Saturday, February 4, 2012

पानिपत युद्धाची पार्श्वभूमी

पानिपत युद्धाची पार्श्वभूमी
डॉ.निनाद बेडेकर

14 जानेवारी 1761 रोजी पानिपतावर मराठी आणि गिलचे यांच्यात युद्ध झाले. खरे तर अफगाणिस्तान कुठे आणि महाराष्ट्र कुठे? या दोन प्रांतात वितुष्ट येण्याचे कारण काय? आणि ही लढाई पानिपतासार"या ठिकाणी घडण्याचेही कारण काय हे जाणून घेण्यासाठी या पाठीमागचा इतिहास जाणून घेणे गरजेचे ठरेल.
20 फेब"ुवारी 1707 रोजी मुघल बादशाह औरंगजेब हा अहमदनगराजवळील भिंगार येथे मृत्यू पावला आणि एकूण सदतीस वर्षे चाललेली एक प्रदीर्घ लढाई संपुष्टात आली. या लढाईत शेवटची पंचवीस वर्षे खासा मुघल बादशाह उतरला होता. 1686 साली आदिलशाही आणि पुढच्याच वर्षी गोवळकोंड्याची कुतुबशाही औरंगजेबाने संपवली. मात्र मराठ्यांचे राज्य मात्र त्याला संपवता आले नाही. मराठे लढत राहिले. त्यांचा राजा बादशहाने मारला, राजधानी घेतली, सिंहासनही बहुधा त्यानेच नेले पण तरीही महाराष्ट्र लढतच राहिला. औरंगजेबाची ताकत हळूहळू विरत चालली. तो मराठ्यांशी लढत असतानाच मराठे नर्मदा ओलांडून मुघल मुलुखात लुटालूट करत चालले होते. औरंगजेबाच्या मृत्यूने मराठी राज्यावरचा फास सुटला पण शाहूच्या मुघलांकडून केलेल्या सुटकेने मराठ्यांना अंतर्गत वादाला तोंड द्यावे लागले. ते वाद संपुष्टात आल्यावर मात्र मराठी राज्याचा आणि ताकदीचा जो विस्तार झाला तो खरे तर आश्चर्यजनक मानावा लागेल.

