Friday, September 30, 2016

Bangladesh 1971 war history in Marathi

गोवा मुक्ती, चीन (१९६२), पाकिस्तान (१९६५) या युद्धांबरोबरच ४५ वर्षांपूर्वी झालेले १९७१ चे युद्ध हा एक निर्णायक टप्पा ठरला. 'युद्धात निर्णायक विजय न मिळवणारा देश तो भारत' अशी एक नकारात्मक मानसिकता शतकाशतके निर्माण झाली होती, तो डाग पुसून निघाला.

पूर्व पाकिस्तानची स्थिती

फाळणी धार्मिक आधारावर झाली. (निदान पाकिस्तानच्या बाजूने) पण पूर्व व पश्चिम भूभागात विभागलेला अखंड (?) पाकिस्तान नावाचा अजब देश जन्माला आला. दोन भागांमध्ये १६०० किमीचे अंतर होते. भौगोलिक अंतर एक भाग झाला. दोघांमधील एकोपा संपून दुरावा वाढू लागण्यास स्वातंत्र्यानंतर लगेचच सुरवात झाली. दोघांमधील सांस्कृतिक, भाषिक फरक ठसठशीत होता.


पूर्वेचे दुःख

लोकसंख्या पूर्वेला जास्त असूनही पाकिस्तानची राजधानी मात्र कराची येथे पश्चिमेला ठेवली होती. ढाक्याला उपराजधानीचा दर्जा दिला गेला नाही. पुढे १९६२ मध्ये ढाक्याला कायदेमंडळाची राजधानी घोषित केले गेले. पण ते पुरेसे नव्हते. बंगाली लोक शिक्षण, कौशल्ये यात सरस असूनही त्यांना प्रशासन, लष्कर यात स्थान दिले गेले नाही. पाकिस्तानात प्रामुख्याने पंजाबी लोकांचे वर्चस्व राहिले. सर्व पंतप्रधान पश्चिमेचेच असत. बंगाली माणूस जो स्वातंत्र्यलढ्यात सर्वात आघाडीवर होता तो आता दुय्यम स्थानी फेकला गेला.

राष्ट्रभाषेचा प्रश्न

जीनांनी १९४० च्या लाहोर अधिवेशनात आश्वासन दिल्याप्रमाणे उर्दू भाषेला पाकिस्तानची राष्ट्रभाषा घोषित केले. त्यांना स्वतःलाच ती येत नव्हती. बंगाली भाषेला समान दर्जा देण्याची मागणी फेटाळली गेली. हा पश्चिम पाकिस्तानचा भाषिक अहंकार होता. (खरेतर उर्दू दख्खनच्या पठारावर म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झाली व फुलली) बंगालीसारख्या साहित्य, शिक्षण यात प्रगत असलेल्या भाषेला तिचे हक्काचे स्थान नाकारले गेले. दोन राष्ट्रभाषा (उर्दू व बंगाली) घोषित केल्या असत्या तर बंगाली लोकांना पाकिस्तानबद्दल आपलेपणा वाटला असता. ती न्याय मागणी होती. भारतात तर आज २२ भारतीय भाषा आहेत. मग दोन असणे फार कठीण गोष्ट नव्हती. पण बरोबरीचे स्थान राहो पाकिस्तानने बंगाली भाषा व भाषिक यांची गळचेपी करण्याचे धोरण ठेवले.

१९५२ चे वळण

भाषेच्या मुद्द्यावरून असंतोष धुमसू लागला. ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी २१ फेब्रुवारी १९५२ रोजी बंदी असूनही मोर्चा आयोजित केला. त्या मोर्चावर गोळीबार झाला. अनेक जण मृत्युमुखी पडले. भाषेसाठी प्राण देण्याचे हे दुर्मिळ उदाहरण. बंगाली भाषा अरेबिक लिपीत आणायची कल्पना लोकांनी सपशेल नाकारली.

या बलिदानाचा आदर ठेवून युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा 'जागतिक मातृभाषा दिन' घोषित केला आहे. शेवटी १९५६ मध्ये बंगाली अधिकृत भाषा म्हणून पाकिस्तानने मान्य केली. मात्र त्याचवेळी 'पूर्व बंगाल' हे नाव बदलून ते 'पूर्व पाकिस्तान' करण्यात आले.फक्त भाषेचा प्रश्न नव्हता

पश्चिम पाकिस्तानने भाषिक आडमुठेपणा दाखवण्यामागे फक्त भाषेचा प्रश्न नव्हता. काही मूलभूत मुद्दे त्यात पणाला लागले होते. 'व्दिराष्ट्र सिद्धांत' या पायावर फाळणी झाली होती. भाषा हे फक्त संवादाचे माध्यम नसून ते संस्कृतीचे वाहन असते. उर्दू हा फारसी-अरेबिक संस्कृतीला जवळ जाणारा वारसा आहे, तर बंगाली भाषा व लिपीला हिंदू संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे जर पाकिस्तानच्या संस्कृतीत समरसून जायचे असेल तर पूर्व पाकिस्तानच्या नागरिकांनी बंगाली भाषा नाकारली पाहिजे, तो हिंदू वारसा नाकारला पाहिजे, अशी भूमिका पश्चिम पाकिस्तानातील विचारवंतांनी घेतली. थोडक्यात जीनांचा व्दिराष्ट्रवाद येथे पणाला लागला होता.


साहित्यिकांची आघाडी

पूर्व पाकिस्तानात सुरुवातीपासूनच साहित्यिकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. लोकांच्या भावनांना शब्दरूप दिले. १९४७ नंतरच्या काळात पाकिस्तानी दडपशाहीविरुद्ध व शोषणाविरुद्ध बांगला कवी-लेखकांनी आपल्या साहित्यातून आवाज उठविला. या दृष्टीने तरुण कवी शमशुर्रहमान यांची कविता विशेष लक्षणीय आहे. जहाज आरा आरजू, झेबुन्निसा जमाल आणि सूफिया कमाल या कवयित्रींचाही या संदर्भात आवर्जून उल्लेख करायला हवा.

