Wednesday, April 4, 2012

मी एक अण्णा! I am Anna

मी एक अण्णा!

मी एक प्रकारचा अण्णा, माझ्या अचानक जाग्या झालेल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून प्रतिज्ञा करतो की-,
मी कधीही लाच घेणार नाही. मी कधीही लाच देणार नाही. देण्याघेण्याच्या कुठल्याही व्यवहाराला मी काळा रंग देणार नाही.
मी हुंडा घेणार नाही. (आणि मला मुलगी झाली तरी) मी हुंडा देणार नाही. मानपानाच्या नावाखाली मी लूटमार करणार नाही. वरदक्षिणेच्या नावाखाली मोटरसायकल मागणार नाही. इतकेच नव्हे तर मी आहेरदेखील घेणार नाही. आणि अर्थातच देणारही नाही.
तिकीट न काढता मी रेल्वे प्रवास करणार नाही. चुकून कधी केलाच तर दंडाची पावती फाडल्याशिवाय राहणार नाही. रिझर्वेशनच्या डब्यात तसेच घुसून बोगी कंडक्टरला शंभर रुपये देऊन झोपायला बर्थ मिळवणार नाही. असा बर्थ मिळवल्यावर समाधानाने स्वत:शीच हसणार नाही.
लायसन्सशिवाय कुठलंही वाहन चालवणार नाही. सिग्नल तोडल्याबद्दल किंवा हेल्मेट न घातल्याबद्दल ट्रॅफिक मामाने पकडल्यास चिरीमिरी देऊन सटकणार नाही. इतकेच काय, त्याला ‘गाववाले’ असं म्हणत फुकटची सलगी दाखवणार नाही.
रोज सकाळी मस्टरमध्ये सही करताना दहा मिनिटं अलीकडची वेळ टाकणार नाही.
सोसायटीच्या पाण्याची पाऊण इंची पाइपलाइन दीड इंची करून घेण्याच्या खटपटीत नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला फितवणार नाही. एकवेळ सोसायटीच्या आवारातल्या सार्वजनिक नळावर पाणी भरू, पण हा असला भ्रष्टाचार करणार नाही.
मी कामावर दांडय़ा मारणार नाही. ‘काका वारले’ असे सांगून टीव्हीवर मॅच बघत बसणार नाही. आजारी नसतानाही ऑफिसात सिकनोट पाठवणार नाही. खोटय़ा मेडिकल सर्टिफिकेटासाठी ओळखीच्या डॉक्टरला पन्नास रुपडय़ा देणार नाही.
वडलार्जित जमिनीचे काय वाट्टेल ते होवो, कागदपत्रे बैजवार करुन घेण्यासाठी तलाठय़ाची धन करणार नाही.
पोराला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाली म्हणून डोनेशन कधी भरणार नाही.
बायकोच्या बीएडसाठी लाख दीड लाख खर्च करणार नाही. बायकोच्या भावानं ‘मॅटर’ केला म्हणून पोलीस स्टेशनात मूठ दाबणार नाही.
वीज मीटर नावावर व्हावं म्हणून लाइनमनला पटवणार नाही. गॅसचा सिलिंडर कधीही ब्लॅकमध्ये घेणार नाही. रेशनकार्डासाठी काहीही अंडरटेबल देणार नाही.
मी कधीही भेटवस्तू घेणार नाही. दिवाळीला दारात येणाऱ्या एकालाही ‘पोस्तं’ काही देणार नाही.
कितीही वेळ लागला तरी रांगेतला नंबर सोडणार नाही. एजंट दलालांच्या कब्जात माझ्या समस्या देणार नाही.
खिशात परमिट नसताना मी दारू कधी पिणार नाही. बारमध्ये बेधडक बसून दोस्तांबरोबर भंकस करणार नाही. खोटं परमिट मी मिळवणार नाही. त्यामुळे साहजिकच दारुही कधी पिणार नाही.
खुशी, चायपाणी, लाच आणि दलाली यामध्ये मी कधीच गल्लत करणार नाही. या चारही गोष्टी मी कधी देणार नाही. मी कधी घेणारही नाही.
मी डोक्यावर सदैव दृश्य किंवा अदृश्य अण्णाटोपी वापरेन. तशीच एक जादा टोपी मी सदैव खिशात बाळगेन. कोणी अपेक्षेनं माझ्याकडे पाहू लागल्यास मी तीच टोपी त्याच्या किंवा तिच्या डोक्यावर चढवेन.
मी एकप्रकारचा अण्णा माझ्या अचानक जाग्या झालेल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून आणि राजीखुशीने आणि नशापाणी न करता वरील प्रतिज्ञापत्र लिहिले असले तरीही माझ्या सद्सद्विवेकबुद्धीची गॅरेंटी मी कधीही घेणार नाही. कारण ती जशी अचानक जागी होते तशीच ती शतकानुशतके झोपीही जाते. इति.

No comments:

Post a Comment