Saturday, February 11, 2012

संधींचे अनोखे डेस्टिनेशन! Wonderful destination of opportunity!!

संधींचे अनोखे डेस्टिनेशन! Wonderful destination of opportunity!!

गेल्या काही वर्षांत देश-विदेशात पर्यटकांची संख्या कितीतरी पटींनी वाढली आणि पर्यटन क्षेत्राला सुगीचे दिवस आले. पर्यटन क्षेत्राच्या नवनव्या शाखा-उपशाखा विकसित झाल्या आणि पर्यटनाबाबतची प्रयोगशीलताही वाढली. पर्यटन क्षेत्रातील अमर्याद करिअर संधी आणि अभ्यासक्रमांचा हा आढावा- फिरायला कोठेतरी जायचे आहे. त्यासाठी कुठे व कधी  आणि कसे फिरायला जावे, यासंबंधीचे मार्गदर्शन करणारे, सहलीदरम्यानच्या सर्व गोष्टींची पूर्तता करणारे आपले माणूस आज अपरिहार्य बनले आहे. यामधूनच आज पर्यटन व्यवसाय उदयाला आला आहे. काही राज्यांची अर्थव्यवस्था तर संपूर्णत: पर्यटनावरच अवलंबून आहे.
पर्यटन व्यवसायाचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यवसायाचे रूपही पालटत आहे. अगदी पूर्वी पर्यटन फक्त तीर्थक्षेत्रांशी संबंधित होते. नंतर ते स्थलदर्शनाशी जोडले गेले. आज मेडिकल टुरिझम, इको टुरिझम, अ‍ॅग्रो टुरिझम असे वेगवेगळे पर्याय तयार होत आहेत.
देशाच्या एकूण विकासाच्या दृष्टीनेही पर्यटन उद्योग महत्त्वाचा ठरतो. यामुळे देशाला परकीय चलन तर मिळतेच, त्याचबरोबर देशांतर्गतही रोजगार निर्माण होतो. हस्तकला आणि कुटिरोद्योगातील मालाला बाजारपेठ मिळते. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारही पर्यटन व्यवसायाला उत्तेजन देत असते. सरकारने पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला आहे, व्यवसाय म्हणून हे क्षेत्र आता अधिकाधिक आश्वासक बनले आहे. म्हणूनच करिअरच्या दृष्टीने पर्यटन हा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.
पर्यटन क्षेत्राचे व्यवसायाच्या दृष्टीने चार विभाग पडतात-
१)    केंद्र सरकार आणि राज्य सरकारशी संबंधित सेवा- पर्यटन संचालनालये, पर्यटन विकास महामंडळे, आय.टी.डी.सी. हॉटेल्स, इमिग्रेशन व कस्टम्स सेवा यात येतात.
२)    व्यावसायिक विभाग- पर्यटन संस्था, हवाई सेवा - रेल्वे सेवा यांसारख्या पर्यटन सेवांचा यात समावेश होतो.
३)    संस्थात्मक विभाग- यात हॉटेल्स किंवा हॉस्पिटॅलिटीशी संबंधित सेवा येतात. उदा. कूकिंग, फ्रंट ऑफिस, हाऊसकीिपग इत्यादी.
४)    सेवा विभाग- गाइड्स, दुभाषी, मार्केटिंगमधील व्यक्ती, प्रसिद्धी यंत्रणा हाताळणारे इत्यादींचा समावेश यात होतो.
यातील हॉटेल्स व हवाई सेवांचा विचार स्वतंत्र लेखाद्वारे करता येईल. याव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या पर्यटन व्यवसायातील करिअरच्या पर्यायांची माहिती या लेखाद्वारे घेऊ या.
