Saturday, September 14, 2013

गृहकर्ज घेताना बँकांमध्ये भरावे लागणारे शुल्क

गृहकर्ज घेताना बँकांमध्ये भरावे लागणारे शुल्क


गृहकर्ज घेताना बँकांमध्ये अनेक प्रकारचं शुल्क भरावं लागतं. ग्राहक यासंबंधी अनभिज्ञ असेल तर भविष्यात त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे नंतर नसती शुक्लकाष्ठं मागे लागू नयेत असं वाटत असेल तर शुल्कासंबंधी आधीच माहिती करून घेणं चांगलं. 


गृहकर्ज घेण्याची प्रक्रिया जेवढी कटकटीची तेवढीच त्यानंतरची कर्ज फेडण्याची प्रक्रियाही अडचणीची आणि त्रासदायक ठरू शकते. कारण गृहकर्ज घेताना अनेकांना आपल्याला कोणकोणतं शुल्क (फी) भरावं लागणार आहे, याची कल्पनाही नसते. त्यामुळे भविष्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मग विनाकारणच जास्त पैसे भरावे लागले, दुस-या बँकेतून कर्ज घेतलं असतं तर कदाचित अधिकचा खर्च वाचला असता, असंही आपल्याला वाटून जातं. अशा प्रकारे भविष्यात पश्चात्ताप होऊ नये यासाठी बँक अशावेळी कोणकोणतं शुल्क आकारणार आहे याची आधीच माहिती करून घेतलेली बरी. कारण त्याची झळ आपल्याच खिशाला बसणार असते.

अ‍ॅप्लिकेशन फी
अनेक बँका अ‍ॅप्लिकेशन फीजऐवजी एस्टॅब्लिशमेंट फीज अशीही संज्ञा वापरतात. गृहकर्जासाठीच्या प्रक्रियेसाठी हे शुल्क बँकांकडून आकारलं जातं. प्रत्येक बँकेचं शुल्क कमी-अधिक प्रमाणात सारखंच असतं. मात्र यात कर्जाच्या रकमेनुसार बदल होत असतो. जितकी कर्जाची रक्कम अधिक तितकं शुल्क आकारलं जातं. त्याचप्रमाणे हे गणित ग्राहकाच्या घराच्या किमतीवरही अवलंबून असतं. त्यामुळे गृहकर्ज घेताना सुरुवातीपासूनच अनेक शुल्क भरण्याची तयारी ठेवावी लागते. अ‍ॅप्लिकेशन फीज म्हणजे प्रक्रिया शुल्क ही त्याची पहिलीच पायरी.

लेंडर्स मॉर्टगेज इन्शुरन्स
 घराच्या किमतीच्या तुलनेत गृहकर्जाची रक्कम कमी असल्यास अशा प्रकारचं शुल्क आकारलं जातं. उदा. जर ग्राहकाच्या घराची किंमत 10 लाख रुपये असेल आणि बँकेने आठ लाख रुपयेच कर्ज मंजूर केले असतील तर अशा परिस्थितीत लेंडर्स मॉर्टगेज इन्शुरन्सचं प्रमाण 80 टक्के गृहीत धरलं जातं. अशा प्रकारे शुल्क का आकारलं जातं, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण एखाद्या कर्जदाराने कर्ज बुडवलं अथवा तो कर्ज फेडू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यास बँकेला या इन्शुरन्सचा फायदा होतो.

व्हॅल्युएशन चार्ज
ग्राहक आणि संबंधित बँकही जेव्हा ग्राहकाच्या घराच्या प्रत्यक्ष किमतीबाबत साशंक असते त्यावेळी बाजारमूल्यानुसार त्या घराची किंमत ठरवून घ्यावी लागते. या मूल्यमापनासाठी बँकेकडून हे शुल्क आकारलं जातं. हे शुल्क प्रक्रिया शुल्कात म्हणजेच अ‍ॅप्लिकेशन फीजमध्येही अंतर्भूत असू शकतं किंवा काही बँका हे शुल्क वेगळं आकारतात.

डिस्चार्ज फी 
डिस्चार्ज फीचा उल्लेख काही ठिकाणी एक्झिट फी असाही उल्लेख केला जातो. ग्राहक गृहकर्जातून मुक्त होतो त्यावेळेस हे शुल्क आकारलं जातं. यामध्ये ग्राहकाला गृहकर्जातून मुक्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रशासकीय प्रक्रियेपोटी हे शुल्क आकारलं जातं. प्रत्येक बँकेची ही शुल्क आकारणी वेगवेगळी असते. कर्जदाराने वेळेत कर्ज फेडलं असल्यास काही बँका डिस्चार्ज/एक्झिट फी माफही करतात.

पेनल्टी इंटरेस्ट
एका ठराविक कालावधीसाठी घेतलेलं गृहकर्ज ग्राहकाने त्याची मुदत संपण्याअगोदरच फेडल्यास पेनल्टी इंटरेस्ट म्हणजेच दंड आकारला जातो. कारण ग्राहकाने मुदतीअगोदर कर्ज फेडल्यास उरलेल्या मुदतीत मिळणा-या व्याजावर बँकेला पाणी सोडावं लागतं. कर्ज देण्यासाठी आणि ग्राहकाचं खातं सांभाळण्यासाठी येणारा खर्च भरून काढण्यासाठी असा पेनल्टी इंटरेस्ट आकारणं बँकेला भाग असतं.

अकाउंट किपिंग फी
प्रत्येक बँकेची अकाउंट किपिंग फीज वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे बँका अकाउंटसंबधी अनेक योजना राबवत असतात. गृहकर्जाचं खातं, क्रेडिट कार्डचं खातं, बचत खातं असं सारं एकाच खात्यात असण्याची सुविधाही बँका देतात. अर्थात त्यासाठी पॅकेज फीज आकारली जाते. हे शुल्क मासिक हप्त्यात आकारलं जातं. काही बँका इन्शुरन्सचीही सेवा देतात. त्यामुळे त्याचंही वेगळं प्रक्रिया शुल्क आकारलं जाण्याची शक्यता असते.

स्विचिंग फी
ग्राहकाला गृहकर्ज फ्लोटिंग रेटमधून फिक्स्ड रेटमध्ये रूपांतरित करायचं असल्यास स्विचिंग फीज द्यावीच लागते.

No comments:

Post a Comment