Sunday, November 1, 2015

Abdul Sattar Edhi Foundation

Abdul Sattar Edhi Foundation

इन्सानियत के फरिश्ते

सीमेच्या अल्याड आम्ही काळ्या शाईची नि सुडाची भाषा बोलत होतो आणि सीमेपल्याड सिंध क्लबची दारं भारताच्या उच्चायुक्तांना बंद करण्यात येत होती, तेव्हा गीता मायदेशात पोहचत होती. तब्बल १५ वर्षं भारतीय गीताचा सांभाळ करणा‍ऱ्या कराचीतील ‘इधी फाऊंडेशन’ Abdul Sattar Edhi Foundation ची माणुसकी जागवणारी गोष्ट…

Abdul Sattar Edhi Foundation
Abdul Sattar Edhi Foundation


गुजरातच्या जुनागढ संस्थानातल्या छोट्याशा बांटवा गावात इधी कुटुंब राहायचं. अब्दुल सत्तार Abdul Sattar तिथल्या शाळेत जायचा. वडील धान्याचे व्यापारी. आई शाळेत जाताना रोज दोन पैसे हातात ठेवायची. एक खाऊसाठी आणि एक पैसा गरिबाला मदत करायला. संध्याकाळी आईला हिशेब द्यावा लागायचा. त्याने दोन्ही पैसे स्वतःसाठी खर्च केल्याचं कळलं तर आई संतापायची. अब्दुल सत्तार आईशी खोटं मात्र कधी बोलला नाही. तो ११ वर्षांचा असताना आई पक्षाघातानं आजारी पडली. घरात करायला कुणी नव्हतं. आईसोबत २४ तास कुणीतरी हवं असायचं. अब्दुल सत्तारला शाळा सोडावी लागली. एवढ्याशा वयात आईचं खाणं पिणं, आंघोळ, विधी, कपडे बदलणं सगळं त्यानं जबाबदारीनं निभावलं. तब्बल आठ वर्षं. दुर्दैवानं आई कधीच उठली नाही. अब्दुल सत्तार १९ वर्षांचा असताना सेवेचं व्रत आणि ‘एक पैशाची बांधिलकी’ त्याच्या हाती देऊन ती गेली… पुढे १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं, ती फाळणीची रक्ताळलेली रेघ मारून. इधी कुटुंब चंबुगबाळं आवरून कराचीत पोहचलं. नव्या शहरात नवं जगणं, नवा संघर्ष सुरू झाला. अब्दुल सत्तारनं वस्तू डोक्यावर घेऊन विकल्या. कापड बाजारात काम केलं. गोरगरिबांसाठी जमेल तशी, जमेल ती मदत करणं सुरू होतं. पण नेमका मार्ग स्पष्ट होत नव्हता. तो मिळाला १९५७ मध्ये कराचीत आलेल्या फ्लूच्या साथीच्या रूपाने. हजारो लोक अंथरुणाला खिळले. सेवेसाठी एवढे डॉक्टर कुठले? इधींनी एक कँप सरू केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. लोकांना, मित्रांना मदतीचं आवाहन केलं. तब्बल २७ हजार रुपये जमा झाले. त्या काळात खूप होते ते. उरलेल्या पैशांतून इधींनी जुन्या कराचीत सहा बाय सहाची जागा घेऊन तिथं डिस्पेन्सरी थाटली. एक जुनी गाडी घेतली, हिलमन पिकअप. ही इधींची पहिली अॅम्ब्युलन्स. इधी फाऊंडेशनची सुरुवात होती. त्यानंतर इधींनी मागे वळून पाहिलं नाही. अडचणी होत्याच, पण त्यावर ते पाय रोवून उभे राहिले.

