Monday, March 21, 2016

Kohli dedicates match winning 55 to Tendulkar

विराट कोहलीचं 'ते' वंदन क्रिकेटच्या देवासाठीच!
Kohli dedicates match winning 55 to Tendulkar

विराट कोहलीचं 'ते' वंदन क्रिकेटच्या देवासाठीच!

२०११ मध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खांद्यावर बसवून 'वानखेडे प्रदक्षिणा' घालणाऱ्या विराट कोहलीनं पुन्हा एकदा या 'देवा'बद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याच्यावरील आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कालच्या सामन्यात अर्धशतक साजरं झाल्यानंतर वाकून केलेलं वंदन हे सचिन तेंडुलकरसाठी होतं, असं नम्रपणे सांगून त्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.

वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करण्याची परंपरा टीम इंडियानं शनिवारी कायम राखली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर धोनीसेनेनं बुम बुम आफ्रिदीच्या पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताच्या या धडाकेबाज विजयाचा शिल्पकार ठरला, विराट कोहली. अफलातून अर्धशतकी खेळी साकारून त्यानं पाकिस्तानचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकलं आणि भारतीयांना जल्लोषाचा आणखी एक 'मौका' दिला. कोहलीच्या या संस्मरणीय खेळीचं क्रिकेटविश्वात भरभरून कौतुक होतंयच, पण अर्धशतकानंतर एका स्टँडकडे पाहत वाकून केलेल्या वंदनामुळे त्याची उंची अधिकच वाढली आहे.

 शाहीद आफ्रिदीच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्हचा फटका खेळून एक धाव घेत विराटनं अर्धशतक पूर्ण केलं आणि ईडन गार्डन्सवर जमलेले ६७ हजार प्रेक्षक उसळलेच. या प्रेक्षकांना आणि टीव्हीसमोर बसलेल्या तमाम देशवासियांना विराटनं बॅट उंचावून अभिवादन केलं. त्यानंतर, व्हीआयपी स्टँडकडे पाहत, दोन्ही हात समोर करून तो नतमस्तक झाला. त्याचं हे वंदन नेमकं कुणासाठी हे तेव्हा कळलं नाही. अर्थात, विराट सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानत असल्यानं, त्याच्यासाठीच हा सलाम असेल, असा अंदाज समालोचक व्हीव्हीएस लक्ष्मणने वर्तवला होता. त्याला विराटनं सामन्यानंतर दुजोरा दिला.



मी सचिन तेंडुलकर यांच्यासाठीच नतमस्तक झालो होतो. त्यांच्याकडे पाहूनच मी क्रिकेट खेळू लागलो. त्यामुळे ६७ हजार प्रेक्षकांसमोर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वेगळंच समाधान वाटलं, अशी भावना विराटनं सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली. त्यानंतर बीसीसीआय टीव्हीशी बोलताना तो अधिकच हळवा झाला होता. सचिनपाजीने भारताला मिळवून दिलेले असे अनेक विजय आम्ही पाहिलेत. त्यांच्या नावाचा स्टेडियममध्ये होणारा जयघोष आम्ही ऐकलाय. त्यांच्यामुळेच आम्ही क्रिकेट खेळायला लागलो. त्यामुळे आज त्यांच्यासमोर ही खेळी करता आली, त्यांना आनंद देता आला, ही खूपच अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे, असं विराटनं नम्रपणे सांगितलं. एरवी आक्रमक वाटणारा विराट सचिनबद्दल बोलताना भावुक होऊन जातो, हे पुन्हा जाणवलं.

दरम्यान, विराटनं दिलेल्या या सन्मानाबद्दल सचिननं त्याचे आभार मानलेत. टीम इंडियानं विजयी होऊन परतताना माझ्याकडे पाहून हात उंचावल्यानं, मी संघातून कधीच बाहेर पडलो नसल्यासारखंच वाटलं, अशा भावना सचिननं ट्विटरवरून व्यक्त केल्या. त्यामुळे सचिन-विराटमधील नातं अधिकच घट्ट झालं आहे.

No comments:

Post a Comment