नवरात्र उत्सव Navaratra Utsav
गेले दोन-तीन महिने बरसणारं आभाळ आता निवळलेलं आहे. एखाद दुसरा चुकार ढग सोडला तर मोकळं झालेलं आभाळ, अथांग पसरलेली हिरवाई, पक्व झालेली शेते, गढूळपणा टाकून शांत, निर्मळ झालेली जलाशये, शांत वाहणारा वारा, असं मोठं आल्हादायक दृश्य भेवताली आहे. आसमंतात असा छानसा गंध भरलेला आहे. अशा तृप्तीने ओसंडून वाहणाऱ्या शरद ऋतूमध्ये नवरात्र येतं. नवरात्र, सृजनाचा उत्सव, निर्माण शक्तीचा उत्सव. या उत्सवातल्या प्रत्येक विधीला, पूजेला छान अर्थ आहे. माणसाची आणि निसर्गाची एकमेकांशी असलेली नाळ आहे. माणसाचं निसर्गाच्या प्रत्येक कणात दिसणारं रुप आहे. भारतीय संस्कृतीने स्त्रीला देवीचा दर्जा दिला आहे. सृजनाची फार मोठी शक्ती तिच्याकडे आहे. नवरात्र उत्सव हा मातृशक्तीचा उत्सव आहे. गौरव आहे.
नवरात्र उत्सव संपूर्ण भारतवर्षात साजरा केला जातो. महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठसह कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व वणी यासह अनेक ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो.
पंढरपूर येथे श्रीरुक्मिणीमातेच्या मंदिरात हा उत्सव खूप उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. वारीच्या निमित्ताने जगभर श्री विठ्ठलरुक्मिणीचे नाव पोहोचले आहे. वारीप्रमाणे इथला नवरात्र सोहळाही खूप आगळा वेगळा आहे. भूवैकुंठ पंढरपूर हे अलौकिक स्थान निर्माण झाले आहे ते रुक्मिणीमातेमुळे. हा चैतन्याचा गाभा पंढरपुरापर्यंत आला तो रुक्मिणीमातेमुळे, तो स्थिरावला भक्त पुंडलिकामुळे. पण त्याच्या इथे येण्याचे निमित्त मात्र रुक्मिणीमाता आहे.
व्दापारयुगात व्दारकेला श्रीकृष्ण वास्तव्य करत असता कृष्णाच्या मांडीवर राधा येऊन बसल्यामुळे रुक्मिणी रागावून, रुसून भीमेच्या काठी दिंडीरवनात आली. तिचा रुसवा काढण्यासाठी कृष्ण गायी-गोपाळांसह आले. विष्णूपदावर सहभोजन केले. गाई गोपाळ गोपाळपुरात सोडून एकटेच रुक्मिणीला भेटायला आले. एकनाथ महाराज म्हणतात,
धरुनिया राधासीस । देव येती पंढरीस ।
रुक्मिणी सुसली । दिंडीरवनात ती आली ।
तया मागे मोक्षदानी । येता झाला दिंडीरवनी ।
रुक्मिणी त्याला झिडकारले. त्यामुळे तो परत एकटाच निघाला. वाटेत पुंडलिक आई-वडिलांची सेवा करीत होता. त्याला भेटण्यासाठी त्यानेच दिलेल्या विटेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल झाला. संतकवी श्रीधर म्हणतात,
पुंडलिकापुढे सर्वेश्र्वर ।
उभा कटी ठेवूनी कर ।
रुक्मिणीस समजावया आला ।
तो पंढरीसच राहिला।
श्री रुक्मिणी मंदिर व मूर्ती
श्री विठ्ठलमंदिरात विठ्ठलाच्या मागच्या बाजूस रुक्मिणीचे स्वतंत्र मंदिर आहे. श्री रुक्मिणीची मूर्ती अत्यंत रेखीव, गंडकी शिळेची बाहे. ती उंच सिंहासनावर पुर्वाभिमुख आहे. चेहऱ्यावर विलक्षण असे स्मितहस्य आहे. दृष्टी समचरण आहे. श्री विठ्ठलाप्रमाणे मातेची मूर्तीही विविध चिन्हांकित आहे. त्यामुळे महापूजा झाल्यावर जेव्हा ही चिन्हे पहावयास मिळतात तेव्हा श्री विठ्ठलाचे वर्णन मस्तकापासूप पायापर्यंत केले जाते रुक्मिणी मातेची चिन्हे पायापासून सांगितली जातात.