१९६६ मध्ये ‘इधी फाऊंडेशन’ Edhi Foundation मध्ये काम करणाऱ्या बिल्किस यांच्याशी इधींनी विवाह केला. त्यावेळीही नवरामुलगा म्हणून त्यांच्याकडे स्वतःचं असं काहीही नव्हतं. एक डिस्पेन्सरी, एक चिमुकलं ऑफिस, सात-आठ खाटा मांडलेलं मॅटर्निटी होम आणि जुनी अॅम्ब्युलन्स. बस्स. बिल्किस यांनाही वेगळी अपेक्षा नव्हतीच काही. इधी फाऊंडेशनचा संसार दुप्पट उत्साहाने आणि वेगाने सुरू झाला. गेल्या ५० वर्षांत कराचीच्या सीमा ओलांडून तो पाकिस्तानभर तर पोहचलाच. पण देशाच्या सीमा ओलांडून जगभर विस्तारलाय. पीडित आणि गरजूंना सेवा पुरवणाऱ्या सेवाभावी संस्थांमध्ये इधींचं नाव जगात अग्रकमानं घेतलं जातं.

‘इधी फाऊंडेशन’ कोणताही नफा न कमावता केवळ सेवाभावी वृत्तीनं चालवलं जातं. इथे येणाऱ्याला एक रुपयाही द्यावा लागत नाही. जात, पात धर्म, लिंग, वय काहीही असो इधी २४ तास मदतीसाठी तत्पर असतात. अॅम्ब्युलन्स सेवा, हॉस्पिटल्स, अनाथालयं, हेल्पलाइन्स, शाळा, वृद्धाश्रम, निराधारगृहं, अंत्यसंस्कारसेवा, लंगर, मनोरुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र, प्राण्यांचं अनाथालय, लंगर….ही यादी तब्बल २१ पर्यंत वाढते.

यातलं इधींचं पहिलं प्रेम आहे, अर्थातच अॅम्ब्युलन्स सेवा. या माणसानं तब्बल चार दशकं अॅम्ब्युलन्स शिवाय कोणतीही गाडी चालवली नाही. रात्री-बेरात्री कराचीच्या रस्त्यावर भटकत राहायचं. रस्त्यावरची असहाय्य, रुग्णाईत, म्हातारी माणसं, बेवारस तान्हुली उचलायची आणि त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये घालून आणायचं. हे काम आता इतकं विस्तारलंय की आज इधींची अॅम्ब्युलन्स सेवा ही जगातली स्वयंसेवा संस्थेनं चालवलेली सर्वांत मोठी सेवा आहे. त्याची गिनिज बुकात नोंदही झालीय. आज इधींच्या ताफ्यात तब्बल १८०० अॅम्ब्युलन्स आहेत. केवळ जमिनीवरच चालणाऱ्या नव्हे तर हवा आणि पाण्यातल्याही! दोन विमानं, एक हेलिकॉप्टर आणि २८ बोटी सेवेसाठी सदैव सज्ज असतात.

बेवारस मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार, ही इधींची आणखी एक महत्त्वाची सेवा. ओळखण्यापलीकडे गेलेले आणि नातं सांगायलाही कुणी नसलेल्या मृतदेहांना इधी आपलेपणानं कफन आणि कबर देतात. त्यांनी अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांची गेल्या आठ-दहा वर्षांतली संख्याच ६० हजारांच्या पुढे जाते. त्यापूर्वीचा हिशेब वेगळा.