नेत्याचा उदय

अखंड पाकिस्तानातील ५६% एवढी विशाल लोकसंख्या धारण करणाऱ्या पूर्व पाकिस्तानींना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेण्याऐवजी पाकिस्तानी सरकारने हिंदूव्देष, जातीय दंगली, भारतव्देष इत्यादी फाळणीपूर्व विषारी धोरण चालूच ठेवले. अशा वातावरणात पूर्व पाकिस्तानला सर्वमान्य अशा नेत्याची गरज होती. ती गरज शेख मुजीबुर रहमान यांनी पूर्ण केली. त्यांचा आवामी लीग हा पक्ष स्वायत्ततेचा सहा कलमी मागणीनामा घेऊन राजकारणात पुढे आला. रहमान हे चांगले वक्ते होते. त्यांच्यावर समाजवादी विचारांचा पगडा होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाला करिष्मा होता. लोक त्यांना प्रेमाने 'वंगबंधू' असे म्हणत.

राजकीय लढा

१९५५मध्ये पूर्व व पश्चिम अशी पाकिस्तानची पुनर्रचना होऊन पाकिस्तानच्या विधानसभेत दोहोंना समान प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली. खरे तर लोकसंख्येच्या प्रमाणात बघितले, तर ते अन्यायकारक होते. कारण बंगाली बहुसंख्य होते. अशा परिस्थितीत आवामी लीगने या प्रश्नांची थेट राजकीय लढ्यातून तड लावायचा निर्णय घेतला.

निवडणुका

१९७०च्या निवडणुकीत पूर्व पाकिस्तानात आवामी लीगने १६९ पैकी १६७ जागा जिंकून ३१३ जागांच्या मजलीस-ए-शूरामध्ये (पाकिस्तानची लोकसभा) निर्णायक बहुमत प्राप्त केले. शेख मुजीबुर रहमान यांनी सत्तास्थापनेचा दावा केला.

ही एक चाचणीच होती की,

पाकिस्तान बंगाली माणसाला पंतप्रधान पद देऊन बरोबरीची वागणूक देतो की नाही. पण संकुचित वृत्तीच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या झुल्फिकार अली भुट्टो यांनी कोलदांडा घातला. अध्यक्ष याह्या

खान यांच्या मदतीने पूर्व पाकिस्तानात सैन्य पाठवले. सैन्याने हरप्रकारे लोकांवर अत्याचार सुरू केले. त्यात त्यांना फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानात प्रामुख्याने बिहारमधून स्थलांत​रित झालेल्या बिहारी लोकांची साथ मिळाली. हा बिहारी लोकांचा प्रश्न पश्चिम पाकिस्तानातील मुहाजिर यांच्या प्रश्नासारखाच आहे. फाळणीने त्यांना कुठलेच ठेवले नाही. बिहारी लोकांवर बंडखोरांनी हल्ले सुरू केले आहेत, हे कारण देऊन पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर लष्करी कायदा लागू केला.

ऑपरेशन सर्चलाइट Operation Search light

पूर्व पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर अटकसत्र सुरू झाले. बंगाली सैनिक व पोलिस यांना निशस्त्र करण्याचा प्रयत्न केला गेला. संप व मोर्चे यांना दडपत ढाका ताब्यात घेण्यात आले. आवामी लीगवर बंदी घालून मुजीबुर रहमान यांना अटक करण्यात आली. विचारवंतांची हत्या करण्याचे सत्र सुरू झाले. पूर्व पाकिस्तानची हिरवी धरती आता लाल रंगाने रंगवली जाईल, अशी वल्गना करण्यात आली. पाकिस्तानचे जनरल टिक्काखान यांना 'बंगालचा कसाई' म्हटले जाऊ लागले. (त्याआधी त्यांना बलुचिस्तानचे कसाई म्हटले जाई) टिक्का यांनी निर्दयी कत्तली व त्याचवेळी दग्धभू धोरण चालू केले. मला जमीन हवी, लोक नको असे घोषित केले. हा पहाटेपूर्वीचा अंधार होता.


आपण १९७१ या ऐतिहासिक वर्षाचा लेखाजोगा पाहात होतो. धार्मिक आधारावर फाळणी झाली, तरी फाळणीसाठी पाकिस्तानने वापरलेले तत्वज्ञान १९७१ साली पणाला लागले. संपूर्ण उपखंडासाठी हा एक निर्णायक क्षण होता.

व्देषावर उभा राहिलेला देश

एक देश म्हणून पाकिस्तानची निर्मिती नकारात्मक भूमिकेतून झाली. त्याची जडणघडणही अशा नकारातूनच होत गेली. आर्थिक वंचना, कुणा ना कुणाची गुलामगिरी, झापडबंद जगणे हेच पाकिस्तानी सर्वसामान्यांचे जीवन बनले. समाजोपयोगी, वर्धिष्णू अशी सरकारी यंत्रणा बळकट करण्यासाठी आवश्यक अशा विधी, न्यायदान, राष्ट्रीय उत्पादन, कायदा-सुव्यवस्था यांसारख्या संघटना, संस्था, त्यांच्याबद्दलचा विश्वास सरकारला निर्माण करता आला नाही. त्यासाठी आवश्यक अशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात रचनाबद्ध आखणी करता आली नाही. त्यामुळेच पाकिस्तान हा देश आहे, पण तो 'राष्ट्र' या संज्ञेला पात्र ठरणारा दिसत नाही.