मातेच्या पायावर कुंकुमवलय आहेत. पायामध्ये जोडवे, तोडे, पैंजण आदी अलंकार आहेत. कमरेच्या पट्ट्यामध्ये वस्त्राच्या निऱ्या खोचलेल्या आहेत. दोन्ही हात कटेवर ठेवलेले आहेत. सौभग्याची खूण म्हणून हातात कुंकवाचा करंडा आहे. बोटांमध्ये अंगठ्या, हातांत बांगड्या, तोडे, मंगळसूत्र, कपाळावर मळवट व कानात गुजराथी तानवडे आहेत. माताव्दारकेहून रुसून आल्याची ती खूण आहे. डोक्यावर मुद्राखडी आहे. पाठीवर वेणी आहे. चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न भाव आहेत. अतिशय देखणी, नयनमनोहर अशी रुक्मिणी मातेची मूर्ती पाहून आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात.
नवरात्र उत्सव
श्री रुक्मिणी मातेचा नवरात्र उत्सव भक्तांच्या अलोट गर्दीत साजरा केला जातो. अश्विन शु. प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पवमान पंचसूक्त अभिषेक करून घटस्थापना होते. नवरात्रात दसऱ्यापर्यंत रोज सकाळी सहा ते आठ या वेळेत रुक्मिणी स्वयंवर कथा सांगितली जाते. ही कथा ऐकण्यासाठी भाविकांची, विशेषत: स्त्रियांची खूप गर्दी होते. त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण होते. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत महाराष्ट्रातील महिला भजनी मंडळं, वेगवेगळ्या संप्रदायाची कीर्तनकार आपली सेवा मातेच्या चरणी रुजू करतात. संध्याकाळी सात वाजता धुपारती व गोंधळ असतो. रात्री उत्पात मंडळींची भजने, पंचमी ते अष्टमी नाथ महाराजांची भारूडे सादर केली जातात. दसऱ्याला श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होतो.
नवरात्री प्रत्येक दिवशी मातेला निरनिराळ्या पोशाखांनी सजवले जाते. त्या त्या दिवशीचे पोशाख ठरवलेले आहेत. प्रतिपादेला नऊवारी साडी, व्दितीयेला मारवाडी घागरा ओढणी असा पोशाख असतो. या दिवशी तिचे रुप अनोखे दिसते तृतीय व चतुर्थीला बैठक म्हणजे बसलेल्या स्वरुपात पूजा बांधतात. ललित पंचमीचा पोशाख विशेष पाहण्यासारखा असतो. या दिवशी रुक्मिणीला फुलापानांची साडी, दागिने घालतात. गाभारा पानाफुलांनी सजवतात. पुण्याहून नारायण माळी व त्यांचे सहकारी दरवर्षी येऊन मातेला असा पोशाख करतात. सप्तमीला देहूडाचरणी पावा वाजवणाऱ्या कृष्णाचे रुप मातेला देतात. सप्तमीला कन्याकुमारी व अष्टमीला संपूर्ण पांढराशुभ्र पोशाख व मोत्यांचे दागिने यांनी सजवले जाते. नवमी दिवशी सोन्याची साडी नेसवतात. ही साडी नऊवारी असून पाहण्यासारखी आहे. दसऱ्याला सोन्याची जर असलेली पैठणी, हिरे, जडावाचे दागिने घालतात.
मातेची मूर्ती खूप लहान आहे. तरीही तिला नऊवारी साडी अतिशय व्यवस्थित नेसवली जाते. निरनिराळे पोशाख करण्यात उत्पात मंडळी निष्णात आहेत. मातेच्या खजिन्यात मौल्यवान दागिने आहेत. त्यातील काही दुर्मिळ व अमूल्य आहेत. धुंडा महाराज देगलूरकर यांचे नातू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाने पौर्णिमेला नवरात्र उत्सवाची समाप्ती होते.
================
यादेवी सर्वेभूतंषू मातृरूपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
हे जगदंबे, तू सर्व जगाची आई आहे आणि या चराचरामध्ये ज्या स्ित्रया आहेत त्या तुझ्या स्वरूप मातृरूप आहे, त्या जगदंबेला मी साष्टांग नमस्कार करतो.