ट्रॅव्हल एजंट्स
ट्रॅव्हल एजंट्स ग्राहकांना प्रवासाचे नियोजन करायला मदत करतात. प्रवासाचे विविध मार्ग समोर ठेवणे, पर्यटनस्थळाची परिपूर्ण माहिती पुरवणे, विमान/ रेल्वे इत्यादीचे आरक्षण करणे, पासपोर्ट/ व्हिसा मिळवून देण्यात मदत करणे, हॉटेल्सचे आरक्षण करणे इत्यादी गोष्टी ट्रॅव्हल एजंट्स करून देतात. मोठय़ा ट्रॅव्हल एजन्सीजमध्ये या प्रत्येक कामासाठी स्वतंत्र विभाग केलेले असतात.
आरक्षण (बुकिंग) विभाग-
या विभागात काम करणाऱ्या व्यक्तीकडे विविध गाडय़ा, विमाने, रेल्वे इत्यादींच्या वेळापत्रकांची माहिती असणे आवश्यक असते. प्रवासाचे विविध पर्याय, आरक्षण, प्रवासभाडे याविषयीची माहितीही त्यांच्याजवळ हवी. जलद काम करण्याची क्षमता, संवादकौशल्य, तत्परता हे गुण या विभागात काम करण्यासाठी आवश्यक असतात.
व्यवस्थापन विभाग-
विविध विभागांच्या कामात सुसूत्रता आणणे, कामाचे नियोजन करणे, कामे वाटून देणे, पर्यटनात नवनवीन पॅकेजेस आखणे अशी कामे या विभागाद्वारे केली जातात.
विपणन (मार्केटिंग) विभाग-
नवनवीन ग्राहक शोधणे, जुन्या ग्राहकांशी संपर्क ठेवणे, नवीन प्रसिद्धी योजना आखणे अशी कामे हा विभाग करतो.
टूर ऑपरेटर्स-
देश-विदेशात पर्यटकांना घेऊन जाणे आणि त्यांची सर्व व्यवस्था पाहणे हे टूर ऑपरेटरचे काम असते. स्वत: टूर आखण्याऐवजी आजकाल ग्राहक टूर ऑपरेटर्सबरोबर फिरायला जाण्यास पसंती देतात. अलीकडे टूर ऑपरेटर्सनी नवनवीन योजना काढून ग्राहकांना आकर्षति केले आहे. या टूर ऑपरेटिंग कंपन्यांच्या कामाचेही विविध विभाग असतात.
नियोजन विभाग-
कंपन्यांचे संचालक आणि अनुभवी अधिकारी विविध टूर्सचे नियोजन करतात. सहलीच्या ठिकाणच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून जेवण, मनोरंजन, प्रवासाचे वेळापत्रक, जाण्या-येण्याची व्यवस्था, टूरचा खर्च इत्यादींचे नियोजन करणे ही या विभागाची जबाबदारी असते.
विक्री विभाग-
हॉटेल्स तसेच ट्रॅव्हल एजन्सीजशी संपर्क साधणे, शाळा, महाविद्यालये, क्लब्ज, विविध वयोगटांतील व्यक्ती, व्यावसायिक इत्यादींपर्यत कंपनीच्या टूर्सची माहिती आकर्षक पद्धतीने पोहोचवणे असे या विभागाचे कार्य असते.
आरक्षण-
प्रवास, निवास, गाइड्स आणि तत्सम आरक्षण करणे ही या विभागाची जबाबदारी असते.
सहल व्यवस्थापक/ सहल प्रतिनिधी -
टूर ऑपरेटिंग कंपनीचा प्रतिनिधी म्हणून टूर मॅनेजर प्रत्यक्ष ग्राहकांसोबत सहलींमध्ये सहभागी होतो. सहलीदरम्यान उद्भवणाऱ्या प्रत्येक समस्येला शांतचित्ताने व प्रसंगावधान राखून सामोरे जाण्याचे महत्त्वाचे काम याला करावे लागते. लहान, वृद्ध, अपंग, आजारी पर्यटकांची विशेष काळजी घेणे, सर्व पर्यटकांना एकत्र आणून मनोरंजनाचे कार्यक्रम घडवून आणणे, त्यांना आवश्यक ती मदत पुरवणे इ. कामांचा समावेश त्याच्या जबाबदारीत होतो. संघटकाचे गुण तसेच पर्यटनस्थळाची परिपूर्ण माहिती, तेथील भाषेचे ज्ञान, समयसूचकता, मनमोकळा स्वभाव इत्यादी स्वभावगुण उत्तम सहल ऑपरेटरला आवश्यक असतात.
