Tuesday, February 21, 2012

Reason to take holiday

बहाणा सुट्टीचा

शनिवार-रविवारची सुट्टी मस्त मजेत गेल्यावर उगवते सुपरिचित सोमवार सकाळ. पुन्हा तीच तयारी, तीच ट्रेन, तेच ऑफिस...सुट्टी घ्यावी की नको असं मनात येताच समोर बॉसचा चेहरा दिसायला लागतो. आता बॉसला काय सांगणार ही पंचाईत असते. आपल्यापैकी अनेकांच्या मनात सोमवारी असेच काहीसे विचार सुरू असतात. गेली वर्षानुवर्षं यापैकीच कारणं उलटसुलट करून वापरली जाताहेत. फुलोरा टीमने याच विचारांची एकत्र फाइल तयार केलीये, जेणेकरून समस्त बॉसमंडळी ऍलर्ट होईल...
बहाण्यांची यादी
१. सुट्टी हवी असली की धावून येतात ते आईबाबा, आजीआजोबा. ही मंडळी वयस्कर. त्यामुळे कधीही आजारी पडू शकतात. सुट्टीसाठी त्यांना धारेवर धरणं नको वाटतं. पण हे कारण पटण्यासारखं असतं म्हणून ही थाप चालून जाते.
२. अचानक तब्येत बिघडलीय हे कारण चांगलं असलं तरी वारंवार देता येत नाही. पुरुषांनी हे कारण दिलं तर फारसा विश्‍वास बसत नाही. स्त्रियांना मात्र ही कारणं देण्याची जाम मुभा असते.
३. बिल्डिंगमध्ये कुणाला तरी अचानक हॉस्पिटलाइज्ड करावं लागलं, यात मित्राचे आईवडील, नातेवाईक या कॅटेगरीमध्ये कुणीही चालतं. ही कारणं दुसर्‍याविषयी वाईट चिंतिल्यासारखीच. पण सुट्टीसाठी हेसुद्धा करावं लागतं.
४. ट्रेन लेट आहेत, ट्रॅफिकमध्ये अडकलोय ही कारणं देण्याची संधी आपल्या वाहतूक व्यवस्थेने उत्तम पुरवली. ऑफिसमध्ये कधीतरी उशिरा जाण्यासाठीही हे कारण चांगलं असतं.
५. दोन-चार दिवसांची सुट्टी हवी असेल तर गावी जायचंय, जमिनीचं काम अचानक आलं, गावच्या घराचा मोठा प्रॉब्लेम झालाय ही कारणं उत्तम चालून जातात.
६. सुट्टीसाठी कधी कधी स्वत:वरही संकटं ओढवून घ्यावी लागतात. फॅक्चर झालंय, पाय मुरगळला, स्टेशनवर चक्कर आली, घसरून पडलो, फूड पॉयझनिंग झालंय असं सांगून सुट्टी मिळवता येते.
७. बॉस थोडा समजून घेण्यासारखा असला तर घरात अचानक पाहुणे आलेत, आज पाणीच आलं नसल्यामुळे आंघोळीशिवाय ऑफिसला कसं येणार या छापाची थाप पचून जाते.
८. बाजूच्या घरात चोरी झाली, आमच्या गाडीची काच फोडली, ट्रेनमध्ये बॅग चोरीला गेली यासारखी कारण देऊन एका दिवसाची सुट्टी मिळवता येते.
९. काही कामानिमित्त मुंबईबाहेर गेलो होतो, तिथेच अडकलोय हे कारणसुद्धा हिट आहे.
१०. मुलाच्या शाळेत अचानक जावं लागतंय, त्यामुळे येऊ शकणार नाही हे कारण समस्त पालक मंडळींना देण्याची परवानगी आहे.
कारण कोणतंही असो, सुट्टी हमखास मिळायला पाहिजे इतकाच त्यामागे हेतू असतो. पण आता तुमच्या बॉसनेही हा लेख वाचला असल्याने आजपासून सुट्टीसाठी नवीन कारणं शोधायच्या तयारीला लागा....

No comments:

Post a Comment