सर्वमंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषिविषयक स्वरूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला. अशा या नवरात्र महोत्सवाचे माहात्म्य आपण जाणून घेऊ या.
नवरात्रात काय करावे?
नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना करायला पाहिजे. हे विशेषतः चैत्र आणि अश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे. नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची मांगलिक तयारी करून ब्राह्मणाच्या हस्ते घटस्थापना केली जाते तसेच सप्तशती चरित्रातील हा श्लोक काय सांगतो, ते आपण पाहू या.
प्रथम शैलपुत्री ती, व्दितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चंद्रघण्टेति, कुष्माण्डेती ती चतुर्थकम्।
पंचमं स्कंन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीच महागौरी ति चाष्टकम।।
नवमं सिध्दिरात्री च नवदुर्गाः प्रकीर्तीताः।
या भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात. दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्याला चन्द्रघण्टा, चौथ्याला कृष्मांडा, पाचव्याला स्कंदमाता, सहाव्याला कात्यायनी, सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी आणि नवव्याला सिद्धीदात्री अशा या नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते.
अशा या देवीचे हे नऊ रूप आपण बघितल्यानंतर, तिचे जे नऊ दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव्य असते, त्यात कोणी उपवास एकभुक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून तिची आराधना केली जाते. नऊ कुमारिकेचे पूजन, सप्तशती पाठ कुंकुमार्चन, श्रीसुक्त पाठ, ललीतासहस्त्र नामावली आणि आपली जी परंपरागत चालत आलेली कुलदेवता आहे तिचा जप, हे जास्तीत जास्त केल्यास त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते.
अन्नादभवंन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः
यज्ञादभवंत्नि पर्जन्यो यज्ञकर्मसमुद्भवः
श्रीकृष्णाने गीतेत वर्णन केल्याप्रमाणे यज्ञ केल्यास आणि त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्या यज्ञाचे फळ शतपटाइतके प्राप्त होते. म्हणून या नवरात्रामध्ये हवन यज्ञाला आपल्या पूर्वजांपासून एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे.
तसेच ज्या कुमारिकांना भोजन दिले जाते त्यांना सुद्धा त्यांच्या वयानुसार देवीच्या वेगवेगळ्या रूपांनी संबोधिले जाते. कुमारिका कमीत कमी दोन वर्षांची असली पाहिजे. त्याआधी तिचे पूजन चालत नाही. तीन वर्षांच्या कुमारीला त्रिमूर्ती, चार वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी, पाच वर्षाच्या कुमारीला रोहिणी, सहा वर्षाच्या कालिका, सात वर्षांच्या कुमारिला चंण्डिका, आठ वर्षाच्या कुमारीला शांभवी, नऊ वर्षाच्या कुमारीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या कुमारीला सुभद्रा याच्या वरच्या वयाच्या कुमारीचे पूजन करण्याचा प्रघात नाही. कुमारी पूजनाचे फळ असे आहे की, दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन शत्रूंचा नाश होते. यावरून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे महत्त्वदेखील अधोरेखित होते.
फार पूर्वीची गोष्ट आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला झाला. तिचा आकार प्रचंड अवाढव्य होता आणि तिच्याच बरोबर असंख्य योगीनींचाही समावेश होता म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रघात आहे त्यात हवन ब्राह्मण भोजन कुमारिका भोजन फळ, फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते तसेच ज्यांना नवरात्रात नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही, त्यांनी तीन दिवस उपवास करूनही त्यांना यथोचित फळ मिळू शकते. तसेच सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन रात्री उपाशी राहून देवीची पूजा केली, तर त्यांना फळ प्राप्ती होऊ शकते. देवीचे पूजन, होम, कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन या चार प्रकारच्या कार्याने यथोचित पूजन केले, तर नवरात्राचे सांगोपांग व्रतपूर्ण होते, अशी आख्यायिका आहे आणि जगात जे काही अनेक व्रत किंवा अनेक दान आहे त्याची या नवरात्रव्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण हे व्रत धनधान्य, सुखसंपत्ती, पुत्रपौत्र, आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे. ज्यांना विद्या, धन आणि पुत्र मिळण्याची इच्छा आहे, त्यांनी या सौभाग्यदायी मंगलमय व्रताचे अनुष्ठान मांडावे. विद्येची आवड असणाऱ्या मनुष्याने हे व्रत केल्यास त्याला विद्येची प्राप्ती होते. ज्याचे राज्य नष्ट झाले, त्याला पुन्हा राज्याची प्राप्ती होऊ शकते, असे वर्णन परमपावन अशा श्री देवी भागवतात केले आहे.
