Tuesday, December 16, 2014

ड्रग्ज विरोधात मोदींचा एल्गार


ड्रग्ज विरोधात मोदींचा एल्गार


pm


अमलीपदार्थांची नशा (ड्रग्ज) ही चिंतेची बाब बनली असून भारतातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर याला बळी पडलेली पाहायला मिळते. मात्र तुमची ही नशा सैनिकांच्या जीवावर बेतते याचा विचार कधी केला आहे का?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना केला. ड्रग्जला आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदींनी जनतेला आकाशवाणीवरून आवाहन केलं.

ड्रग्ज ही भयंकर समस्या असून यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे आवश्यक आहे. नशेच्या आहारी गेलेल्या अनेकांना हे माहीत आहे का की, त्यांनी नशेसाठी खर्च केलेला पैसा हा दहशतवाद्यांकडे जातो. दहशतवादी संघटना यातून आपलं जाळं पसरवत आहेत आणि त्या पैशातून शस्त्रास्त्र जमवून हल्ले करतात. दहशतवाद्यांशी दोन हात करताना जेव्हा सैनिकांचा बळी जातो त्यामागे नशेबाजांचा पैसा असतो. तेव्हा नशेच्या आहारी जाऊन दहशतवाद्यांना मदत करू नका, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

ड्रग्जच्या आहारी जाण्यामागे 'D-डिस्ट्रक्शन, डेवस्टेशन आणि डार्कनेस (3D) ' ही कारणे आहेत. मात्र या सगळ्यात पालकांची भूमिका महत्वाची आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्याविरोधात नाही तर त्याच्या सवयी विरोधात, ड्रग्ज विरोधात लढले पाहिजे. त्याला समजून घेतले पाहिजे आणि समजावून सांगितले पाहिजे. त्यांनी आपल्याला पाल्याला ध्येय दिले पाहिजे तर तो या मार्गाला वळणार नाही, असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारतर्फे आपण या संदर्भात एक हेल्पलाइन सुरू करण्याचा विचार करतो आहोत. जेणेकरून तरुणांना या व्यसनातून बाहेर येण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

ड्रग्ज मुक्त भारत करण्यासाठी सोशिअल मीडियावरील लोकांनाही त्यांनी आवाहन केले की, यासंदर्भात जागृतता पसरावी म्हणून '#drugfreeindia' असा हॅश टॅग वापरावा. असे केल्यास तो एक लोकशिक्षणाचा भाग ठरेल, असेही मोदी म्हणाले.

तसेच सेलिब्रेटी, सामाजिक कार्यकर्ते, नेते, धार्मिक-अध्यात्मिक क्षेत्रात मोठे कार्य करणाऱ्या व्यक्ती या साऱ्यांनी देखील आपल्या संवादातून ड्रग्जचे गंभीर परिणाम आणि त्याच्या विरोधात लढा देण्यासाठी शक्य तेव्हा विचार द्यावेत, असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment