Sunday, August 26, 2012

सोने ३५,०००चा भाव दाखवू शकेल!

मौल्यवान धातू सोने लकाकी गमावत चालले असल्याची कबुली खुद्द
‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अलीकडेच दिली आहे. प्रत्यक्षात सोने खरेदी घटली असली तरी गुंतवणुकीचे ते आजही लोकप्रिय दालन आहे. म्हणूनच नजीकच्या काळात सोन्याच्या किमतीतील चढ-उताराचा हा तांत्रिक अंगाने घेतलेला वेध निश्चितच अनेकांसाठी उद्बोधक ठरेल.
‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांसमोर सोन्याचे विश्लेषण ठेवत असताना काही मूळ मुद्दे मांडूनच पुढे जाणे योग्य ठरेल. तांत्रिक विश्लेषणात बाजारबाह्य कोणत्याही इतर गोष्टींना महत्त्व दिले जात नाही. म्हणजे मंदी, तुटीचा पाऊस, सणोत्सवाचा हंगाम वगैरे घटकांचा नव्हे तर फक्त बाजारभाव (Market Price) आणि खरेदी-विक्रीचा ओघ (Volume) या दोनच गोष्टींचा अशा विश्लेषणात विचार केला जातो. बाजारात, देशात व जगात घडणारी वा होऊ घातलेली प्रत्येक घटना बाजारभावात प्रतििबबित होत असते हे यामागील तत्त्व आहे.
प्रस्तुत लेखात आपण सोन्याच्या किंमतीतील चढ-उताराचे विश्लेषण करून नजीकच्या काळामधील किंमतीचा वेध घेणार आहोत. सोन्याच्या किंमतीचा विचार करता आपल्या लक्षात येईल की, २००४-०५ मध्ये रु. ५६०० ते रु. ६६००च्या दरम्यान असलेल्या सोन्याचा भाव मे २००६ ला रु. १०,७०० वर पोहोचला. २००८ पासून सुरु झालेल्या उसळीने रु. १३,४००- रु. १६,००० - रु. १८,३०० - रु. २२,८०० आणि रु. २९.४०० असे नवनवीन उच्चांक करीत जून २०१२ मध्ये सोन्याला रु. ३०,७०० पर्यंत नेऊन ठेवले. शेअर मार्केट शांत असल्याने आणि आपल्या समाजात असलेल्या सोन्याच्या आकर्षणामुळे सर्वानाच सोन्याची भुरळ पडलेली दिसत आहे. माझ्या तांत्रिक विश्लेषणाच्या कार्यक्रमात मी सतत सांगत असलेलं एक वाक्य इथे लिहिण्याचा मोह टाळता येत नाही. What looks obvious to the masses, is obviously wrong in the markets (बाजारामध्ये जे ‘आम’ लोकांना घडणार असे वाटते, ते कधीही घडत नसते). म्हणूनच ‘आम’ लोक पसे गमावतात आणि काही ‘खास’ लोक, जे ‘आम’ लोकांसारखा विचार करीत नाहीत, तेच पसा मिळवतात. ‘सोन्याचे भाव कधी खाली येऊच शकत नाहीत’ याला ‘आम’ माणसाकडे आज १०१ कारणे आहेत आणि गेल्या सात-आठ वर्षांत सोन्याचे भाव ५००% पेक्षाही जास्त वधारले आहेत ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आज काय स्थिती आहे आणि नजीकच्या भविष्यात काय घडणे शक्य आहे, याचा विचार तांत्रिक विश्लेषणाच्या अंगाने करणेच योग्य ठरेल.
तांत्रिक विश्लेषणानुसार सोबतचा सोन्याचा आलेख प्रामुख्याने पुढील गोष्टी दर्शवतो
* नजीकच्या काळाचा (एक ते तीन महिन्यांचा) विचार करता सोन्याने रु. २७,००० ते रु. ३२,००० अशी range प्रस्थापित केली असून, रु. ३१,५०० ते रु. ३२,००० पर्यंतची मजल शक्य आहे.
* त्यानंतर (तीन ते सहा महिन्यांचा) विचार करता रु. २९,००० ते रु. २७,००० पर्यंत खाली येऊन सोन्याचा भाव पुन्हा वधारून रु. ३५,००० पर्यंतची मजलही मारू शकेल. 
* अतिशय overbought झालेले सोने रु. २७,००० च्या खाली जाईल असे सध्या तरी दिसत नाही. तसे घडलेच तर रु. २३,००० ते रु. २१,००० दरम्यानचा भाव शक्य असून भरभरून सोने खरीदण्याची ती वेळ असेल हे मात्र निश्चित. 
* दीर्घकालीन (सहा महिने ते २४ महिने) विचार करता सोन्याचा भाव रु. ३८,००० ते रु. ४०,००० पर्यंतही जाणे अशक्य वाटत नाही, परंतु त्याआधी एका मोठय़ा correction ची शक्यता आहे.
* सात-आठ वर्षांत ५००% कमवण्याचा सुकाळ मात्र या पुढे असाच चालू राहील असे दिसत नाही.

No comments:

Post a Comment