श्री सप्तश्तीरचयीला मार्केण्डेय ऋषी काय म्हणतात,
सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतन्वितः।
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः।।
जो कोणी भक्त या नवरात्रामध्ये या भगवतीचे मनापासून उपासना करेल, त्याला कुठलीच बाधा होणार नाही आणि त्याला या जन्मात धनधान्याची प्राप्ती होईल, यात काही संशय नाही. असे म्हणून सकलचराचर अजरामर भगवती देवीला माझे साष्टांग दंडवत असो.
===============
सनडो सनेडो… ढोलीडा ढोलीडा… अशा गाण्यांचा आवाज… मोठ-मोठे ऑर्केस्ट्रा… त्याच्या तालावर नाचणारी तरूणमंडळी आणि या सगळ्याला असणारी गुजराती ठेक्याची झालर… हे सर्व पाहायला नवरात्रात प्रचंड गर्दी जमते. मीही या गर्दीत सहभागी होतो. त्या गर्दीत साधारण चौथी-पाचवीतली मुलगी आपल्या वडिलांना विचारत होती, गरबा म्हणजे काय रे बाबा?
त्या मुलीने दर दोन मिनिटाने हा प्रश्न विचारून बापाला भंडावून सोडलं होतं. शेवटी त्याने तिला कडेवर घेऊन सांगितलं की, समोर जो ‘डान्स’ सुरू आहे त्याला गरबा म्हणतात. या उत्तराने मुलीचे समाधान काही होईना. कारण त्या मैदानात कोणी पारंपारिक वेषभूषा करून तालबद्ध नाचत होते, तर ज्यांना काही येत नाही अशी मंडळी आपल्याला येईल तसे (गावच्या भाषेत रावडी नाच) नाचत होते.
म्हणजे गरबा हा भरतनाट्यम्, कथ्थक अशाप्रकारच्या पारंपारिक नाचाप्रमाणेच एक प्रकारचा नाच असावा असा समज करून त्या मुलीने एका गाण्याच्या ठेक्यावर ताल धरला आणि नाचायला सुरुवात केली. आई-बाबांच्या चेह-यावरही आनंद होता. पण या सगळ्यात मागे राहून गेला तो तिचा प्रश्न. त्या प्रश्नाचे उत्तर हा गरबा आयोजित करणा-या मित्रमंडळापासून तिथे जमलेल्या समस्त भक्त(?)गणांपैकी किती जणांना देता आला असता कुणास ठाऊक?
खरे तर भारतीय संस्कृतीत उत्सवांना अनन्य साधारण महत्व आहे. उत्सवाच्या निमित्ताने मरगळलेल्या, ताणतणावात जगणा-या मनाला ताजेपणा मिळतो. पण या सगळ्याला भक्तीची बैठक देण्याचे काम प्राचीन ऋषींनी केले आहे. म्हणून या सणांच्यामागे एखादी पौराणिक अथवा ऐतिहासिक कथा जोडलेली असते. जी कथा या उत्सवातील पावित्र्य, मर्यादा जपण्यासाठी जशी आवश्यक ठरते. तसेच त्यातून नकळत बोध देण्याची भूमिकाही हे उत्सव निभावतात. नवरात्री उत्सवाचेही असेच आहे.
गणपती गेले की नवरात्र उत्सवाचे वेध लागतात. भारतात प्रत्येक राज्यात थोड्या अधिक फरकाने हा उत्सव साजरा केला जाते. पश्चिम बंगालमध्ये माँ कालिकेच्या उत्सवाला अश्विन शुद्ध पंचमीपासून सुरुवात होते. तर गुजरातमध्ये या उत्सवात गरब्याचे पूजन होते. या दोन राज्यात नवरात्राचे सार्वजनिक स्वरुप पाहायला मिळते. मात्र महाराष्ट्रात घराघरात घटस्थापना करतात. पण सगळ्यांमध्ये उपासना होते ती देवीची.
आधी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीला पौराणिक कथा जोडलेली आहे ती महिषासुर राक्षसाच्या वधाची. महिषासुर हा देवांच्या कार्यात अडथळे निर्माण करत होता. काही केल्या त्याला हरवणे शक्य नसल्याने देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांची आराधना केली. या तिन्ही देवांच्या पुण्यप्रकोपातून एक शक्ती निर्माण झाली. या शक्तीला देवांनी सांभाळले. तिला आपले शस्त्र देऊ केले आणि या नऊ दिवसात अखंड युद्ध करून देवीने महिषासुराचा वध केला.
कथेवरून सहज लक्षात येईल की हा उत्सव म्हणजे शक्तीची उपासना. सत्कार्य करण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे. शक्तीहीन माणूस कितीही चांगला विचार सांगत असेल तर त्याची निंदा होते. असे म्हणतात की चांगले विचार अशक्त व्यक्तीला देणे हा गुन्हा आहे. कारण अशा व्यक्तीची समाजात कायम विटंबना होते. म्हणून या नऊ दिवसात उर्जा मिळवायची असते. पण ती एकट्याने नव्हे तर सगळ्यांनी मिळून. यातूनच गुजरातमध्ये सुरू झाला तो सांघिक भावनेचे महत्व विषद करणारा गरबा.
महाराष्ट्रात जसे घट पूजले जातात तसे गुजरातमध्ये गरबा पूजतात. मातीच्या सुंदर सजवलेल्या मडक्याला काही छिद्र पाडलेली असतात आणि त्याच्या आत एक दिवा ठेवण्यात येतो. या रचनेला गरबा म्हणतात. या गरब्यात मोठे तत्त्वज्ञान सामावलेले आहे. हा मटका म्हणजे ब्रह्मांडाचे छोटे पण ‘रफ’ मॉडेल आहे. अनंत पसरलेले विश्व आहे ते म्हणजे हा घट. आतील दिव्यामुळे ही छिद्रे प्रकाशमान झालेली दिसतात. ते आहेत या नभोमंडळातील तारे. आतील दिवा हा आहे उर्जेचा आद्य स्त्रोत. हे संपूर्ण विश्व एकाच तत्त्वापासून निर्माण झाले आहे आणि या सा-या सृष्टीत ते तत्त्व सामावले आहे. हे या गरब्यामधून सांगायचे आहे. तसेच दुसरा अर्थ म्हणजे, जन्म घेणारे मुलं हे मातेच्या गर्भात वाढत असते आणि त्याचे पोषण हे छिद्राच्या माध्यमातून होते. त्यामुळे गरब्यातून शरीररचनेचे शास्त्र आणि महत्व समजते. आतून बाहेर किंवा बाहेरून आत संपूर्ण सृष्टीत प्रकाशमान, उर्जा स्वरुप हे एक तत्त्व, एक शक्ती आहे हे सांगणारा असा हा गरबा.
गुजरात-राजस्थान सीमेजवळ अंबाजीचे स्थान आहे. या जुनागडमध्ये ‘नागर’ जातीचे लोक आढळतात. हे लोक घरोघरी जाऊन गरबा गायचे. म्हणजेच या गरब्याच्या मागील तत्त्वज्ञान गेय स्वरुपात त्या घरात सांगितले जायचे. घराच्या अंगणाच्या मधोमध गरबा ठेवला जायचा आणि आजुबाजूला गोल रिंगणात सर्व मंडळी बसायची. मग हे नागर जातीचे लोक गरबा गायचे. हा होता मूळ स्वरुपातील गरबा.
कालांतराने यात हळूहळू बदल होत गेला. विशिष्ट चालीत तालबद्ध अशा गीतांवर जमलेले लोक ठेका धरायचे आणि कोणत्याही साधनाशिवाय गोल फेर करून हातानेच गरबा खेळायचे. भागवताचा मोठा प्रभाव गुजराती समाजावर झालेला पाहायला मिळतो. या भागवतात रासलीलेचे वर्णन आहे. त्यामुळे नवरात्रीच्या भक्तीपूर्ण अशा वातावरणात रासलीला खेळली जाऊ लागली. अशा पद्धतीने गरबा आणि रास यांचा संगम झाल्याचे पाहायला मिळते. सध्या खेळला जाणारा गरबा हा त्याचेच कालानुरुप बदलत जाणारे स्वरुप आहे.