हजार वर्षांचे युद्ध

सर्वच राज्यकर्ते, लष्करी अधिकारी आणि बहुतांश समाज यांच्या मनात हिंदू समाज आणि भारत यांच्याबद्दल वैरभाव, द्वेष, तृच्छता आरंभापासूनच होती. जनरल अयूबखान यांनी तर लष्करी अधिकाऱ्यांजवळ बोलूनही दाखवले होते. भुट्टो यांनी भारताशी हजार वर्षे युद्ध करण्याची भाषा केली. काश्मीर प्रश्न धगधगत ठेवणे व अमेरिकेच्या मदतीने अर्थव्यवस्था चालवणे हा कार्यक्रम नेहमीचा झाला होता.

वास्तवाची जाण

पूर्व पाकिस्तानला हळुहळू आपण दुसऱ्यांदा वसाहत झाल्याची जाणीव होत गेली. पहिल्यांदा ब्रिटीशांची व दुसऱ्या वेळी पश्चिम पाकिस्तानची गुलामगिरी नशिबी आली. संकटाच्या प्रसंगी दोन्ही पाकिस्तानमधील मतभेद अगदी स्पष्ट दिसून आले. १९६५च्या युद्धाच्या वेळी भारत पूर्व पाकिस्तानवर आक्रमण करण्याची शक्यता होती. आमच्या सुरक्षेचे काय, असे जेव्हा पूर्वने पश्चिम पाकिस्तानला विचारले, तेव्हा त्यांचे उत्तर मासलेवाईक होते. तुमच्या सुरक्षेची काळजी चीन घेईल.

लढ्याला आरंभ

हत्याकांडाची प्रतिक्रिया म्हणून अवामी लीगने दोन तऱ्हेने प्रतिकार सुरू केला. एक म्हणजे, तरुणांचे सैन्य उभारून पूर्व पाकिस्तानात आलेल्या सैन्याविरुद्ध सशस्त्र लढा दिला. हे सैन्य 'मुक्तिवाहिनी' म्हणून ओळखले गेले. दुसरे म्हणजे, अवामी लीगने भारतात आपले स्वतंत्र सरकार (विजनवासातील सरकार) स्थापन केले. त्या सरकारने स्वातंत्र्याची घोषणा केली. सुमारे एक कोटी लोकांनी भारताचा आश्रय घेतला. भारताची सीमा अस्थिर झाली. निर्वासितांच्या छावण्यांतून अन्न, कपडे व सुरक्षा पुरवताना आधीच अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेवर ताण पडू लागला. यापेक्षा युद्धाचा खर्च कमी पडेल, या निष्कर्षावर भारत आला.

भारताची प्रतिक्रिया

भारताने आंतरराष्ट्रीय समूहाकडे हस्तक्षेप करायची वारंवार विनंती केली. स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विविध देशांचे दौरे करून भारताच्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या. पण काहीच उपयोग झाला नाही. उलट भारताने मध्ये पडू नये, असा शहाजोग सल्ला अमेरिकेने दिला. भारत जर पूर्व पाकिस्तानात हस्तक्षेप करू लागला, तर आम्ही मध्ये पडू अशी धमकी चीनने दिली. या सर्व दबावाला भीक न घालता भारताने स्वातंत्र्याच्या घोषणेला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. आता संघर्ष अटळ होता.


आपण १९७१ या ऐतिहासिक वर्षाची जडणघडण बघत होतो. युद्ध आता अटळ झाले होते; पण मागील तीन युद्धांतील चुका टाळून युद्ध जिंकण्याचे व एकाच वेळी अनेक आघाड्या सांभाळण्याचे आव्हान भारतापुढे होते...

बांगलादेशमुक्तीचे १३ दिवस

इंदिराजींनी पूर्व पाकिस्तानावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्याची अंमलबजावणी करण्याचे कुणी टाळणार नाही असेच सर्वांना वाटत होते; पण लष्करप्रमुख सॅम माणकेशा यांनी लष्कराची वास्तव स्थिती इंदिराजींसमोर मांडली. भारताकडे त्या वेळी एकच आर्मड् डिव्हिजन सैन्य होते. याशिवाय केवळ १८ रणगाडे होते. इतक्या सैन्यासह पूर्व व पश्चिम दोन्ही आघाड्यांवर लढणे शक्य होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले. चीनच्या आक्रमणाच्या वेळी भारतीय सैन्याला पराभव पत्करावा लागला होता. तशी स्थिती याहीवेळी येऊ शकते जी भारताला परवडणारी नाही, असेही माणेकशा यांना वाटत होते. त्यामुळे पूर्व पाकिस्तानवर आक्रमण केव्हा करायचे ही बाब लष्करावर सोपवा, असे त्यांनी इंदिरा गांधींना सांगितले. असा निर्णय जनरल माणेकशा यांच्यासारखा कर्मठ सेनापतीच घेऊ शकत होता.

गृहपाठ

इंदिराजींचा आपल्या जनरलच्या बुद्धिमत्तेवर विश्वास होता, त्यांची स्वतःची दूरदृष्टी आणि सेनापतींवर असलेल्या विश्वासातून पाकिस्तानशी झालेल्या या लढाईने नवा इतिहास लिहिला गेला.

एप्रिल ते नोव्हेंबर १९७१ या काळात भारतीय लष्कराने अत्यंत गोपनीय हालचाली करून, लष्करात असलेल्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला. लष्करासाठी आवश्यक असलेले रणगाडे रशियाकडून मागविण्यात आले. सैन्याचे नूतनीकरण करण्यात आले. पूर्वेकडील भागात रस्ते बांधणीचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले, नवीन सैन्यभरती वेगाने सुरू झाली. सेनाधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या. पूर्वेकडील नद्यांवर पूल बांधण्यात आले. सहा महिन्यांच्या काळात सर्व दलांचा समन्वय साधून लष्करी उत्पादन करणारे कारखाने २४ तास सुरू ठेवण्यात आले.

