Thursday, January 8, 2015

योगा तणावमुक्तीसाठी रामबाण उपायसध्याचे युग धावपळीचे आहे. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांनी अनेकांना घेरले आहे. ताण-तणावावर मात करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारे योगा हे उत्तम शास्त्र आहे. व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, आहाराच्या चुकीच्या वेळा यामुळे त्यांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने यावर रामबाण उपाय म्हणून बहुतांश लोग योगाकडे आकर्षित झाले आहेत. जगभरात योगाला मिळालेले महत्त्व पाहता 'युनो'ने २१ जून हा दिवस 'योगा दिन' म्हणून पाळला जातो. कोल्हापुरात विविध भागांत योगा क्लब सुरू झाले आहेत. पतंजली, डॉ. धनंजय गुंडे व योग विद्या धाम तसेच प्रशिक्षित डॉक्टरांकडून योगवर्ग चालविले जातात. निरोगी जीवनासाठी योगा, यावर 'टीम मटा'ने टाकलेला फोकस...!

योग शिबिरांतून निरोगी आयुष्याचा मंत्र

शहराच्या विविध भागांत रोज सकाळी ते एकत्र येतात. योगासन, प्राणायामच्या माध्यमातून निरोगी आयुष्याचा मंत्र अंगिकारतात. योगाचे विविध प्रकाराचे प्रात्यक्षिक करताना स्वतःच निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील असतानाच इतरांनाही प्रवृत्त करतात. योग शिबिराच्या माध्यमातून निरोगी जीवनाची कास धरण्यासाठी नागरिकांची पावले पडत आहेत. शहरात आज शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, महावीर गार्डन, कसबा बावडा परिसर, रंकाळा परिसर, तपोवन, शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ, आपटेनगर, सानेगुरुजी वसाहत, ​शिवाजी विद्यापीठ परिसर, रामानंदनगर, जरगनगर अशा विविध ठिकाणी योग शिबिरे भरविली जातात. शाळा, बहुउद्देशीय हॉलसोबतच काही ठिकाणी उद्यानात योग शिबिर होतात. योग शिक्षक आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले योगाचे वर्ग शहराच्या विविध ठिकाणी नजरेस पडतात. दहा दिवस, एक महिना, तीन महिने असा शिबिराचा कालावधी असतो. काही ठिकाणी नियमितपणे शिबिरे घेतली जातात. कोल्हापुरात पतंजली योग समिती व खासगी पातळीवर योग शिबिरांचे आयोजन केले जाते.

योगाला आले ग्लॅमर

योगामुळे माझी फिगर झीरो साइज झाली असे सांगणाऱ्या अभिनेत्री, विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटीजमुळे आता योगाला एक वेगळेच ग्लॅमर आले आहे. त्यातही रामदेव बाबा यांच्या योगा शिबिरातील एका तासासाठी व्हीआयपी पासची किंमत २१०० रुपये असल्याच्या बातम्यांनी योगा आणि उच्चभ्रू समाज यामध्ये महत्त्व आणले आहे. स्लीमट्रीम हा तर आज तरुणींमध्ये फंडा आहेच. त्यामुळे काही वर्षांपूर्वी पन्नाशी उलटलेल्या सीनिअर सिटीजन्सनी योगासने करावीत हा विचार आता केव्हाच मागे पडला आहे. टीनएजर्सच्या वर्तुळात योगा एक ग्लॅमरस टच आला आहे. केवळ वजन कमी करण्यासाठीच किंवा शरीराच्या एखाद्या अवयवाचा घेर कमी करण्यासाठीच योगा करायचा या चौकटीतून योगा ही संकल्पना बाहेर पडली असून, आरोग्य निरोगी राखण्यासाठीही योगाकडे आजची तरुण पिढी वळत आहे. योगा शिबिरे, योगा शिकवणाऱ्या संस्थांमध्येही आधुनिक तंत्रज्ञान आणि मशिन्स आणली आहेत. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणे योगा केंद्रांचे रूप खुलले आहे. मुलींना स्लीम होण्यासाठी तर मुलांना फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी योगातील ग्लॅमर खुणावत आहे. गेल्या काही वर्षांत योगाला ग्लॅमर मिळवून देणाऱ्या व्हीएलसीसी, तळवलकर फिटनेस, गोल्ड जिम, पार्थ जिम, आंबर्डेकर फिटनेस या फिटनेस सेंटर्सनी योगाच्या माध्यमातून सेलिब्रिटी टॉकसारख्या उपक्रमांचे आयोजन केल्यामुळे ग्लॅमर अधिक खुणावत आहे.

वयाच्या दहाव्या वर्षापासून मुला-मुलींनी योगासने केल्यास त्याचे चांगले फायदे मिळू शकतात. योगासनासाठी सकाळची वेळ फार चांगली असते. पण संध्याकाळीही ती करण्यास हरकत नाही. योगासनांसाठी जागा शांत, स्वच्छ, हवेशीर व मनास प्रसन्न वाटेल अशी असावी. योगासने करताना काहीही न खात किंवा एखादे पेय घेतल्यानंतर किमान अर्ध्या तासाने करावीत.

जेवणानंतर किमान चार तास जाऊ द्यावेत. तर आसनांनंतर अर्ध्या तासाने जेवण घेण्यास हरकत नाही. आसने करताना स्वच्छ, हलके, सैलसर व आवश्यक तेवढेच कपडे घालावेत. विशिष्ट प्रकारच्या आजारात, आजारी किंवा एखाद्या व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी अपायकारक ठरणारी आसने करू नयेत. आसने करताना किंवा करून झाल्यावर श्वासाचा वेग वाढता कामा नये. घाम येऊ नये व दमल्यासारखे वाटू नये. उलट योगासने करून झाल्यावर व्यक्तीला शांत, प्रसन्न, उत्साही व आनंदी वाटले पाहिजे. योगासनांच्या अभ्यासाच्या सुरुवातीला ती सावकाश व हळुवारपणे करावीत. विशिष्ट आसन साध्य करण्यासाठी शरीराला झटके किंवा ताण देऊ नयेत. आसनांची आदर्श स्थिती साधेपर्यत, विशेषतः लवचिकपणा येईपर्यंत, आसनांच्या मध्यंतरी अथवा प्रत्येक आसनानंतर थोडी थोडी विश्रांतीही घेतली जावी. प्रत्येक व्यक्तीने आपल्याला झेपेल, त्याप्रमाणे एकेका आसनस्थितीचा काल व आवर्तन वाढविणे योग्य व आरोग्यदृष्ट्या हिताचे असते. आसने करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी शरीर सामान्यपणे तीन स्थितीमध्ये ठेवावे लागते. उभ्या म्हणजे दंडस्थितीत; बैठकस्थितीत आणि पाठीवरील शयनस्थितीत किंवा पोटावरील विपरीत शयनस्थितीत.प्रशिक्षित डॉक्टरांकडून धडे

गेल्या काही वर्षांत मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगाची क्रेझ कमालीची वाढलेली दिसून येत आहे. सेवाभावी संस्था, डॉक्टर, योगाचे मार्गदर्शक यांच्यावतीने कोल्हापुरात विविध ठिकाणी योगाचे क्लासेस घेतले जातात. यातील काही मोफत आहेत, तर काही पैस घेऊन घेतले जातात. दोन्हींना प्रतिसाद उत्तम मिळत आहे. योगगुरू रामदेव बाबा यांचे पतंजली केंद्र, भारतीय योग संस्थान अशा काही संस्थांच्यावतीने योगाचे मोफत धडे दिले जातात. याशिवाय काही डॉक्टर आणि योग मार्गदर्शक योगाचे क्लासेस घेतात. काही जिममध्ये पॉवर योगा नावाने योगाचे धडे गिरवले जातात. यांची फी सर्वसाधारण ५०० ते २५०० रुपयांपर्यंत जाते. योगांच्या सोबतीनेच प्राणायाम, ध्यानधारणा यांचेही पॅकेज काही ठिकाणी उपलब्ध आहेत. कोल्हापुरातील काही आयुर्वेदिक डॉक्टारांनी योगाचे प्रशिक्षण घेऊन योग, प्राणायाम, ध्यान, सोबत आवश्यकतेनुसार औषधोपचार असे पॅकेज उपलब्ध करून दिले आहेत. प्रशिक्षित डॉक्टर मार्गदर्शन करत असल्याने त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे.

भुजंगासन

पोटावर झोपून, हात छातीजवळ टेकून, पोटापर्यंत शरीर मागे उचलणे, मान वर उचलून मागेपर्यंत घेणे ही कृती. मुख्य संबंध पाठीच्या कण्याशी व पोटाच्या स्नायूंशी. पोटाच्या स्नायूंवरील ताण पचनेंद्रियांवर योग्य परिणाम करतात. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पाठदुखी वा पाठीच्या कण्याच्या गैर हालचालीवर उपचारात्मक उपयोग होतो.

शलभासन

या आसनातील ताण विशेषेकरून पाठीचे शेवटचे मणके, ओटीपोटातील स्नायू व मांडीतील स्नायू यांवर येतात. त्यामुळे त्या त्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. तसेच लहान व मोठे आतडे यांवरही ताण पडून स्नायूंची अधिक ताणासहित हालचाल होऊन पचनक्रियेस मदत होते.

धनुरासन

धनुरासनात सर्वच मणक्यांना ताण बसतो. तसेच पोट, मांड्या, पाय, दंड व हात यावरही ताण बसतो. पोटावर पडणाऱ्या सर्वाधिक दाबाने पोटातील इंद्रिये व पाचकरस निर्माण करणाऱ्या विविध ग्रंथी आणि यकृत, स्वादुपिंड यांच्यावर दाब पडून चांगला परिणाम होतो. हाता-पायांतील शिरा ताणल्यामुळे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते.

द्विपाद व उत्तानासन

हे आसन केल्याने मांड्यांच्या स्नायूंवर ताण पडतो, तसेच पोटातील स्नायू आकुंचन पावतात. अंतरेंद्रियांवर दाब पडतो. लहान व मोठे आतडे यावर व पाचकग्रंथींवर चांगला परिणाम होतो. हे आसन पचन व उत्सर्जनादी विकारांवर उपयुक्त आहे.

मत्स्यासन

या आसनामुळे पोटाला योग्य ताण पडतो. एक बंध तयार होतो. त्यावेळी ताणलेल्या ग्रंथी मोकळ्या होतात. डोक्याच्या विशिष्ट अवस्थेमुळे मेंदूला अधिक चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो.

हलासन

पाठीचा कणा ताणला जातो, त्याला लवचिकता येते. कमरेपासून पायापर्यंतच्या स्नायूंवर ताण येतो, त्यामुळे नाड्यांची शुद्धी होते. पोटाचे स्नायू व त्यातील इंद्रिये यांची कार्यक्षमता वाढते. पचन चांगले होते.

नौकासन

नौकासनात पोटाच्या स्नायूंचे आकुंचन आहे व पाठीच्या स्नायूंचे प्रसरण आहे. एकंदर शरीराला आधार कमी असल्याने तोल अधिक सांभाळावा लागतो. अंगठे पकडण्याऐवजी घोटे, मांड्या पकडूनही प्रारंभी तोल सावरून आसन करावे. पोटाचे आकुंचन म्हणून त्यातील आतडी, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांवरील दाब वाढतो. कार्यक्षमता वाढते. मूत्रपिंडासंबंधीचे विकार कमी करता येतात.

पवनमुक्तासन

मोठ्या आतड्याच्या मार्गात अडकलेल्या वायूची (बळाने) मुक्ती होण्यास हे आसन उपयुक्त ठरते. गुदद्वारातून वायू बाहेर पडतो. पचनक्रिया सुधारते, शौचास साफ होते. पोटाची एखादी शस्त्रक्रिया, अंतर्गळ, मूळव्याध वा अन्य अपचनाचे विकार असलेल्यांनी वैद्यकीय सल्ल्याने हे आसन करावे.

शवासन

अवयव, इंद्रिये यावरील दाब, ताण, आकुंचन, प्रसरण ह्या सर्वांवर नियंत्रण आणून विश्रांती मिळते. फक्त श्वासपटलाची मंद हालचाल चालते. मेंदूची विचारप्रक्रिया कमी करून त्याकडेही कमी रक्तपुरवठा, त्यामुळे मेंदूला-मनाला विश्रांती व संथ मनोव्यापाराने मज्जासंस्थेला विश्रांती मिळावी. त्यानंतर मात्र पुनरुत्साहित होणे आवश्यक आहे.

वक्रासन

या आसनात पाठीचा कणा एका पातळीत राहून पिळला जातो. त्याची लवचिकता वाढते. पोटालाही पीळ पडतो व अंतरेंद्रियांवर दाब व ताण येतो. मज्जासंस्थेची कार्यक्षमता वाढते. या आसनात पायापासून मानेपर्यंत सर्व शिरांना ताण बसतो. सर्व स्नायू आकुंचन पावल्याने फुप्फुसे, उदरस्थ इंद्रिये व अंतःस्रावी ग्रंथी यावर ताण पडतो व त्यामुळे कार्यक्षमता वाढते. पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग व पचनेंद्रियांच्या तक्रारींवर हे आसन म्हणजे योग्य उपाय आहे.

शीर्षासन

हे आसन करताना क्रिया अत्यंत सावकाश कराव्यात. हे आसन डोळ्यांचे आरोग्य, रक्तशुद्धी, उत्साह व शांत निद्रा यांसाठी करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment