Saturday, September 14, 2013

घर खरेदीद्वारे महागाईला शह

घर खरेदीद्वारे महागाईला शह


महागाई वाढत असताना आपली गुंतवणूकही महागाईच्या दरापेक्षा अधिक गतीने वाढायला हवी. त्यासाठी घर खरेदी हा एक अनेक पर्यायांपैकी एक पर्याय. घर खरेदी करून म्हणजेच घरात गुंतवणूक करून महागाईला शह देता येईल.

सर्वसामान्य जनतेला सध्या वाढत्या महागाईने ग्रासलेलं आहे. सरकारच्या महागाईचा निर्देशांक आठवड्यागणिक वर-खाली होत राहिला तरी सर्व सामान्यांना जी भाववाढीची झळ बसायची ती बसतेच. त्यातून कोणाचीही मुक्ती नाही. ही महागाई दिवसेंदिवस वाढत जाणार, हे कोण्या भविष्यवेत्त्याने सांगण्याची गरज नाही. महागाई वाढली की,आपला खर्चही वाढत जाणार. त्यामुळे दिवसेंदिवस पैशाचं मूल्यही कमी होत जाणार. काही वर्षापूर्वी 50 पैशालाही महत्त्व होतं. पण महागाईमुळे आता हे नाणं चलनी बाजारातूनही हद्दपार होण्याची शक्यता आहे. कारण महागाई. पैशाचं असं महत्त्व कमी होत जात असताना आपली गुंतवणूकही महागाई दरापेक्षा अधिक गतीने वाढायला हवी. त्यासाठी घर खरेदी हा अनेक पर्यायांपैकी एक पर्याय. घर खरेदी करून म्हणजेच घरात गुंतवणूक करून तुम्ही महागाईला शह देऊ शकता.

तुम्ही बचत केलेल्या रकमेवर आणि मुदत ठेवींवर सध्या मिळणारं व्याज हे महागाई दरापेक्षा कमी आहे. त्यावर मिळणा-या व्याजावर करही भरावा लागतो. (दहा हजारांपेक्षा अधिक असेल तर.) मुदत ठेवींवर मिळणा-या व्याजाचा दर अन्नधान्य महागाईपेक्षाही कमी आहे. त्यामुळे जेव्हा तुमची ठेवींची मुदत संपते त्यावेळी तुमची वाढलेली रक्कम त्या काळच्या महागाईच्या तुलनेत कमी असते. ठरावीक कालावधीत आपली रक्कम महागाईच्या दरापेक्षा अधिक दराने वाढावी,असं वाटत असेल तर त्यासाठी ‘प्रॉपर्टी’तील गुंतवणूक हा एक जोखीममुक्त पर्याय आहे.

गुंतवणुकीवर महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा मिळवण्यासाठी सोने खरेदी हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय कमोडिटी मार्केट आणि शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक केली जाऊ शकते. मात्र, या सर्वापेक्षा ‘प्रॉपर्टी’तील गुंतवणूक जोखीममुक्त आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये प्रॉपर्टीचा समावेश असू द्या, असं अनेक गुंतवणूक सल्लागार सांगत असतात. वाढती महागाई आणि वाढती लोकसंख्या यामुळे येत्या काळातही घरांची, जागेची मागणी वाढत जाईल, यात शंका नाही. अशा परिस्थितीत आपली जर ‘प्रॉपर्टी’त गुंतवणूक असेल तर आपला फायदा होणे अपरिहार्य आहे.
वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अर्थव्यवस्थेतील खेळता पैसा कमी करणं हा एक उपाय आहे. त्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून वेळोवेळी व्याजदरवाढही केली जाते. परिणामी गृहकर्ज महाग होतात. महागाई वाढत गेली तर व्याजदरही वाढत जाणार. त्यामुळे घर घेण्यासाठीचे कर्जही महागात घ्यावे लागणार. म्हणजेच मासिक हप्ताही महागणार. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही घर खरेदी कराल तितके अधिक फायद्याचे आहे.

कोणत्याही शहरात घर खरेदी केलं तरी ते फायद्याचं ठरतं. कारण देशातील प्रत्येक शहरातील घरांचे भाव वाढतच आहेत. मुंबई आणि पुण्यात तर घरांचे भाव वाढण्याचा दर सर्वाधिक आहे. मुंबई आर्थिक राजधानी असल्याने आणि पुणे आयटी हब असल्याने या शहरांतील घरांच्या किमती गेल्या काही वर्षात जवळपास 30 ते 40 टक्के वाढल्या आहेत. आता हाच दरवाढीचा रोग महाराष्ट्रातील इतर शहरांनाही लागला आहे. ठाणे जिल्हा, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्येही जागांचे भाव झपाट्याने वाढू लागले आहेत. महागाईमुळे हे भाव आवाक्याबाहेर जाण्याअगोदर घर खरेदी करणं कधीही चांगलं.

No comments:

Post a Comment