग पुस्तकांचेही एक जग तयार होते. चेतन भगत यांच्या पुस्तकांनी नव्या पिढीला झपाटून टाकले आहे. ती मुले हॅरी पॉटरसाठी प्रसिद्ध जे. के. रॉिलग, रिक रिओर्डन, स्टेफनी मेअर यांची पुस्तके वाचताहेत. साहसकथा आणि जादुई वास्तववाद यांचे मिश्रण असलेल्या, चित्रपटाच्या पटकथांसारख्या वाटणार्या कादंबर्या वाचताहेत. काही हरकत नाही. पुढे ती पाउलो कोएल्हो, जुझे सारामागो, ओरहान पामुक, गॅब्रिएल गार्सयिा माक्र्वेझ वाचतील. इंग्रजी माध्यमात शिकणार्या मुलांना हे सहज उपलब्ध होणारे साहित्य आहे. मराठी माध्यमाच्या मुलांनी काय वाचावे? मी स्वत बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांपासून सुरुवात करून जी ए कुलकर्णी यांच्या कथांपर्यन्त पोचलो. आता मराठी लेखकांनादेखील किशोरांचे, युवकांचे मन वेधले जाईल अशा कथा-कादंबर्या लिहाव्या लागतील. आपल्या लेखनशैलीत, तंत्रात बदल करावे लागतील. विज्ञान, लोककथा, पुराणे यांच्यातून कथानके घ्यावी लागतील. लोककथांचे भांडार विपुलच आहे. चित्रदर्शी, घटनाप्रधान पण मूल्यभानयुक्त कथात्म साहित्याची या पिढीला गरज आहे. पुन्हा नव्या पिढीला वाचनाकडे घेऊन जाणे हे लेखकांचेच काम आहे.
शेवटी मला एक खंत व्यक्त करायची आहे. आजचे साहित्य मी बारकाईने आणि प्रामाणिकपणे वाचत असतो. त्यात मला जागतिक साहित्याच्या पातळीवर पोचेल अशी साहित्यकृती अभावानेच आढळते. विविध देशांमधून इंग्रजीत भाषांतर होऊन आलेल्या साहित्यकृती आपण वाचतो तेव्हा रूपबंध आणि आशय या दोन्ही बाबतीत आपण नव्या शक्यतांचा वेध का घेत नाही या प्रश्नाने मी व्यग्र होतो. वास्तविक पाहता आजचे आपले महानगरी व ग्रामीण समाजवास्तव अस्वस्थ करणारे, अंगावर येणारे आहे. या वास्तवाला आपण पुरेशा ताकदीने भिडत नाही आहोत हे तर यामागचे कारण नसेल? किंवा जागतिकच नव्हे, तर भारतीय साहित्यविश्वात काय चालले आहे याची पुरेशी माहिती आपल्याला नाही हे तर कारण नसेल? तरीदेखील यापुढची महान कादंबरी भारतासारख्या देशातून येईल या ओरहान पामुक यांच्या वाक्यावर माझा विश्वास आहे. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातल्या, विशेषत अर्धनागर, ग्रामीण परिसरात मला हिंडायचे आहे. तेथे मराठी भाषा आणि साहित्य यांविषयीचे कोणते उपक्रम, प्रकल्प हाती घेता येतील याचा शोध घ्यायचा आहे. या कामासाठी पुणे येथील पुण्यभूषण फाउंडेशनने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षांना आíथक साहाय्य करण्याची एक योजना कार्यान्वित केली आहे याची नोंद घेत आहे. या कामातून विधायक असे काही घडेल. साहित्य ही कनिष्ठ मध्यमवर्गाची एॅक्टिव्हिटी आहे अशी धारणा होती. आता त्या धारणेत बदल होतो आहे. भिन्न भिन्न समाजगटांतून, वर्गातून, परिसरांतून साहित्य येते आहे. त्याची दखल घेतली पाहिजे आणि संवर्धनही केले पाहिजे. आíथक क्षमता नसलेल्या पण साहित्याचे वाचन करण्याची इच्छा असलेल्यापर्यंत पुस्तके कशी पोचवता येतील, त्याचप्रमाणे दृष्टिहीन मुलांपर्यंत आजचे मराठी साहित्य पोचवण्यासाठी ब्रेलचा आणि श्राव्य माध्यमाचा उपयोग कसा करता येईल हाही विचार मनात आहे.
आपल्याला शब्द, शब्दापुढे शब्द ठेवण्यासाठी एक अवकाश, एक स्पेस, एक जागा हवी असते. मी या संमेलनाच्या आयोजक मंडळाचा, स्वागत समितीचा, महामंडळाचा, विविध साहित्यसंस्थांचा, मतदारांचा, तसेच माझ्या महाराष्ट्रभर पसरलेल्या मित्रांचा, ज्ञात-अज्ञात हितचिंतकांचा अतिशय आभारी आहे. त्यांनी मला येथे दोन शब्द बोलायला एक जागा (स्पेस) उपलब्ध करून दिली. स्पेस, जागा असे शब्द मी आज वापरतो. आजच्या काळात माणसांना बोलायचे असते. काही सांगायचे असते, त्यासाठी ती आर्कुट, फेसबुक, ट्विटरचा उपयोग करतात. ती जगाशी जोडली जातात, पण बोलताना, लिहिताना ती एकटीच असतात. ती अंतराळातली स्पेस वापरतात. मी इथे प्रत्यक्ष, दृष्टीसमोर असलेली जागा वापरत आहे. म्हणून आज या जागेबद्दल मी विशेष आभार मानतो.
शेवटी मी माझ्या एका कवितेने या भाषणाचा समारोप करतो. हा माझाच माझ्याशी चाललेला संवाद आहे. माझ्या बहुतेक कविता माझी शारीरिक-मानसिक स्थिती आणि समाजातील घडामोडींचा मनावर झालेला परिणाम यांतून आलेल्या आहेत. त्या एकाच वेळी वैयक्तिक आणि सामाजिक आहेत.
आज तुला काय सापडलं?
पुष्कळच गोष्टी जगण्याविषयीच्या.
कसे आपण उघडे पडतो, कच्चे ठरतो, उलटे पडतो.

तुला जगणं सापडलं?
मला बाजार सापडला. मालकीच्या वस्तू सापडल्या.
हुज्जतखोर सापडले.

जगणं नाही?
अपकर्ष सापडला, अवनती सापडली,
वाढ खुरटणे सापडले.

जगणं?
मला नागवणूक सापडली,
हिसकणे, हिरावणे सापडले.

तुला जगण्याविषयीच्या कोणत्या गोष्टी सापडल्या?
मला आपलेच घोडे पुढे दामटणे सापडले,
निमूटपणे शिक्षा सोसणे सापडले.
आज तू या शहराच्या रस्त्यांवरून खूपच भटकलास वाटतं!
नाही. मी बाहेरच्या शहरातल्या रस्त्यांवरून नव्हे,
माझ्याच आतल्या शहरात हिंडत होतो.

No comments:

Post a Comment