गाइड्स -
पर्यटनस्थळाविषयी ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक माहिती पर्यटकांना आकर्षक शैलीत देण्याची जबाबदारी गाइड्सची असते. पर्यटन मंत्रालयातर्फे स्थानिक, प्रादेशिक, राज्य अशा तीन पातळीवर गाइड्सना मान्यता दिली जाते. प्रादेशिक गाइड्ससाठी मंत्रालयाकडून परवाना  मिळवणे आवश्यक असते. तसेच या परवान्याचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक असते. परवानाधारक गाइड्स टूर ऑपरेटर्स, हॉटेल्स, स्थानिक पर्यटन विभाग इत्यादींसाठी काम करू शकतात. कधी समूहांसाठी तर कधी व्यक्तिगत गाइड (उदा. संशोधकासाठी) म्हणूनही काम करावे लागते.

सरकारी पर्यटन विभाग
केंद्र आणि राज्य सरकारच्या पर्यटन विभागात दोन प्रकारच्या संधी मिळू शकतात. संचालनालयातील किंवा पर्यटन मंत्रालयातील विविध अधिकारी, आरक्षण लिपिक, टूर गाइड्स, विक्री-विपणन कर्मचारी इत्यादी. ऑपरेशनल कामांसाठी असे अधिकारी हे केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधून निवडलेले सनदी अधिकारी असतात. त्यांचे काम प्रामुख्याने पर्यटनविषयक नियोजन करणे, या व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी योजना आखणे, धोरणात्मक निर्णय घेणे असे असते. तसेच ऑपरेशनल जॉब्स म्हणजे प्रत्यक्ष आरक्षण करणे, धोरणानुसार कार्यक्रम राबवणे, प्रसिद्धी करणे या स्वरूपाचे असतात. या प्रकारच्या नोकरीसाठी ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझममधील पदवी/ पदविकाधारक उमेदवारांची निवड केली जाते. त्यासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'मधून जाहिरात प्रकाशित केली जाते.
याशिवाय पर्यटन मंत्रालयात व संबंधित विभागात माहिती सहाय्यकांची नियुक्ती केली जाते. पर्यटनस्थळाविषयी माहिती/ सेवा पुरवणे, पर्यटकांना सहलीचे नियोजन करण्यात मदत करणे आदी स्वरूपाचे काम त्यांना करावे लागते. या पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे स्पर्धा परीक्षा घेतली जाते. २१ ते २५ वयोगटातील पदवीधर उमेदवार या लेखी परीक्षेसाठी पात्र समजले जातात. याव्यतिरिक्त भारतीय इतिहास, संस्कृती, पर्यटनस्थळांचे ज्ञान, इंग्रजीवर प्रभुत्व याही बाबी आवश्यक असतात. एखादी परदेशी भाषा येत असल्यास अधिक उपयुक्त मानले जाते. लेखी परीक्षा व मुलाखत या दोन टप्प्यांतून निवड केली जाते. जाहिरात 'एम्प्लॉयमेंट न्यूज'मधून प्रकाशित केली जाते.

पर्यटनाचे विविध पर्याय
रूढ अर्थाच्या पर्यटनातील संधी आपण बघितल्या आहेत. आजचं पर्यटनक्षेत्र केवळ प्रेक्षणीय स्थळं दाखवण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. पर्यटनाच्या स्वतंत्र शाखा तयार झालेल्या दिसतात. पर्यटनाच्या या नव्या वाटा व्यवसायाची नवी संधी देतात. यासाठी आवश्यक क्षमतेच्या, कौशल्याच्या जोरावर खालीलपकी एखाद्या विभागात पर्यटनासंबंधी आगळावेगळा व्यवसायदेखील आपल्याला सुरू करता येईल.