पडघम

भारताने सीमेवर मोर्चेबांधणी सुरू केली. पावसाळा संपताच आक्रमण करण्याचे ठरले. कारण जमीन कोरडी झाल्यावरच हालचाली करणे सोपे जाणार होते. शिवाय तोपर्यंत हिमालयातील खिंडी बर्फाने बंद होणार होत्या. त्यामुळे चीनला हस्तक्षेप करणे जड गेले असते. याह्याखान यांनी नोव्हेंबरमध्ये संपूर्ण पाकिस्तानात आणीबाणीची घोषणा केली व पाकिस्तानी जनतेला युद्धासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.

युद्धज्वर

पश्चिम पाकिस्तानात आता युद्धाचा ज्वर चालू लागला. 'मुजिबूर रहमान या देशद्रोह्याला फाशी दया', अशा घोषणांना ऊत आला. लाहोरवर राजकारणी लोकांनी हजारोंचे मोर्चे काढले व 'भारताला चिरडा' या मागणीचा सामूहिक उद्घोष केला. पूर्व पाकिस्तानात अत्याचार वाढत चालले होते. तेथे मुस्लिम व हिंदू बंगाल्यांनी सारख्याच निश्चयाने उठाव केला असला तरी विशेष रोष हिंदू बंगल्यांना सहन करावा लागला.

भूगोल

पूर्व पाकिस्तानचे (आजचा बांगलादेश) क्षेत्रफळ १,४३,९९८ चौरस कि.मी. असून जमिनीवरील सुमारे ४,५०० कि.मी.ची सरहद्द तीन बाजूने भारताशी भिडली आहे. केवळ आग्नेयेकडील २८० कि.मी.ची सरहद्द म्यानमारशी निगडीत आहे. घड्याळाच्या काट्यांप्रमाणे बघितले तर पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्ये त्याला जोडली गेली आहेत.

आजचा बांगलादेश म्हणजे नद्यांच्या संचयन कार्यामुळे तयार झालेले विस्तीर्ण मैदान असून, देशाचा बराचसा भाग समुद्रसपाटीपासून १५ मीटरपेक्षा कमी उंचीचा आहे. देशभर नद्यांचे जाळे पसरलेले असून गंगा, जमुना (ब्रह्मपुत्रा), मेघना, पद्मा, तिस्ता, कर्णफुली, ढालेश्वरी, बुढीगंगा या प्रमुख नद्या आहेत. असा हा बुद्धिबळाचा पट तयार होता. त्यावर कास लागणार होता निश्चयाचा व निर्णयक्षमतेचा.

अमेरिकेला रशियाचा काटशह

हा काळ शीतयुद्धाचा होता. जगात कुठेही खुट्ट जरी झाले तरी त्यात महासत्तांचा हस्तक्षेप ठरलेला होता. तेव्हा त्यांना आपल्या बाजूने वापरून घ्यायचे की विरुद्ध जाऊ द्यायचे, हाच वास्तविक पर्याय भारतापुढे होता. भारताने अर्थात पहिला पर्याय निवडला. या कसोटीच्या क्षणी भारताचा मित्र (यारों का यार) यू. एस. एस. आर. भारताच्या मागे खडकासारखा उभा राहिला. अमेरिकेचा पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा असताना सोव्हिएतचा भारताला पाठिंबा शहाला काटशह ठरला. ऑगस्ट १९७१ मध्ये भारत-सोव्हिएत मैत्री व सहकार्याचा करार करण्यात आला. यापुढे सोव्हिएतवरील हल्ला भारतावरील व भारतावरील हल्ला हा सोव्हिएतवरील हल्ला असेल असे ठरले. या मैत्रीच्या आणाभाका एक अचूक डाव ठरला (मास्टर गेम). या करारामुळे भर युद्धाच्या काळात चीन व अमेरिकेला हात चोळत बसावे लागले.

आता शांततेचे प्रयत्न संपले
भारताने शांततेसाठी जे काही करायचे ते सर्व करून झाले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विविध देशांचा दौरा केलाच पण त्यांच्या विनंतीवरून जयप्रकाश नारायण यांनीही विविध देशांना भेटी देत भारताची बाजू मांडली. गांधी यांनी वेळोवेळी अस्थिर झालेल्या पूर्व सीमेला भेट देत पाहणी केली व जे बाधित लोकसंख्येला दिलासा दिला. आता हतबलपणे वास्तव बघत राहायचे की हस्तक्षेप करून ते बदलायचे हा निर्णय घ्यायचा ऐतिहासिक क्षण आला होता. पाकिस्ताने स्वतःच आक्रमण करत काम सोपे केले.

ऑपरेशन चेंगीज खान Operation Chengiz Khan

पाकिस्तानने ३ डिसेंबर १९७१ला भारताच्या हवाईतळांवर बचावात्मक हल्ले (preemptive strikes) केले. अशाप्रकारे युद्धाला तोंड फुटले. भारताने कधी स्वतः हून कोणावर आक्रमण केले नाही हे मिथकही टिकून राहिले. जसे इस्रायलने सहा दिवसांच्या युद्धात 'ऑपरेशन फोकस' चालवून नुसत्या हवाई दलाच्या माऱ्याने अरबांना नेस्तनाबूत केले तसा हा प्रयत्न होता. प्रत्यक्षात फक्त ५० विमाने पाकिस्तानने वापरली. एक लक्ष्य आग्रा हेही होते. ते सापडू नये म्हणून रात्री चंद्रप्रकाशात संगमरवराचा झगमगणारा ताज महाल भारताने झाडाझुडपांनी झाकून घेतला. हवाई हल्ले झाले त्याच रात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी
रेडियोवर राष्ट्राला संबोधून बोलताना हे हवाई हल्ले म्हणजे भारताविरुद्ध युद्धच आहे याची कल्पना दिली. त्याच रात्री भारतीय हवाई दलाने प्रतिहल्ले करून प्रतिसाद दिला. अशा प्रकारे युद्धाला तोंड फुटले.

युद्धाची उद्दिष्ट्ये
पूर्व आघाडीवर ढाका ताब्यात घेणे व पश्चिम आघाडीवर पाकिस्तानला भारताच्या भूमीवर पाऊल टाकण्यापासून रोखणे हे मुख्य उद्दिष्ट. पश्चिम पाकिस्तानवर मोठा लष्करी हल्ला करायचा हेतू भारताने ठेवला नाही. सर्व लक्ष पूर्व आघाडीवर केंद्रित केले. युद्ध रेंगाळत न ठेवता लवकरात लवकर संपवणे हेही अगत्याचे होते.

युनोतील आघाडी
भारत पाकिस्तानात १९७१ मध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यावर चीन, पाकिस्तान व अमेरिका यांनी डिसेंबरच्या पूर्वार्धात संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव आणून युद्धबंदी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु रशियाच्या नकाराधिकारामुळे हा प्रस्ताव फेटाळला गेला व भारताला पूर्व पाकिस्तानातील लष्करी कारवाई पूर्ण करता आली. भारताशी शत्रूत्व म्हणजे सोव्हिएतशी वैर हे आता सर्वांच्या पुरेसे लक्षात आले. अमेरिकेने चिडून भारताची सर्व आर्थिक मदत थांबवण्याची धमकी दिली.


पाकिस्तानने हवाई हल्ले सुरू केल्यावर युद्धाला कशाप्रकारे तोंड फुटले ते आपण मागील लेखात बघितले. समुद्र, आकाश, जमीन व इतिहास असा हा रणांगणाचा पट होता. भारताची लोकशाही जी एरवी अघळपघळ वाटे ती या कसोटीच्या प्रसंगी वज्रमूठ बनली.

ऑपरेशन ट्रायडन्ट Operation Trident


नौदल पाठवून आम्ही पूर्व पाकिस्तानला वाचवू असा पवित्रा पाकिस्तानने घेतला होता. त्यामुळे पाकिस्तानी नौदलाचा नक्षा उतरवणे आवश्यक होते. त्यासाठी भारतीय नौदलाने ४ व ५ डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर हल्ला चढवत त्रिशूळ उपसले. (ऑपरेशन ट्रायडन्ट) या जबरदस्त हल्ल्यात पाकिस्तानी युद्धनौका खैबर व मुहाफिझ बुडवल्या. तर, शहाजहाँन क्षतिग्रस्त झाली. लगेचच ८ व ९ डिसेंबरला 'ऑपरेशन पायथॉन' (पायथॉन म्हणजे शत्रूला वेढा घालून गुदमरून मारणारे अजगर) हाती घेण्यात आले. त्यात कराची बंदरावरील तेलाचे राखीव साठे उद्ध्वस्त करण्यात आले.

समुद्रावरील वर्चस्वाकडे

हे दोन्ही हल्ले पाकिस्तानी नौदलासाठी दुःस्वप्न ठरले. यात त्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली व पाकिस्तानी नौदलाने संघर्षात भाग घ्यायची शक्यता संपुष्टात आली. भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाला बंगालच्या उपसागरात घेरले. विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवरील विमानांनी चितगॉन्ग व कॉक्स बाझार या शहरांवर बॉम्बफेक केली. प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने आपली 'गझनी' पाणबुडी समुद्रात उतरवली. परंतु विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ ती बुडाली. भारतीय समुद्रात पाणबुडी बुडाल्याचे ते पहिले उदाहरण ठरले.

पोलादी विजय

१९७१ च्या युद्धातील नौदलाची कामगिरी देदीप्यमान ठरली. पाकिस्तानचे जवळपास अर्धे नौदल नष्ट झाले. आजही ४ डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. विक्रांतचे योगदान अतुलनीय ठरले. एकटया विक्रांतवरील नौसैनिकांनी २ महावीर चक्र व १२ वीर चक्र प्राप्त केली. पुढे विक्रांत निवृत्त झाल्यावर तिच्या लोखंडापासून बनलेली बजाज कंपनीने नुकतीच V२ नावाची बाईक आणली आहे. दणकटपणामुळे तीही लोकप्रिय ठरली आहे.

हवाई युद्ध

भारताने ४००० उड्डाणे करीत युद्धाच्या पहिल्या ४८ तासांतच आकाशावर वर्चस्व प्रस्थापित केले. तीन भारतीय बॉम्बरनी जोधपूरवरून उड्डाण करीत बलुचिस्तानातील सुई गॅस प्रकल्पावर बॉम्बफेक केली. ती इतकी अचूक ठरली की तो प्रकल्प पुन्हा अर्ध्याने चालू करायला पाकिस्तानला सहा महिने लागले. ही चित्तवेधक कामगिरी बजावणारे फ्लाइंग ऑफिसर शेखौ यांनी परतल्यावर त्याच रात्री एकट्याने श्रीनगर येथे शत्रूच्या सहा विमानांना अंगावर घेतले. त्यातील दोन पाडली. या प्रयत्नात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांचा मरणोत्तर परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.

आकाशावर ताबा

पाकिस्तानी हवाई दल दिवसेंदिवस निस्तेज होत गेले. त्यांच्याकडे बिगर बंगाली तंत्रज्ञ नव्हते व त्यामुळे उड्डाणाला मर्यादा पडल्या. जॉर्डन, सौदी अरेबिया व लिबिया यांच्याकडून लढाऊ विमाने आणून पाकिस्तानने नुकसान भरून काढायचा प्रयत्न केला. परंतु भारतीय हवाई दलाने पकड ढिली होऊ दिली नाही.