सत्तेची स्पर्धा
इ.सन. 1719 हे साल मराठ्यांची ताकद पहिल्यांदा दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे द्योतक आहे. एक विलक्षण घटना यावर्षी घडली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुहम्मद मोअज्जम हा शाहआलम हा किताब घेऊन गादीवर आला. त्याआधी झालेल्या जजाऊ येथील लढाईत त्याने आपला भाऊ मुहम्मद आज़म याचा पराभव करून त्याला ठार मारले होते. शाहआलम इ.सन 1712 मध्ये मृत्यू पावला. त्यानंतर त्याचा मुलगा जहॉंदारशाह गादीवर आला पण एका वर्षातच त्याचा मृत्यू झाला आणि दिल्लीच्या गादीवर फर्रूखसिअर याला बसवण्यात आले. हा औरंगजेबाचा पणतू होता. याला गादीवर आणण्यात साय्यिद हुसेन अली आणि त्याचा भाऊ साय्यिद अब्दुल्ला हे "किंगमेकर' ठरले.
पण फर्रुखसिअरला सारखे वाटत होते की हे बंधू आपली कधीही गच्छंती करून दिल्लीच्या गादीवर आणखी कोणाला तरी बसवतील. हा प्रसंग स्वत:वर येऊ नये म्हणून त्याने हुसेन अलीला दक्षिणेच्या सुभ्यांचा सुभेदार म्हणून औरंगाबादेला पाठवून दिले. आणि मराठे आणि निजामअली यांना त्याला परस्पर मारून टाकण्याबद्दल आतून निरोप धाडले. पण हुसेन अलीचा दिवाण एक मराठी माणूस होता. त्याचे नाव शंकराजी मल्हार. या शंकराजीने पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि निजाम उल्मल्काला तसे न करण्याची विनंती केली. मराठी मंडळींना काही सनदा, दिल्लीकडून हव्या होत्या तसेच त्यांची काही माणसे दिल्लीत मुघलांच्या कैदेत होती. त्यांची सुटका करणे गरजेचे होते. स्वत: शाहूराजे यांच्या मातुश्री मुघलांच्या कैदेत होत्या.
ताकद दाखवली
मराठ्यांनी दाखविलेल्या वृत्तीबद्दल समाधान व्यक्त करून हुसेन अलीने त्यांना दिल्लीकडून हव्या असणाऱ्या सनदांचे "ड्राफ्ट' देण्यास सांगितले. हे तीन सनदांचे ड्राफ्ट दिल्लीस पाठवण्यात आल्यावर बादशाह फर्रूखसिअरने त्यांची फर्माने करण्यास नकार दिला. हुसेन अलीने मराठ्यांना निरोप पाठविला की तुमची फौज द्या, मी दिल्लीस जातो, फर्रूखसिअरला काढतो, दुसरा बादशाह करतो आणि तुमच्या माणसांची सुटका करतो. पण नुसती फौज दिली तर आपल्या माणसांच्या जीविताला धोका उत्प होईल म्हणून बाळाजी विश्वनाथ, शंकराजी नारायण यांनी यावर एक तोडगा काढला. औरंगजेबाच्या नातवाचा एक तोतया एका सजवलेल्या हत्तीवर बसवण्यात आला. मराठी फौज आणि या तोतयासोबत घेऊन हुसेन अली दिल्लीत आला. दिल्लीत हत्ती फिरवण्यात आला. अवघी दिल्ली त्या तोतयाच्या पाया पडली. दुसऱ्याच दिवशी हुसेन अली दरबारात गेला. फर्रूखसिअर घाबरून गेला होता. पुढची भेट ठरली. त्या भेटीत हुसेन अली आणि फर्रूखसिअर यांची बाचाबाची होऊन हुसेन अलीने बादशहाचे डोळे काढून त्याला अदबखान्यात घातले आणि रफीउद्दरजत नावाच्या मुघल घराण्यातील एका मुलाला गादीवर बसवून त्याच्याकरवी मराठ्यांना फर्माने दिली. त्यांच्या माणसांची कैदेतून सुटका केली आणि वर 50 लक्ष रुपये फौजेचा खर्च दिला. मराठे आणि दिल्ली यांची ही पहिली भेट होती. मराठी ताकद काय आहे हे दिल्लीला कळून चुकले होते.
वाढती मराठी ताकद आणि दिल्लीच्या मुघल गादीला लागलेली उतरती कळा ही खरी मराठ्यांच्या उत्तरेतील वाढत्या हालचालींची कारणे होती. बाजीराव पेशव्याने केलेले निजामुल्मुल्काचे पराभव, गुजरात आणि माळव्याचे त्याला मिळालेले सुभे, शिंदे, होळकर, पवार यांच्या माळव्यातील नेमणुका, चौथाई वसूल करण्यासाठी मिळालेला इतर प्रदेश यामुळे मराठी ताकदीची ओळख हिंदुस्थानात झाली. मुघलांचा सुभेदार मुहम्मदखान बंगष याने बाजीराव पेशव्याची आई राधाबाई यांची काशीयात्रा करून दिली होती. उदयपूरच्या राण्याने आणि जयपूरच्या सवाई जयसिंगाने बाजीरावाचे अभूतपूर्व स्वागत केले होते. बाजीरावाच्या पेशवाईच्या काळात मराठी राज्याचा मोठा विस्तार झाला. स्वत: बाजीराव अजिंक्य राहिला. बाजीरावाने दिल्लीला धडक मारली, भोपाळला निजामाला कोंडले आणि नादिरशाहाने दिल्ली झोडली. नादिरशाहाशी सामना करण्यास जात असताना वाटेत नर्मदा तीरावर रावेरखेडी येथे बाजीराव मृत्यू पावला.

विस्तार
या आधी दोन-तीन वर्षे मराठ्यांच्या स्वाऱ्या बंगालमध्ये झाल्या होत्या. भास्कर राम कोलटकर या नागपूरच्या रघुजी भोसल्यांच्या दिवाणाने 1742 मध्ये पहिली स्वारी बंगालवर केली. या स्वारीत मराठ्यांनी अलीवदीखानाचा अनेक ठिकाणी पराभव केला. मुर्शिदाबादच्या जगतशेठ आलमचंदाच्या पेढीतून त्यांनी अडीच कोटींची लूट मिळवली. भास्करपंतांचा दरारा पुऱ्या बंगालमध्ये पसरला. हा दरारा एवढा होता की रडणाऱ्या लहान मुलाला त्याची आई सांगत असे की, "रडायचे थांब नाहीतर भास्कर पंडित येऊन तुला घेऊन जाईल.' या सर्व प्रकारावर गंगाराम नावाच्या लेखकाने बंगालीमधून "महाराष्ट्र पुराण' नावाचे पुस्तकच लिहिले आहे. 1744 मध्ये भास्करपंताने ओरिसामधून बंगालमध्ये प्रवेश केला. याच वेळी मराठी सैन्याने वाळूत झाकून गेलेले कोणार्कचे सूर्यमंदिर शोधून काढले! कटकचा बाराबतीचा किल्लाही मराठ्यांच्या ताब्यात होता. यावेळीही अलीवर्दीखानाला मराठ्यांचा सामना करणे कठीण गेले; पण त्याने कारस्थान रचून भास्कर राम आणि इतर एकवीस मराठी सरदारांचे खून केले.
कलकत्त्याचे तसेच कासिम बझार आणि चंद्रनगर येथील व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी इंग"जांची आर्जवे करून पंचवीस हजार रुपये बिनव्याजी मिळवले आणि मराठ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी कलकत्त्याभोवती एक खंदक खणला. त्याची लांबी सुमारे पाच किलोमीटर्स एवढी होती. त्याला "मराठा डिच' असे म्हणत. सध्या त्याचा रिंग रोड केला आहे. पण थोडा भाग शिल्लक आहे.

अब्दालीचा उदय
बिहारमध्येही पाटण्याला मराठ्यांच्या भीतीने शहराभोवती एक तटबंदी उभारण्यात आली होती. या सगळ्या मराठी पराक"माच्या आणि ताकदीच्या खुणा आहेत. इ.सन 1747 मध्ये इराणचा बादशहा नादिरशाह हा मृत्यू पावला आणि त्याचा सेनापती अहमदशाह अब्दाली हा उदयाला आला. अहमदशाहाने अफगाणिस्तानातील टोळ्या एकत्र केल्या आणि त्याने स्वत:ला बादशाह म्हणून घोषित केले. तो नादिरशाहाबरोबर हिंदुस्थानात आधी आला असल्याने त्याला दिल्लीची आणि तेथील संपत्तीची कल्पना होती. त्याने लगेचच दिल्लीकडे लक्ष वळवले. त्यांचे जातभाई रोहिले, बंगष वगैरे हिंदुस्थानात होतेच. या सर्वांच्या सहाय्याने हिंदुस्थानची संपत्ती ताब्यात घेऊन अफगाणिस्तानचे दैन्य मिटवावे, पंजाब प्रांत आपल्या हातात ठेवावा, विरोधकांना पराक"माने धाकात ठेवावे असे योजून अब्दालीने त्याची पहिली स्वारी हिंदुस्थानावर केली.
इ.सन 1748 मध्ये अब्दाली हिंदुस्थानावर चालून आला. मुघल वजीर कमरुद्दीनखानाने त्याचा जावई शाहनवाजखान याला अब्दालीवर रवाना केले पण त्याचा पराभव करून अब्दाली लाहोरला आला. तेथील व्यवस्था लावून त्याने दिल्लीकडे प्रयाण केले. मुघल बादशहाने कमरुद्दीनखान, सफदरजंग, जयपूरचा ईश्वरसिंग अशांना अब्दालीशी झुंजण्यास पाठवून दिले. अब्दाली तोवर सतलज ओलांडून सरहिंदला दाखल झाला होता. सरहिंदजवळ मनुपूर येथे 21 मार्च 1748 रोजी दोन्ही दलात लढाई होऊन त्यात अब्दालीचा पराभव झाला. तोफेचा गोळा लागून वजीर कमरुद्दीनखान हा मारला गेला. वजिराचा मुलगा मोईनुल्मुल्क मीर मू आणि त्याचे भाऊ यांनी मोठा पराक"म करून अब्दालीविरुद्ध विजय मिळविला. अब्दाली परत पार अफगाणिस्तानात गेला; 12 मे ला तो कंदाहारला पोहोचला. पण त्याची ताकद आणि आवेश पाहता आता दिल्लीला अधिक संरक्षणाची गरज भासू लागली.
इ.सन 1751 मध्ये अब्दाली परत दिल्लीवर चालून आला. बादशाह काळजीत पडला आणि त्याने त्वरेने मराठ्यांना मदतीस बोलावून घेण्यास सांगितले. अब्दालीशी सामना करण्याची ताकद फक्त मराठ्यांतच होती. 23 एप्रिल 1752 रोजी कनोज येथे हा तह झाला. हा तह म्हणजे मराठी फौजा अटकेच्या पार जाण्याची नांदी होती या तहात पाच कलमे होती.
1. पठाण, राजपूत वगैरे देशातील बंडखोर किंवा अब्दालीसारखे परदेशीय शत्रू यांजपासून पेशव्याने मुघल बादशाहीचे रक्षण करावे.
2. या मदतीबद्दल बादशहाने मराठ्यांना 50 लाख रुपये खर्चासाठी द्यावेत. पैकी 30 लाख अब्दालीप्रीत्यर्थ आणि 20 लाख अंतर्गत बंडखोरांबाबत.
3. पंजाब, सिंध, अंतर्वेद या प्रदेशातून चौथाई वसुलीचे हक्क बादशाहाने मराठ्यांना द्यावेत.
4. अजमीर व आग्रा या प्रांतांची सुभेदारी पेशव्यास देण्यात यावी. या सुभ्यांचा कारभार पूर्वापार चालत आलेल्या रिवाजांस अनुसरून मराठ्यांनी करावा.
5. पेशवा स्वत: येण्यास असमर्थ असेल तेव्हा त्याच्या बदल्यात मराठी सरदारांनी बादशाहाच्या तैनातीत राहून इतर मनसबदारांप्रमाणे बिनतक"ार नोकरी बजवावी.

असा तह करून वजीर सफदरजंग मराठ्यांना घेऊन दिल्लीला निघाला. त्याआधी अब्दालीने दिल्लीला पाठविलेला वकील कलंदरखानाने बादशाहावर दबाव टाकून त्याच्याकडून अब्दालीच्या सिंधबद्दलच्या मागण्या मंजूर करून घेतल्या होत्या. अब्दाली परत गेला. त्यामुळे मराठ्यांच्या मदतीची गरज उरली नव्हती. जावेदखानाने ही बातमी वजीर सफदरजंगाला सांगितल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने बादशाहाला साफ सांगितले की, तुम्ही अब्दालीबरोबर केलेला करार मला मान्य नाही. मराठी फौजा दिल्लीत आल्यामुळे दिल्ली आणि भोवताली त्यांचा उपसर्ग लागला. बादशाहाचा सल्लागार जावेदखान मराठी फौजा दिल्लीबाहेर काढायच्या तयारीला लागला. बादशाही खजिन्यातून काही पैसे हाती लागल्यावर मराठ्यांनी दिल्ली सोडली. पण या प्रकारामुळे बादशाह आणि वजीर यांच्यात मोठी तेढ निर्माण झाली.

वजिराचे कारस्थान
इ.सन 1753 च्या सुरुवातीला अब्दालीने आपला मोर्चा परत दिल्लीकडे वळवला. त्याचा वकील दिल्लीत येऊन 50 लक्ष रुपये मागत होता. वजिराने त्याची समजूत घालून त्याला परत पाठवले. वजिराने बादशाहाला मराठ्यांची मदत घेऊन अब्दालीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. पण बादशाह आणि वजिरामधली तेढ वाढतच गेली.
चौथाई गोळा करण्यासाठी इ.सन 1754 सुरुवातीला मराठ्यांनी कुम्हेरीच्या किल्ल्यावर मोर्चे लावले. किल्ल्यावर सूरजमल जाट होता. तो चाळीस लाख रुपयांची खंडणी देण्यास तयार होता. पण मराठे एक कोटी रुपये मागत होते. शेवटी किल्ला ताब्यात येत नाही हे पाहिल्यावर मराठ्यांनी तीन हफ्ते मिळून एकूण तीस लाख रुपयांची खंडणी कबूल केली. रघुनाथराव यावेळी दिल्लीच्या बादशाहाकडे रकमेसाठी तगादे लावत होताच.
इ.सन 1756 मध्ये होळकर हे सावनुरावर आणि शिंदे मारवाडच्या स्वारीत गुंतलेले असल्याने अब्दाली परत दिल्लीवर चालून आला. अंताजी माणकेश्वर हा एक मराठी सरदार दिल्लीत होता. पण त्याची फौज कमी होती. 14 जानेवारीला अब्दालीच्या वकिलाने दिल्लीकडे दोन कोटी रुपये आणि सरहिंदपर्यंतचा प्रदेश मागितला. ही मागणी ऐकून सर्वच हतबुद्ध झाले. अब्दालीने मुघलांच्या बेगमेला हाताशी धरून दिल्लीची माहिती काढली. अब्दालीने यावेळी दिल्ली लुटून मोठी दौलत मिळविली. अमिरांच्या हवेल्या लुटल्या. हत्ती, घोडे लुटले. ही सारी दौलत त्याने त्याचा मुलगा तैमूरशाह याच्याबरोबर लाहोरला पाठवली. पुढे अब्दाली मथुरेत आला. मथुरा लुटली. गोसाव्यांची मोठी कत्तल केली. गाईंची आणि माणसांची मुंडकी एकमेकांच्या तोंडाला लावून झाडावर टांगली. अनन्वित अत्याचार केले. अटकेपासून पार आग्य"ापर्यंतचा प्रदेश पार बेचिराख करून टाकला. त्याचा वजीर शाहवलीखान, नजीबखान रोहिला, शाहवलीउल्ला या सर्वांनी मिळून दिल्ली-मथुरेत हैदोस घातला. हिंदू स्त्रियांना पळवून नेले. मूर्ती फोडल्या, घरे जाळली, मोठा हलकल्लोळ केला आणि अब्दाली अफगाणिस्तानात निघून गेला.


युद्धाच्या तोंडावर
मराठे आता पंजाब पार करून अटकेवर निघाले. 8 मार्च 1758 ला मराठी फौजा सरहिंदला आल्या. एप्रिलमध्ये लाहोर जिंकले. चिनाब नदीचे पाणी गहिरे आणि गार असल्याने मराठी फौजेला चिनाब उतरण्यास वेळ लागला. शेवटी ऑगस्ट महिन्यात मराठी फौज सिंधू नदी ओलांडून अटकेवर आली. शिंद्यांना बंदोबस्तासाठी ठेवून रघुनाथराव परतला.
नजीबखान रोहिल्याने अब्दालीकडे मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी लकडा लावला. दत्ताजी पंजाबात पहारे कायम करून शूकरतालला गंगेच्या काठावर आला. पण अब्दालीने पंजाबातील शिंदे यांचे पहारे उडवले आणि तो दिल्लीकडे सरकू लागला. ते पाहिल्यावर दत्ताजी शिंदे यमुना ओलांडून तिच्या पश्चिम तीरावर आला. बुराडी घाट, जगत्पूर, मजनूका टीला, गौरीपूर, सनावली, अंधेरा येथे त्याने तीरावर आणि उतारावर पहारे ठेवले. पण अब्दाली बुढियाहून यमुना ओलांडून अंतर्वेदीत आला. तो यमुनेच्या पूर्व तीरावर येऊन थांबला. शिंद्यांच्या लोकांनी तोंडे वळवली आणि यमुनेच्या पश्चिम तीरावरून ते पूर्वेकडे पाहू लागले.
10 जानेवारी 1760 या दिवशी अचानक अब्दालीने चार ठिकाणाहून यमुना ओलांडली आणि तो पश्चिम तीरावर आला. तेव्हा झालेल्या लढाईत बयाजी शिंदे, दत्ताजी शिंदे हे पडले. शिंद्यांचा गोट पार लुटला गेला. नजीबखान रोहिल्याच्या सांगण्यावरून अब्दाली परत गेला नाही तो दुआबातच राहिला. पानिपतची ही नांदीच होती.


Purchase Panipat book here

No comments:

Post a Comment