अ‍ॅग्रो टुरिझम
कोकणातील अनेक गावं- खेडेगावं राज्यातील एक अ‍ॅग्रो टुरिस्ट पर्यटनस्थळं म्हणून ओळखली जातात. कृषी महाविद्यालयाच्या पदवीधरांनी जैविक पद्धतींचा उपयोग करून फळं, भाज्या, कुक्कुटपालन विकसित केल्याची उदाहरणं आहेत. शहरातील रासायनिक फवाऱ्यांनी लगडलेली फळं आणि भाज्या खाणाऱ्या शहरवासीयांना म्हणूनच खेडोपाडय़ातील शेतीचे प्रयोग पाहावेसे वाटू लागले किंवा शेतीत नवीन उपक्रम राबवू इच्छिणाऱ्या शेतकरी/गावकरी तसंच शेतकी संशोधकांनाही अशी स्थळं खुणावू लागली.
आपल्याकडे काही ठिकाणी शेतीमधील प्रयोगांबरोबर मत्स्यशेती हे काही ठिकाणी पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहे. कृत्रिम बनवलेल्या मात्र नसíगक दिसणाऱ्या तळ्यामध्ये हाऊसबोटीसारखी निवासाची सोय, आकाशदर्शनाची सोय यामुळे अनेक शाळा, महाविद्यालये व खासगी पर्यटकांना अशी ठिकाणे खुणावतात.
अ‍ॅग्रो टुरिझमची एका वाक्यात व्याख्या करायची तर आपल्या शेताचा काही भाग जाणीवपूर्वक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे, अशी करता येईल. सायप्रस, थायलंड, अम्रेनिया, मलेशिया या देशांत अ‍ॅग्रो टुरिझमचं प्रस्थ वाढत आहे. आता भारतातही जाणीवपूर्वक अ‍ॅग्रो टुरिझमला चालना देण्याचे प्रयत्न होत आहेत. उदाहरण द्यायचं तर केरळ पर्यटन विकास मंडळाने काही जिल्ह्यांमध्ये अशी अ‍ॅग्रो टुरिस्ट केंद्रं विकसित करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील शेतीविषयक प्रथांविषयी पर्यटकांना आकर्षण असतं, हे लक्षात घेऊन हा प्रयोग केला जात आहे.
आपणही आपल्या गावच्या जमिनीवर शेतीसंबंधी असे काही नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करू शकतो. वनौषधींची लागवड, फळझाडं, फुलझाडं, ग्रीनहाऊस बांधून शहरांत मागणी असलेली जरबेरा, काíनशनसारख्या फुलझाडांची लागवड अशा अनेक गोष्टी करता येतील. पंचतारांकित हॉटेल्समध्ये लागणाऱ्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आपल्या शेतात लावता येतील व योग्य व्यक्तींमार्फत त्याचं मार्केटिंगही करता येईल. याशिवाय बायोगॅस प्रकल्प, गांडुळखतनिर्मिती याविषयीचं वाढतं आकर्षण लक्षात घेऊन तसे उपक्रम राबवता येतील. याविषयी हळूहळू प्रसिद्धी होऊन पर्यटकांचा ओघ निर्माण होऊन उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होतं. मात्र अ‍ॅग्रो पर्यटनस्थळ म्हणून नीट विकसित करण्यासाठी निवासाची तसेच पर्यटकांच्या जेवणाची योग्य व्यवस्थाही करावी लागेल.
अलीकडे काही संस्थांतर्फे कोकणातील शेतीविषयक प्रयोग दाखवण्यासाठी सहलींचं आयोजन केलं जातं. एप्रिल-मेमध्ये आम्र-पर्यटन हा अभिनव उपक्रम राबवला जातो. 'स्वत:च्या हाताने झाडावरचा आंबा तोडून खा,' ही कल्पनाच अनेकांना मोहून टाकते. अ‍ॅग्रो टुरिझमचं हे उत्तम उदाहरण आहे.
मेडिकल टुरिझम
मद्रास मेडिकल मिशनचं चेन्नई येथे हॉस्पिटल आहे. तिथे ८७ वर्षांची एक वृद्ध व्यक्ती हृदय शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी अमेरिकेतून या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. त्या व्यक्तीचं विमान तिकीट, एक महिन्याचं हॉस्पिटलमधील वास्तव्य व शस्त्रक्रिया यांचा खर्च निव्वळ आठ हजार अमेरिकन डॉलर्स एवढा झाला. निव्वळ म्हणण्याचं कारण अमेरिकेत याहून कमी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी ४० हजार अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित होता. भारतातील अद्ययावत वैद्यकीय सेवा, उत्तम दर्जाची हॉस्पिटल्स, कुशल डॉक्टर्स व कमी खर्चीक सेवा यामुळे देश-विदेशांतून भारतात वैद्यकीय उपचारांसाठी येणारे मेडिकल टुरिस्ट दिवसागणिक वाढत आहेत. केवळ श्रीमंत राष्ट्रांतूनच नव्हे, तर गरीब देशांतूनही चांगल्या वैद्यकीय उपचारांच्या आशेने पर्यटक येत आहेत. दरवर्षी असे सुमारे एक लाख ५० हजार पर्यटक देशात येतात. हा आकडा दरवर्षी ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार परदेशी पर्यटकांना देण्यात येणारी वैद्यकीय सेवा ही निर्यात वस्तू  समजली गेली आहे. कारण त्यामुळे देशाला परकीय चलन उपलब्ध होतं. त्यामुळे मेडिकल टुरिझमकडे शासकीय पातळीवरूनही विशेष लक्ष पुरवलं जात आहे. मेडिकल टुरिझम ही काही आजची संकल्पना नाही, तर ती हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. प्राचीन ग्रीसमध्ये उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, म्हणून जगभरातून पर्यटक जायचे. अठराव्या शतकात श्रीमंत जर्मन किंवा युरोपियन्स नाईल खोऱ्यात उपचारांसाठी जायचे. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात स्वस्त व उत्तम वैद्यकीय सेवांसाठी भारत, थायलंड अशा देशांकडे पर्यटक वळत आहेत.
भारतात केवळ आधुनिक वैद्यक उपचारच नव्हे तर पर्यायी उपचार पद्धतींचीही प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेद, मसाज, योग, ध्यानधारणा यांचंही प्रचंड
आकर्षण परदेशांमध्ये आहे. देशांतर्गत पर्यटकांमध्येही अशा उपचारांसाठी पर्यटनाचं आकर्षण वाढलेलं दिसतं. आजच्या धावपळीच्या व घडय़ाळ्याला बांधलेल्या जीवनामुळे बदललेल्या आहारसवयी व जीवनपद्धतीमुळे तरुण वयातच रक्तदाब, मधुमेह, मानसिक अस्वास्थ्य यांनी अनेकांना ग्रासलेलं आहे. त्यामुळेच निसर्गाच्या सान्निध्यात, शांत ठिकाणी वरील उपचारांसाठी जाणारे पर्यटक दिसू लागले आहेत. विपश्यना केंद्रात किंवा केरळमधील तेल-मसाज केंद्रात म्हणूनच पर्यटकांचा ओढा दिसतो. अगदी वजन कमी करण्यासाठीही अशा ठिकाणी जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.
या वैद्यकीय पर्यटनाचा आपल्यालाही लाभ घेता येईल. आयुर्वेदातील पंचकर्म तसंच योगाभ्यास इत्यादींचं योग्य प्रशिक्षण घेऊन निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांना त्याचं प्रशिक्षण देणं, हाही एक व्यवसाय बनू शकतो.