पूर्वेला भारतीय हवाईदलाने खुद्द जनरल नियाझी यांच्या सरकारी बंगल्यावर बाँम्बफेक केली.

पश्चिमेकडील पाकिस्तानी हवाईदल थेट पूर्वेला जाऊ शकत नव्हते. त्यांना श्रीलंकेहून जावे लागे. श्रीलंकेने आपले तळ वापरण्यासाठी व तेल भरण्यासाठी पाकिस्तानला खुले करून दिले. मात्र अत्याधुनिक विमाने दिमतीला असूनही पाकिस्तानला त्याचा फारसा फायदा उठवता आला नाही.

भूमीवरील युद्ध

पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवर हल्ला करायचा प्रयत्न करून बघितला, परंतु भारतीय सैन्य आपल्या जागेवर पाय रोवून राहिले व प्रतिहल्ले चढवू लागले. राजस्थानातील थार जिल्ह्यात लोंगेवाला येथे झालेली लढाई संस्मरणीय ठरली. भूदल व हवाई दलाने समन्वय साधत पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा उडवला. लोंगेवाला या ठिकाणाला रणगाड्यांची दफनभूमी म्हटले गेले. त्यावर बॉर्डर हा लोकप्रिय सिनेमाही आला.अमेरीका-चीनची युती
एरव्ही एकमेकांना पाण्यात पाहणारे हे देश मित्राला मदत करण्याच्या निमित्ताने एकत्र आले. भारताने युद्ध थांबवून तातडीने माघार घ्यावी, म्हणून अमेरिकेने आटोकाट प्रयत्न केले. पण यावेळी भारताच्या मुत्सद्देगिरीने कोणतीच फट ठेवली नव्हती. सोव्हिएतने नकाराधिकार वापरत युद्धबंदीचा युनोतील ठराव हाणून पाडला. मग स्वतः मैदानात उतरत अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका एंटरप्राइस बंगालच्या उपसागरात पाठवली. अमेरिकेने चीनलाही सीमेवर युद्ध सुरू करण्यासाठी उद्युक्त केले. पण १९६२च्या वेळी भारत बेसावध होता, तसे आता नव्हते. त्यामुळे चीन यशाबद्दल साशंक होता.

अमेरिकेची कोंडी
अमेरिकेने भारताला शह देण्यासाठी आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात आणले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने आपले नौदल हिंदी महासागरात आणले होते. परंतु अमेरिकेचे नौदल भारताच्या सागरी हद्दीत प्रवेश करेपर्यंत युद्ध संपले होते. शिवाय त्यांच्या मागे रशियाने आपले नौदल आणून उभे केले होते. त्यामुळे अमेरिकेचे नौदल कात्रीत सापडायची पुरेपूर शक्यता होती. त्यापलीकडे शेवटी ज्याची त्याची युद्धे त्यालाच लढायला लागतात. अमेरिका हे विकतचे दुखणे अंगावर घ्यायची शक्यता कमीच होती.

१९७१ : उजळली पूर्व दिशा


असा घडला इतिहास
भारतीय लष्कराचे डावपेच नियाझींना समजले नाहीत. वेगवेगळ्या आघाड्यांवरून मुक्तिवाहिनीचे लेाक बांगलादेशच्या हद्दीत शिरू लागले, तेव्हा ते स्वतःच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी आले असावेत, या समजुतीने जन.नियाझी यांनी सर्व आघाड्यांवर पाकिस्तानी लष्कर तैनात केले. पाकिस्तानाचे लष्कर निरनिराळ्या आघाड्यांवर विखुरल्यामुळे भारताचे जनरल जेकब यांनी ३००० सैन्यांसह सरळ ढाक्यावर हल्ला चढविला.

रणकौशल्याची शिकस्त
मग मात्र भारताने १९ डिव्हिजन सैन्य लढाईत उतरविले. एवढ्या संख्येने भारतीय लष्कर प्रथमच युद्धात उतरविण्यात आले होते. या वेळी पाकिस्तानचे ४२ हजार सैनिक पूर्व पाकिस्तानात होते; पण त्यांचे वायुदल दुबळे होते. कारण पश्चिम आघाडीवर ते सगळे तैनात केले होते! उलट भारतीय सैन्याला वायुदलाचे छत्र लाभल्यामुळे सैन्याला ढाक्क्याचा वेढा घट्ट करणे सोपे गेले. सैन्याने मेघना, पद्मा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांवर पूल बांधल्यामुळे सैन्याच्या हालचाली सुलभ झाल्या. या युद्धात हवाई दलाने आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले. त्यामुळे एक पॅरा ब्रिगेड पॅराशूटच्या साहाय्याने बांगलादेशच्या भूमीवर उतरविणे शक्य झाले.

मुक्तिवाहिनीचे योगदान
मुक्तिवाहिनीला बांगलादेशचा भूगोल ज्ञात होता. त्यांनी भारतीय हद्दीतून बांगलादेशमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक मोर्चांवर आघाड्या उघडल्या. लष्कराच्या योजनेत मुक्तिवाहिनीचे स्वतंत्र स्थान होते. हेरखात्याने अचूक माहिती पुरवत काम सोपे केले. 'रॉ'ने विशेष सीमा दल कामाला लावले होते. त्यांना मुक्तिवाहिनीकडून अचूक माहिती व स्थानिक स्तरावरील पाठिंबा मिळत गेला. भारतीय सैन्याने मुक्तिवाहिनीशी हातमिळवणी करत 'मित्रो बाहानी' उभी केली.

तडिताघात
यावेळी १९६५ सारख्या तुटक व मंद हालचाली न करता वेगाने मुसंडी मारत ढाका ताब्यात घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. सेना, नौदल व भूदल यांनी एकाच वेळी हल्ले चढवले. आक्रमण 'तडिताघात' (blitzkrieg) पद्धतीने केले गेले. त्यात शत्रूच्या दुर्बल जागांचा फायदा घेत, विरोधाला वळसा घालत आपल्या लक्ष्याला (ढाका) हात घातला. आता सीमेवरील पाकिस्तानी सैन्याला ढाक्याकडे उलटी धाव घ्यायची वेळ आली. अशा वेळी भारतीय सैन्य संरक्षण भूमिकेत शिरले. अशा प्रकारे भारताने आक्रमण करून (offensive) मग संरक्षणाचा (defensive) फासा टाकला. पाकिस्तानी सैन्याला आपले फासे नीट उलटवता आले नाहीत. पाकिस्तानी सैन्य सगळीकडून वेढले गेले. भयानक हानी सामोरी दिसून येताच पंधरवड्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने नांगी टाकली.

पाकिस्तानची सपशेल शरणागती


आतापर्यंतच्या काही लेखांत आपण १९७१ च्या युद्धातील भारताची रणनीती बघत होतो. हे युद्ध म्हणजे लक्ष्य निश्चित करून पूर्ण जोर लावून लढलेले भारताचे पहिलेच युद्ध होते. हे युद्ध अत्यंत कमी वेळात जिंकलेल्या युद्धांपैकी एक ठरले.

लष्करातील वैविध्य
भारतातील विविधतेतील एकता युद्धनेतृत्वात पुरेपूर दिसून आली. लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ पारशी होते. तर, पश्चिम आघाडी सांभाळणारे लेफ्टनंट जनरल कॅन्डेथ हे अँग्लो-इंडियन होते. पूर्व आघाडीच्या कलकत्ता मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अरोरा हे शीख होते. तर, प्रत्यक्ष रणभूमी सांभाळणारे चीफ ऑफ स्टाफ जेकब हे ज्यू होते.

लक्ष्यावर नजर
हे पहिलेच असे युद्ध होते की जेव्हा भारताच्या राजकीय नेतृत्वाने सैन्याचा पुरेपूर वापर केला. यावेळी सैन्याला युद्धसंचलनाचे अधिकार पूर्णपणे देण्यात आले. १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धावेळी हवाई दलाला युद्धात उतरू दिले नव्हते. १९६५च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धावेळी नौदलाला बाहेर पडायची परवानगी नाकारली होती. १९७१ मध्ये मात्र पहिल्यांदाच भारताने भूदल-नौदल-हवाईदल असा त्रिशूळ पूर्ण जोमाने उगारला.

वेळेशी लढाई
सॅम माणेकशॉ यांनी पश्चिम पाकिस्तानात खोलवर आगेकूच करण्यापासून लष्कराला रोखले. चीनवर नजर ठेवणे आवश्यक होते. तेव्हा खरी चढाई पूर्वेच्या आघाडीवरच होती. पूर्व आघाडीवर भारताकडे २:१ असे वरचढ सैन्यबळ होते. आक्रमण करणाऱ्या सैन्याकडे ते ३:१ असावे लागते. ते भारताकडे नव्हते. पूर्वेला पाकिस्तानचे धोरण वेळकाढूपणाचे होते. पाकिस्तानला खात्रीच होती की अमेरिका मध्यस्थी केल्याशिवाय राहणार नाही. संयुक्त राष्ट्राचा (युनो) दबाव भारतावर वाढत होता. त्याचवेळी सोव्हिएतने यानंतर पुन्हा व्हेटो वापरणार नाही, असे सांगून टाकले होते. अशावेळी खरी लढाई वेळेशी होती.

धाडसी बेत
पूर्व आघाडीने अशा परिस्थितीत थेट ढाक्यावर हल्ला चढवायचा निर्णय घेतला. हा बेत फारच धाडसी वाटत असल्याने लष्करी मुख्यालय या चढाईला राजी होत नव्हते. परंतु अरोरा व जेकब यांना आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. तेव्हा चीनच्या सीमेवरील राखीव भारतीय फौज पूर्व आघाडीवर नेमण्यात आली. हे इतक्या घाईने केले की ही फौज विमानांनी थेट पूर्व पाकिस्तानात उतरवली. पाकिस्तानी सैन्याने शहरे कडेकोट संरक्षणात ठेवली होती. परंतु भारतीय सैन्याने ती शहरे जिंकायच्या फंदात न पडता त्यांना वळसा घेत थेट ढाक्याकडे धाव घेतली. पाकिस्तानी सैन्य चकित होऊन पाहतच राहिले. त्यांना भारतीय सैन्याचा बेत लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता.

निर्विवाद विजय
फक्त ३ हजार भारतीय सैन्याने ढाका वेढले. पाकिस्तानला आता सीमा सांभाळायची की ढाका हेच कळेना. शत्रूला हालचाल करायला जागाच उरली नाही. शरणागतीला पर्याय नव्हता. ढाक्याच्या रामना रेसकोर्सवर भारताचे पूर्व आघाडीचे सेनापती लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्यासमोर पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानचे सेनापती लेफ्टनंट जनरल ए. के. नियाझी यांनी शरण येत शरणागतीच्या करारनाम्यावर (instrument of surrender) स्वाक्षरी केली.

युद्धसमाप्ती
फक्त १३ दिवस चाललेले हे युद्ध पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी शरणागतीचा करारनामा केल्यावर संपुष्टात आले. शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत युद्ध लढण्याच्या बाता हवेत विरल्या. अशाप्रकारे १६ डिसेंबर १९७१ला बांगलादेश मुक्त झाला. बांगलादेशच्या निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण होताच भारताने पूर्व आणि पश्चिम सीमेवर एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. (१७ डिसेंबर १९७१)

bangladesh war1971
bangladesh war1971


१९७१ : सरले रण

१९७१ : सरले रण

मागील काही लेखांत आपण १९७१च्या रोमांचक युद्धाच्या कहाणीचा मागोवा घेतला. विजय मिळवल्यावर भारताने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. त्यानंतर युद्धात काय कमावले व काय गमावले याचा लेखाजोगा घेण्यास सुरुवात झाली.


स्वातंत्र्याची किंमत

या संघर्षात तीन लाखांहून अधिक लोक मारले गेले. अर्थात सर्वात मोठी आहुती ही बांगलादेशातील स्वातंत्र्यप्रिय हिंदू व मुस्लिम नागरिकांना द्यावी लागली. पाकिस्तानने नृशंस हत्याकांड,

बलात्कार यांचा कहर केला. पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांवर मानवाधिकार भंग केल्याबद्दल खटला चालवला जावा, अशी मागणी बांगलादेशाने केली. बांगलादेशातील ज्यांनी पाकिस्तानला मदत केली त्यांच्यावर सध्या खटले चालू आहेत.

त्यांना शिक्षा व्हावी याबद्दल बांगलादेशातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्यासाठी काही काळापूर्वी तरुणांनी केलेले ढाक्याच्या शाहबाज चौकातील आंदोलन गाजले.


मानवमुक्तीचा लढा

युद्धामुळे पाकिस्तानचे एक तृतीयांश सैन्य बंदी बनले. नौदल अर्ध्याने नष्ट झाले व एक चतुर्थांश हवाई दल नष्ट पावले. त्यामुळे उपखंडात भारताचे लष्करी प्रभूत्व निर्माण झाले. संसदेत बोलताना इंदिरा गांधींनी बांगलादेशच्या मुक्तीचे वर्णन 'मानव मुक्तीच्या लढ्यातील एक मैलाचा दगड' असे केले. बांगलादेश हा नवीन देश जन्माला आला. वंगबंधूंची पाकिस्तानच्या कैदेतून सुटका झाली. बांगलादेशात जाण्याआधी दिल्लीत येऊन त्यांनी भारतीय जनतेचे आभार मानले. पुढे २०११ मध्ये बांगलादेशने इंदिरा गांधींना 'बांगलादेश स्वाधीनता सन्मान' मरणोत्तर घोषित केला.


पाकिस्तानवरील परिणाम

या युद्धाने पाकिस्तानचे नुकसान तर झालेच परंतु व्दिराष्ट्र सिद्धांत खोटा सिद्ध झाल्याने खुद्द पाकिस्तानच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. पश्चिम पाकिस्तानातील मीडियाने जनतेला कल्पित विजयाच्या बातम्यांनी भ्रमात ठेवले होते. त्यामुळे जेव्हा शरणागतीची बातमी आली तेव्हा लोकांना धक्का बसला. त्यांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली. शेवटी जनरल याह्या खान यांनी सत्तात्याग केला व झुल्फिकार अली भुत्तो यांनी सत्ता ताब्यात घेतली. भुत्तोनी गुप्तपणे पाकिस्तानच्या अणवस्त्रनिर्मिती कार्यक्रमाला चालना दिली. (आम्ही गवत खाऊ, परंतु बाँम्ब बनवू अशी दर्पोक्ती त्यांनी केली.)


छुप्या युद्धाकडे

यानंतर थेट लष्करी विजयाची आशा मावळल्याने जिहादींना पाठिंबा देणे व भारतीय सैन्याला काश्मिरमध्ये गुंतवून ठेवणे हे धोरण पाकिस्तानने चालू केले. यात खोटे भारतीय चलन छापणे, भारतविरोधी प्रचार करणे असा रडीचा डावही सुरू झाला. याला छुपे युद्ध (proxy war) असे म्हटले जाते. पाकिस्तानचे अस्तित्व आता यापुढे पणाला लागले.


युद्धकैदी

भारताने सुमारे ९०,००० युद्धकैदी ताब्यात घेतले. (त्यातील काही बंगालीदेखील होते जे युद्धकाळात पाकिस्तानशी एकनिष्ठ राहिले) त्यातील सुमारे १५,००० नागरिक होते. (ते एकतर लष्करी अधिकाऱ्यांचे नातेवाईक होते अथवार रझाकार) सुमारे दोन वर्षे ते भारताच्या ताब्यात होते. त्यांना ग्वाल्हेर येथे ठेवले होते. जीनिव्हा योजनेनुसार युद्धकैद्यांना जशी वागणूक द्यावी लागते तशी भारताने त्यांना दिली. त्यांच्याकडून काम करवून घेता येत नाही. यापुढील कठीण टप्पा हा पाकिस्तानशी बोलणी करणे हा होता. ताश्कंद कराराच्या वेळेचा अनुभव काही फार उत्साहवर्धक नव्हता. बड्या सत्तांची मध्यस्थी न स्वीकारता भारताला बोलणी यशस्वी करून दाखवायचे आव्हान पेलायचे होते. सिमला येथील थंड हवेत हा प्रयत्न भारताने केला. तो कितपत जमला, ते आपण पुढील वेळी बघू.


civil war bangladesh 1971

bangladesh war1971

1971 indo-pak war and birth of bangladesh

bangladesh war 1972

bangladesh 1971 war video

bangladesh 1971 war crimes

indo pakistani war of 1971

1971 bangladesh war photos

1971 indo-pak war and birth of bangladesh

bangladesh 1971 war history

bangladesh liberation war in 1971

71 war bangladesh

1972 bangladesh war

1971 indo pak war in hindi

1971 indo pak war ppt

1971 indo pak war longewala

indo pak war 1971 western front

No comments:

Post a Comment