गरबा खेळताना अनेक गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. गरब्याच्या भोवती अनेक रिंगण असतात. जो जितक्या वेगाने रिंगणात खेळू शकेल तो त्या रिंगणात उभा असतो. जर आपल्याला त्या रिंगणातील वेगानुसार खेळता येत नसेल तर रिंगणही बिघडते आणि इतरांचा खेळही बिघडतो. म्हणून जसजसा गरबा खेळण्यातील वेग आणि तालबद्धता वाढत जाते तसतसे आपले रिंगण बदलत जाते. लौकिक जीवन घ्या किंवा अध्यात्मिक जीवन, विकास साधण्यासाठी आपल्याला हळूहळू एक एक पायरी पुढे जावे लागते. इतरांशी तुलना करत माणूस समाजात जगत असतो ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तो आपल्या शक्तीच्या बाहेर जाऊन प्रयत्न करतो. पण यश मिळाले नाही तर निराश होतो. म्हणून जी गोष्ट प्राप्त करायची आहे त्यात सातत्य आणत हळूहळू पुढे गेलो तर विकासात बाधा निर्माण होत नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जीवन विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेले हे तत्त्वज्ञान आपल्याला नकळत सांगणारा असा हा गरबा आहे.
तसेच हे सारे उत्सव पृथ्वीवरील वातावरण, बदणारे ऋतुमान, त्यानुसार शरीराला आवश्यक असणारे बदल या सा-या गोष्टी लक्षात घेऊन त्यांची रचना करण्यात आली आहे असे वाटते. पावसाळा गेला की वातावरणातील गारवा वाढत जातो आणि शरीराला त्याच्यासोबत मिळतेजुळते घेण्यासाठी ऊर्जा वाढवणे आवश्यक असते. त्यामुळे खाण्यात जसे बदल करण्यात येतात. तसेच शरीलाला अधिक श्रमांची सवय लावावी लागते. म्हणून या गरब्याचे महत्व अनन्यसाधारण आहे असे वाटते. बॉडीबिल्डिंग करणा-या पैलवानाला विचारले तर तोही सांगतो थंडीत जास्त व्यायाम केला पाहिजे. थोडक्यात शक्ती मिळवण्यासाठी हा उत्सव आहे.
पण केवळ शक्ती आली तर उन्मत्ता येते. शक्ती ही शारिरीकच नव्हे तर विद्या, वित्त, आणि सत्ता हेही शक्तीचे प्रकार आहेत. यापैकी एक जरी शक्ती आपल्या जवळ आली तर ती बुद्धी भ्रष्ट करू शकते. एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे…
विद्याविवादाय धनंमदाय खलस्य शक्ति: परपीडनाय। (अविचारी किंवा दुष्ट व्यक्तीकडे असलेली विद्या केवळ वाद करण्यासाठी वापरली जाते, तर केवळ धन उन्मत्तता आणते आणि सत्ता किंवा शक्ती दुस-याला त्रास देण्यासाठीच वापरली जाते.)
समर्थ रामदासही म्हणतात..
सामर्थ्य आहे चळवळीचें। जो जो करील तयाचें। परंतु तेथे भगवंताचे। आधिष्ठान पाहिजे।।
शक्तीला धारण करणा-या व्यक्तीचे विचार ती प्राप्त करताना किंवा केल्यावर ढासळून जाऊ नये म्हणून त्याला दैवी विचारांशी जोडले जाते. समाजात एखादे परिवर्तन आणायचे असेल तर त्याला श्रद्धा आणि भक्ती यांची जोड देणे आवश्यक आहे असे आपले पूर्वज मानत होते. त्यातूनच या उत्सवाचा जन्म झाला आहे असे वाटते.
गरब्याबद्दल आणखी खूप काही जाणण्यासारखं आहे. पण हे सगळं अनुभवायचे असेल तर गरबा खेळल्याशिवाय या सगळ्या अर्थाला कोरडेपणा आल्यासारखा वाटले. मग विचार काय करताय. गरब्याबद्दल आता जे काही वाचले आहे ते डोक्यात ठेऊन बिनधास्त गरबा खेळायला उतरा. मग त्याचा अनुभव आणि खरा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ‘चालो, गरबा रमवा’!
……………………..
संदर्भ: संस्कृती पूजन-(मराठी) पांडुरंगशास्त्री आठवले. (नवरात्री), नवारात्रीनु नवल कथा-(गुजराती) भावेन कच्छी, अर्धी सदिनी वाचन यात्रा-(गुजराती)- महेंद्र मेघाणी
No comments:
Post a Comment