इको टुरिझम
फिरायला जायचं म्हणजे हुल्लडबाजी, कर्कश आवाजात गाणी ऐकणं-म्हणणं, बरोबर नेलेल्या खाण्याची रिकामी पाकिटं इतस्तत: फेकून कचरा करणं अशी आजच्या तरुणाईची व्याख्या आहे. इको टुरिझम ही याहून पूर्णत: भिन्न अशी संकल्पना आहे. माणूस हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. पर्यावरण, सभोवतीची सजीवसृष्टी यांच्याशी त्याची नाळ घट्ट बांधलेली आहे. याची जाणीव ठेवून पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता निसर्गाच्या सान्निध्यात केलेला प्रवास म्हणजे इको टुरिझम. इको टुरिझम सोसायटीने केलेल्या व्याख्येनुसार 'पर्यावरणाला, स्थानिक संस्कृतीला व तिथल्या लोकांना हानी न पोहोचवता केलेली रोजगारनिर्मिती व पर्यावरण संरक्षण' म्हणजे 'इको टुरिझम' होय.
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये विविध निसर्गसंस्थांतर्फे फुलपाखरं पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो किंवा राणीच्या बागेतील दुर्मीळ वनस्पती उपक्रम हे काही प्रमाणात यात मोडतात. इको टुरिझमची ही स्थानिक उदाहरणं आहेत. अशाच प्रकारे ताडोबाच्या किंवा अन्य अभयारण्यात जैवविविधता पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. पक्षीनिरीक्षण, गिर्यारोहण, ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसिंग अशा उपक्रमांचं आयोजन करून आपणही इको टुरिझम वाढण्यास हातभार लावू शकता.
व्हिलेज टुरिझम
'खेडय़ामधलं घर कौलारू..' हे गाणं ऐकताना कौलारू घर न पाहिलेल्यांचंही अंत:करण कातर होतं तर प्रत्यक्ष गावातल्या कौलारू घरांत वावरलेल्यांना नॉस्टेल्जिक व्हायला होतं. ५०० चौरस फूटांच्या आलिशान शहरी घरातील व्यक्तीला गावातील कौलारू घर खुणावत असतं. गावातील शांत-निवांत जीवन, शेती, गोठे, मोट, विहीर या सर्वाविषयी आपल्याला एक प्रकारची आत्मीयता असते. मात्र अनेकांना स्वत:चं गाव नसतं किंवा भाऊबंदकीमुळे अथवा स्थलांतरामुळे ते नावालाच उरलेलं असतं. यातूनच 'व्हिलेज टुरिझम' ही संकल्पना उदयास आली असावी.वीकेन्ड ट्रिप्ससाठी शहरांजवळच्या ग्रामीण भागांत जाणीवपूर्वक अशी पर्यटनस्थळं विकसित करणं शक्य आहे. तिथे येणाऱ्या पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा पूर्ण अनुभव देण्यासाठी तेथील ग्रामस्थांच्या घरी निवासाची सोय करता येईल. यामुळे ग्रामस्थांनाही उत्पन्न मिळू शकेल. याशिवाय झुणका-भाकर, चुलीवर भाजलेली कणसं, कांदे यांचा गावरान आहार, विहिरीतून पाणी काढणे, बलगाडीतून सवारी, गायी-म्हशींचे दूध काढणे अशा अनेक कल्पक गोष्टी करता येतील.
हेरिटेज टुरिझम
भारतीय संस्कृती बहुपेडी आहे. आज जगभरातील पर्यटकांमध्ये ही संस्कृती जाणून घेण्याविषयी उत्सुकता दिसून येते. एखाद्या पर्यटनस्थळाची, तेथील कलांविषयी, स्थानिक लोकांविषयी, त्यांची संस्कृती आणि इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने आयोजित केलेला प्रवास म्हणजेच हेरिटेज टुरिझम.
देशातील प्रत्येक राज्यात अशी कित्येक सांस्कृतिक  पर्यटनस्थळं आहेत. राजस्थानातील महाल, महाराष्ट्रातील लेणी, दक्षिण राज्यांमधील भव्य मंदिरं, ऐतिहासिक किल्ले अशी मोठी यादी करता येईल. या पर्यटनस्थळांना नुसती भेट देण्यापेक्षा त्यामागचा इतिहास, त्या वास्तूंचे अन्य विशेष, त्यातून तत्कालीन राज्यकर्त्यांचा दिसणारा दूरदर्शीपणा इत्यादी गोष्टी प्रभावीपणे पुढे आणणे 'हेरिटेज टुरिझम'मध्ये आवश्यक ठरतं.
फेस्टिव्हल टुरिझम
देशात विविध सण साजरे होतात. राज्या-राज्यांतील सण वेगळे आहेत किंवा एकच सण असेल तरी तो साजरा करण्याच्या पद्धती भिन्न आहेत. बिहू, पोंगल असे निसर्गाशी संबंधित सण आहेत; तसेच गणेशोत्सव, दिवाळी, होळी, ईद, ख्रिसमस असे धार्मिक सण आहेत. सणांनिमित्त अनोख्या कार्यक्रमांचं किंवा जत्रांचं आयोजन केलं जातं. उदा. बत्तीस शिराळ्याला नागपंचमीला सापांची जत्रा असते. या सणांच्या वैविध्याचा उपयोग पर्यटनाच्या विकासासाठी करणे म्हणेजच 'फेस्टिव्हल टुरिझम' होय.
गोव्यात काíनव्हलच्या वेळी पर्यटकांची संख्या खूप वाढते. पुण्या-मुंबईतील गणेशोत्सव आता परदेशी पर्यटकांनाही आकर्षति करतो. तशाच प्रकारे कोकणातील शिमगा किंवा मुंबईतील दहीहंडी यांची नीट प्रसिद्धी करून पर्यटकांचा ओघ वाढवता येईल.
आपल्या प्रदेशातील वैशिष्टय़े, स्वत:चा व्यवसाय व निसर्ग यांची सांगड घालून आपल्यालाही महाराष्ट्रात पर्यटनाच्या अमर्याद संधी निर्माण करता येतील.
प्रशिक्षण
पर्यटन क्षेत्रातील खाजगी कंपन्यांमध्ये उमेदवार निवडताना अनेक गुणांचा विचार केला जातो. मात्र वाढत्या स्पध्रेच्या युगात या गुणांबरोबरच ट्रॅव्हल व टुरिझममध्ये पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना अधिक पसंती मिळताना दिसते.

आयटा/ उफ्टा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
आयटा म्हणजे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही संस्था १९४५ मध्ये स्थापन झाली. आज या संस्थेत २५६ एअरलाइन्स कंपन्यांचा समावेश आहे. उफ्टा म्हणजे युनायटेड फेडरेशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ही ट्रॅव्हल एजंट व टूर ऑपरेटर्सचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे.
या दोन्ही संस्थांमार्फत ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम क्षेत्रात येण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम चालवले जातात. फाऊंडेशन, कन्सल्टंट, मॅनेजमेंट व सीनियर मॅनेजमेंट अशा चार स्तरांवर हे अभ्यासक्रम आहेत. मान्यताप्राप्त खासगी संस्थांमधून हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.
अन्य अभ्यासक्रम
राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये आणि संलग्न महाविद्यालयांतही ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझमसंबंधी अभ्यासक्रम शिकवले जातात. वानगीदाखल या काही संस्था -
१)    गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, कलिना, सांताक्रुझ (पू.), मुंबई.
२)    बी. के. सोमाणी पॉलिटेक्निक, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई-२६.
३)    निर्मला निकेतन, न्यू मरिन लाइन्स, मुंबई.
४)    एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ.


Wonderful destination of opportunity!!

No comments:

Post a Comment