महिला आणि मुलांशी निगडित असलेलं काम बिल्किस पाहतात. इधींची पाकिस्तानभर अनाथालयं आहेत. हजारो निराधार मुलांना इधी नवं आयुष्य देत आहेत. त्यांचं दत्तक केंद्रही आहे. अत्यंत कडक नियम पार करून, स्वतः बिल्किस यांच्या मुलाखतीत पास झालेल्या जोडप्यांनाच मुलं दत्तक दिली जातात. याशिवाय शेकडो गरीब बायका प्रसूत व्हायला इधींच्या आश्रयाला येतात. त्यांची रक्तपेढी हजारोंचे प्राण वाचवते. घरातून हाकलून दिलेल्या, मारहाणीला कंटाळलेल्या बायका इथं विश्वासाने येतात. मुलाबाळांनी घराबाहेर काढलेली ज्येष्ठ मंडळी इधींकडे हक्काचं छप्पर शोधतात. जगण्याचं भान विसरलेले मानसिक रुग्ण इथं सन्मानाने राहतात, कष्टाची तयारी असलेल्या तरुणांना हक्काचा रोजगार मिळतो, इधींच्या शाळांमधून उद्याचे सुजाण नागरिक घडतात… यादी न संपणारी. आणि हे सारं कोणत्याही सरकारच्या कसल्याही मदतीशिवाय. केवळ लोकांच्या पैशांतून. इधींचे इरादे नेक, काम चोख. त्यामुळे पैशांची चणचण त्यांना कधी भासली नाही. कधी फारच गरज असली तर इधी फूटपाथवर झोळी घेऊन बसतात. यात त्यांना आजही लाज वाटत नाही. कागद गोळा करणाऱ्यापासून गरीब बाईपासून चकचकीत गाडीतून जाणाऱ्या अमिरापर्यंत सारेच इधींपाशी थबकतात. काही वेळातच इधींची अवस्था ‘दुबळी माझी झोळी’ अशी होऊन जाते.

करोडो रुपयांचं मदतकार्य करणारे इधी संस्थेच्या पैशातून एक रुपयाही पगार घेत नाहीत. पूर्वी कधीतरी सरकारी योजनेत गुंतवलेल्या पैशांतून मिळणाऱ्या व्याजावर त्यांचं भागतं. आजही त्यांचं स्वतःचं घर नाही. संस्थेच्या आवारात दोन साध्या खोल्यांत ते राहतात. फैझल, कुब्रा, झीनत आणि अल्मास ही मुलं लग्न होऊन स्थिरस्थावर झालीत. ते इधींचा सेवेचा वारसा पुढे चालवताहेत.
पाकिस्तानच्या सीमा ओलांडून अफगाणिस्तान, लेबेनॉन, बांग्लादेश, इथिओपिया, अर्मेनिया, इराण, सोमालिया, रशिया, बोस्निया, यूएई, जपान, नेपाळ…अशा अनेक देशांत आपत्तीकाळात इधींनी हात दिलाय. १९९४मध्ये भारतात सुरतमध्ये प्लेगने हाहाकार माजवला, तेव्हा इधी मदतीसाठी पोहचले होते. या कामाची दखल घेऊन इधी दांपत्याला लेनिन अॅवॉर्ड, मॅगसेसे अवॉर्डसह अनेक छोटे मोठे सन्मान मिळालेत. पण या दोघांचं साधेपण कायम आहे. कामाचा वेळ जातो म्हणून या माणसानं कधीही कुठल्या सभारंभांना हजेरी लावली नाही, कधीही भाषणं झोडली नाहीत, तसं त्यांनी जाहीरच करून टाकलं होतं. ८७ वर्षांचे इधी आता पूर्वीसारखे अॅम्ब्युलन्स घेऊन भटकत नाहीत. पण बिल्किस आणि मुलांनी हे सेवाव्रत सुरू ठेवलंय.

इधींचं काम विस्तारतंय. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सात वर्षांच्या मूकबधीर गीताला त्यांनी १५ वर्षं सांभाळलं. मायेची पाखर घातली. तिला तिच्या धर्माचं मुक्तपणे आचरण करू दिलं. भारताच्या पंतप्रधानांनी देऊ केलेले कोटभर रुपये त्यांच्या नियमांना जागून त्यांनी नम्रपणे नाकारले…

सीमेच्या अल्याड आम्ही काळ्या शाईची, हुल्लडबाजीची आणि सूडाची भाषा बोलत होतो आणि सीमेपल्याड सिंध क्लबची दारं भारताच्या उच्चायुक्तांना बंद करण्यात येत होती, तेव्हा गीता मायदेशात पोहचत होती… इन्सानियतची भाषा बोलणारे इधी कुटुंबातले Edhi Foundation फरिश्ते तिला तिचं आयुष्य सन्मानाने परत द्यायला इथवर आले होते!

No comments:

Post a Comment