Friday, September 12, 2014

भारतीय खेळाडूंच्या जेवणात झुरळे, निकृष्ट भाज्या


नवी दिल्ली : एकीकडे भारतीय खेळाडूंकडून ऑलिम्पिक, आशियाई यांसारख्या स्पर्धांमध्ये पदकविजेती कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगण्यात येत असतानाच खेळाडूंना योग्य आहार व इतर आवश्यक सुविधा देण्यात मात्र सरकारकडून कुचराई होत आहे. दिल्ली येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना निकृष्ट अन्न मिळत असून, खेळाडूंच्या आरोग्यासाठी आवश्यक काळजी घेण्यातही हेळसांड होताना दिसून येत आहे.

दक्षिण कोरियातील इंचिऑन येथे होणाऱ्या आगामी आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या महिला बॉक्सर, जिम्नॅस्ट आणि सायकलपटू सध्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये सराव करतात. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साई) या संकुलाचे व्यवस्थापन पाहिले जाते. मात्र, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेणे तर सोडाच, खेळाडूंसाठी बनवलेल्या अन्नात झुरळे, उघड्यावर ठेवलेल्या भाज्या, न धुतलेली भांडी, बंद पडलेले वॉटर कुलर्स व साचलेला कचरा असे चित्र दिसून येत आहे. अर्थातच या गैरसोयींमुळे येथे सराव करणाऱ्या खेळाडूंमध्ये नाराजी आहे. दिल्ली महानगरपालिकेनेही या संकुलाला पाण्याची टाकी स्वच्छ नसल्याने ४,००० रुपयांचा दंड ठोठावला होता. तथापि, त्यानंतरही परिस्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही.

संकुलातील खानावळीचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराकडे खेळाडूंनी याविषयी तक्रारही केली. परंतु, त्यामुळे खेळाडूंनाच सराव शिबिरातून काढून टाकण्याचा; तसेच शिळे अन्न देण्याच्या धमक्या देण्यात आल्या. काही खेळाडूंनी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून याविषयी दखल घेण्याची विनंती केली आहे. 'फुकट मिळतेय, त्या जेवणाबाबत तक्रार करू नका', अशी धमकीही या कंत्राटदाराने दिल्याचे शिबिरातील एका खेळाडूने सांगितले. स्टेडियमचे प्रशासक कपिल कौल यांच्यासमोर हा मुद्दा मांडला असता त्यांनी कोणत्या घरात झुरळे नसतात, असा प्रतिप्रश्न केला. आहारतज्ज्ञांनीच कीटकनाशके न वापरण्याची सूचना केल्याने झुरळे व उंदीर वाढल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment