Wednesday, January 9, 2013

शीतपेये, मिनरल वॉटर कंपन्यांचे पाणी तोडा

शीतपेये, मिनरल वॉटर कंपन्यांचे पाणी तोडा

कोकाकोला , पेप्सी , मिनरल वॉटर कंपन्यांना पुरविण्यात येणारे पाणी तात्काळ बंद करण्यात यावे , हे पाणी पिण्यासाठी आणि शेतीकरिता वापरण्यात यावे , अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे . आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे मिनरल वॉटरचे प्रकल्प असून त्यांना धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावरुन वादंग होण्याची शक्यता आहे .

मागील ५० वर्षात पडला नाही , असा दुष्काळ राज्यात यावर्षी पडला असल्याची कबुली आघाडीचे नेतेच देत आहेत . ​ मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके यांना सर्वाधिक दुष्काळाचा फटका बसला आहे . काही महिन्यात पिण्याचे पाणीही मिळेल की नाही , अशी स्थिती आहे . आताच काही तालुक्यांमध्ये पंधरा दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे . नद्यांमध्येही पाणी नसल्याने टँकरमध्ये पाणी कुठून भरणार असाही प्रश्न आहे . मात्र राज्यातील पेप्सी , कोकाकोला आणि मिनरल वॉटर कंपन्या धरण आणि नद्यांमधून पाणी उचलत आहेत . त्यांना आळा घालण्यासाठी तातडीने या कंपन्यांचे पाणी तोडण्यात यावे , अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे .

या कंपन्यांचे पाणी तोडले तर ते पाणी लोकांना पिण्यासाठी वापरता येईल , असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे . बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरुन वादंग होईल , असे दिसते . कारण अनेक मंत्र्यांचे मिनरल वॉटर , डिस्टलरीज प्रकल्प आहेत , त्यामुळे पाणी तोडले तर त्यांच्या प्रकल्पांना या मागणीचा फटका बसू शकेल .

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळावर चर्चा होणार आहे . राज्य सरकारने टंचाईग्रस्त म्हणून काही निर्णय घेतले आहेत . चारा डेपो , टँकरने पाणीपुरवठा , वीज बिलात माफी असे काही निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत . राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी , दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफी करा , अशी सूचना सरकारला केली आहे . त्याबाबतही निर्णय अपेक्षित आहे .

 

No comments:

Post a Comment